एलआयसी क्वार्टरची २० हजार चौ.मी.जागा बिल्डरच्या घशात

धंतोली पोस्ट ऑफिस अचानक फ्रॅण्ड्स कॉलनीत स्थलांतरित
नागपूर,ता.२६ फेब्रुवरी २०२६: भारतीय टपाल सेवा ही जगातील सर्वात मोठे जाळे असून ते पत्रांच्या देवाणघेवाणीसोबतच,विश्वासार्ह्य बचत योजनेसाठी देखील भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे.पार्सल सेवा,मनी ऑर्डर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विशेष योजनांद्वारे ग्रामीण व शहरी भागात अत्यंत महत्वाची आर्थिक दळवळण सेवा पुरवाणारी ही टपाल सेवा, स्वातंत्र्यांच्या काळापासून प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील अभिन्न अंग झाली आहे.अशा वेळी एखाद्या शहरी भागातील एखादे फार जुने पोस्ट ऑफिस अचानक सात ते दहा किलोमीटर अंतरावर, कोणत्याही नियोजनाशिवाय स्थलांतरित करण्याचा आदेश येऊन धडकतो तेव्हा त्या भागातील ज्येष्ठ खातेधारक,महिला ग्राहक,रिकरिंग डिपॉजिट(आर.डी)जमा करणा-या महिला एजेंट आदी अनेक घटकांवर त्याचा दूर वर परिणाम घडून येत असतो.
धंतोलीतील पोस्ट ऑफिस हे अनेक दशकांपासून येथील रहीवाश्यांसाठी सोयीची टपाल सेवा असताना, अचानक या पोस्ट ऑफिसला १ मार्चपासून फ्रॅण्ड्स कॉलनीत स्थलांतरित करण्यात आले आहे.या आदेशामुळे धंतोलीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे.
हे पोस्ट ऑफिस आधी धंतोली उद्यानासमोर होते मात्र,एलआयसीने ती जुनी इमारत पाडून भव्य आणि प्रशस्त अशी नवीन इमारत तब्बल एक दशकांपूर्वी बांधली.याच इमारतीत धंतोली पोस्ट ऑफिससाठी जागा देखील उपलब्ध आहे मात्र,या जागेचे ३० हजार रुपये मासिक भाडे पोस्ट विभागाला परवडत नसल्याचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्य जनरल पोस्ट कार्यालयाचे(जीपीओ) अधिकारी सांगतात.
महत्वाचे म्हणजे,वर्धा रोडवरील दैनिक हितवादच्या परिसरात देखील पोस्ट ऑफिस मानकापूरला स्थलांतरित करण्यात आले आहे.परिणामी हे पोस्ट ऑफिस देखील धंतोली येथील खातेधारकांसाठी येत्या १ मार्चपासून उपलब्ध नसणार आहे.परिणामी ,धंतोलीसारख्या भागातील दोन अतिशय महत्वाचे पोस्ट कार्यालय, एक साथ दहा किलोमीटर अतंरावर स्थलांतरित करण्यात आल्यामुळे, आज खातेधारक ज्येष्ठांनी व महिलांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.पोस्ट सेवा ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे की नेते व अधिका-यांच्या मनमानी कारभारासाठी,असा सवाल उपस्थित झाला आहे.
धंतोली येथील एलआयसी क्वार्टरचे अंदाजे २० हजार चौ.फूटांपेक्षा अधिकचा परिसर हा आता एका बिल्डरला देण्यात आला असून, या ठिकाणी आणखी एक मॉल तसेच कोट्यावधींचे वारेन्यारे करणारी रहीवासी ईमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.एलआयसी क्वार्टरच्या इमारती अद्यापही अतिशय सुस्थितीत असून व इमारतीतील मुलांसाठी खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होती मात्र,इतका मोठा परिसर आता शहरातील आणखी एका सिमेंट-काँक्रिटच्या बांधकामातून कोंडला जाणार आहे.या जागवेरील अनेक हिरवीगार वृक्षे या विकासकामाची भक्ष्य ठरणार आहेत,हे विशेष.

(छायाचित्र : अतिशय सुस्थितीत असलेली एलआयसी क्वाटर्सची ईमारत व हिरवीगार वृक्षवल्ली)
याहून महत्वाचे म्हणजे संपूर्ण शहरात बिल्डर किवा डेव्हलपर्स यांनी बांधकाम केल्यानंतर नष्ट केलेल्या वृक्षराजीं ऐवजी कुठेही वृक्षारोपण केल्याची नोंद नाही!त्यांच्या निव्वळ नफ्याच्या बेरजेत, नागपूरकरांच्या प्राणवायूचा नैसर्गिक हक्क समाविष्ट नसतो,हे मुख्यमंत्र्यांच्या शहराचे आगळेवेगळे वैशिष्ठ ठरते.
धंतोली पोस्ट ऑफिसच्या चाळीस हजारच्यावर खातेधारकांची खाती काँग्रेसनगरच्या पोस्ट कार्यालयात वळती करण्यात आल्याची माहिती जनरल पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रसून्न रेड्डी यांनी खातेधारकांना दिली मात्र,काँग्रेसनगरचे पोस्ट कार्यालय पहील्या मजल्यावर असून, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अतिशय गैरसोयीचे असल्याचे मत खातेधारकांनी व्यक्त केले.यावर रेड्डी यांनी,आमचा एक माणूस वरुन खाली येईल व तुमची रक्कम जमा करेल,पोस्टाशी सबंधित इतर कामे करेल,असे ‘अफलातून’ उत्तर खातेधारकांना दिल!
‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’भारतात अशी किर्ती सरकारी बाबूंच्या कामाची असताना,चाळीस हजारच्या वर खातेधारकांसाठी काँग्रेस नगर पोस्ट ऑफिसचे कर्मचारी चक्क पहीला मजला उतरुन खातेधारकांसाठी काम करतील हे भारतासारख्या देशात तरी अशक्यप्राय सेवा आहे!काँग्रेस नगर येथील पोस्ट ऑफिसकडे असे कोणते लग्नाचे सभागृह आहे ज्यामध्ये रणरणत्या उन्हात ज्येष्ठांना थांबवून त्यांची पोस्टाची कामे करण्यासाठी तेथील कर्मचारी धावत खाली येतील,असा खोचक सवाल देखील खातेधारकांनी केला.
याहून महत्वाचं म्हणजे काँग्रेस नगरच्या पोस्ट कार्यालयावर आधीच खूप कामाचा ताण असून ‘ऑल इंडिया रिर्पोटर्सच्या ’कामांचा खूप मोठा बोजा आधीच या कर्मचा-यांवर असताना, जीपीओच्या अधिका-यांनी धंतोली येथील खातेधारकांच्या सोयीचा कोणताही विचार न करता,अधिकारशाही गाजवली असल्याची नाराजी आज अनेक खातेधारकांनी व्यक्त केली.
२२ फेब्रुवरी रोजी धंतोली पोस्ट ऑफिसला २८ फेब्रुवरी रोजी तातडीने कार्यलय रिकामे करण्याचे नियोजनशून्य आदेश त्यांनी पाठवले!फ्रॅण्डस कॉलनीतील पोस्ट कार्यालय हे अवघ्या १५ बाय १० चौ.फू.जागेमध्ये आहे.भविष्य काळात कामाचा व्याप बघून जागेमध्ये वाढ करण्याचे चमत्कारिक धोरण जीपओ अधिका-यांनी स्वीकारले आहे.

(छायाचित्र : धंतोली पोस्ट ऑफिसमध्ये चिटकवलेली नोटीस)
अनेक ज्येष्ठ खातेधारकांनी धंतोलीतील हे पोस्ट कार्यालय हितवाद परिसरातील पोस्ट कार्यालयात स्थलांतरित करावे अशी मागणी केली असून हितवाद येथील कार्यालयाचे कोणतेही भाडे जीपीओला भरावे लागत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र.१५ मधून निवडून आलेले चारही नगरसेवक यांनी तातडीने धंतोलीतील नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असून, अनेक खातेधारकांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
…………………………………
Advertisements
