(भाग-३)
नागपूर,ता.१४ एप्रिल २०२६: शा भोसले आणि आर.डी.बर्मन(पंचम दा)यांची जोडी भारतीय संगीतसृष्टितील आणखी एक सर्वात कर्णप्रिय,रोमँटिक व प्रतिभावान जोडी समजली जाते.
आशा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहील्या भेटीविषयी सांगितले होते.आर.डी यांनी आशाबाईंना पहिल्यांदा एका स्टूडियोमध्ये पाहिले होते.तेव्हा त्यांनी आशाबाईंना ऑटोग्राफ मागितला होता.आर.डींनी आशाबाईंचे मराठी नाट्यसंगीत रेडिओवर ऐकले होते.
या भेटीबद्दल सांगताना आशाबाई सांगतात की,जाड चष्मा घातलेला सडपातळ तरुण माझ्या जवळ आला व त्याने माझा ऑटोग्राफ मागितला,त्याने माझे मराठी नाट्यसंगीत रेडिओवर ऐकले होते.दोघांची मैत्री वाढत असताना आशाबाईंना समजलं की बर्मन यांनी कोलकाता येथील महाविद्यालय सोडलं आहे.बर्मन यांच्या भवितव्याबद्दल आशाबाईंना काळजी वाटली.त्यांनी पंचमला पदवी परिक्षा पूर्ण करण्याचा सल्ला दिला.मात्र,या सल्ल्यानंतर पंचम हे आशाबाईंवर नंतरची रेकाँडिंग पूर्ण होईपर्यंत नाराज होते.
सुरवातीला व्यवसायिक संबंध असलेल्या या दोघांची मैत्री नंतर प्रगाढ भावबंधनात बदलली.आशाबाईंचे वैयक्तिक आयुष्य खूप चढउतारनी भरलं होतं. आर.डी.ही अशी विभूती होती ज्यांनी आशाबाईंची ओळख ‘जॅझ’आणि ‘कॅबरे’सारख्या नवीन संगीत प्रकाराशी करुन दिली होती व यात प्रयोग करण्यास प्रोत्साहित केले.यामुळे देखील आशाबाईंना लता मंगेशकर यांच्यापेक्षा वेगळी ओळख भारतीय सिनेमाच्या संगीतक्षेत्रात निर्माण करता आली जी सिनेप्रेमींच्या काळजात कायमची रुजली.पिया तू अब तो आजा,दम मारो दम,चुरालिया है तुमने जो दिल को,ही गाणी कोण विसरेल?
आर.डी आणि आशाबाई हे एक असे जोडपे होते ज्यांनी वयाच्या परिपक्वतेकडे झुकलेल्या वयात लग्नगाठ बांधली.आशाबाई तेव्हा ४७ वर्षांच्या होत्या.१९८० मध्ये त्यांनी लग्न केले,त्या पूर्वी आशाबाईंचे संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्यासोबतचे ऋणानुबंध १९७२ साली संपुष्टात आले होते.अशी देखील चर्चा आहे की आशाबाईंनी नय्यर यांना आर.डी त्यांच्या जीवनात आल्यानंतर सोडले कारण पंचम दा हे आशाबाईंना १९६६ सालीच तिसरी मंजिल चित्रपटाच्या संगीत निर्मितीच्या वेळी भेटले होते.तत्पूर्वी आशाबाईंनी पंचमचे वडील सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती.यातूनच त्यांचा पंचमसोबत परिचय झाला.
त्यामुळे आशाबाईंनी पंचममुळे ओ.पी.नय्यर यांना सोडले अशी चर्चा घडते.याचा खुलासा मात्र,आशा,पंचम किंवा नय्यर या तिघांनीही आयुष्यभर केला नाही.यात तथ्य असो किंवा नसो मात्र, ओ.पी.नय्यरसोबत आशाबाईंचं नातं हे पंधरा वर्षे राहून देखील नय्यर आशाबाईंसोबतच्या नात्याला कायदेशीर सुरक्षीतता व सन्मानजनक नाव देण्यास असमर्थ होते.एका निश्चित टोकावर आशाबाईंना त्यांच्या अगतिकतेची जाणीव झाली तेव्हा या नात्यात त्यांना कोणतेही भविष्य दिसलं नाही आणि त्यांनी नय्यर यांच्यासोबत काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
आधीच आशाबाई पहिल्या लग्नाने नखशिखांत पोळल्या होत्या.जीवनात त्यांनी लग्न या नात्यात खूप दु:खं सहन केले होते.त्या नरकरुपी नात्यातून बाहेर पडून जिद्दीने आपल्या तिन्ही मुलांचे उत्तम संगोपन त्यांनी केले.त्यांच्या स्वभावातील जिद्द ही एकमेव अशी गोष्ट होती ज्यासमोर परिस्थितीही हार मानत होती.ओ.पी.नय्यरसोबत इतक्या प्रदीर्घ काळाचं नातं संपुष्टात आणनं ही सोपी आणि सहज गोष्ट नव्हती. मात्र,त्यांच्यातील जिद्द यामुळेच त्यांना त्यातून बाहेर पडणं शक्य झालं.
१९६० ते १९९० या तीन दशकांमध्ये आर.डी बर्मन यांनी त्यांच्या जगावेगळ्या संगीताच्या जादूने संगीतप्रेमींना वेड लावले होते.आशाबाईंना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यास आर.डींचा हात होता जरी ओ.पी.नय्यर हे आशाबाईंच्या सांगितिक कारकीर्दीचा पायवा ठरले होते.आर.डी बर्मन यांनी जवळपास ३३१ सिनेमांना संगीत दिले हाते.१९६० ते १९९० चा काळ हा पंचमदांचा काळ मानला जातो.ते देशातील सर्वाधिक यशस्वी संगीतकार मानले जातात.त्यांनी संगीतात इतके प्रयोग केले त्याची गणनाच होऊ शकत नाही.संगीताच्या दूनियेत त्यांनी फक्त स्वत:ची ओळख निर्माण केली नाही तर किशोर कुमार आणि आशा भोसले यांना देखील गायन क्षेत्रातील सुपरस्टार बनवले.
पंचमदांचा जन्म २७ जून १९३९ साली प्रसिद्ध संगीतकार सचिव देव बर्मन यांच्या घरी झाला.पंचम दा त्यांच्या ख-या आयुष्यातही खूप रोमँटिक आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाचे धनी होते.मात्र,ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या संगीताच्या जादूमध्ये चिंब भिजवले ते मात्र,आशा भोसले यांच्या प्रतिभेच्या व स्वभावाच्या ओलाव्यात चिंब भिजले होते.वयाने लहान असलेल्या पंचम आपल्या वडिलांच्या मोठ्या वारश्यात स्वत:ची वेगळी ओळख शोधत होता.कोणालाही कल्पना नव्हती पुढच्या काही वर्षात पंचम-आशाची जोडी सुरांचं एक नवं इतिहास घडवणार होती.
१९६६ साली ‘तिसरी मंजिल’ हा नासिर हुसैन यांच्या चित्रपटातून त्यांचा पहिला सांगितीक प्रवास सुरु झाला.याच चित्रपटाच्या वेळी त्यांच्यात रचनात्मक आणि रुमानी नात्याची पायभरणी झाली.एका बाजूला ‘ओ मेरे सोना रे सोना’चा रुमानी रुसवा आणि मनधरणी होती तर दुस-या बाजूने ‘ओ हसीना जुल्फोवाली’ची धडधडती लय,ज्यात आशाने आपल्या श्वासांवर ज्या जादुई नियंत्रणाने सुरांची गुंफन केली,त्याने सगळ्यांना थक्क केले.
पंचम जेव्हा सिनेजगतात आले तेव्हा त्यांच्या मनात जगभरचं संगीत घोळत होतं.त्यांना हिंदी सिनेमात फंक,जॅझ,कॅबरे आणि रॉक-अँड-रोल आणायचं होतं.पण या सगळ्या गुंतागुंतीच्या धूना साकारण्यासाठी त्यांना एक असा आवाज हवा होता,जो लवचिक असेल आणि ज्यात धाडस असेल.तो आवाज होता आशा भोसलेंचा.
पंचमने आपल्या संगीतामध्ये पाश्चात्य रंग मिसळले,तर आशाच्या आवाजाने त्या संगीताला एक बेधडक आकर्षण आणि मुक्ततेची झलक दिली.पण पंचमची नजर फक्त धडाकेबाज गाण्यांपुरती मर्यादित नव्हती.त्यांनी आशाच्या आवाजातील त्या खोल आणि नाजूक पैलूंनाही खूप चांगल्याने ओळखलं होतं,जे आधी फारसे समोर आले नव्हते.एका बाजूला ‘पिया तू अब तो आजा’,दम मारो दम’दूनिया में लोगो को धोका कभी हो जाता है,’यांनी आशाला आधुनिक,कॅबरे स्टाईलची गायिका म्हणून ओळख दिली तर दूसरीकडे ‘मेरा कुछ सामान’आणि ‘खाली हात शाम आई है’सारख्या गीतांनी दाखवून दिलं की,आशाबाईंचे सूर किती खोलवर वेदना व्यक्त करु शकतात. या संपूर्ण जुगलबंदीत आशाबाईंनी स्वत:ला प्रत्येक साच्यात बसवलं,कॅबरेची चंचलता असो,गझलेचं थांबलेपण असो किवा शास्त्रीय,उपशास्त्रीय बंदिशींची गुंतागुंत.
.
संगीताच्या याच सुरेल प्रवासात जेव्हा पंचमनी आशाबाईंना लग्नाची मागणी घातली होती तेव्हा एका झटक्यात आशाबाईंनी लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता.अनेक वर्ष पंचमदांसोबत नात्यात राहल्यानंतर वयाच्या ४७ व्या वर्षी आशाबाईंनी पंचमदांसोबत दुसरं लग्नं केलं.पंमम दा यांचंही हे दूसरं लग्न होतं.पहिलं लग्न रिटा पटेलशी झालं होतंं मात्र,त्यांचा घटस्फोट झाला होता.घटस्फोटानंतर पंचम दा त्यांच्या आयुष्यात एकटेच होते.पंचम दा आणि आशाबाई दोघेही मनाने परिपक्व होते.दोघांनाही घटस्फोट,लग्नं,नाते,विश्वास,विभक्त होणे याचा पुरेपूर अनुभव होता.पंचम दा आशाबाईंपेक्षा ६ वर्षांनी लहान हाेते मात्र,सूर आणि तालाची इतकी पारलौकिक जुगलबंदी या दोघांमध्ये रंगली होती की त्यांना परस्पर विभक्त करने किंवा संबोधनेही कठीण झाले होते.
या दोघांचीही संगीत आणि आयुष्याची जुगलबंदी अशी होती की एकदा आर.डींनी आशाबाईंच्या वाढदिवसाला चक्क त्यांना झाडू भेट म्हणून दिला होता,कारण आशाबाईंना स्वच्छतेची खूप आवड होती.आशाबाई जिद्दी होत्या व लग्नाला नकार देण्याचं कारण जरी वेगळं होतं तरी पंचम दा देखील शेवटी लीलया तालासोबत खेळणारे मुरलेले संगीत दिग्दर्शक होते,त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले.अखेर १९८० साली त्यांनी लग्नं केलं.या लग्नासाठी लता मंगेशकर यांनी देखील आशाबाईंचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
लताबाई व पंचमदा यांनी देखील अनेक सुपरहिट गाणी दिली होती.लता बाई यांनी चैतन्य पादुकोण यांच्या ‘आर. डी बरमानिया’या पुस्तकात पंचमदां सोबतच्या त्यांच्या अतुट नात्याचा उल्लेख केला.लताबाईंने सांगितले की जेव्हा पंचम आणि आशाचं लग्न झालं तेव्हा पंचमने लताबाईंना सांगितले की आम्हाला तुझ्याकडून कोणतंही महागडी भेटवस्तू नको आहे. काही द्यायचंच असेल तर माझ्यासाठी एक समुपदेशन पत्र लिहा आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी मी काय करावं आणि काय करु नये,ते मला सांगा.पंचमदांनी लताबाईंचे ते पत्र आयुष्यभर लॉकरमध्ये सांभाळून ठेवलं.
आर.डी आणि आशाबाईंची अविट गोडीची अनेक हिंदी गाणी अजरामर झाली आहेत.चुरा लिया है तुमने जो दिल को(चित्रपट-यादो की बाराम १९७३)पिया तू अब तो आजा(कारवां १९७१)दम मारो दम(हरे रामा हरे कृष्णा १९७१)ओ मेरे सोना रे सोना रे(तिसरी मंझिल १९७६)दो लफ्जो की है दिल की कहानि(द ग्रेट गॅम्बर १९७९)जाने जां ढूंढता फिर रहा(जवानी दिवानी १९७२)आओ ना गले लगाओ ना लगी बुझाओ ना(मेरे जीवनसाथी १९७२)ये लडका हाय रे अल्लाह कैसा है दिवाना(हम किसी से कम नही १९७७)राेज रोज आंखों तले एक ही सपना चले(जीवा १९८६) .
या जोडीने वेस्टर्न म्युझिक,कॅबरे आणि रोमँटिक अशा विविध धाटणींची गाणी गाऊन बॉलिवूडच्या संगीत क्षेत्रात अक्षरश: क्रांतीच घडवून आणली होती. एका मुलाखतीत आशाबाई म्हणाल्या होत्या,पंचमना भेटेपर्यंत आपण इतक्या ताकदीने आणि विविधतेने गाऊ शकतो,याची मला कल्पनाच नव्हती.ओ.पी.नय्यर यांनी प्रस्थापित केलेल्या आशाबाईंच्या गळ्याला एका धाटणीत न अडकवता वैविध्यात रमविले ते म्हणजे आर.डी.बर्मन यांनी.
आर.डींसोबत आशाबाईंनी मराठीत देखील ‘सावधानतेचा मी देते इशारा’(चित्रपट-सुखी संसाराची बारा सूत्रे)रम झुन झुन ऐकाना माझिया,संध्यावेळी तुझे माझे,सांज ये गोकुळी सावळी सावळी,अशी लोकप्रिय भावगीते गायली आहेत.
या जोडीचं एक विलक्षण गाणं म्हणजे ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’.हे गीत गुलजारने लिहलं असून १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘इजाजत’चित्रपटातलं आहे.जेव्हा हे गाणं आर.डीं.समोर आलं तर त्यांनी अक्षरश: एखाद्या लेखासारखं असलेल्या या गाण्याचा कागद भिरकावून दिला.याला चाल तरी कशी लावणार?असा संताप आर.डींनी व्यक्त केला.हे गाणं गुलजार यांनी नेहमीसारखंच खूप संवेदनशील शब्दात शब्दबद्ध केलं होतं.नायक नसीरुद्दीन शहाच्या पूर्वाश्रमीच्या जीवनात आलेली प्रेयसी माया ही,त्याच्या लग्नानंतर त्याला पत्र पाठवून त्याच्याकडे असलेलं तिचं सामान परत मागत असते.यामध्ये ११६ चांद की राते एक तुम्हारे कांधे का तिल,सावन के भीगे दिन,गीली मेंहदी,पतझड के पत्ते,एक अकेली छत्री मे आधे आधे भीगना,अश्या या तिच्या अनेक आठवणीतील क्षण परत मागत असते.ही तिची आठवणीतली यादी असते.
मात्र,आर.डींनी भडकून गुलजार यांना तिरकस प्रतिक्रिया देत ‘हा काय कचरा आणला आहे?असे सुनावले.याला मी कशी चालबद्ध करु?हा किस्सा स्वत: गुलजार यांनीच एका मुलाखतीत ऐकवला आहे.पंचमचा माझ्यावर विश्वास होता,मी काही तरी विचित्र लिहतो यावरही त्याचा विश्वास होता.कदाचित तो बरोबरही असेल. ज्यावेळी मी त्याला ‘मेरा कुछ सामान’हे गीत लिहून त्याला दिले त्यावर तो ‘हा सीन चांगला आहे’असा म्हणाला.यावर मी त्याला,‘हा सीन नाही गाणं आहे’असं सांगितलं.त्याने गाण्याचा कागद उचलला आणि म्हणाला,हा कसला कचरा आहे?तू काहीही उचलून आणले , गाणे बनवायचे म्हटले तर मी बनवू का?तू विचित्र मित्र आहेस,तुला काही काळत नाही.उद्या तू टाईम्स ऑफ इंडियामधील एखादा लेख आणशील आणि म्हणशील की याचं गाणं तयार कर,हे कसं होईल?पण.पंचमने एवढं बोलूनही अखेर त्याने ते गाणे तयार केले याचे एकमेव कारण म्हणजे…त्याचा माझ्यावर विश्वास होता.
आशाबाईंना जेव्हा पंचमदांनी चाल बांधल्यानंतर हे गाणं ऐकवलं तेव्हा त्या देखील खूप हसल्या होत्या. पंचमदा त्यांना वारंवार गंभीर होण्यास सांगत होते मात्र आशाबाईंचे हसणं काही केल्या थांबत नव्हतं.यानंतर मात्र त्यांनी या नॉन-मेट्रिकल(गद्य)शब्दांना खूप भावूक होऊन गाण्याचा निर्णय घेतला व शानदार गायल्या.हे एक कल्ट -क्लासिक गाणे बनले. या गाण्यासाठी आशाबाईंना सर्वोकृष्ट गायिकेचा तर गुलजार यांना सर्वोकृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.आशाबाई गीतकाराचे शब्द अजरामर करणारीच नव्हे तर लौकिकार्थाने काव्य किंवा नादमय नसलेल्या गाण्यातही जीव ओतणारी गायिका होती,हे सिद्ध झालं.
‘मेरा कुछ सामान’मूळात हे गाणंच नव्हतं.ते मुक्तछंदात लिहलेलं काव्यच होतं.मात्र या गद्याला, पद्यात उतरविण्याचे सामर्थ्य आशाबाईंमध्येच होतं.पंचमदांनी या गाण्याची खूप आत्मीय धून तयार केली.हे गाणं खूप विचित्र आणि कठीण आहे.या गाण्यात पंचमदांनी खूप लहान-लहान गोष्टींवर भर दिला.टोनी वाझने या गाण्यात गिटारचा खूप शानदार वापर केला जो नंतर तबल्याच्या मुख्य लयीत मिसळून जातो.आशाबाईंनी हे गाणं इतक्या आत्मीयतेने आणि रुहानियतने गायलं की आजही हे गाणं म्हणजे गायकीचं एक आदर्श उदाहरण मानल्या जातं.
मात्र,पंचम आणि आशाबाईंचा वैवाहिक प्रवास अवघ्या १४ वर्षांचाच राहीला.आर.डी.म्हणजे राहूल देव बर्मन यांनी ४ जानेवरी १९९४ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला आणि हा महान संगीतकार कायमचा आशाबाईंपासून दूर झाला.आर.डींच्या निधनानंतर आशाबाई त्यांच्या अंतिम दर्शनाला देखील गेल्या नव्हत्या आणि यावर खूप टिका झाली होती मात्र,आशाबाईंनी पंचमदाला मृत अवस्थेत पाहण्यास नकार दिला होता कारण त्यांना पंचमला आपल्या स्मरणात जिवंत पहायचं होतं.त्या शेजारच्या खोलीतून शेवटपर्यंत बाहेर आल्याच नाहीत.
आर.डी.बर्मन यांचे शेवटचे दिवस हे व्यवसायिक संघर्ष,एकाकीपण आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांनी ग्रासलेलं होतं.त्यांना मद्याचे आणि सिगारेटचे अति प्रमाणात सेवन यावर मात करता आली असती तर ते अधिक काळ जगू शकले असते,असं आशाबाईंना वाटायचं.शेवटच्या क्षणी पंचम दा म्हणाले,त्यांना छातीमध्ये खूप दुखत आहे,ते आशाबाईंचे नाव घेण्यासाठी फक्त आ…आ..घेण्याचा प्रयत्न करत होते,पण आशाबाईंचं नाव ही पूर्ण घेऊ शकले नाहीत!
आर.डींचा शेवटचा चित्रपट ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’हा होता.हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.या चित्रपटाच्या संगीतासाठी फार उशिरा आर.डींना सन्मान मिळाला.कुछ ना कहो कुछ भी ना कहो,प्यार हूआ चूपके से,इक लडकी को देखा तो ऐसा लगा,कोण विसरु शकतो ही गाणी?या चित्रपटातून त्यांच्या सांगितिक कारर्कीदीचे पुर्नगमनच झाले होते मात्र,त्याचा आनंद घेण्यासाठी आर.डी.कुठेही नव्हते….!या चित्रपटातलं संगीत हे मास्टरपीस ठरले.
या चित्रपटातील ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा’गाण्याच्या रेकाँडिंगच्या वेळी कुमार सानू हे जसे होते तशाच अवतारात आले होते.त्यांनी दाढी देखील केली नव्हती.आपल्या इतक्या रोमाँटिक गाण्याच्या प्रति गायक सानूचा हा अवतार बघून पंचमदा भडकलेच आणि त्यांनी कुमार सानूला आधी दाढी करुन येण्यास सांगितले.सानू यांनी त्यांच्या शब्दाचा मान राखत आधी दाढी केली,नीटनेटके होऊन आले व यानंतर एकाच टेकमध्ये त्यांचे हे गाणे रेकॉर्ड झाले,अशी आठवण कुमार सानू यांनीच एका वाहीनीवरील संगीत स्पर्धेच्या वेळी सांगितली.
हा एक किस्सा पंचम हे आपल्या संगीताप्रती असो किंवा नात्याप्रती किती समर्पित होते,हे सिद्ध करतं.
(वाचा भाग-४ मध्ये अाशा,जीवन आणि कंट्रोवर्सीज)
पंचम दा यांच्या निधनानंतरही आशाबाईंनी आपले गाणे सुरुच ठेवले.आशाबाई नेहमीच सांगायच्या त्या संगीत क्षेत्रातील ‘शेवटच्या मुघल’आहेत.


आमचे चॅनल subscribe करा
