सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थेने लोकवर्गणीतून केले पुतळ्याचे निर्माण
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मार्गदर्शक तत्वांची पूर्तता
नागपूर, २३ सप्टेंबर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा कळमेश्वर येथील तळ्याची पार येथे स्थापित करण्यात आला असून येत्या रविवारी २९ सप्टेंबर रोजी सायं. ५ वा. या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत आज माजी मंत्री सुनील केदार यांनी दिली.या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी खा. संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, खा. शाम बर्वे, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार प्रकाश जाधव, बाळाभाऊ राऊत, हर्षल काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २०१६ साली हा पुतळा स्थापनेचा ठराव करण्यात आला. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार २५ फूट उंचीचा हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय आणि समाज शिक्षण संस्था कळमेश्वर या दोन संस्था या पुतळ्याची देखभाल करणार आहेत. शासनाचे सर्व नियम आणि निकष पाळून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली असून २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश काढून मार्गदर्शक तत्वानुसार पुतळ्याची स्थापना करावी असे आदेश दिले आहेत.
याप्रसंगी बोलताना केदार म्हणाले की,निवडणूकीच्या वेळी राजकीय विषयांवर ब-याच बातम्या तुम्ही देता मात्र,हा आगळा -वेगळा विषय आहे.हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विचारधारेचा विषय आहे. दिवस येतील दिवस जातील,निवडणूका येतील निवडणूका जातील,सरकार बनेल सरकार पुन्हा दूसरं बनेल ,परंतू छत्रपती शिवाजी महाराजांची संस्काराच्या माध्यमातून जी शिकवण दिली त्याचा नवीन पिढीवर,प्रत्येक स्वाभिमानी माणसावर छत्रपतींचा वैचारिक पगडा असावा,या हेतूने छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला असल्याचे केदार यांनी सांगितले.
आज विदर्भात बदल्या राजकारणावर ,विस्कळीत राजकीय विचारसरणीवर हे फार महत्वाचं पाऊल असल्याचे ते म्हणाले.छत्रपतींच्या पुतळ्याचा अनावरण साेहळा हा ‘न भूतो ना भविष्यती’ होणार असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी जनसामान्यांच्या मनात काय विचारधारा आहे हे पत्रकारांना देखील अनुभवता येईल,असे ‘सारगर्भित’ते बोलले.उद्धव ठाकरे निवडणूकीच्या प्रचारामुळे या ठिकाणी भेट देऊ शकले नाहीत मात्र,आता येत्या निवडणूकीच्या प्रचाराचा रणशिंग ते कळमेश्वरुन फूंकणार असल्याचे केदार यांनी सांगितले.स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी हे निमंत्रण देण्यास आलो असल्याचे ते म्हणाले.दूस-यांसाठी कसे जगावे हा आदर्श ज्यांनी महाराष्ट्रात निर्माण केला त्या व्यक्तिमत्वाच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा ही भूषणावह बाब असल्याचे केदार यांनी सांगितले.
सिंधुदूर्ग येथील मालवणमध्ये ३६ कोटींचा छत्रपतींचा पुतळा अवघ्या आठच महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण झाले होते,तो पुतळा कोसळला.कळमेश्वर येथील छत्रपतींचा पुतळा हा किती कोटींचा आहे तसेच या पुतळ्याच्या सुरक्षेविषयी कोणती काळजी घेण्यात आली आहे?असा प्रश्न केला असता जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांनी सांगितले ,की हा पुतळा सावित्रीबाई फूले समाज शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून,लोकवर्गणीतून साकारण्यात आला असून ,शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी आम्ही घेतला नाही.पुतळ्याच्या सुरक्षेबाबतही शासनाने जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाची आम्ही पूर्तता केली असल्याचे कापसे यांनी सांगितले.
सिंधूदूर्ग येथील छत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांनी ही घटना म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच घाव असल्याची टिका केली होती,यावर तुमचे काय म्हणने आहे?अशी विचारणा केली असता,जे आमच्या प्रदेशाध्यक्षांचे म्हटले आहे तीच माझी देखील भूमिका असल्याचे केदार म्हणाले.
पत्रपरिषदेला उत्तम कापसे, डॉ. घनश्याम मक्कासरे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते.