नागपूर. बेलतरोडी ठाण्याअंतर्गत भूखंड विक्रीचा करारनामा करून 30 लाख 50 हजार रुपये घेणाऱ्या लॅण्ड डेव्हलपर्सने दोन वर्षे होऊनही भूखंडाची विक्री करून दिली नाही. त्यामुळे तिघांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यातील राहुल शरद पिल्लेवार (38) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेलतरोडी आरोपी प्रतापसिंग भास्करराव धुमाळ (35, रा. बरडेनगर, बोरगाव) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिल्लेवार आणि त्यांच्यासोबतच्या दोन सहकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, त्यांनी प्रतापसिंग धुमाळ यांच्याकडून मौजा बेलतरोडीतील खसरा क्रमांक 107/05 मधील 28, 29, 30, 36 आणि 37 क्रमांकाचे भूखंड घेण्याचा करारनामा केला. त्यानुसार 23 एप्रिल 2016 ते 15 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आरोपी धुमाळ यांच्या बँक खात्यात 30 लाख 50 हजारांची रक्कम आरटीजीएसद्वारे जमा केली. आरोपी धुमाळ यांच्या महालक्ष्मी इन्फ्राव्हेंचर नामक कार्यालयातून तशी पावतीही घेतली. आता या कराराला तीन वर्षे होत आहेत. मात्र, धुमाळ यांनी भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही. त्यांनी मुद्दामहून टाळाटाळ करून सदर रक्कम घेऊन विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने पिल्लेवार यांनी बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी धुमाळविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.