Advertisements

साहित्य संघाची इमारत ६ वरुन करायची आहे २४ मजल्यांची!

आशुतोष शेवाळकर,गिरीश गांधी व भाजपविषयी साहित्यप्रेमींमध्ये प्रचंड रोष: डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशींचा दावा
नागपूर,ता.१५ मार्च २०२६: विदर्भ साहित्य संघाची निवडणूक आज रविवार दिनांक १५ मार्च रोजी होत आहे,आजच त्याचा निकाल देखील लागेल मात्र,उमेवारीचा अर्ज भरण्यापासून तर अगदी मतदानापर्यंत या निवडणूकीचे कवित्व संपले नसल्याचे दिसून पडतंय.मूळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोनवेळा प्रा.रविंद्र शोभणे व वि.सा.संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासोबत एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये बैठक झाली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.भालचंद्र श्रीपाद जोशी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगतात.मूळात ही निवडणूक साहित्य क्षेत्राच्या प्रसार-प्रचार आणि संरक्षण,संवर्धनासाठी होत नसून वि.सा.संघाच्या ६ मजली इमारतीसाठी होत असल्याचा खळबळजनक दावा ते पुन्हा करतात.
झांशी राणी चौकातून मेट्रो गेल्यामुळे एफएसआय वाढल्याने आता पूर्वीच्या सहा मजली इमारतीला २४ मजली करण्याचा घाट राजकीय नेता,बिल्डर व त्यांच्या उमेदवाराकडू रचला गेला असल्याचा थेट आरोप डॉ.जोशी करतात.प्रदीप दाते व रविंद्र शोभणे यांना वि.सा.संघाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष व सदस्य म्हणून पाच वर्षांची संधी मिळाली आहे.त्यांचा एकंदरित कारभार बघता,साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळी त्यांच्यावर नाराजच आहेत.शोभणे यांना मराठी विश्वकोष मंडळातील सहभागामुळे आधीच दहा लाख रुपये मिळाले आहे.दाते यांना देखील संधी मिळाली असल्याने या दोघांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीत पाठवण्याविषयी आमच्यात चर्चा झाली होती ,आता फक्त अध्यक्ष पदा ऐवजी वि.सा.संघाच्या कार्यकारणीत राहावे अशी बैठकीत चर्चा झाली आणि ते दोघेही यासाठी तयार देखील झाले होते.यावेळी १११ पैकी २१ सभासद व अध्यक्ष यांची बिनविरोध निवड होऊ द्या असे हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ठरले होते.
मात्र,वि.सा.संघाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसताच,बिल्डर शेवाळकरांनी यात मीठाचा खडा टाकला असल्याचा स्पष्ट आरोप डॉ.भालचंद्र श्रीपाद जोशी करतात.या निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील नाव गिरीश गांधींना उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं आहे.त्याचा त्यांनी खुलासा देखील केला मात्र,त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या संघठन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनी पक्षाच्या पदाधिका-यांना हाताशी धरुन नागपूरातील सहाही जिल्ह्यातील मतदारांना साम,दाम,दंड,भेदाच्या नीतीने प्रभावित करण्याचा प्रयत्न केला,असा आरोप डॉ.जोशी करतात.
साहित्य क्षेत्रातच नव्हे तर भाजपमध्येही अनेकांमध्ये त्यांच्या या कृत्यामुळे प्रचंड असंतोष असल्याचा दावा डॉ.जोशी करतात.भाजपच्याच एका बैठकीत विधान परिषदेच्या येत्या पदवीधर मतदारसंघ तसेच नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपच्या या संधीसाधू धोरणाचा फटका बसणार असल्याची चर्चा झाली,असे सांगण्यात येतं.भाजपचे संघटक मंत्री,भाजपचे एक आमदार जर सर्वस्वी साहित्य क्षेत्रातील असलेल्या निवडणूकीत राजकीय डावपेच खेळत असतील तर हा त्यांचा ‘आत्मघात’असल्याचे डॉ.जोशी सांगतात.गडकरी यांनीही याचा विचार करावा.
ही निवडणूक जिंकण्यासाठी ते इतके आसुसलेले आहेत की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरविणा-या प्रसार माध्यमांनी देखील सुरवातीला फक्त एकाच पॅनलचा प्रसार सोडून इतरांच्या बातम्यांवर जणू बहीष्कारच घातला होता.इतर पॅनलची एक ही बातमी प्रसिद्ध केली जात नव्हती.मूळात संपादक श्रीपाद अपराजित,डॉ.श्रीमंत माने,शैलेश पांडे,देवेंद्र गावंडे,संदीप भारंबे आदींनी तर या निवडणूकीच्या सहा महिने आधी संपादकांचे एक सिंडीकेट तयार केले आहे.अध्यक्ष आणि कार्यकारिणीसाठी अर्ज भरले.गडकरींच्या अतिशय जवळचे समजले जाणारे व त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या मंचावर दिसणारे डॉ.पिनाक दंदे यांच्या घरी या संपादकांची बैठक झाली.मूळात त्यांच्या निवडणूक लढणा-यावर कोणालाही आक्षेप नाही मात्र,साहित्य क्षेत्रात त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाशिवाय व अपवाद म्हणून एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशानाशिवाय कोणते योगदान आहे?यावर तर ख-या अर्थाने संशोधन करण्याचीच गरज ते प्रतिप्रादीत करतात.साहित्य क्षेत्रासोबतच नागपूरात पार पडल्या जाणा-या प्रेस क्लब किंवा श्रमिक पत्रकार संघाची निवडणूूक लढण्यात ही बुद्धीवंत मंडळी गेल्या दोन -तीन दशकात तरी कोणाला दिसली का?आता त्या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मात्र,बोलविता धनी कोणी होता का?याचा शोध आता नागपूरकर वृत्तपत्रीय वाचक व साहित्यिकच घेतील.
नाट्य क्षेत्रातील काही मंंडळीही ही निवडणूक ‘मराठी-अमराठी’ वादात ओढताना दिसत आहे.त्यांनी हा प्रश्न बिल्डर आशुतोष शेवाळकरांना विचारावा ज्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यास खोडा घातला,असे डॉ.जोशी सांगतात.वि.सा.संघाच्या इमारतीत त्यांचे ६०-७० कोटी रुपये फसले आहेत.एफएसआय वाढल्याने ही इमारत पाडून २४ मजली झाली तर यातून कोणत्याही बिल्डरला फायदाच पोहोचेल.मात्र,साहित्य हे असं क्षेत्र आहे ज्याचा सरळ संबंध पैशांशी नव्हे तर मानवी ,सामाजिक आणि साहित्यिक मूल्यांशी येत असतो.नागपूरकरांना काहीही आश्चर्य वाटणार नाही येत्या काळात गडकरी यांचे पूत्र सारंग गडकरी व सुप्रसिद्ध बिल्डर कुकरेजा यांच्या संयुक्त भागीदारीतून ही शंभर वर्षांची साहित्यिक मूल्य असलेली वास्तू धराशाही होऊन भव्य मॉल बघण्यास मिळेल!
महत्वाचे म्हणजे या निवडणूकीची प्रक्रिया सुरु असताना उपेंद्र कोठेकर यांचा सहभाग स्पष्टरित्या दिसून पडल्याने गडकरी यांना मी दूसरं पत्र लिहलं,मात्र,त्यांचे कोणतेही उत्तर मिळाले नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे हे स्वत:चे शहर आहे,त्यांनी देखील या सर्व असंवैधानिक व अनैतिक घडामोडींवर गप्प राहणे पसंद केले व माझ्या पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही.राज्याचे राज्यपाल व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना देखील पत्र पाठवले,फक्त नितीन नवीन यांनी आमच्या तळमळीच्या पत्राची दखल घेतली व ते पत्र पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात पाठवले असल्याचे डॉ.जोशी सांगतात.गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणात राजकारण्यांनी साहित्यिक क्षेत्रात हस्तक्षेप करु नये असे सांगितले असताना,कोठेकर हे गडकरी यांच्या या मताचे सर्रास उल्लंघन करतात आहेत का?याच्याही उत्तराची अपेक्षा डॉ.जोशी करतात.
आजच्या निकालात निश्चित गिरीश गांधींना मृत उमेवारांचीही मते मिळालेली असणार,साहित्यिक वर्तुळात एक ‘ऑडियो’तर तूफान व्हायरल झाला आहे ,ज्यामध्ये चक्क गिरीश गांधींचे नाव आले आहे.एक मतदार त्यात विचारतो आहे मतपत्रिका आली आहे,त्याचे काय करु?हा मतदार तर त्याच्या बोलण्यावरुन पंचशील चौकात पहाटेच मजूरीसाठी उभे असणा-या मजूरांपेक्षाही अज्ञानी वाटतो,असा टोला डॉ.जोशी हाणतात.या मतदाराला हे ही माहिती नाही गिरीश गांधी कोण आहेत,त्याला कोणाला मतदान करायचं आहे,तो इतका अज्ञानी आहे!
या निवडणूकीचा निकाल काहीही लागू देत.मी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार ही नव्हतो.अखेरपर्यंत मी ही निवडणूक अ.भा.मराठी साहित्य महामंडळासारखीच बिनविरोध करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र,माझे प्रामाणिक प्रयत्न अपयशी ठरले.वि.सा.संघाच्या गौरवशाली इतिहासात पहील्यांदाच इतक्या खालच्या स्तरावर गेलेली ही निवडणूक पाहता,परमेश्वराने त्यांना माफ करावे,इतकंच मी बोलू शकतो,अशी हताशा डॉ.जोशी व्यक्त करतात.
……………………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
