नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गेल्या साडेचार वर्षात भ्रष्टाचारऱ्यांवर लगाम लावली आहे़ स्व़ पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात केंद्राकडून निघालेल्या एका रुपया, गरीबांपर्यंत पोहोचेपर्यंत १८ पैसे होऊन जात होता़ मात्र, आता एका रुपयातील ९९ पैसे गरीबांपर्यंत पोहोचतात़ मात्र, राहूल गांधी ‘राफेल’वर अडून बसले आहेत़ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारल्यावरही ते स्वत:ला मोठे समजत आहेत़ अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज येथे केले़
भारतीय जनता पार्टीच्या नागपूर, रामटेक आणि भंडारा लोकसभा क्षेत्रातील शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा गुरुवारी रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृृहात पार पडला़ मेळाव्याला दोन हजारावार शक्ती केंद्र प्रमुख सहभागी झाले होते़ त्यांना मार्गदर्शन करताना त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकर्त्यांना २०१९च्या निवडणूकीत पुन्हा भाजपा सरकार स्थापित करण्याचे आवाहन केले़ यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ़ अनिल सोले, आ़ सुधाकर देशमुख, आ़ सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, राजकुमार बडोले, डॉ़ राजू पोतदार, डॉ़ उपेंद्र कोठेकर, जमाल सिद्दीकी, सुभाष पारधी, आ़ चरण वाघमारे, आ़ मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़
नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असून, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे सामर्थ्य या भूमीत आहे़ साडेचार वर्षापूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाला होता़ तेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये देशाचे सामर्थ्य वाढवण्याचे कार्य केले आहे़ सामर्थ्यापुढे जग नमते, हे याच काळात सिद्ध झाले़ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प ‘मोदी मॉडेल’ अंमलात आणतात, युएईमध्ये मंदिराची उभारणी होते आणि डोकलाममधून चीनला माघार घ्यावी लागते़ हे सामर्थ्य मोदींमुळेच प्राप्त झाले़ कधी सतत धगधगणाऱ्या कश्मिरात आता दहशतवाद संपत आला आहे आणि सैनिकांवरील हल्लयातही कमतरता आली आहे़
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंमत दाखवत पाकीस्तानचे पाणी बंद केले आणि विकासाचा पर्याय म्हणून ते सिद्ध झाले़ एवढी हिंमत आजवर कोणत्याही मंत्र्याने दाखवली नसल्याचे त्रिवेंद्रसिंह रावत यावेळी म्हणाले़ आणि तिकडे राहूल गांधी स्वत:ला सर्वोच्च समजतात़ साडेचार वर्षात केंद्र व राज्य सरकारने ज्या लोकोपयोगी योजना सादर केल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांचे आहे़ त्याच अनुषंगाने भाजपाचे ४६ हजार कार्यकर्ते एका वर्षासाठी पूर्ण वेळ विस्तारक म्हणून बाहेर पडले आहेत़ आता निवडणूक जवळ असून, पुन्हा सत्तेत येण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने भिडण्याचे आवाहन रावत यांनी यावेळी केले़.
भाजप शक्ती गीताचे विमोचन
:- यावेळी, निवडणूक काळात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भाजपाचे कार्य पोहोचवण्यासाठी तयार केलेल्या शक्ती गीताचे विमोचन त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले़ .