Homeblogआशा: यासाठी सुटला ओपींचा साथ

आशा: यासाठी सुटला ओपींचा साथ

(भाग-२)

नागपूर,ता.१३ एप्रिल २०२६: रंगेल,रगेल स्वभावाचे ओ.पी.नय्यर स्वत: सांगायचे माझ्या आयुष्यातील स्त्रिया याच माझ्या गाण्यामागील प्रेरणा आहेत.माझ्या व्यक्तिमत्वात जो बदल घडला त्यात त्यांचे योगदान आहेच,प्रणय हा माझ्या आयुष्याचा पाया आहे.तो माझ्या चालीतही उतरला,माझे संगीत तरुण आहे.ओ.पी.यांचे पूर्ण नाव ओंकारप्रसाद नय्यर होतं.
आईये मेहरबां,इशारो इशारो में दिल लेनेवाले,दिवाना हूआ बादल,आओ हूजूर तुमको,इक परदेसी मेरा दिल ले गया,जाईये आप कहाँ जायेंगे,रेशमी सलवार कुर्ता जाली का, हौले हौले साजना,झूमका गिरा रे,ये है रेशमी जुल्फो का,अशी अनेक चिरतरुण गाणी याची साक्ष देतात.ओ.पी.यांनी कधीही लता मंगेशकर यांच्यासोबत काम केले नाही.नय्यर यांच्या लहरी प्रतिभेने लता मंगेशकर यांना त्या चंचल संगीतकारासोबत काम करण्याची जोखीम पत्करण्याइतके प्रभावित केले नव्हते.नय्यर हे सिनेजगतातील एकमेव असे संगीतकार होते ज्यांच्या गाण्यात लताबाईंचा आवाज नाही.हा एक रेकॉर्ड ठरला.याविषयी अनेकदा आेपी आणि लताबाईंना विचारणा झाली.यावर ते दोघेही सांगतात की आम्हाला एकमेकांसोबत काम करण्यात कोणतीही अडचण नव्हती फक्त आमचा स्वभाव मिळत नव्हता आणि नशीबातही नव्हते.‘आसमान‘चित्रपटात ओपींनी लताबाईंना एकमेव गाण्याची संधी दिली होती परंतू रेकॉर्डिंच्या वेळी लताबाईंची तब्येक खराब झाली व ते गाणं ध्वनिमुद्रित होऊ शकले नाही.
२००७ साली मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार नय्यर साहेबांना देण्याची घोषणा केली मात्र,नय्यर यांनी तो पुरस्कार नाकारला हे सांगत की मी कधीही माझ्या कारकीर्दीत लता मंगेशकरसोबत कामच केले नाही तर मी त्यांच्या नावाचा पुरस्कार कशा स्वीकारु शकतो?
आशा-नय्यर या जोडीने १९६२ ते १९७४ या २२ वर्षांच्या कालखंडात,६१ सिनेमात एकाहून एका सरस अश्‍या ३२४ गाण्यात साथसंगत केली.नय्यर यांच्या कारकीर्दीत रफी,गीता दत्त व शमशाद बेगम यांचेही योगदान असले तरी या तिघांच्याही गाण्याची बेरिज केली तरी ती,आशा-नय्यर एवढी होऊ शकत नाही.१९७३ साली प्रदर्शित झालेला ‘टॅक्सी ड्रायव्हर’हा जरी या जोडीचा शेवटचा सिनेमा असला तरी ’प्राण जाये पर वचन ना जाये’या सिनेमातील ’चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’हे गीत या जोडीचे शेवटचे गीत ठरले.
‘सोच कें दम घूटता है,फिर कैसे गुजर होगा,काश ना आती अपनी जुदाई मौत ही आ जाती’या अजोड संगीतमय व भावनिक नात्याची हे गाणं इतिश्री ठरली.१९५९ पासून सुरु झालेले हे नाते ५ ऑगस्ट १९७४ साली संपुष्टात आले.

या गाण्यासाठी आशाबाईंना फिल्मफेअरचा सर्वोकृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.तो त्यांनी नाकारला,इतकं वितुष्ट त्यांच्या नात्यात आलं होतं.परिणामी आयोजकांनी या गाण्याचे संगीतकार ओ.पी.नय्यर यांनाच तो मंचावर बोलावून बहाल केला व नंतर तो आशाबाईंपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.नय्यर यांनी तो स्वीकारला मात्र,या सोहळ्यानंतर घरी परतताना त्यांनी समुद्र किनारी कार थांबवून ते सन्मानचिन्ह समुद्रात भिरकावून दिले…..!
चैन से हमको कभी..या गाण्यात इतकी पराकोटीची आर्तता आहे की हे त्यांच्या नात्यातील अखेरचे गीत आहे हे या दोघांनीही माहिती होते. कदाचित यामुळेच या दोघाही महान कलाकारांनी या गाण्यात इतका जीव ओतला.या गाण्यात नय्यर यांनी पियानो नोट्स,चर्च बेल्स व असीम शांततेचा उपयोग केला आहे.आजही हे गाणं संगीतप्रेमींचं काळीज चिरुन जातं
शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही ओपींच्या अनेक मेलडीज या शास्त्रीय रागांवर आधारित आहेत.फागुन सिनेमातील जवळजवळ सर्वच गीते ही राग पिलूवर आधारित आहेत तरीही ती खूप वेगळी आहेत.
पिया पिया न लगे मोरा जिया(राग पिलू)अकेली हूँ मै पिया आजा(राग शिवरंजनी)फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो(यमन)आप युंही अगर हमसे मिलते रहे देखिये एक दिन प्यार हो जायेगा(राग देस)बेकसरी हद से(राग देस)ये है रेशमी जुल्फो का अंधेरा ना घबराईये(राग मधुवंती)मन मोरा बावरा(राग दरबारी कानडा)अशी अनेक अवीट गोडीची गाणी ऐकली की अचंबा वाटतो आणि लक्षात येतं की सप्तसूरांनी देखील या अवलिया संगीतकारावर आपल्या प्रेमाची उधळन केली यामुळेच अशी गाणी त्यांना साकारता आली.
१९७३ साली आशा-नय्यर यांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर नय्यर यांची कारकिर्द उतरायला लागली.ओपींच्या कारकिर्दीचा हा तिसरा टप्पा होता.या नंतरही त्यांनी १२ सिनेमात संगीत दिले मात्र ७० आणि ८० च्या दशकात काळ पूर्णपणे बदलला होता.या काळात संगीतातील मेलडी निघून गेली होती.हा अँग्री यनमॅन अमिताभ बच्चनचा काळ होता.
गीताचे रेकाँर्डिंग झाल्याबरोबरच वादकांना त्यांचा मोबदला देण्याची प्रथा ओपींनीच सुरु केली होती.म्युझिक प्लेयर्स असोसिएशन यासाठी आजही नय्यर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करते.५० च्या दशकात ओपींचे मानधन एक लाख रुपये हाेते जे त्याकाळी सर्वोच्च समजले जात होते.ओपींच्या यशाच्या काळात रेकॉर्डवर तसेच चित्रपटांच्या पोस्टरवर देखील ओपींचे नाव ठळकपणे असायचे आणि या नावावर सिनेमा चालायचा.‘आदमी का वक्त चलता है,आदमी नही चलता’यावर ओपींचा दृढ विश्‍वास होता.काळा पुढे कोणाचेही काहीच चालत नाही हे त्यांना माहिती होतं.
एक दिवस असाही आला की गृहकलहामुळे त्यांनी आपले घर सोडले होते.
ओपींना चार अपत्य होते परिणामी ते आशासोबत लग्न करु शकत नव्हते.त्यांना तीन मुले आणि एक मुलगी होती.त्यांच्या पत्नीचे नाव सरोज मोहिनी नय्यर होते.त्यांच्या कुटूंबाबद्दल खूप कमी माहिती मिळते कारण ते आपले वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवीत होते.नय्यर यांच्या पत्नीने आर्थिक कारण व मुलांच्या जबाबदारीतून नय्यर यांना घटस्फोट देण्यास साफ नकार दिला.आशाबाईंनी देखील त्यांच्या या अलौकिक नात्याला कायदेशीर नाव मिळेल यासाठी तब्बल १५ वर्षांची वाट पाहिली परंतु जेव्हा त्यांना कळले या नात्याला कधीही कायदेशीर नाव मिळू शकत नाही त्यांनी ओपींसोबत गाणी न गाण्याचा निर्णय घेतला.एका कटू वळणावर त्यांचे हे अतिशय सुरेल व सुंदर नातं संपुष्टात आलं.
आयुष्याची शेवटची १२ वर्षे ओपींनी एका मराठी कुटूंबात पेईंग गेस्ट म्हणून व्यतीत केली.ते जरी पेईंग गेस्ट म्हणून राहत असले तरी त्यांच्या अखेरपर्यंत नाखवा कुटूंबियांनी या महान संगीतकाराला घरातील सदस्याप्रमाणेच सन्मान आणि वागणूक दिली.
स्वाभिमान म्हणा किंवा अहंकार,ओपींनी कधीही जीवनात मागे वळून पाहिले नाही.अगदी शेवटच्या दिवसांतसुद्धा त्यांच्या आवाजात जरब होती.त्यांची मान ताठ होती.त्यांनी होमियोपॅथीचा अभ्यास केला होता.हाताला गुण होता.भविष्यशास्त्राची त्यांना चांगली जाण होती त्यामुळेच आयुष्यातील चढउतार त्यांनी तक्रार न करता झेलले.
२८ जानेवरी २००७ रोजी या महान संगीतकाराने शेवटचा श्‍वास घेतला.त्यांचा मृत्यूही तितकाच सहज आणि संयमी होता.त्यांच्या मानसकन्येने सांगितले की,हे इतके अनपेक्षत होते की आतापर्यंत हसत बोलत असलेले ओपी,दुस-या क्षणाला या जगात नव्हते….!‘
ओपींना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.त्यांच्या शेवटच्या दिवसांत दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे,‘इक रोज मैं हर आँख से छूप जाऊंगा लेकीन…धडकन में समाया हूं हर दिल में रहूंगा…दूनिया मेरे गीतो से मुझे याद करेगी..उठ जाऊंगा फिर भी इस महफिल में रहूंगा’.
ह्दयातून आलेले शब्दच अखेर सत्य झाले.आशाबाईंनी जरी १९७२ नंतर एकत्र काम करणे थांबवले असले तरी आशाबाईंनी नेहमीच ओ.पी.नय्यर यांच्यातील कलाकाराचा आणि त्यांच्यातील संगीतकाराचा आदर केला.ओ.पी.नय्यरच्या निधनानंतर आशाबाईंनी त्यांच्यासोबतच्या सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.नय्यर हेच त्यांच्या कारकिर्दीचे शिल्पकार होते,असे त्या म्हणाल्या.नय्यर साहेबांनी मला हातात घेईपर्यंत मी लता मंगेशकरसमोर काय होते?अशा शब्दांत आशाबाईंनी नय्यर यांच्या योगदानाचा गौरव केला होता.
नय्यर यांच्या संगीताची शैली(विशेषत:लोअर रजिस्टर)आशाबाईंना खूप आवडत असे.नय्यर हे प्रयोगशील होते आणि गायकाला गाण्यात प्रयोग करण्यास प्रोत्साहन देत असे,असे आशाबाईने सांगितले होते.नय्यर हे स्वत:उत्तम गायक होते त्यामुळेच ते गाण्यातील भावना उत्तम प्रकारे गायकांना समजावून सांगत असे,अशा शब्दात आशाबाईंनी शेवटपर्यंत नय्यर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली होती.

आज आशाबाई देखील अनंतात विलीन झाल्या.त्या पारलौकिक जगतात पुन्हा एकदा या दोन्ही महान कलावंतांची भेट झाली असावी.पुन्हा एकदा या अजोड,अविट गोडीच्या जोडीने ‘आओ हूजूर तुमको सितारो में ले चलूं’अशी सप्तसुरांची जुगलबंदी केली असावी आणि उपस्थित गंधर्वांनी त्यांच्यावर फूलांची उधळण केली असावी असा भास होतो.या दोन्ही महान कलावंतांच्या उपजत प्रतिभेला,त्याग व संयमी प्रेमभावनेला ‘सत्ताधीश’चा सलाम.
(वाचा भाग-३ मध्ये आशा व आर.डी.या अद्वैत जोडीचं नातं)
…………………………..
Advertisements

Latest बातम्या