नागपूर: ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची असली तरी नागपूर शहराचा विकास हा आमचा उद्देश्य आहे.नागपूर शहरात आज अनेक समस्या आहेत,नागपूर महानगरपालिकेसारखी स्वायत्त संस्था ही आता खासगी संस्था झाली आहे. महामेट्रोला शहरातील मोक्याच्या जागा दान देण्यात आल्या. पाणी पुरवठासारख्या जिवनावश्यक गरजा देखील मनपाने खासगी कंपन्यांकडे देऊन टाकल्या. चोवीस बाय सातची योजना आणली मात्र पाणी मिळत नाही,मग पाणी नेमकं जातं कुठे?रोजगार आले नाहीत,मिहानचा विकास झाला नाही,मुत्तेमवार होते तेव्हा कार्गोसाठी प्रयत्न झाले होते. कवडीमोल भावाने बाबा रामदेव यांना जागा देण्यात आली अद्याप तिथे उद्योगाला सुरवात झाली नाही,नागपूरचा विकास म्हणजे घोटाळ्याचा विकास असल्याचा झणझणीत आरोप माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांनी पत्र-परिषदेत केला.
शनिवार दि.१६ मार्च रोजी सिव्हिल लाईन्स येथील नागपूर प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.या प्रसंगी मंचावर प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,शहराध्यक्ष् विकास ठाकरे,प्रदेश सचिव प्रफूल्ल गुडधे,विशाल मुत्तेमवार, ॲड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले,की जनतेच्या घामाचा पैसा लुटलवल्या जातोय. २००९ साली गडकरी यांनी घोषणा केली होती आम्हाला सत्ता दिली तर मिहानचा विकास करु, शेतकऱ्यांचा माल विदेशात पाठवू,पाच वर्षात केंद्रात मंत्री राहील्यानंतर देखील मिहानचा विकास झाला नाही.मुत्तेमवार यांच्या काळात जे उद्योग आले तेच उद्योग आजही आहेत,नवीन उद्योग आलेच नाही.गडकरी म्हणतात ‘माझा आयक्यु दोनशे कोटींचा आहे,त्यांच्या विद्वतेबाबत शंका नाही मात्र चांगले डांबरी रस्ते खोदून काढून सिमेंट रस्ते बनवले, ६ जुलैच्या पावसात विधान भवनच नव्हे तर संपूर्ण नागपूर शहरच सिमेंट रस्त्यांमुळे पाण्यात गेले. असा एकही प्रभाग किंवा घर नव्हते ज्या घरात सिमेंट रस्त्यांमुळे पाणी शिरले नाही.अद्याप लोकांना भरपाई मिळाली नाही,विकासाच्या नावावर किती पैसे खर्च केले, नागपूरकरांवर किती खर्च लादला याबाबत ‘श्वेत पत्रिका’जाहीर करा मगच निवडणूकीला सामोरे जा,अशी मागणी पटोले यांनी केली.
दहा पट घरांचे टॅक्स वाढवले,साठ ते ऐंशी हजार कोटींचा विकास नागपूरात केला याचा हिशोब गडकरी यांनी द्यावा हे पैसे वापस कसे करणार?ते ही नागपूरकरांना सांगा. मी निवडूण आल्यास मिहानला पूर्णत्व प्रदान करणे हे माझे पहीले कर्तव्य राहील असे ते म्हणाले. तरुणाईच्या हाताला काम मिळेल असे व्यापारी हब निर्माण करणार.
खैरलांजीबाबत आरोप खोटे-
माध्यमांशी संवाद साधताना सर्वप्रथम त्यांनी माध्यमात त्यांच्या विषयी खैरलांजी प्रकरणात तथाकथित आरोप लावण्यात आल्याचा खुलासा केला. १२ वर्षीय तेली समाजाच्या मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आला तेव्हा भोतमांगे कुटुंबासारखाच या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी विधानसभेत केली,कायद्या हातात घेणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहीजे एवढीच मागणी केली होती मात्र या मागणीला जातीय रंग देण्यात आला. काल नागपूरात आलो तेव्हा अनेक दलित संघटना यांनी रेल्वे स्थानक व संविधान चौकात माझे स्वागत केले. खैरलांजी प्रकरणात माझा कुठेही संबंध नव्हता माझी मागणी ही फक्त अन्यायाच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
गडकरींच्या आर्शिवादाचा स्वीकार करतो-
परवा गडकरी यांनी आर्शिवाद दिला ते माझ्यासाठी मोठे बंधू आणि आदरणीय अाहेत. त्यांच्या आर्शिवादाचा मी स्वीकार करतो,त्यांचा आर्शिवाद निश्चितपणे वेगळ्या वाटचालीवर मला घेऊन जाणार म्हणून मी त्याचा स्वीकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आर्शिवादातून चार लाख मते अधिकची मी घेईल अशी कोटी करायलाही ते विसरले नाहीत.
मोदी पंतप्रधान व्हावे ही चीन व पाकिस्तानची ईच्छा!-
पुलवामा शहीदांच्या नावाखाली मते मागितली जातात मात्र हा आरोप नसून वस्तूस्थिती आहे की पाकिस्तान व चीनलाही मोदीच पंतप्रधान हवेत!चायनाच्या वस्तूंनी अख्खा देश काबिज केला असून हा देश पुन्हा पारतंत्र्यात जावे,जुनी संवैधानिक व्यवस्था मोडकळीस यावी, न्यायव्यवस्था संकटात आहेच,न्यायमूर्तीच आज माध्यमांसमोर येत आहेत, त्यांना संवैधानिक व्यवस्था संपवून हुकुमशाही देशात अाणायची असल्याचा आरोप यावेळी पटोले यांनी केला. हे ‘स्टार्ट अप इंडिया नव्हे तर स्टार्ट अप चायना’ असल्याची टिका त्यांनी केली. कालच ‘हिंदूत्वाचा’ शंखनाद त्यांनी केला मात्र त्यांच्याच काळात सर्वात जास्त मंदिरे तोडण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
विकासाच्या नावावर विद्रुपीकरण-
विदर्भाच्या विकासाच्या नावावर सध्या विद्रुपीकरण सुरु असल्याचा आरोप नाना यांनी केला. आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. एम्सची अद्याप एक वीट ही चढली नाही.मेट्रोच्या नावावर लृट सुरु आहे. बुट्टीबोरीपासून मेट्राेची सुरवात व्हावी तर सदर ते बर्डी सैर करण्यासाठी मेट्रो सुरु केली जात असल्याचे ते म्हणाले. मला तिकीट देताना राहूल गांधी यांनी विचारले तेव्हा मला विदर्भाच्या विकासासाठी लढायचे असल्याचे मी सांगितले.
लोकतंत्रात नेता नव्हे जनता मोठी-
माझ्या समोर किती ही मोठा आणि कद्दावर नेता जरी निवडणूकीत उभा असला तरी लोकतंत्रात नेता नव्हे तर जनता ही मोठी असल्याचे विधान त्यांनी केले.मी नागपूरचाच असून मोदी जर गुजरातचे असून वाराणशी मधून निवडणूक लढू शकतात तर नागपूर हे तर माझेच शहर असल्याचे ते म्हणाले. माझी मुले नागपूरात शिकत असून गेल्या वीस वर्षांपासून नागपूरशी माझे नाते जुळले आहे. वेगळ्या विदर्भाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी वेगळ्या विदर्भाचा समर्थक असून काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये वेगळ्या विदर्भाचा मुद्दा टाकण्यास मॅनिफेस्टो समितीला सांगणार असल्याचे ते म्हणाले. २०१४ साली गडकरी यांनी कोऱ्या स्टॅम्पवर राज्यात व केंद्रात सत्ता आल्यास वेगळा विदर्भ देणार म्हणून लिहून देणार असल्याचे सांगितले होते. आता केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. मुख्यमंत्री,अर्थमंत्री, उर्जामंत्री विदर्भाचे अाहेत मग ‘कथनी अाणि करणी मध्ये फरक का?’ असा सवाल त्यांनी केला.