फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogभारतात ’ती’च्या विचारांनी केला तिचा घात 

भारतात ’ती’च्या विचारांनी केला तिचा घात 

Advertisements
जागतिक महिला दिन विशेष(भाग-२)

नागपूर,ता.९ मार्च २०२६: जगातील अनेक विचाराधारांमध्ये रक्तरंजित क्रांतीचा इतिहास आढळतो मात्र,जगाच्या पाठीवर भारत हे एकमेव राष्ट्र असे आहे जो सहिष्णू,सर्वधर्मसमभाव आणि अहिंसेसाठी ओळखल्या जातो.मात्र,याच देशात कर्नाटमध्ये हिंदू राष्ट्रवादी राजकारणावर टीका करणा-या एका प्रख्यात भारतीय महिला पत्रकाराची गोळ्या घालून निघृण हत्या,ही जगाच्या पाठीवर भारताची ‘बेगडी’असहिष्णूता तपासून बघणारी घटना ठरली.भारतात जागतिक महिला दिवस साजरा होत असताना फक्त आपल्या ‘वेगळ्या’विचारांसाठी पत्रकार गौरी लंकेश हिला आपला जीव गमवावा लागला,महत्वाचे म्हणजे अनेक वर्ष तिचे मारेकरीही या सहिष्णु देशात मोकाट होते.
५५ वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुसारख्या सर्वच बाबतीत प्रगत समजल्या जाणा-या शहरात एएक दिवस तिच्याच घराच्या दारात  कारमधून उतरताच रक्ताच्या थारोळ्यात पडली .मोटरसायकलवर आलेल्या बंदूकधा-याने तिच्या डोक्यात आणि छातीत चार गोळ्या झाडल्या आणि तिचा ‘वेगळा’आवाज कायमचा बंद केला.यानंतर मात्र या सर्वात प्रतिष्ठित महिला पत्रकाराला पूर्ण राजकीय सन्मानाने दफन करण्यात आले.कट्टरपंथी हिंदू राष्ट्रवाद्यांकडून तिची हत्या झाली असल्याचे म्हणने तिच्या वैचारिक समर्थकांचे आहे.
इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षात हिंदू राष्ट्रवादींवर टीका करणा-या पत्रकारांना सोशल मिडीयावर उघडपणे हल्ल्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या देखील दिल्या गेल्या आहेत.महत्वाचे म्हणजे भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनीही पत्रकारांवर उघडपणे शाब्दिक हल्ला केला असून, अश्‍या वेगळ्या विचारांच्या विभूतींचा उल्लेख भाजपच्या मंत्र्यांनी ‘प्रेस स्टिस्टिटयूट’ म्हणजे प्रेस आणि वेश्‍या यांचे मिश्रण’ असा शेलक्या शब्दात केला!
गौरी या एका साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादन करीत होत्या व एक निर्भय आणि स्पष्टवक्ती पत्रकार म्हणून ओळखल्या जात होत्या.त्या उजव्या विचारसरणीच्या आणि हिंदू राष्ट्रवादींवर ज्यात भाजपच्या ट्रोलक-यांचा समावेश होता,आपल्या धर्मनिरपेक्षवादी विचारसरणीतून जहाल टिका करीत होत्या.गौरी यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केली होती यानंतर तिचा भाऊ इंद्रजितसोबत अनेक वर्षे ‘लंकेश पत्रिके’हे स्वतंत्र वृत्तपत्र चालवले.हे वृत्तपत्र तिचे वडील,डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक पी.लंकेश यांनी स्थापन केले होते.तिच्या भावासोबत विभक्ततेनंतर,तिने अनेक प्रकाशने सुरु केली,ज्यात तिचे स्वत:चे वृत्तपत्र ‘गौरी लंकेश पत्रिकेचा’ ही समावेश होता.पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या कविता लंकेश त्यांची बहीण आहे.
५ सप्टेंबर २०१७ रोजी अज्ञात मारेक-यांनी राजराजेश्‍वर नगरातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून तिची हत्या केली.त्यांची हत्या हिंदूत्वादी संघटनेतील आरोपींनी शांत डोक्याने व तिच्या दिनचर्याची रेकी करुन केली होती. तिला मारण्यापूर्वी मुख्य आरोपी परशुरामला ३ सप्टेंबर रोजी एका घरात नेण्यात आले होते.तिथून एका व्यक्तिसोबत त्याला दूचाकीवरुन गौरी लंकेशचे निवासस्थान असलेल्या आर.आ.नगर भागात नेण्यात आले.परशुरामने न्यायालयात कबूल केले की त्याने या कन्नड पत्रकार गौरी लंकेशवर चार गोळ्या झाडल्या होत्या.धर्मरक्षणासाठी एकाची हत्या करायची आहे,असे मला २०१७ मध्ये सांगण्यात आले होते.ज्याला मारायचं होतं त्या व्यक्तिविषयी मला काहीही माहिती नव्हतं.
३ सप्टेंबर रोजी बंगळूरुला जाण्यापूर्वी बेळगावात मला एअरगनचे प्रशिक्षण देण्यात आले.हत्येपूर्वी तीनवेळा मला वेगवेगळ्या तिघांनी गौरी यांच्या घराच्या परिसरात नेले होते. दुस-या दिवशीच म्हणजे ४ सप्टेंबर रोजीच गौरी लंकेशची हत्या करणार होतो मात्र,त्या दिवशी आम्हाला पोहोचायला उशिर झाला.यानंतर ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मला बंदूक देण्यात आली.मला एकाने दुचाकीने गौरीच्या घरापर्यंत नेले.आम्ही तिथे वेळेत पोहोचलो.त्या कारमधून उतरण्याआधीच मी त्यांच्या कारपाशी पोहोचलो,तिथे मी खाकरताच त्यांनी माझ्याकडे पाहिले.त्याबरोबर मी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या….!
गोळ्या झाडल्यानंतर मी व मला घेऊन येणार इसम दूचाकीवरुन लगेच निघालो.त्याच रात्री मी बंगळूरु शहर सोडून बाहेर निघालो,असे बयाणात परशुराम वाघमारेने सांगितले.या घटनेनंतर संपूर्ण देशात उग्र संतापाची लाट उसळली.या घटनेत सुरवातीला पोलिसांनी सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीची थेट नावे घेतली नव्हती मात्र,ज्यांना ज्यांना या प्रकरणात अटक झाली व ज्यांचे जबाब घेतले,ते सारे या संस्थेची संबंधित निघाले.त्यांच्यापैकी काहींचा श्रीराम सेनेशीही संबंध आढळला.
महत्वाचे म्हणजे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘भारत’ या सहिष्णू देशात लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या विशेष पथकानं हिंदूत्वावर टीका करणा-या सहापेक्षा जास्त लेखक,एक बिशप आणि एक तत्ववेत्ता यांची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती.या लोकांच्या घरी सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात यावेत तसंच चार सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावे अशी शिफारस त्यांनी केली .यात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड,तत्ववेत्ते के.एस.भगवान,नरेंद्र नायक,सी.एस.द्वारकानाथ,निदुमामिदी मठाचे वीरभद्र चन्नमाला स्वामी यांचा समावेश होता.विशेष तपास पथकाने आरोपी अमोल काळे याला पकडण्यासाठी छापेमारी केली होती त्यात त्यांना एक हिट लिस्ट सापडली होती,ज्यात बरीच नावं होते,गौरी लंकेशचं नाव या यादीत दुस-या क्रमांकावर होते….!

या हत्याकांडात पोलिसांनी पुण्यातून अमोल काळे,गोव्यातील अमोल दगवेकर,विजयपुरामधील मनोहर इदेव, श्रीराम सेनेचा जिल्हाध्यक्ष राकेश मठ,तसेच परशुराम वाघमारे यांना अटक केली होती.लंकेश यांच्यावर गोळी झाडणारा परशुराम वाघमारे होता,असा संशय पोलिसांना असून हे सर्व कट्टर हिंदूत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.याच परशुरामने या पूर्वी हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्यासाठी विजयपुरा इथं सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडकावला होता.या प्रकरणातही त्याच्यावर कोर्टात खटला सुरु आहे.
‘वैज्ञानिक दृष्टिकोण,मानवता आणि भारताच्या संविधानातील मूलभूत कर्तव्य हे आरोपींना समजले तर त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटेल’ असे के.एस.भगवान म्हणाले.
नुकतेच जानेवरी २०२६ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत, लंकेश हत्येच्या प्रकरणातील आराेपी आणि नालासोपारा स्फोट प्रकरणात जामीनावर बाहेर असलेला संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर याने अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्र.१३(ड) मधून विजय मिळवला.माझ्यावरील आरोप न्यायप्रविष्ठ आहेत,जनतेच्या न्यायालयात मला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत पांगारकर यांनी या विजया नंतर दिली!२००१ ते २००६ दरम्यान अविभाजित शिवसेनच्या जालना नगरपालिकेचा नगरसेवक पंगारकरला ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.४ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला जामीन मिळाला होता.२०११ मध्ये शिवसेनेकडून त्याला तिकीट न मिळाल्याने पंगारकर दक्ष्णपंथी हिंदू जनजागृती समितीत सामिल झाला होता.त्याने माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकरच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.
बंगळुरुच्या सत्र न्यायालयाने गौरी लंकेश हत्याकांडात सामील आठ आरोपींना देखील जामीन दिला आहे.यात ४ सप्टेंबर  २०२४ रोजी ४ तर ९ ऑक्टोबर रोजी ४ आरोपींना जामीन मिळाला आहे. आरोपी परशुराम वाघमारे आणि मनोहर यादव या दोघांना विजयपुरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. यातील दोन आरोपींचा जामीन मिळाल्यानंतर विजयपुरातील एका मंदिरात हार घालून सत्कार करण्यात आला….!आपला समाज नेमका कोणत्या दिशेला जात आहे,असा प्रश्‍न गौरी लंकेश यांची बहीण कविता हिने केला.या सत्काराबाबत बोलताना श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलकांत कंडगलने बीबीसी हिंदीला सांगितले की, ते हिंदू कार्यकर्ते आहेत.जामिनावर बाहेर आले होते,त्यामुळे आम्ही त्यांचा फूल आणि हारांनी सत्कार केला.आम्ही कलिका मंदिरात पूजा करुन न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडावे यासाठी प्रार्थना केली….!गौरी लंकेशचे मारेकरी आरोपींचा सत्कार हा मूळात त्यांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासारखा असल्याचा तीव्र संताप यानंतर समाज माध्यमांवर उमटला.हिंदूत्ववादी संघटनांकडून दूस-यांदा तिची हत्या करण्यासारखा हा प्रकार असल्याचा संताप समाज मध्यमांवर उमटला.
या घटनेनंतर गोध्रा दंगलीत बळी पडलेल्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करणा-या आरोपींची सुटका आणि त्यानंतर त्यांचा करण्यात आलेला सत्कार हा देखील देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोळकर,साम्यवादी नेते गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंधित असल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे.
गौरी लंकेश प्रकरणातील १८ पैकी १६ आरोपींना जामीन मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे खटल्याला झालेला प्रचंड विलंब.आरोपपत्रात नमूद केलेल्या ५२७ साक्षीदारांपैकी आतापर्यंत सुमारे १४० साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून भविष्यात हा खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
कर्नाटक हायकोर्टानं मोहन नाईक उर्फ संपांजे याचा जामीन मंजूर केला होता,मात्र,याचिकाकर्त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.यानंतर नवीन कुमार,अमित दिगवेकर आणि सुरेश एचएच यांनाही जुलै २०२४ मध्ये हायकोर्टातून जामीन मिळाला.यानंतर भरत कुमार,श्रीकांत पांगारकर,सूजित कुमार आणि सुघाना गोंधकर यांना सप्टेंबर २०२४मध्ये जामीन मिळाला.एका आठवड्या पूर्वीच सत्र न्यायालयाने या गुन्ह्यातील परशुराम वाघमारे,यादव,अमित काळे, राजेश डी.बंगेरा,वासूदेव सूर्यवंशी,ऋषीकेश देवदार,गणेश मिस्कीन आणि अमृत रामचंद्र बद्दी यांना जामीन दिला होता.गौरी लंकेशच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू युवा सेनेचा संस्थापक के.टी.नवीनकुमार हाच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप एसआयटीने आराेपपत्रात नमूद केले आहे….!
आरोपींवर भारतीय दंड संहिता(आयपीसी),भारतीय शस्त्र कायदा आणि कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.नवीनकुमार उर्फ होटे मांजा हा कर्नाटकातील मद्दूर येथे राहणार असून त्याला १८ फेब्रुवरी २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.त्याच्याकडील १८ राऊंड जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहे.
भारतासारख्या देशात गौरी लंकेश किंवा बिल्किस बानो प्रकरण हे कोणत्याही इराणी देशात किंवा इराक,अफगानिस्तान,लेबनान,सिरीया सारख्या देशात घडल्या नाहीत.महिलांसाठी भारतासारख्या गौरवशाली इतिहासाची पंरपरा असणा-या देशात घडल्या आहेत.गौरी लंकेश या सातत्याने त्यांच्या लिखाणात हिंदू देवी-देवतांचा अपमान करीत होत्या,असा आरोपींचा आरोप असला तरी हिंदूंच्या कोणत्या धर्मशास्त्रात असे कृत्य केल्याने अश्‍या स्त्रीची गोळ्या घालून हत्या करण्यास सांगितले आहे?याचे उत्तर मात्र ते देत नाहीत….! हिंदू धर्मातला हाच पुरुष मात्र देवीरुपात स्त्रीला पुजतानाही आढळून पडतो….!याला श्रद्धेचा विरोधाभास म्हणावा,की विचारांचा कि हिंदू धर्माविषयीचं अज्ञान?
बिल्किस बानो ही तर अवघी २१ वर्षांची होती, त्यात ती पाच महिन्यांची गर्भवती होती.२००२ च्या गुजरात दंगलीत  गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात राहणा-या बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करुन तिच्या कुटूंबातील १४ सदस्यांची निघृण हत्या करण्यात आली.या अत्याचारातून तिच्या गर्भातील मूल देखील दगावले.यात तिच्या तीन वर्षाची चिमूकलीला देखील नराधमांनी धर्मद्वेषेच्या सूडातून संपवले…!

२००२ च्या या दूर्देवी घटनेनंतर २००८ मध्ये या प्रकरणातील ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.मात्र,२०२२ मध्ये गुजरात सरकारने विशेष अधिकारात या सर्व दोषींची मुक्तता केली.दोषींनी १५ पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा भोगली असल्याचे करण गुजरात सरकारने यासाठी दिले.मात्र,गुजरात सरकारच्या या निर्णयाविरुद्ध बिल्किस बानोने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायमूर्ती बी.वी.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जवल भुईया यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारचा हा निर्णय रद्द करुन दोन आठवड्यांचा आत सर्व ११ आरोपींना पुन्हा गोधरा तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला.या प्रकरणाचा संपूर्ण घटला महाराष्ट्रात चालला व निकाल लागला असताना गुजरात सरकारला दोषींना मुक्त करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे खंडपीठाने नमूद केले.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा संपूर्ण राष्ट्र स्वातंत्र्य दिवस साजरा करीत होता त्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बिल्किस बानोच्या दोषींना गुजरात सरकारने मोकाट सोडण्याचा आदेश जारी केला होता!
या ११ दोषींपैकी एक राधेश्‍याम शाह याने माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायालयाने गुजरात सरकारला याचिकेवर निर्णय घेण्यास सांगितले.यानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली होती.या समितीने माफीचा अर्ज स्वीकारला.यानंतर ११ ही दोषींना सोडण्यात आले होते.सरकारच्या या आदेशाला बिल्किस बानोने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.सरकारच्या या आदेशाला इतर कोणत्याही सरकारी आदेशाप्रमाणे आव्हान दिलं जाऊ शकंत.यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व ११ दोषींना दिलेली माफी रद्द केली.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसमध्ये गोध्रा रेल्वे स्टेशनजवळ काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली.या घटनेत अयोध्येतून परतणा-या ५९ भाविकांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल पेटली.या दंगलीच्या झळा ३ मार्च २००२ रोजी बिल्किस बानोच्या कुटूंबापर्यंत देखील पोहोचल्या.त्यावेळी बिल्किस बानो अवघी २१ वर्षांची होती आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह १४ जणांच्या कुटूंबात राहत होती.चार्जशीटनुसार बिल्किस बानोच्या कुटूंबियांवर वेगवेगळी शस्त्र असलेल्या २० ते ३० लोकांनी हल्ला केला.यामध्ये दोषी सिद्ध झालेले ११ आरोपी पण होते.दंगलखोरांनी बिल्किस बानो,तिची आई  आणि कुटूंबातील इतर ३ महिलांवर अत्याचार केला.त्यांना बेदम मारहाण केली.या हल्ल्यात कुटूंबातील ७ जणांचा मृत्यू झाला.६ बेपत्ता झाले.फक्त ३ लोक बचावले.यामध्ये बानोच्या कुटूंबातील एक पुरुष आणि ३ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.या घटनेच्या वेळी बिल्किस बानो ५ महिन्यांची गर्भवती होती.या अत्याचारानंतर ती तीन तास बेशुद्ध होती.
या घटनेची तक्रार बानो हिने लिमखेडा पोलिस ठाण्यात दाखल केली.सीबीआयच्या म्हणण्यानुसार,तक्रार दाखल करणारा हेड कॉन्स्टेबल सोमाभाई गोरी याने खरी परिस्थिती लपवून ठेवली आणि बानो हिच्या तक्रारीतील काही भाग वगळला.गोध्रा येथील मदत शिबिरात पोहोचल्यावर तिला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बिल्किस बानोचे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.
सीबीआयच्या तपासात मृतकांचे शवविच्छेदनही योग्य पद्धतीने झाले नसल्याचे समोर आले.सीबीआयने या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचे मृतदेह पुन्हा एकदा बाहेर काढले तेव्हा लक्षात आले की एकाही मृतदेहाची कवटीही जागेवर नव्हती….!शवविच्छेदनानंतर मृतदेहांचे मुंडके कापण्यात आली होती जेणेकरुन मृतदेहांची ओळख पटू नये.
खटल्याची सुरवात झाल्यानंतर बिल्किस बानोला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या.त्यानंतर ही ट्रायल गुजरात बाहेर महाराष्ट्रात हलवण्यात आली.६ पोलिस अधिकारी आणि एक डॉक्टरसह एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल झाले.जानेवरी २००८ मध्ये विशेष न्यायालयाने ११ आरोपींना बलात्कार,खून,बेकायदेशीर रित्या गोळा होणे आणि इतर आरोपांसाठी दोषी ठरवले.त्याचवेळी बिल्किस बानोची तक्रार लिहणा-या हेड कॉन्सटेबलला आरोपींना वाचवण्यासाठी चुकीचा रिर्पोट लिहल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.न्यायाच्या पहील्याच पायरीवर बिल्किस बानोसोबत अन्याय करणारा वास्तवतेत तो खरा महादोषी होताच.अन्य ७ आरोपींची मात्र पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली.याच खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला.
दोषी ठरलेल्या ११ आरोपींमध्ये जसवंतभाई,गोविंदभाई,नरेश कुमार मोरधिया(मृत)शैलेश भट्ट,राधेश्‍याम शाह,बिपिन चंद्र जोशी,केसरभाई वोहनिया,प्रदीप वोहनिया,बकाभाई वोहनिया,राजूभाई सोनी,नितेश भट्ट,रमेश चंदना आणि हेड कान्सटेबल सोमाभाई गोरी यांचा समावेश आहे.जसवंत,गोविंद आणि नरेश यांनी बिल्किसवर बलात्कार केला त्याचवेळी शैलशने बिल्किसची ३ वर्षांची निरागस चिमुकली हिला जमीनीवर आपटून ठार केले होते….!
मे २०१७ मध्ये,मुंबई उच्च न्यायालयाने सामूहिक बलात्कार प्रकरणात ११ जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली मात्र,त्याचवेळी पोलिस कर्मचारी आणि डॉक्टरसह उर्वरित ७ जणांची निर्दोष मुक्तता केली.एप्रिल २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दोन आठवड्यांच्या आत बिल्किस बानोलला ५० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
थोडक्यात,भारतासह जगभरातील युद्ध असो,दंगली असो किंवा मणिपूरसारखे गृहयुद्ध असो.दंगलखोरांच्या वासनेला बळी पडते ती स्त्रीच.दंगल ही बलात्कार करणा-यांसाठी मोक्याची संधी असते.यात मग जात,धर्म,साधन शुचिता वगैरे आड येत नाही.पाच महिन्यांच्या गरोदर स्त्रीसोबत बलात्कार करताना  व तिच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जमीनीवर आपटून मारणा-यांचे क्रोर्य माणूसकीच्या सर्व मर्यादा ओलांडणा-याच होत्या.
हिंदू स्त्रीयांसोबत ‘ते’यापेक्षाही क्रूर पद्धतीने वागत असतात,त्यांच्या गर्भाशयाचा कोथळाच तलवारीने बाहेर काढतात,असा आरोप केला जातो तेव्हा पराकोटीच्या क्रोर्याला बळी पडणारी जगभरातील स्त्री ही ना हिंदू असते ना मुसलमान ना कोणत्याही इतर धर्माची.तिची विटंबना तिच्या आत्मसन्मालाना धक्का देणारा आणि तिचं सन्मानजनक अस्तित्व संपवणाराच असतो. धर्म,वंश,जात,पंथाच्या नावावार या भूतळावरील स्त्रियांवर बलात्कार करण्याचा अधिकार दंगलीच्या नावावार लिंगपिसाटांना अनादीकाळांपासूनच सहज मिळत आहे….!
भारतासारख्या देशातही जेव्हा माणूसकीला काळीमा फासणा-या अश्‍या घटना हिंदू, मुस्लिम,दलित किंवा ब्राम्हण या मनोविकृतीतून घडतात,तरीही त्या देशात बेगडी‘जागतिक महिला दिनाचा’उत्साहपूर्वक एक दिवसाचा सोहळा आपल्या मागे अनेक अनुत्तरित प्रश्‍न सोडून जात असताे.किमान भारतासारख्या देशात गौरी लंकेश असो,बिल्किस बानो असो किंवा मणिपूरमधील पराकोटीची स्त्री देहांची विटंबना करणा-या घटना असो,सरकार आणि प्रशासनाच्या न्याय व संवैधानिक वृत्तीवरच कठोर प्रहार करणा-या ठरतात…..!
(पुढील भागात वाचा एपस्टीन फाईल्स आणि चिमुकलींवर क्रार्याची परिसीमा)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या