

नागपूर,ता. २० ऑक्टोबर: महापालिकेची ऑन-लाईन सभा आज मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा पार पडली मात्र अपेक्ष्ेप्रमाणे या ऑन-लाईन सभेत देखील पराकोटीचे तांत्रिक दोष असल्यामुळे आवाज ऐकूच आला नाही.परिणामी विरोधी पक्ष्ातील नगरसेवकांनी ऑन-लाईनच चांगलाच गोंधळ घातला. आवाज बंद असल्यामुळे ही विशेष सभा आहे की ’मूक’सभा,असा प्रश्न नागरिकांनाही पडला!
ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी अखेर संतप्त होऊन हे बजेट आहे की नुसता गोंधळ?ऐतिहासिक बजेट आहे वाटतं?असा चिमटा काढला. सकाळी ११ ची सभा ही ११.४० वा. थोडी फार ऐकू येऊ लागली तोपर्यंत नुसते नगरसेवकांचे चेहरे अधून-मधून स्क्रीनवर झळकत राहीले.स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी विशेष सभेत अर्थसंकल्प सादर केला मात्र अर्ध्याहून जास्त अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यांचा आवाज ऐकू आला,हे विशेष!
प्रारंभी सभा सुरु होताच,माजी महापौर प्रवीण दटके यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन स्थगन प्रस्तावावर चर्चा घ्यावी,अशी विनंती महापौरांना केली.मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ’आधी प्रश्नोत्तराचा तास व्हावा,नंतर स्थगनवर चर्चा घ्यावी’अशी विनंती महापौरांना केली.यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी ’स्थगन प्रस्तावावरील भाषणाच्या मध्येच तुम्ही सभा स्थगित केली त्यामुळे तेथूनच पुन्हा चर्चा व्हावी’असा आग्रह धरला,यावर प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी‘सभा ही ज्या प्रस्तावावर स्थगित झाली त्याच प्रस्तावापासून सुरु होत नाही,ही नवीन सभा आहे,नियमावली क्रमानुसार सभेचे नियोजन झाले पाहिजे’असा आक्ष्ेप नोंदवला.
यावर पुन्हा दयाशंकर तिवारी यांनी महापौरांनी माझ्या स्थगन प्रस्तावरील चर्चेदरम्यान अनिश्चित काळासाठी मागील सभा स्थगित केली होती परिणामी जिथे सभा स्थगित झाली त्याच मुद्दापासून सभा पुन्हा सुरु होईल,असे समर्थन केले.यावर प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी सभेच्या कामकाजाविषयी प्रशासनाने विषय पत्रिकेत दोन्ही सभेबाबत कालावधीच निश्चित केला नसल्याचे सांगितले.
स्थायी समिती सभापतींनी सादर केला २५०० कोटींचा अर्थसंकल्प https://sattadheesh.com/?p=9173
या सर्व गोंधळातच पुन्हा आवाज गायब झाला.नगरसेवकांचे आवाज ’सभा कशी चालवावी,नेटवर्कमुळे आवाजच येत नसल्याचे’स्क्रीनवर उमटलेत.परिणामी महापौरांनी सभाच १२.३० पर्यंत स्थगित केली.यानंतर विशेष सभेत झलके हे बजेट सादर करतील,असे आदेश दिले.
मात्र १२.३० वा. देखील आवाजामधील तांत्रिक दोष दूर करण्यात आला नव्हता.पिंटू झलके हे अर्थसंकल्पाचे वाचन करीत असताना त्यांचाच आवाज गायब होता,यावर प्रफल्ल गुडधे पाटील यांनी ‘ही सभा चालूच शकत नाही’असा संताप व्यक्त केला.अर्थसंकल्पासारख्या अतिशय महत्वाच्या विषयावर सभा अशी चालणार आहे का?असा प्रश्न उपस्थित केला.
आभा पांडे यांनी विधान सभेचं अधिवेशन होऊ शकतं तर मनपाची सर्वसाधारण सभा भट सभागृहात का होऊ शकत नाही?हा बजेट आहे की गोंधळ?यावर माजी महापौर नंदा जिचकार यांनी बजेटची प्रत सर्वांकडे पाठविली असल्याचे सांगितले.यानंतर आभा पांडे व माजी महापौर नंदा जिचकार यांच्यातच नेहमीप्रमाणे शाब्दिक जुगलबंदी रंगली.
नंदा जिचकार यांनी मुख्यमंत्र्यांनीच सभेसाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले,यावर आभा पांडे यांनी ’काय मुख्यमंत्री,मुख्यमंत्री करीत आहात?कमलेश चौधरी यांनी मध्ये उडी घेत ‘सत्ता पक्ष् विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत!’अशी टिका केली.यावर आभा पांडे यांनी ’हे ऐतिहासिक बजेट आहे,महापौरांना सोडून कोणालाही ऐकू येत नाही’अशी मिश्कीली केली.
यावर नंदा जिचकार यांनी मुख्यमंत्री परवानगी देत नाही,असे म्हणताच,आभा पांडे यांनी जनतेची कामे सर्वांनाच करायची आहेत मात्र तुमच्या कार्यकाळात जनतेची कामे थकलेली असल्याचा चिमटा काढला.नंदा जिचकार यांनी ’आम्ही भट सभागृहात सभा घेण्यास तयार आहोत’असे प्रतिउत्तर दिले.
या सर्व गोंधळातही सभापती पिंटू झलके मात्र शांतपणे बजेट ‘रेटत’ राहीले.यावरही नंदा जिचकार यांनी आता फक्त सभापती बजेटचे प्रस्तुतीकरण करीत आहेत,सर्वांना याची कॉपी मिळेल त्यामुळे शांतपणे ऐका’असा सल्ला दिला.
या सर्व गोंधळात ब-याच वेळाने पिंटू झलके यांचा स्पष्ट आवाज स्क्रीनवर ऐकू येताच,नगरसेवक हे कान लावून बजेट ऐकू लागले मात्र तोपर्यंत ही सभा ’मूक’च राहीली. बजेटवर गुरुवार दि.२२ ता.रोजी सकाळी ११ वाजचा चर्चा हाेणार असल्याचे महापौर यांनी सूचना केली व सभा स्थगित केली.




आमचे चॅनल subscribe करा
