विद्यापीठाने सुटी देखील जाहीर केली नाही
सोशल मिडीयावर शेकडो भावनिक पोस्ट मात्र…
राज्यपालांचा अभ्यास आता ’निरुपयोगी’
कुलगुरु राजकारणाचे बळी ठरले का?कुटूंबियांकडून उत्तर अपेक्षीत
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ सप्टेंबर २०२४: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निलंबित कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी यांचा काल मध्यरात्री किंग्जवे रुग्यालयात हार्टअटैकने मृत्यू झाला,असे अधिकृतपणे घोषित करण्यात आले.अर्थात डॉ.चौधरी यांचा मृत्यू हा अनेकांच्या मनाला चटका लाऊन जाणारा ठरला.विविध कारणांमुळे त्यांच्यावर झालेले आर्थिक अनियमिततेचे आरोप,२१ फेब्रुवरी २०२४ रोजी राज्यपालांनी त्यांचे केलेले निलंबन,राज्यपालांच्या या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायलयात त्यांनी घेतलेली धाव,न्यायालयाकडून मिळालेला दिलासा,पुन्हा राज्यपालांकडून चौकशीचा सुरु झालेला ससेमिरा,पुन्हा निलंबन,पुन्हा डॉ.चौधरींची उच्च न्यायालात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात धाव या सर्व घडामोडी नागपूरकरांना माहिती आहे मात्र,न्याय-अन्यायाच्या,सत्य-असत्याचा,प्रतिष्ठा-अप्रतिष्ठेच्या या संपूर्ण लढाईत कुलगुरु डॉ.चौधरी हे एकाकी होते,हे मान्य करावेच लागेल.आज अंबाझरी घाटात त्यांचा पार्थिव देह अनंतात विलिन झाल्यावर पार पडलेल्या शोकसभेत प्र.कुलगुरु संजय दुधे यांच्या मुखातून ,‘डॉ.चौधरींसारखे इमानदार कुलगुरु विद्यापीठाला मिळाले,असे कुलगुरु पुन्हा भेटणार नाही’अशी शोकसंवेदना प्रकटली त्यावेळी,ते हयातीत असताना त्यांच्या राजकीय,न्यायिक आणि नैतिक लढ्यात हे सर्व कुठे होते?असा प्रश्न उपस्थितांना पडणे स्वाभाविक आहे.
इतकंच नव्हे तर आज फेसबुक पासून तर एक्स,व्हाॅट्स ॲपवर दिवंगत कुलगुरुंसाठी अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त करीत,त्यांच्यासोबतच्या आपल्या आठवणी भरभरुन शेअर केल्या.ते किती उच्च दर्जाचे कला रसिक होते,गायक होते,त्यांच्या आवडीची गाणी,त्यांचे कामाप्रतिचे सर्मपण,अमूक विद्यालयात प्राचार्य असताना,अमूक विभागात विभाग प्रमुख असताना त्यांनी केलेले भरीव काम,मनमिळावू स्वभाव इत्यादी-इत्यादी माहितीचा आज सोशल मिडीयावर महापूर आला मात्र,ते हयातीत असताना,त्यांच्यासाठी,त्यांच्या बाजूने याच त्यांच्या ‘चाहत्यांना’साधे दोन शब्द देखील ,त्यांच्या एवढ्या प्रदीर्घ व कारर्कीदीच्या महत्वाच्या शैक्षणिक व राजकीय लढ्यात सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करावसे वाटले नाही !
आपल्या भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर सगळा वैरभाव संपुष्टात येत असतो,गेलेल्या माणसासाठी फक्त चांगलं बोललं,लिहलं व सांगितलं जातं मात्र,याच सर्व शब्दांची,समर्थनाची गरज, ही ते हयातीत असताना त्यांना नव्हती का?आता ते हयातीत नाही,सोशल मिडीया किवा राजकारणातील शीर्षस्थ नेत्यांचा शोकसंवेदनाचा त्यांना काय उपयोग?ते किती भ्रष्ट आहेत हे सिद्ध करण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती अवलंबिणारे आता ते किती इमानदार होते,मनमिळावू होते,महान होते,कर्तव्यदक्ष होते,हे सांगण्यासाठी तत्पर झालेले बघून,त्यांच्या कुटूंबियांना काय वाटत असावे?
कुलगुरु आज आपल्यात नाहीत,ते सगळं काही आपल्या मनातलं सोबतच घेऊन गेलेत.कुलगुरु पदावरील व्यक्ती संवैधानिक पदावर असल्याने पत्रकार परिषद घेऊन व्यक्त ही होऊ शकत नाही,अनेक बंधने त्यांच्यावर असतात.जास्तीत जास्त शैक्षणिक धोरणाबाबत प्रतिक्रिया देत असतात मात्र,जनते समोर येऊन मनातलं,जीवनातलं वादळ मांडू शकत नाही,हाच नियम न्यायदानाच्या क्षेत्रालाही लागू आहे मात्र,२०१५ मध्ये पहील्यांदा तो मोडण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी पहील्यांदा दिल्लीत न्यायदानाच्या क्षेत्रात राजकीय ढवळाढवळ,मुस्कटदाबी आणि अनैतिक हस्तक्षेपाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि..संपूर्ण देश स्तब्ध झाला!२०१४ मध्ये मोदी सरकार पहील्यांदा संपूर्ण बहूमतासह देशाच्या सत्तेत आले होते,हे विशेष!त्या पूर्वी देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर कधीही पत्रकार परिषद घेऊन देशवासियांसमोर न्यायदानाच्या क्षेत्रावर आलेले संकट मांडण्याची वेळ आली नव्हती!
दिवंगत कुलगुरुंना व्यक्त होता आले नाही,आता कधीही त्यांना नागपूरकर जनतेसमोर त्यांची बाजू मांडता येणार नाही,सांगता येणार नाही त्यामुळेच त्यांच्या कुटूंबियांकडून नागपूरकर जनता अपेक्षा करीत आहे,कोणतेही दडपण न ठेवता त्यांनी दिवंगत कुलगुरुंच्या मनातलं जनतेला सांगावं.
दुसरी महत्वाची बाब,कुलगुरु अद्यापही कुलगुरु पदावरच होते,शासकीय बंगल्यात राहत होते,शासकीय वाहन वापरत होते असे असतानाही,विद्यापीठाने आज कुलगुरुंसाठी सुटी जाहीर केली नाही!इतरांना शिकवण देणारे विद्यापीठ ही मूलभूत परंपरागत शिकवणच कशी विसरलेत?किंबहूना विद्यापीठाचे प्रशासन राजकीय दबावात होते का ?ज्या कुलगुरुंची न्यायिक लढाई काही सत्ताधारी नेते व कुलपतींसोबतच सुरु होती,त्यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठाला सुटी जाहीर करने,हे देखील विद्यापीठ प्रशासनाला का शक्य झाले नाही,याचे उत्तर त्यांना नागपूरकर जनतेला द्यावे लागणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे,कुलगुरुंच्या सर्व निर्णयात संपूर्ण विद्यापीठातील पदाधिकारी बरोबरीने सहभागी असतात.कोणातही निर्णय हा सिनेट तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मंजुरी शिवाय होत नसतो, मग आर्थिक अनियमिततेचे जे आरोप दिवंगत कुलगुरुंवर झालेत,त्याची सामुहिक जबाबदारी प्र.कुलगुरु,अधिष्ठाता आदी यांच्यावर नव्हती का?ज्या काही निविदा निघाल्या त्या फक्त कुलगुरुंनीच मंजूर केल्या होत्या का?आता उद्याच्या बैठकीनंतर प्र.कुलगुरु,अधिष्ठाता ही संपूर्ण पदेच रिक्त होणार आहे,या पदांवर आता तरी तथाकथित ‘सदाचारी’लोकांची निवड होणार आहे का?याकडे नागपूरकर जनतेचे लक्ष राहणार आहे.
दिवंगत कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी हे शेवटपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यपालांसोबत न्यायिक लढाई लढले.राज्यपालांनी दुस-यांदा कुलगुरुंच्या केलेल्या निलंबनाला त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपालांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी,मी नव्यानेच पद स्वीकारले असून या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे सांगून, याच महिन्यात १९ सप्टेंबर रोजी मुदतवाढ मागितली होती.यावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकूलिका जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.तत्कालीन राज्यपालांनी कुलगुरुंना ४ जुलैला पुन्हा निलंबित केले होते.आता राज्यपाल राधाकृष्णन यांना कोणतेही उत्तर देणे बंधनकारक राहीले नाही कारण कुलगुरु ही लढाई अपूर्ण सोडून अनंतात निघून गेले आहेत.
अनेकांना आज ही ते ‘राजकारणाला’बळी पडले,असं वाटतंय.अर्थात माध्यम जगतावर देखील त्यांच्या बदनामीचे खापर फोडल्या जात आहे.मात्र,कुलगुरुंचे निलंबन असो किवा राज्यपालांसोबत त्यांचा संघर्ष,वाचकांसमोर माहिती मांडणे हे पत्रकारितेचे मूल्यच आहे,त्यामुळे पत्रकारांना दोषी धरता येणार नाही.कुलगुरुंना नाहक त्रास देण्यात आला,त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले,आज शोकसभेत ही मुक्ताफळे उधळण्यात आली असली तरी, पत्रकार हे खरं-खोटं ठरवू शकत नाही,तो त्यांचा अधिकार नाही.तो अधिकार न्याय देवतेचा आहे.त्यामुळेच,कुलगुरु जी बदनामी आपल्यासोबत घेऊन गेलेत, त्याचा त्यांच्या कुटूंबियांना चांगलाच धक्का बसला आहे,जो स्वाभाविक अाहे.कुलगुरुंप्रति खरी श्रद्धांजली हीच असेल,त्यांच्या कुटूंबियांनी पुढे येऊन कुलगुरुंच्या मनातलं ‘सत्य‘नागपूरकरांसमोर मांडावं.
‘सत्ताधीश’तर्फे दिवंगत कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी यांना विनम्र श्रद्धांजली.
……………………………
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स वरील पोस्ट-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
वंचितांच्या मुलांना शिक्षण आणि चांगल्या क्रीडा सुविधा मिळाव्या, यासाठी त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय होते. ग्रामीण भागात युवा आणि महिलांसाठी कौशल्य विकासाच्या सुविधा निर्मितीतही त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
ॐ शान्ति 🙏