Advertisements

(एपस्टीन आणि भारत भाग-२)

‘सत्ताधीश’ने जगभरात उत्साहात साजरा होणा-या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेखमाला प्रसिद्ध केली.जगातील सर्वात प्रगत आणि विकसित देश अमेरिकेतही हा दिवस साजरा केला जातो पण,या विकासात लहान-लहान चिमुकल्यांवर बर्बरतापूर्ण बलात्कार करणार-या ‘एपस्टीन’चीही काळी किनार जोडल्या गेली आहे. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात,महिलांवरील अत्याचार अक्षम्य पाप असल्याचे सांगितले.दोषी कोणीही असो,त्याची गय करु नका.सरकार येतील व जातील,पण नारीशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे’असे उद्गार त्यांनी जळगाव येथे विमानतळ परिसरात ‘लखपती दीदी’कार्यक्रमात काढले हाते.या कार्यक्रमात त्यांनी बदलापूरमधील चिमुकल्यांवर झालेला अत्याचार व कोलकत्तामधील आर.जी.कर रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर हिची बलात्कारानंतर निघृण हत्या ,याचा संदर्भ दिला होता.एपस्टीन फक्त विदेशात घडत नाही तर स्त्रीला देवी म्हणून पुजणा-या भारतासारख्या पंरपरावादी देशातही घडतं.अनेक राजकीय नेत्याच्या असलेल्या मुलींच्या वसतीगृहात अगदी लहान-लहान निराधार मुलींसोबत लैंगिक अत्याचार घडण्याचे वृत्त नेहमीच प्रसिद्ध होत राहतात.एपस्टीन निदान याचे डॉलर्स तरी द्यायचा,भारतात तर त्या निराधार मुली त्या नेत्यांच्या… वसतीगृहाचे प्रशासन सांभाळणा-या अधिका-यांच्याच नव्हे तर अगदी सुरक्षा रक्षकांच्याही बापाची जागीर समजून, भोगली गेली,संपवली गेली,त्यांच्यासोबत एपस्टीनसारखंच क्रोर्य केल्या गेलं.
देशातील मातृशक्तीचे देशाच्या विकासात मोठे योगदान असून,आज तिन्ही सैन्य दलात अगदी सर्वोच्च पदांवरही महिला अधिकारी आहेत असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.मात्र,तो दर्जा गाठण्यासाठी महिला सैनिक अधिका-यांना सर्वोच्च न्यायालयात एक मोठा लढा द्यावा लागला होता,काँग्रेससारखाच मोदी सरकारनेही त्यांच्या शारीरिक क्षमतेवर व सुरक्षेच्या कारणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्यांचा तो अधिकार नाकाराला होता.महिलांच्या लष्करातील कायम नियुक्तीसाठी शारीरिक तंदुरुस्तीची अट हीच मुळात एकतर्फी आणि अतार्किक आहे,असे सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयाने २५ मार्च २०२१ रोजी नोंदवले आहे.’समाजाची रचना ही पुरुषांनी त्यांच्यासाठी निर्माण केली आहे आणि यात त्यांना कहीही चूक वाटत नाही’ असे सांगून सैन्यातील नियुक्त्यांच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले पक्षपती निकष न्यायालयाने काढून टाकले.
मोदी सांगतात‘नारीशक्ती’हा नवा कायदा बनवला आहे.महिलांच्या रक्षणासाठी कठोर कायदे केले जात आहेत.राजकारणात महिलांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसोबत आहे….!असे आश्वासन देणा-या पंतप्रधानांच्या देशातच जेव्हा शबरीमाला,मणिपूर घडतं ,तेव्हा जगाचे सोडून द्या पण भारतात तरी ’जागतिक महिला दिन’साजरा करण्याचं औचित्य दिसून पडतं का?हा सवाल बैचेन करतो.
केरळच्या शबरीमाला मंदिरासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच २८ सप्टेंबर २०१८ रोजी महिलांना प्रवेशबंदी उठवण्याचा निर्णय दिला होता परंतु,आज ही १० ते ५० वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो आहे का?परंपरेच्या नावाखाली शबरीमाला व्यवस्थापनाने तो आजही लागू केला नाही,उलट या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली.१० ते ५० वयादरम्यानच्या महिलांना मासिक पाळीमुळे ४१ दिवस सलग शुद्धतेचे पालन करणे शक्य नसून, भगवान अयप्पा ब्रम्हचारी असल्यामुळे या वयातील महिलांनी मंदिरात प्रवेश करु नये ,अशी भूमिका मंदिर बोर्ड व केरळमधील इतर विविध धार्मिक संस्थांनी घेतली आहे.न्यायालय म्हणाले ,धर्माच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष असा भेद करता येणार नाही.अध्यात्माच्या मार्गावर मार्गस्थ होण्याचा महिलांनाही समान अधिकार आहेत.त्या ही भगवान अयप्पांचेच भक्त आहेत,हिंदू धर्मिय असून शारीरिक कारणातून त्यांची वेगळी धार्मिक ओळख असू शकत नाही.तत्कालीन सरन्यायाधीश दिपक मिश्रा,न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर,न्या.आर.एफ.नरिमन आणि न्या.धनंजय चंद्रचूड यांनी प्रवेशबंदीचा निर्णय उठवला मात्र, घटनापीठातील एकमेव महिला न्या.इंदू मल्होत्रा यांनी या निर्णयाशी असहमती दर्शवली.धार्मिक परंपरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करु नये.अनुच्छेद २५ नुसार शबरीमला मंदिरालाही भारतीय राज्यघटनेचे संरक्षण प्राप्त आहे.परिणामी,धार्मिक प्रथेवर विश्वास ठेवणा-यांचाही सन्मान व्हायला पाहिजे,अशा प्रथा रद्द करणे न्यायालयाचे काम नाही,अशी भूमिका त्यांनी नोंदवली…..!इतर धर्मियांमधील प्रथा,कुप्रथेविषयी भरभरुन बोलताना,टिका करताना हिंदूत्ववादी मात्र,महिलांबाबतच्या या प्रथेविषयी मौन बाळगतात….!
हेच न्यायालय ‘पती हयात असताना पत्नीने मंगळसूत्र काढणे ही टोकाची मानसिक क्रूरता’ असल्याचा निर्वाळा देताना दिसून पडते.मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एम.वेलूमणी आणि न्या.एस.सुंदर यांच्या खंडपीठाने १५ जुलै २०२२ रोजी असे निरिक्षण नोंदवून इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असेलेल्या शिवकुमार यांची घटस्फोटाची याचिका मंजूर केली…!मूळात मंगळसूत्र हा विवाहित महिलांसाठी ऐच्छिक ‘दागिना’नसून सक्तीची ‘बेडी’ आहे,हे या निकालावरुन सिद्ध होत नाही का?
या ही पुढे जाऊन केरळ सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती एस.कृष्णकुमार यांनी कोची येथील लैंगिक छळाच्या दोन प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करताना,‘आरोपी सिविक चंद्रन हे सुधारणावादी असून ते जातीव्यवस्थाविरुद्ध लढत आहेत.त्यामुळे त्यांनी अनुसूचित जातीतील महिलेचा लैंगिक छळ केला असेल,हे मानणे कठीण आहे’,असे मतप्रदर्शन चंदन यांना जामीन देताना २ ऑगस्ट २०२२ रोजी केले.यावर मोठे वादळ उठल्यावर या न्यायमूर्तींची कोल्लम येथील कामगार न्यायालयात बदली करण्यात आली.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणा-या राज्याच्या मंत्रालयातच महिला अधिकारीसोबत गैरवर्तन घडतं तेव्हा ही मानसिकता किती प्रतिगामी आहे,याची प्रचिती येते.२९ ऑक्टोबर २०२२ रोजी मंत्रालयात अवर सचिव दर्जाच्या अधिका-याने ,उपसंचालक दर्जाच्या महिला अधिका-याशी गैरवर्तन केल्याची तक्रार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्याकडे केली.तातडीने त्यांनी त्या अवर सचिव व घटनेच्यावेळी उपस्थित असेलले उपसचिव यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देत तसे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले.मंत्रालयातील इतर मागास बहूजन कल्याण विभागामध्ये अवर सचिव स्तरावरील अधिका-याने, उपसंचालक दर्जाच्या महिला अधिका-याकडे ‘मला बरे वाटत नाही,मी बोअर झालो आहे,मला जरा गाणे म्हणून दाखव’अशी गळ घातली.या वेळी विभागाचे उपसचिव देखील तेथे उपस्थित होते.महत्वाचे म्हणजे या बोअर झालेल्या अधिका-याची तक्रार पिडीत महिला अधिका-याने या विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिका-यांकडे देखील केली मात्र,तिच्या आत्मसन्मानाच्या लढ्याकडे लक्ष द्यायाला त्या ‘पुरुषांकडे’तरी सवड आणि मानसिकता होती का?
याच पुरोगामी महाराष्ट्रात नाशिक येथील नंदूरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न आंघोळ करण्याची शिक्षा तसेच तिच्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलाला तापवलेली कु-हाड हातात धरुन ठेवण्याची अमानवीय आणि अघोरी शिक्षा सुनावली.१७ डिसेंबर २००० मध्ये तिचा विवाह झाला होता,२०१३ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले.यानंतर तिच्या मावस भावाने तिला लग्नाची मागणी घातली जी तिने धुडकावली. तिने नकार देताच त्याने तिच्या सासू व दिराला खोटी माहिती देऊन भडकावले व ते जातपंचायतीकडे गेले….!जातपंचायकतीचा ‘फतवा’होता या कलंकित महिलेने पंचासमोर नग्न राहून आंघोळ करावी,तिने १०७ पावले चालावे.तिच्यासोबत दोन महिला असतील त्यापैकी एक तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारेल तर दूसरी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल.यानंतर ती पंचांसमोर दूध व पाण्याने आंघोळ करेल…..!
पुण्याच्या पिंपरीमध्ये कंजारभाट समाजातील ऐश्वर्या तमायचीकर ही लग्नानंतर पहील्यांदाज माहेरी आली.नवरात्री सुरु असल्याने ती रात्री भाटनगर येथे दांडिया खेळायला गेली मात्र,संयोजकानी ती येताच दांडियाचा कार्यक्रम बंद केला.ती निघून जाईपर्यंत कार्यक्रम सुरु झाला नाही.ऐश्वर्याने हा प्रकार पोलिसांना सांगितला.सामाजिक बहिष्क़ार प्रतिबंधक कायद्यानुसार संयोजकांवर गुन्हा दाखल झाला.ऐश्वर्याचा गुन्हा काय होता?तर लग्नानंतर तिने कौमार्य चाचणीस नकार दिला होता…!ती आजच्या काळातील तरुणी होती पण…परंपरा मात्र आदिमयुगापासून तिचा पिच्छा पुरवित होती….!
देशाच्या राजधानीत दिल्लीत तर नर्सिंगच्या अभ्यासक्रमात,‘हुंडा पद्धतीमुळे कुरुप दिसणा-या मुलींचाही विवाह होऊ शकतो,फर्निचर,रेफ्रिजरेटर आणि वाहनांसारख्या वस्तुंसह नवीन घर उभारण्यासाठी हुंडा उपयुक्त ठरतो,’असा धक्कादायक मजकूर समाजशास्त्राच्या अभ्याक्रमात समाविष्ट आहे.‘हुंडा पद्धतीची उपयुक्तता आणि फायदे’असे या पुस्तकाचे नाव असून निश्चितच या पुस्तकाचा रचियता कोणी विद्धान पुरुषच आहे,हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज आहे का?
पुरोगामी महाराष्ट्रातच हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात अरोपी कुटूंबाचा बचाव करताना त्यांचा वकील ॲड.दूशिंगने ‘रागाच्या भरात पतीने चार कानाखाली मारल्या तरी तो छळ होत नसल्याचे’ बौद्धक मोक्तीके उधळली!इतकंच नव्हे तर हगवणे कुटूंबियांना वाचवण्यासाठी एका तरुणासोबत तिच्या चॅटिंगचाही संदर्भ जोडला.याचा अर्थ भारतात स्त्री म्हणून जन्माल्या आलेल्यांना मृत्यूनंतरही चारित्र्य शुचितेच्या अग्निपरिक्षेतून जावं लागणं क्रमप्राप्त आहे.
एपस्टीन हा पिडीतांचा बाप नव्हताच मात्र,देशाच्या राजधानी दिल्लीत स्वत: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष राहीलेल्या स्वाती मालीवाल यांनी ’मी लहान असताना माझे वडीलंच माझ्यावर लैंगिक अत्याचार करत होते,ते मला मारत असत,मी घाबरुन पलंगाखाली लपत असे’असा खळबळजनक दावा केला.मालीवाल यांच्या आधी अभिनेत्री आणि राजकीय नेत्या खुशबू सुंदर (सुनील दत्तचा कर्क रोगावर चित्रित ’दर्द का रिश्ता’मधील बाल कलाकार)हिने देखील ती आठ वर्षांची असताना तिचे वडील तिचा लैंगिक छळ करीत असल्याचे सांगितले.मी १५ वर्षांची झाल्यावर त्यांचा विरोध करण्याची हिंमत माझ्यात आली.वडील आईला देखील खूप मारहाण करीत होते.खुशबू या स्वत: राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य राहील्या आहेत…..!कुठून येते आपल्याच मुलीमध्ये ‘मादी’शाेधण्याची ही एपस्टीन पुरुषी विकृती?
केवळ बापच मुलीमध्ये ‘मादी’शोधत नाही तर तरुण मुलगाही जेव्हा आपल्या जन्मदात्री आईमध्ये आपली लैंगिक वासना शमवण्यासाठी ‘मादी’शोधतो तेव्हा माणूसकीच्याच नव्हे तर देव,धर्म आणि कर्माच्या सगळ्या विचारधारा धराशायी होतात.नागपूरात या ३५ वर्षीय आरोपीने जून २०२१ मध्ये आपल्या आईवरच बलात्कार केला.याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश वाठोडा पोलिसांना दिले.आई आंघोळीला गेली असताना त्याने स्नानगृहात शिरुन जबरदस्तीने आपली वासना शमवली.या घटनेचा आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला.तिने ही घटना आपल्या विवाहित मुलीला सांगितली.आई आणि मुलाच्या जगातील सर्वात पवित्र नात्याला कलंकित करणा-या या घटनेचा मुलीला इतका राग आला की तिने तातडीने घर गाठून आपल्या आईला पोलिस ठाण्यात नेले…..!न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा या नराधमाला सुनावली आहे.
देशाचा इतिहास गौरवशाली असण्याचा टेंभा मिरविणा-या भारतातही मृतदेहावरच बलात्कार होतो,तिथे देवी माणून नारीची पूजा.. ही विडंबना वाटू लागते.कनार्टक उच्च न्यायालयाने मृतदेहांवर बलात्कार करण्याच्या कृत्याला गुन्ह्याच्या श्रेणीत आणण्यासाठी आणि शिक्षा करण्यासाठी(भारतीय दंड संहितेतील तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्याची सूचना जून २०२३ मध्येच न्या.बी.वीरप्पा आणि वेंकटेश नाईक टी.या खंडपीठाने केली आहे मात्र,नारीशक्तीची महिमा वर्णित करणारे पंतप्रधान मोदी यांना यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही.बलात्काराशी संबंधित कलमांमध्ये मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तिला दोषी ठरवण्याची तरतूद नसल्याने कलम ३७३ अंतर्गत एका व्यक्तिला निर्दोष मुक्त केल्यानंतर, कर्नाटक उच्च न्यायालयाने ही सूचना केली होती.एका महिलेची हत्या करुन नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार त्याने केला होता.आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याचे मान्य ही केले.मात्र,भांदविच्या कलम ३७५ किंवा ३७७ अंतर्गत तो गुन्हा नाही.या कलमांतील तरतुदीचे काळजीपूर्वक वाचन केल्यास मृत शरिराला माणूस किंवा व्यक्ती मानल्या जात नाही….!एकाने हत्या व दुस-याने बलात्कार केल्यास बलात्कारी हा मोकळा सूटतो…..!
‘तो’इतका मनोविकृत आहे की सर्व पापांपासून मोक्षाची संकल्पना जिथे साकरली गेली आहे त्या प्रयागराजमधील कुंभ मेळ्यातच स्नान करणा-या महिलांचे व्हिडीयो युट्यूबवर टाकून पैसे कमविण्याचे पाप करताना दिसून पडतो. शिराळा तालुक्यातील चिखली गावातील २० वर्षीय प्रांज राजेंद्र पाटील असे या मनोविकृताचे नाव आहे.त्याच्या शोधात अहमदाबाद पोलिस शिरोळ्यात दाखल झाली होती.अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिन्ही आरोपींनी महाकुंभात स्नान करणा-या लाखो महिलांचे व्हडीयो काढून ते अनेक चॅनल्सला विकले…..!
या देशात पंतप्रधानाचा नातू प्रज्वल रेवण्णाने तर बलात्कारामध्ये एपस्टीनचाही रेकॉर्ड तोडला असावा.अगदी घरातील मोलकरणीपासून त्या लिंगपिसाटाच्या मोबाईलमध्ये अडीच हजार बलात्कारांचे व्हिडीयोज पोलिसांना सापडले….!२६ एप्रिल २०२४ रोजी कनार्टकात मतदान होते.पंतप्रधान मोदी त्याच्या प्रचारासाठी आले होते.मंचावरुन मोदींनी कनार्टकातील काँग्रेसची सरकार उलथवून टाकत एनडीएची सरकार स्थापन करण्याचे आवाहन जनतेला केले आणि मतदानाच्या एक दिवस आधी रेपिस्ट प्रज्वल रेवण्णाचे हे व्हिडीयोज घरोघरी माेबाईलवर पोहोचले….!
मणिपूरमध्ये तर दोन महिलांना विवस्त्र फिरविण्याचा व्हिडीयो हा भारत या देशाची ,देश भावना म्हणून हत्या करणारी अतिशय तिरस्करणीय घटना होती.त्या दोन्ही तरुण महिलांना पुरुषांचा झुंड.. नग्न अवस्थेत फिरवित होते,त्यांच्या स्तनांना आणि योनिमार्गाला अश्लीलतेने हात लावित होते.अखेर त्यांनी त्यांच्यावर बलात्कार देखील केला.एपस्टीनच्या कृत्यासारखेच हेच कृत्य होते… त्यांचा देह त्या झुंडीच्या शत्रूत्वाचा सूड घेणारे साधन होते ..मणिपूरमधील या घटनेविरोधात मणिपूर पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केला नाही.३० जुलै २०२३ रोजी देशाच्या सर्वोच्च न्ययालयाला केंद्र व राज्य सरकारला धोरवर धरावे लागले.या देशातील दोन महिलांसोबत इतकी लज्जास्पद घटना घडल्यानंतरही एफआयआर नोंदवायला १४ दिवस का लागले?अशी विचारणा तत्कालीन सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी केली.महत्वाचे म्हणजे वारंवार इस्त्राईलला धाव घेणारे देशाचे पंतप्रधान यांनी मणिपूर जळत असताना,हिंसेच्या आगीत धगधगत असताना आपल्याच देशातील एका राज्याचा दौरा करने शेवटपर्यंत टाळले….!
या शर्मनाक घटनेविषयी पूर्णपणे मौन बाळगणा-या देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मर्मू कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरील बलात्कार व हत्याकांडानंतर मात्र,निषेध व्यक्त करत्या झाल्या.‘बस्स,आता पुरे झाले,कोणताही सुसंस्कृत समाज आपल्या मुली-बहीणींवरील नृशंस अत्याचार सहन करु शकत नाही,’असा निषेध व्यक्त करणा-या राष्ट्रपती मुर्मू मणिपूरच्या घटनेविषयी मात्र ‘मौनात’होत्या….!
भगवे वस्त्र धारण करुन धार्मिक प्रवचन करणारे स्वामी कृष्णस्वरुप दासजी तर या ही पुढे जाऊन,’मासिक पाळी सुरु असताना पतीसाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणा-या महिला पुढच्या जन्मात कुत्र्यांचा जन्म घेतली आणि त्यांच्या हातचे खाणारे पती पुढच्या जन्मी बैलाचा जन्म घेतील,’असे सांगून मोकळे झालेत…!हे ज्ञानी महाराज गुजरातमधील भुज येथील स्वामी नारायण मंदिराशी संबंधित आहे.या मंदिराकडून भुज येथे एक कॉलेज चालविले जाते.या कॉलेजमध्ये मासिक पाळी सुरु आहे का हे तपासण्यासाठी ६० मुलींची अंतर्वस्त्रे काढण्यात आली होती!पाळी सुरु असताना मुलींनी इतरांसाठी जेवण बनवायचे नाही असा या कॉलेजच्या वसतीगृहाचा नियम आहे.जो मोडला जात नाही हे तपासण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आणि यावर या ‘महाज्ञानी’दास यांची ही प्रतिक्रिया आली.असे कोणत्या धर्माच्या कोणत्या शास्त्रातील कोणत्या ओवी किंवा मंत्रात हे सांगितले आहे,याचा उलगडा मात्र ते करत नाहीत….!ज्या मासिक पाळीतून स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया घडते.शुक्राणूच्या संयोगातून हे ज्ञानी महाराज देखील जगात प्रगटले हाेते.भगवंताने दिलेल्या त्याच नैसर्गिक मासिक पाळीविषयी त्या महाराजांच्या मनात इतका तुच्छतेचा भाव,एपस्टीनच्या मानसिकतेपेक्षा कमी होता का…!
अफगाणिस्तानात तालेबानी यांची सरकार आल्यानंतर मुलींना फक्त सहावीच्या पुढे शिकण्यावर प्रतिबंध आहे.त्यामुळे त्यांनी सहावीपेक्षा जास्त वर्ग असलेल्या मुलींच्या शाळेतील पाण्यात विष कालवले….!या दोन्ही शाळा जवळ-जवळ होत्या.यामुळे ८० पेक्षा जास्त मुलींना विषबाधा झाली….!ही घटना आहे ५ जून २०२३ ची.२०१५ मध्येही अफगाणिस्तानात अशीच घटना घडली होती,त्यावेळी शाळेतील पिण्याच्या पाण्यातील टाक्यांमध्ये विषप्रयोगामुळे ६०० मुलींना विषबाधा झाली होती.भुजच्या या कॉलेजमध्ये सज्ञान विद्यार्थिनींसोबत जे घडले ,त्यांची अंर्तवस्त्रे तपासण्यात आली,ते….तालिबानी कृत्यापेक्षा कमी विषारी होते का?
अर्थात महिलांवर बलात्काराचे सुखं काय असंत याची व्याख्या करताना मध्यप्रदेशचे इंदोरमधील काँग्रेसचे आमदार फूल सिंह बरैया म्हणाले की,’सुंदर मुलगी दिसली,तर पुरुषांचे मन विचलित होणारच आहे आणि त्यांच्यावर बलात्कार होऊ शकतो.अनुसूचित जाती-जमातीवरील महिलांवर बलात्कारामुळे तर तीर्थक्षेत्राचे फळ मिळते!’त्यांचा हा व्हिडीयो देशभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.मध्यप्रदेशमध्ये इंदोरमध्ये दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूच्या संदर्भात काँग्रेस नेते राहूल गांधी इंदोरमध्ये आले होते.त्याचवेळी दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघाचे आमदार बरैया हे सगळं माध्यमांकडे बरळले होते….!या वक्तव्यावरुन वाद पेटल्यानंतरही जनेतेचे हे भाग्यविधाता आमदार आपल्या मतावर ठाम होते व ते अनुसूचित जाती-जमातीतील ४० कोटी महिलांच्या हितासाठीच बोलले ,असा दावा केला….!जेफ्री एपस्टीनचे विचार आणि कृत्य भारतीय आमदाराच्या विचारांपेक्षा याहून वेगळे होते का?
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्स’च्या एका अहवालानुसार लोकप्रतिनिधींवर(खासदार व आमदार)महिला अत्यांचाराचे सर्वाधिक आरोप दाखल आहेत.या लोकप्रतिनिधींच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करुन या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.अनेक लोकप्रतिनिधींवर बलात्कार म्हणजे कलम ३७६ चे गुन्हे दाखल आहेत…!ऑगस्ट २०२४ मध्ये या संस्थेने एकूण ४ हजार ६९३ प्रतिज्ञापत्रांची पडताळणी केली होती.यातील १५१ लोकप्रतिनिधींवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.यातील १६ खासदार व १३५ आमदार आहेत…!हेच खासदार व आमदार देशातील महिलांसाठी,त्यांच्या सुरक्षेसाठी,प्रगतीसाठी आणि विकासासाठी धाेरणे व कायदे तयार करण्याचे काम करतात…!
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करुन,महिलांना मोठे स्वप्न पाहण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे हे आरक्षण फक्त १५ वर्षांसाठीच असेल व ते २०२९ च्या लोकसभेच्या निवडणूकीपासून लागू होईल.राज्यघटनेतील ८२ व्या कलमामध्ये २००२ साली सुधारणा करण्यात आली होती.त्यानुसार २०२६ नंतर झालेल्या पहिल्याच जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची फेररचना होईल आणि ३३ टक्के महिला, खासदार होऊन लोकसभेत जातील.२०२१ मध्ये होणारी जनगणना आता २०२७ मध्ये होऊ शकते.महत्वाचे म्हणजे,ज्या लोकसभेत महिलांच्या नारी शक्तीला पंतप्रधानांनी वंदन केले त्याच लोकसभेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांकडून धोका असल्याचा दावा करीत, माेदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर न देताच लोकसभेचे सत्र समाप्त झाले.या महिला खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ येऊन,त्यांचा घेराव घालून, अप्रिय घटना घडविणार होते,हा धोका लक्षात आल्यानेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच पंतप्रधान मोदींना लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्याची औपचारिका पार पाडू नये आणि लोकसभेत येऊ नये,असा सल्ला दिला असल्याचे लोकसभेत सांगितले जे संपूर्ण देशाने फेब्रुवरी २०२६ च्या संसदेच्या सत्रात बघितले!
त्यांची ही भीती खरी होती तर असा प्रसंग पुढे ही घडू शकतो.यावर बिर्ला नेमके काय करणार आहेत?विरोधी पक्षाच्या महिला खासदारांकडू देशाच्या पंतप्रधानांना अगदी लोकसभेत धोका असेल तर तो पुढे ही असणारच आहे.असा प्रसंग पुन्हा आल्यास बिर्ला काय करणार आहेत?पंतप्रधान दरवेळी लोकसभेत येण्यास टाळू शकत नाहीत.२०२० मध्ये लडाखमध्ये जे घडले त्यावर निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील उतारा घेऊन विराेधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी ते सत्र गाजवले होते.या पुस्तकाच्या प्रकाशनावर भारतात बंदी आहे,हे विशेष!पुरावा म्हणून राहूल गांधी यांनी जे छापिल पुस्तककाची एक प्रत लोकसभेत दाखवली त्या प्रकाशकावर केंद्र सरकारने गुन्हा दाखल केला आहे.मुद्दा हा आहे,अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्याप्रमाणे त्यांच्या देशावर ‘अनीती’लादत आहे,तोच प्रकार महिलांच्या बाबतीत भारताच्याअगदी संसदेतही घडत आहे….!
विविध भागातून जनतेनी निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या महिला खासदारांवरच जर लोकसभा अध्यक्षांसारखी महनीय विभूती इतके गंभीर आरोप लावत असेल,तर या देशातील महिलांचा तो अपमान ठरताे.देशाच्या प्रगतीमध्ये या देशातील महिला बरोबरीने वाटा उचलत आहे.उत्पादन,बँकिंग,आयटी क्षेत्र,उद्योग क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्रापासून तर सैन्यापर्यंत .त्यामुळे जोपर्यंत महिलांविषयीची मानसिकता.. जातपंचायतीपासून,आमदार,खासदार ते लोकसभा अध्यक्षांपर्यत बदलत नाही तोपर्यंत फक्त एपस्टीनच्या कृत्यांना दोष देऊन उपयोग नाही….!तो फक्त…एकच एपस्टीन होता….भारतात पदोपदी एपस्टीन …पुरुषांच्या मानसिकतेत दिसून पडतो….!
(जागतिक महिला दिन लेखमाला समाप्त)
Advertisements

Advertisements

Advertisements
