फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजभाजपच्या अशोक चव्हाण गटातील कार्यकर्ते काँग्रेसचे उमेदवार!

भाजपच्या अशोक चव्हाण गटातील कार्यकर्ते काँग्रेसचे उमेदवार!

बच्चू कडू यांचा दावा :परिवर्तन महाशक्ती घडवणार महाराष्ट्रात परिवर्तन
१२१ उमेदवार केले उभे
नागपूर,ता.४ नोव्हेंबर २०२४: आघाडी आणि युतीमध्ये ‘बाहेरच्या’उमेदवारांची व्यवस्थित‘सेटिंग‘करण्यात आली असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये त्यांचेच काही उमेदवार घातले की काय?असा काँग्रेसचाच आरोप होता ,अशोक चव्हाण गटातील काही उमेदवार हे काँग्रेसच्या तिकीटावर जिंकून येत असले तसेच उद्या जर सरकार स्थापनेत काही अडचण निर्माण झाल्यास असे व्हायला नको की ‘फूटून’तिकडे गेले,याचा अर्थ अतिशय चित्रविचित्र अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली असून, आम्हाला परिवर्तनासाठी जनतेची साथ हवी आहे,असे विधान आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी केले.ही निवडणूक शेतकरी,शेतमजूरांच्या मुद्दावर आम्ही लढत असून आम्हीच जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.
याप्रसंगी मंचावर स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे,स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी,विदर्भवादी नेते व माजी आमदार वामनराव चटप आदी उपस्थित होते.
महाशक्ती ही कोणत्याही एका भागापुरती मर्यादित नसून आम्ही चौकार मारणार आहोत,प्रचंड ताकदीने लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.तळागाळातल्या माणसाला आता परिवर्तन हवे आहे.समाजातील वंचितांसाठी आमची ही खरी लढाई आहे ती लढाई आम्ही विचार आणि मुद्दांवर लढत आहोत.आम्ही आहोत म्हणून या निवडणूकीत मुद्दे आहेत,आम्ही नसतो तर ही निवडणूक फक्त धर्म आणि जात याच मुद्दांवर लढली गेली असती,असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.निवडणूकीत कोण जिंकेल कोण हरेल हा मुद्दा गौण असून याचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणारच आहे मात्र,लढाई कोणत्या मुद्दांवर लढली पाहिजे,ते आमची महाशक्ती सांगणार आहे,असे बच्चू कडू म्हणाले.
याप्रसंगी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात एक सशक्त आणि ताकदवान पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला.गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात अशी दोनशे ते अडीचशे अशी घराणी आहेत की तेच आलटून-पालटून वेगवेगळ्या आघाड्या करुन निवडणूका लढवतात व  सत्तेत येतात.या सर्व प्रस्थापितांना शह देण्यासाठी तसेच सर्वसामान्य कुटूंबातील आश्‍वासक चेह-यांना एकत्रित करुन या निवडणूकीत संधी देऊन आम्ही ही परिवर्तन महाशक्ती निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले.आज महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लोप पावलेली असून अतिशय खालच्या दर्जावर राजकारणाचा स्तर पोहोचला असल्याची टिका करीत,हे राजकारण नसून राज्यात गृहयुद्ध आहे का? असा संशय येतो.अश्‍या परिस्थितीत जे जनसामान्यांचे प्रश्‍न आहेत त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.दररोज सरासरी १२ शेतकरी आत्महत्या करत आहेत,त्याची चिंता ना महाविकासआघाडीला आहे ना महायुतीला.हीच परिस्थिती बेरोजगारांची आहे.बेरोजगारांचे तांडेच राज्यात तयार झाले आहेत,परंतू तिकडे ही लक्ष देण्यासाठी या ‘धंदेवाईक’राजकारण्यांना वेळ नाही अशी टिका त्यांनी केली.महाराष्ट्रात जे कामगार आहेत,मजूर आहेत,कंत्राटदारांच्या हाताखाली रोजंदारी करणारे असंघटित मजूर आहेत,ज्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे मात्र,तिजाेरीतील पैशांची उधळपट्टी  चालली आहे अशी टिका करीत ,आता या क्षणी ३ हजार ३०० कोटींचा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी थकीत आहे.दिव्यांगाचा निधी देखील अखर्चित आहे,सरकारी शाळा बंद पडल्या आहेत,हे सर्व जनसामान्यांचे प्रश्‍न घेऊन आम्ही या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की,परिवर्तन महाशक्ती का निर्माण झाली?या महाशक्तीचा उद्देश्‍य काय याचे विस्तृत वर्णन राजू शेट्टी व बच्चू कडू यांनी केले.जनसामान्यांच्या प्रश्‍नांना घेऊन आम्ही सर्वसामान्य कुटूंबातील संपूर्ण महाराष्ट्रातून १२१ उमेदवार उभे केले असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. आम्हाला अधिक वेळ मिळाला असता तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व जागा लढल्या असतो मात्र,शेवटच्या टप्प्यात एक चांगला आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली.७५ वर्षात समाजाचे जे मूलभूत प्रश्‍न आहेत,त्यावरच आज ही आपण बोलत आहोत,एक लाँग टर्म व्हिजन बाँड प्रोग्राम आज ही आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत नाही.आपल्या शेजारील कर्नाटक,तेलांगणासाखे राज्य असा प्रोग्राम घेऊन आपल्या पुढे निघून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.आज मराठा नेते मनोज जरांगे  यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मराठा समाजाच्या हितासाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला,लवकरच परिवर्तन महाशक्ती त्यांच्याशी चर्चा करेल व महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देण्यावर चर्चा करु,असे ते म्हणाले.कालच नागपूरला येण्याचं ठरलं असून आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रातच परिवर्तन महाशक्तीच्या पत्रकार परिषदा झाल्या मात्र,विदर्भ व नागपूरकरांना आमची भूमिका सांगण्यासाठी नागपूरात आलो असल्याचा खुलासा त्यांनी केला.पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षाही अधिक उमेदवार आमचे विदर्भातून जिंकून येणार असल्याची अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी सांगितले की,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तनासाठी नऊ घटक पक्ष या निवडणूकीत एकत्र आले आहेत.महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे तसेच महाविकासआघाडीचे सरकार बघितले आहे,दोन्ही पक्षातील दोन मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा कारभार बघितला आहे,त्यांच्या  सत्ताकाळात राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघाले,आमची सत्ता आल्यास राज्याची आर्थिक घडी तसेच कायदा-सुव्यवस्था पुर्नस्थापित करु,माणूस म्हणून जगता येईल अशी स्थिती निर्माण करु असे सांगत,राज्यात परिवर्तन घडवा,अशी मतदारांना त्यांनी आवाहन केले.एकेकाळी व-हाडाला सोन्याची कु-हाड’म्हटले जात होते,त्याच व-हाडात गेल्या १२ वर्षात ३५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली.बँकांनी कर्ज फेडण्यासाठी सक्तीच्या नोटीसी पाठवल्या.विदर्भातील ३० प्रकल्प अपूर्ण आहेत,सिंचनाचा अनुशेष अजूनही तसाच आहे,परिणामी आमचे राज्य आले तर पाच वर्षात १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणू,असा दावा याप्रसंगी वामनराव चटप यांनी केला.
सावनेरमध्ये प्रहारचे उमेदवार डॉ.प्रणय चांदेकर हे धनोजे कुणबी असून काँग्रेसच्या अनुजा केदार तसेच भाजपचे डॉ.आशिष देशमुख हे तिरळे कुणबींची मते विभागून घेणार,धनोजे कुणबींची ७० हजार पेक्षा अधिक मते सावनेरमध्ये आहे,त्यामुळे धनोजे कुणबी उमेदवार सावनेरमध्ये देण्यात आला का?रामटेकप्रमाणेच सावनेरमध्येही परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांची सभा होईल का?असा प्रश्‍न केला असता,जातीचे गणित आम्ही मांडत नाही,सर्व जाती-धर्माच्या प्रश्‍न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले.
महाराष्ट्रातील २८८ जागेपैकी परिवर्तन महाशक्तीचे फक्त १२१ उमेदवारच आहेत जो बहूमतापेक्षा फार कमी आकडा अाहे,याकडे लक्ष वेधले असता,आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे,पुढे आमच्या जागा वाढू शकतात,असा गुगली संभाजी राजे यांनी टाकली,सगळे पत्ते आम्ही आज उघडणार नसल्याची कोटीही त्यांनी केली.त्यांचा रोख अपक्षांवर हाेता,असे बोलले जात आहे.
एका प्रश्‍नाच्या उत्तरावर,आमच्याकडे पैसा नाही याचा अर्थ आम्ही गप्प बसायचं का?असे प्रतिउत्तर संभाजी राजे यांनी दिले.स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी राजे यांच्या समोर मोठमोठे शाही राजे होते,आदिलशाही,निजामशाही सारखी घराणी होती मात्र छत्रपती शिवाजी राजे गप्प बसले का?आपलं मन स्वच्छ असेल,विचारशक्ती असेल तर यश स्वत:चालून येत असतं,आमचा प्रयत्न तोच आहे ,पैसा जरी आमच्याकडे नसला तरी या निवडणूकीत यश मिळवायचा आमचा उद्देश्‍य स्पष्ट असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.
तुमच्याकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा कोणता आहे?असा प्रश्‍न केला असता,आम्ही तो चेहरा नंतर सांगू आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारा पुढील निवडणूकीनंतर त्यांच्याकडे या दोन्ही पदांसाठी कोणता चेहरा आहे?असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले.‘दिल को देखो चेहरा ना देखो’असे म्हणत मुख्यमंत्री कोण?हा प्रश्‍न फडणवीसांना विचारा,असे चटप म्हणाले.
…………………………..
तळटीप- 
बच्चू कडूंच्या प्रहारची रामटेक मधून माघार..प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारमोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे..स्टार प्रचारक म्हणून निवड!!प्रहारचे कार्याध्यक्ष बंडू जवांदार यांचे कारमोरे यांना पत्र..महाराष्ट्रात १२१ जागांवर परिवर्तन आघाडीचे उमेदवार उभे असल्याने व स्टार प्रचारक यांची कमतरता असल्याचे पत्रात दिले कारण…!
नागपूर शहर व ग्रामीण मधून प्रहारचा एकमेव उमेदवार सावनेर मधून कायम.डॉ.प्रणय चांदेकर यांची आशिष देशमुख व अनुजा केदार विरोधात लढत कायम…पडद्या मागे केदार.. कडू बैठकची चर्चा…रामटेक मध्ये प्रहारची माघार… मुळक यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा!
……………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या