Homeनागपूर न्यूजस्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांचा ६,२०२ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प

स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांचा ६,२०२ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प

Advertisements
नगरसेवकांच्या विकास निधी आता २५ लाख रुपयांचा

सर्वसामान्य  जनतेसाठीचा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प- महापौर निता ठाकरे
नागपूर, ता. २७ जून २०२६: नागपूरकर नागरिकांवर कोणताही कराचा वाढीव बोजा न टाकता समाजातील सर्व घटकांना विकासाच्या साखळीमध्ये सामावून घेत महापौर माहेर योजना, मजुरांसाठी ठिय्या, स्मार्ट प्रभाग, सावजी बुनकर व मारबत महोत्सव, उद्याने व मैदानांचा विकास तसेच नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कर्ज रोखे काढून रू. २०० कोटी उभारणार आहे. अशा नव्या संकल्पांसह स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी ६,२०२ कोटी ९९ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प आज (ता. २७) महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर श्रीमती निता ठाकरे यांना  सादर केला. याचवेळी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सादर केला.
गेल्या 19 मे रोजी स्थगित झालेली मनपाची विशेष सभा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे होत्या. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्ष नेता  संजय महाकाळकर, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त  मिलिंद मेश्राम यांच्यासह मनपाचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
मनपा स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षात मनपाचे आर्थिक उत्पन्न ५,६९० कोटी ६७ लाख राहणार असून सुरूवातीची शिल्लक ५१२ कोटी ६१ लाख रुपये मिळून एकूण उत्पन्न ६,२०२ कोटी ९९ लाख रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहे. यात ६,२०२ कोटी ४८ लाख रुपये खर्चाच्या बाजूला राहणार असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस मनपाच्या तिजोरीत ५०.१८ लाख रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(छायाचित्र : असा येईल रुपया)

केंद्र व राज्य सरकारचे अनुदान तसेच मनपाच्या  आर्थिक स्त्रोतामध्ये वाढ करण्याचा संकल्प करून नागपूरच्या  प्रत्येक घटकासाठी व शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा भौतिक विकास करताना नागपूर शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन शहराला विकसित शहराच्या यादीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील सर्व महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांची राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरला कर्करोग मुक्त करण्यासाठी आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच महापौर हर्ष, मुस्कान योजना अंतर्गत १८ वर्षांखालील मुलींचे दातांवर उपचार  करण्यासाठी  रू.२५ लक्षाचे अनुदान दिले जाईल.

(छायाचित्र : असा जाईल रुपया)

नगरसेवकांचा विकास निधी २५ लाखाचा-
स्थायी समितीच्या सभापती  शिवानी दाणी-वखरे यांनी प्रभागामध्ये विकास कामावर खर्च करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा-
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मनपा मुख्यालय परिसर व वर्धमान नगर येथील शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणार असून, याकरिता अर्थसंकल्पात ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
DUCTING POLICY-
२०१५ साली १००० कि.मी. च्या वर फायबर ऑप्टीक केबल चे जाळे स्मार्ट सिटी द्वारे पसरविण्यात आले होते. याची सुस्थिती व दुरुस्ती व नवनिर्माण करणे आवश्यक आहे. परंतु महानगरपालिकेचा कुठलाही आर्थिक खर्च न करता आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करता येईल. याद्वारे मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल. याद्वारे जमिनीखालील युटिलिटी सुव्यवस्थित होतील तसेच आकाशातील तारांचे जाळे कमी होण्यास आणि भविष्यात संपण्यात मदत होईल. त्यामुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात वाढ होईल.
७५० एमएलडी पाण्याची उपलब्धता नागपूर महानगरपालिकेद्वारे असल्याने सद्य स्थितीत गरज ही तेवढी नाही, नजीकच्या भविष्यात ऑरेंज सिटी बोटलिंग प्लांट टाकून त्याद्वारे अधिक उत्पन्न महानगर पालिकेला मिळेल, असा मानस आहे. तसेच पाणी बिलावर जाहिरातींच्या माध्यमातून सुद्धा उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाचे शताब्दी संग्रहालय-
नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त नागपूर महानगरपालिका या आर्थिक वर्षात संग्रहालय निर्माण करणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार शताब्दी संग्रहालय तयार करण्यात येणार असून याकरीता आवश्यक ती आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे.
नागपूर शहराचा मागील ३०० वर्षाचा इतिहास ऑडीओ व्हिज्युअल रूपात जनतेला बघायला मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव मिळावा याकरीता हेरीटेज दर्जा प्राप्त असलेल्या जुन्या ऐतिहासक नगरभवन सभागृहामध्ये Experience Centre तयार करण्यात येणार, आहे. जी नागपूरच्या पर्यटनात विशेष भर घालणार आहे.
२०० क्रीडा मैदानाचा विकास तसेच भव्य क्रीडा संकुल-
 मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस व केन्द्रीयमंत्री नितिनजी गडकरी यांच्या सूचनेनुसार २०० क्रीडा मैदानाचा विकास करण्याचे उद्दिष्टे महानगर पालिके समोर ठेवले आहे. त्यापैकी या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये ७५ क्रिडामैदानाचा विकास करण्याचा या स्थायी समितीचा मानस आहे.
शहरातील क्रीडा विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात् रु. ४५.०० कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच नागपूर शहरामध्ये नव्याने भव्य क्रीडा संकुल तयार करण्यात आले असून ते नियमित सुरु आहे. खेळाडूंना या संकुलामध्ये सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध आहे.
५ रस्त्यावर पे ॲण्ड पार्क योजना-
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी शहरातील प्रमुख मागांमध्ये Pay & Park साठी ५ रस्ते नियोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. हा उपक्रम प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल, ज्यामुळे त्याची परिणामकारकता आणि नागरिकांचा प्रतिसाद यांचे मूल्यमापन करता येईल. या उपक्रमामुळे अव्यवस्थित पार्किंगला आळा बसेल, वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुलभ व शिस्तबद्ध पार्किंग सुविधा उपलब्ध होतील. प्रायोगिक टप्पा यशस्वी ठरल्यास, समग्र पार्किंग धोरण (Parking Policy) तयार करण्यात येईल
वार्डातील लोकोपयोगी कामाकरिता २५.०० लक्ष निधी-
या अर्थसंकल्पात वार्डातील लोकपयोगी कामांकरिता जो प्रभाग निधी प्रस्तावित करण्यात येतो रु. २५.०० लक्ष प्रभागातील प्रति सदस्याप्रमाणे राखीव ठेवण्यात आलेला आहे. तसेच मागिल आर्थिक वर्षाच्या अपूर्ण राहीलेल्या ज्यांचे कायदिश झालेले आहे परंतु काम सुरू झाले नाही व ज्या प्रकरणात निविदा प्रक्रीया पुर्ण झाली व विभागाने कायर्यादेश निर्गमित केले नाही अशा सर्व कामांकरीता बांधील खर्चासहीत रू. ४१.३८ कोटीची या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.
रेन वॉटर हारवेस्टींग व वॉटर-
शहरातील ग्राहक दररोज १ लाख लिटर पेक्षा जास्त पाणी वापरतात (५४ ग्राहक) असे सर्व ग्राहकांना त्यांच्या परिसरात ई.टी.पी. किंवा एस.टी.पी. यावर्षी बसविण्याबाबतची ताकीद देण्यात आलेली आहे. सर्व शासकीय कार्यालयाला त्यांच्या परिसरात रुफ टॉप वॉटर हारवेस्टींग करण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील भूजल पातळीमध्ये बाढ व्हावी यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या इमारती, बगीचे यात रेन बॉटर हार्वेस्टींगची कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरात रस्त्यालगत २०९ जागी Recharge shaft प्रणाली विविध ठिकाणी पाऊस पाणी संकलन करण्याचे प्रस्तावित आहे.
येथून पुढे टप्पा ५ किंवा मोठे, लहान रस्ते, पॉलीसी म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी कटाक्षाने करण्याचे निर्देश दिले जातील, हे सध्या लोकसहभागातूनच – होणे असल्याने, सर्व लोकप्रतिनिधी आणि जनता ह्यांच्या मदतीने हे साध्य करण्याचे उद्देश ठेवले आहे.
महापौर नेत्र ज्योती योजना-
संपूर्ण देशात बऱ्याच प्रमाणात मोतीया बिंदुचे रुग्ण निघत आहे. जर त्यांचेवर वेळीच मोतीया बिंदुची शस्त्रक्रिया झाली नाही तर त्या व्यक्तीचे जिवनात अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना म्हणून नागपूर शहरात प्रत्येक प्रभागात मोतीया बिंदु शस्त्रक्रिया संबंधाने नेत्र तपासणी
शिबीरे आयोजीत करुन त्या रुग्णांची मोतीया बिंदु शस्त्रक्रिया निःशुल्क करण्याचा आमचा मानस आहे. शस्त्रक्रिये नंतर त्यांना चष्मा सुध्दा निःशुल्क पुरविण्याची जबाबदारी महानगरपालिका घेत आहे. ही योजना सुध्दा महात्मे नेत्रपेढी व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्तीक उपक्रम राहील. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची व्यवस्था सी.एस. आर. निधी किंवा शासनाच्या विविध योजना मधून करण्याची जबाबदारी महात्मे नेत्रपेढी या संस्थेची राहील.
 मनपातील  विधानसभा क्षेत्रात १२ नव्या दमाच्या युपीएससी-
मनपातील ६ विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी २ युपीएचसी चे प्रोटोटाइप निश्चित करून, १२ नव्या दमाच्या युपीएचसी तयार करण्याचा मानस असेल. त्या साठी विशेष तरतूद ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षात ५३ युपीएचसी नवनिर्मित करून जनतेच्या चांगल्या आरोग्य साठी प्रयत्न करण्याचा मानस आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा-
शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा यामध्ये जेष्ठ नागरिकांचे हेल्थ कॅम्प घेणे, ज्येष्ठ नागरिकांच्या सहली आयोजीत करणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे शिबीरांचे आयोजन करणे व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा देणे. ही सर्व कामे एनजीओ व मनपा यांचे संयुक्त विद्यमाने समाज कल्याण विभागाचे माध्यमतातून राबविण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कार्यासाठी प्रत्येक नगरसेवकांचे माध्यमातून खर्च करण्यासाठी रु. २ लक्ष निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
 प्रत्येक नगरसेवकांनी प्रभागात ज्येष्ठ नागरिकांचे विभागाच्या माध्यमातून गट निर्माण करण्यात येईल व  व त्या गटांना वरील सुविधांचा लाभ मिळेल, यामुळे ज्येष्ठ नागरिकामधील नैराश्याची भावना दुर होऊन एक सुखद आयुष्य जगण्यास मनपा.च्या या प्रकल्पाव्दारे मदत होईल
माजी महापौर पुष्पाताई घोडे सायकल बँक योजना-
महानगरपालिका क्षेत्रातील या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ प्रतिभावान व हुषार मुलींना या सायकल देण्यात येतील. त्यामुळे या विद्यार्थीनींना चालना मिळेल.
प्रती विधानसभा २ अशा १२ शाळा पुनर्निर्माण-
प्रती विधानसभा २ अशा १२ शाळा पुनर्निर्माण करणार आहे. शासन आणि महानगरपालिका असे मिळून ते करणार असून मनपा द्वारे ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सर्वंकष व सर्वस्पर्शी अर्थसंकल्प – महापौर
स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी यावर्षी सादर केलेला मनपाचा अर्थसंकल्प सर्वसामान्याच्या जनतेला दिलासा देणारा व सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महापौर निता ठाकरे यांनी व्यक्त केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………

Latest बातम्या