फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमूसळधार 'हाहाकारा'ची वर्षपूर्ती

मूसळधार ‘हाहाकारा’ची वर्षपूर्ती

अंबाझरी अतिवृष्टीला एक वर्ष पूर्ण

राजकारण्यांचे अहंकार जनतेच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे!

येत्या निवडणूकीत मतदानातून करणार ‘श्राद्ध कर्म!’पिडीतांचा गर्भित इशारा

त्या पूरात तीन जणांचा मृत्यू मात्र न्यायालयात सादर केले प्रशासनाने खोटे प्रमाणपत्र!

न्यायालयाच्या दणक्यानंतर स्केटिंक रिंकच्या नाल्यावरील भिंत आणि पार्किंग तोडली मात्र

फंड नसल्याने अद्यापही पोत्यांचा आधार!

विवेकानंद स्मारक वाचवण्यासाठी प्रशासनाने न्यायालयीन लढ्यात केले ८० लाख खर्च

सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरच नासुप्रचे अतिक्रमण:व्यवसायिक लाभ कोणाच्या घश्‍यात?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२३ सप्टेंबर २०२४: मागच्या वर्षी याच दिवशी नागपूर शहर हे नाग‘पूर’ झाले होते.२३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पासून सकाळपर्यंत केवळ चार तासात १०९ मि.मी पावसाची नोंद झाली.अंबाझरी ओव्हरफ्लो होऊन अंबाझरी ते पंचशील चौक,,कॉटन मार्केट पर्यंतच्या नाग नदीपरिसरातील वस्त्या या जलमग्न होऊन घरे पाण्यात बुडाली तर रस्त्यांना नदीचे रुप आले होते.या पावसात दोन महिला व दोन इसमाचा मृत्यू झाला तर एनडीआरएफ,एसडीआरएफ,लष्कर तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने २४ सप्टेंबरच्या दूपार पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर आली होती.
नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ एप्रिल २०२३ रोजी क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ‘नागपूरला सर्वोत्तम शहर बनवणार’असा मानस व्यक्त केला होता मात्र,पाचच महिन्यानंतर तेच नागपूर महापूरामध्ये पार बुडालेले होते.मुसळाधारेमुळे शहरातील नदीनालेच नव्हे तर रस्त्यांवरही पूरसदृश स्थिती होती.धरमपेठ,शंकरनगर,कारर्पोरेशन कॉलनी,डागा ले आऊट,वर्मा ले आऊट,झाशी राणी चौक,पंचशील चौक,काचीपूरा,कॉटन मार्केट,लकडगंज हा भाग जलमय झाला होता.वेगवेकळ्या यंत्रणांनी पुरात अडकलेल्या ४०० लोकांची सुटका केली होती.संपूर्ण माध्यमांमध्ये याला ‘नागपूरवर मूसळधार हल्ला’अशीच हेडलाईन्स मिळाली होती.

२३ सप्टेंबर २०२४ राेजी घरोघरी बसलेल्या माहेशवाशिण महालक्ष्म्यांना सोहळ्याचा नैवेद्य दाखवूनदमलेल्या देहाने विश्रांती घेतली असतानाच मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास विजांचे तांडव  सुरु झाले होते.काहीच मिनिटात मुसळधारेने शहरावर जणू आक्रमण केले.शनिवारी सकाळपर्यंत कोसळणा-या पावसातून ढगफूटीच कोसळली होती.पूराच्या पाण्यात अडकल्याने दोन ज्येष्ठ महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या.महेशनगर येथील मिराबाई पिल्ले (वय ७० वर्ष) व संध्या ढेरे(वय ५०)अशी त्यांची नावे असून पंचशील चौकातील रौद्ररुप धारण केलेल्या नाल्यात पडून एक युवक वाहून गेला होता.तर मेडीकलमध्ये भरती नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलेले संजय शंकर गाडेगावकर(वय ५२,रा.साई मंदिराजवळ,अयोध्या नगर)यांचा मेडीकल परिसरात पाणी भरलेल्या खड्डयात पडून मृत्यू झाला होता.गिट्टीखदान पोलिस ठाण्यातील महेशनगर परिसरात राहणा-या संध्या ढाेरे व त्यांची आई सयाबाई ढोरे या एका खोलीत रहात होत्या.अन्य पाच खोल्यांमध्ये त्यांचे नातेवाईक राहायचे.संध्या लकवाग्रस्त होत्या.खोल्यांमध्ये पाणी शिरु लागल्याने नातेवाईकांनी ७२ वर्षीय आई सयाबाई यांना बाजूच्या सुरक्षीत खोलीमध्ये नेले.संध्या यांना पलंगावर ठेवले.याच दरम्यान अन्य पाच खोल्यांमध्येही पाणी साचले.नातेवाईकांनी पाणी काढण्यास सुरवात केली.संध्या यांच्या खोलीतही सुमारे चार फूटांपर्यंत पाणी भरले.पाण्यात बुडून पलंगावरच संध्या यांचा मृत्यू झाला!काही अवधी गेल्यानंतर नातेवाईकांनी संध्या यांच्या खोलीत बघितले असता संध्या यांचा पुराच्या पाण्यात बुडून पलंगावरच मृत्यू  झाला होता!पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मुसळधार पावसामुळे घरासमोर पाणी जमा व्हायला लागले.ते घरात शिरण्या पूर्वी उपाययोजना कराव्या म्हणून दार उघडताच दारा समोर साचलेले पाणी एकदम घरात घुसले अन ७० वर्षीय मीरा पिल्ले यांचा जीव गेला.ही घटना देखील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महेश नगर मधील आहे.मीराबाई एकट्याच रहात होत्या.शनिवारी पहाटे मूसळधार पाऊस सुरु असताना मीराबाई यांनी दार उघडले.पाण्याच्या प्रवाहाने त्या खाली कोसळल्या.त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.पंचशील चौकातील नाल्यात शनिवारी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी एका युवकाचा मृतदेह आढळून आला.ताे बाहेर काढण्यासाठी हायड्रा मशिनने पूलाचा पिल्लर कापावा लागला होता.धंतोली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम समोरील गणेश सागर हॉटेलमध्ये पाणी शिरले.शनिवारी दूपारी ४.३० वाजताच्या सुमारास कृष्णकुमार लेखराम बरखंडी(वय २१ वर्ष,रा.बैतूल)हा मोटारीने संपूर्णत: पाण्याखाली गेलेल्या हॉटेलमध्ये जमा झालेले पाणी काढत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.महत्वाचे म्हणजे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयात २३ सप्टेंबरच्या पूरात एक ही मृत्यू झाला नसल्याचे शपथपत्र सादर केले  आहे!हजारीपहाड भागात गोठ्यात बांधण्यात आलेल्या १४ जनावरांचा मृत्यू झाला,त्यात ६ म्हशी,६ गायी आणि २ वासरांचा समावेश होता.शहरात जिथे जिथे ‘काळजाचे पाणी’दिसत होते!
मध्यरात्री सुरु झालेल्या या जलप्रलयाने नागपूरकर झोपेतून खडबडून जागे झाले.धडकी भरवणारा कडककडाट आणि कोसळणा-या पावसाचा अंदाज घेत नागपूरकर झोपी गेले.पहाट उजाडताच कोसळलेल्या त्या ‘प्रलयाची’भयाणता नागपूरकरांना जाणवली.रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते,उच्चभ्रू वस्त्यांमध्ये देखील सहा ते आठ फूट पाणी भरले होते.झोपडपट्ट्यां जलमग्न झाल्या होत्या.दूचाकी,चारचाकी वाहने दूस-या दिवशी शोधावी लागली होती.बेसमेंट पूर्णपणे पाण्याखाली ‘द्वारका’ नगरीसारखी रातोरात बुडाली होती.सखोल वस्त्यांमध्ये बोटी लावून नागरिकांना बाहेर काढावे लागले होते.कायम रहदारीचा असणारा रस्ता सीताबर्डी,झाशी राणी चौक,पंचशील चौकाला नदीचे रुप आले होते ज्यावर एनडीआरएफच्या बोटी चालत होत्या!विदर्भ साहित्य संकूलासह या संपूर्ण परिसरातील दूकानांमध्ये पाच फूटांच्या वर पाणी शिरुन संपूर्ण कोट्यावधींच्या साहित्याची नासधूस झाली होती.संगणक झोन म्हणून ओळखल्या जाणा-या धंतोली परिसरातील संपूर्ण दूकानांमधील संगणक व इतर साहित्य हे कबाड झाले होते.डागा ले आऊट,कारर्पोरेशन कॉलनीतील नागरिकांनी मध्यरात्री अंगावरील कपड्यानिशी हातात फक्त मोबाईल घेऊन उंचावरील घरांमध्ये आश्रय घेतला होता.पाच फूटांपर्यंत पाणी शिरु पाहणा-या घराघरात माहेशवाशिण महालक्ष्म्यांना ओल्या डोळ्यांनी हळदी कूंकू वाहून,पाय निघत नसतानाही जीव वाचवण्यासाठी घर सोडावे लागले होते.

पंचशील चौकातील रेशन दूकानातील आनंदाचा शिधा देखील पाण्याखाली गेला होता तर रामदासपेठेतील चारचाक्या या नाल्यात वाहून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत विना ड्रायव्हर व विना पेट्रोलने चालल्या होत्या.रामदासपेठेतील चारचाक्या घाटरोडच्या नाग नदीत आढळल्या होत्या.वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाच्या वसाहतीत पाणी शिरले.शनिवारी मोटार लावून पाणी काढावे लागले.सुदैवाने जिवित हानी झाली नाही.नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला नदीचे रुप आले होते.मुख्य द्वाराकडील प्लॅटफॉर्मची स्थिती तर वाहत्या नदीप्रमाणे भासत होती!स्टेशनवरील प्रतिक्षालय,जीआरपीएफ कार्यालय गुडघाभर पाण्यात बुडाले होते.प्रवाशांचे सामान भिजले.सहा तास रेल्वे रुळ हे पाण्याखाली होते.पावसाचा फटका रुग्णालयांनाही बसला.मेडीकलामध्येही अनेक वॉर्डात पाणी तुंबले.त्या महापूरात लष्कराने नागपूरात विविध वयोगटातील ४० जीव वाचवले होते तर मनपाच्या अग्निशमन विभागाने १५२ व्यक्तींचा जीव वाचवला.एसडीआरएफच्या चमूने १०५ लोकांना जीवनदान दिले.आपदा मित्रांनीही ११ लोकांना सुरक्षीत ठिकाणी पोहोचवले.

मनपा मुख्यालयातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर(सीओसी)माध्यमातून शहरातील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते.नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक पुरविण्यात आले मात्र,अनेक भागाची वीज ही अठरा तासांपेक्षाही जास्त काळ गेली असल्याने अनेक पूरपिडीतांचे मोबाईल देखील चार्ज नव्हते.नागपूरातील पूरपस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आढावा घेतला.अतिवृष्टि भागातील नागरिकांना आवश्‍यक त्या सुविधा पोहोचविण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले तर नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पूरस्थितीचा आढावा घेतला.नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी,पोलिस आयुक्त हे पूरग्रस्त भागांची पाहणी करीत होते.

गडकरी-फडणवीसांनी २३ सप्टेंबर रोजीच सायंकाळी मनपा मुख्यालयात तातडीची बैठक घेऊन पूरग्रस्तांना १० हजारांची मदत जाहीर केली.पूर पिडीत दूकानदारांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.सुमारे १० हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर १५०० दूकानांचे नुकसान वर्तवण्यात आले होते.गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल,असे आश्‍वासन फडणवीसांनी दिले.

२३ सप्टेंबरची रात्र नागपूरकरांनी अक्षरश: दहशतीत जागून काढली होती.क्षणाक्षणाला मनाचा थरकाप उडवणारी ती रात्र होती.अनेक ठिकाणी गणेश मूर्तीही वाहून गेल्या होत्या.पावसाने नाग नदी,पिवळी नदी व पोरा नदीच्या किना-यावरील अनेक वस्त्या जलमग्न केल्या.संगम चाळ,मुरलीधर मंदिर बर्डी,जानकी टॉकिज़ला देखील नदीचे रुप आले होते.जवानांनी जानकी टॉकिजजवळ अडकलेल्या दोन व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले.वर्मा ले आऊट,समता ले आऊटमधील २४ व्यक्तींना,मूकबधिर निवासी विद्यालयातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना तसेच एलएडी कॉलेजच्या वसतीगृहात अडकलेल्या ४१ मुलींना सुखरुप बाहेर काढले व सुरक्षीत ठिकाणी हलवले.धरमपेठ सायंस कॉलेजच्या चौकीदाराचे प्राण वाचवण्यात आले.जनता चौकात पाणी जमा झाल्याने खासगी बस अडकली होती.अग्निशमन जवानांनी बसमधील ११ प्रवाश्‍यांना सुखरुप बाहेर काढले.उन्मळून पडलेल्या व वाहून गेलेल्या झाडांची तर मोजदाद देखील होऊ शकली नाही.

पंचशील चौक,झाशी राणी चौकाला नदीचे रुप आल्याने आदीवासी गोवारी उड्डणपूलावर वाहतूक कोंडी झाली.अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी आणण्यात आलेली जेसीबी नाल्यात फसली.विशेष म्हणजे अंबाझरी तलावाच्या वेगवान प्रवाहात जेसीबी सारखे वाहन दहा फूट पूलापर्यंत वाहून आले.त्याहून महत्वाचे म्हणजे तलावातील जलपर्णी काढून त्याच परिसरात फेकण्यात आल्या असल्याने जलपर्णी पाण्यासोबतच नागरिकांच्या घरात मुक्कामी पोहोचल्या!सोबत चिखल,दुर्गंधी आणि दगड गोटे ही होते.२३ सप्टेंबरच्या रात्री तर शहराच्या सीमेवरील बेसा,बेलतरोडी,घोगली भागातील घरे देखील पाण्यात तुंबली.नाग नदी काठावरील भांडेवाडी कचरा डम्पिंग परिसर व रिंग रोडच्या खोलगट भागातील घरांमध्ये तर भांडेवाडीतील जीवघेणा व दुर्गंधीयुक्त कचरा घरोघरी शिरला होता!साईनगर शेजारी असलेल्या झोपडपट्टीतील लोकांनी पाण्यापासून बचावासाठी पाण्याच्या टाकीचा अाधार घेतला होता.पहाटे वस्तीत गेल्यानंतर भांडीकुंडी,अन्नधान्य,कपडेलत्ते काहीही शिल्लक नव्हते!

सर्वात महत्वाचे म्हणजे दोनच वर्षांपूर्वी अंबाझरी तलावापुढे अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो पॉईंट ते टी पॉईट पर्यंत ,राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जो सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला होता तो २३ सप्टेंबरच्या पूरानंतर खरवडून निघाला होता.किती तरी किलोमीटरपर्यंत या पुलाचे गट्टू पसरले होते.डागा ले आऊटच्या गल्ल्यांपर्यंत या रस्त्याचे गट्टू पसरले होते.एवढंच नव्हे तर या रस्त्यावर चार फूटांपर्यंत खोल खड्डे देखील पडले होते.काही भागात रस्त्याखालील माती वाहून गेली होती.कोट्यावधीच्या या रस्त्याची अवस्था बघून नागपूरकरांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता.शहरातील नरेंद्रनगर,मनीष नगर,सीताबर्डी येथील अंडरपास हे मृत्यूचा सापळा बनले होते.

रहाटे कॉलनीतील पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.हजारो लिटरच्या पेट्रोलच्या टाक्यांमध्ये पाणी शिरले.महत्वाचे म्हणजे दुस-या दिवशी शनिवारी सकाळी पेट्रोल पंपावरील यंत्रेच सुरु झाली नाही.धंतोलीतील केअर हॉस्पीटलमधील ७० रुग्णांना तातडीने हलवावे लागले.
मोरभवनात चालक वाहकांनी देखील ती काळरात्र अनुभवली.मोरभवना रात्री मुक्कामी फेरीसाठी आलेल्या १३ वाहक-चालक आगारात झोपले.विश्रामगृहात अचानक पाणी येऊ लागले.खोलीत पाण्याचा स्तर वाढू लागल्याने एक एक वाहक-चालक एसटीच्या टपावर चढले.मोरभवनचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता.१२ एस टी पाण्याखाली बुडाल्या होत्या.जिवाच्या आकांताने त्यांनी मदतीसाठी पुकारा केला होता.पहाटे ४ वाजता त्यांनी महामंडळाच्या अधिका-यांना फोन लावला.अधिका-यांनी लगेच याची दखल घेत पोलिस व  अग्निशमन दलाला कळवले.पहाटे अग्निशमन दलाचे पथक मोरभवनात पोहोचले.सकाळी ६.३० वा.सर्व वाहक-चालकांची सुखरुप सुटका केली.जवळपास साढे तीन तास एस टी कर्मचा-यांनी मृत्यूचा हा थरार अनुभवला होता.पाण्याखाली तुंबल्याने एस टी चे झालेले नुकसान याची मोजदाद नव्हती.
मुसळधार पावसाने अंबाझरी ओव्हर फ्लो झाला अन् शहरातील अंबाझरी घाट,मोक्षधाम,मानेवाडा घाट,गंगाबाई घाट,बेसा,वाठोडा परिसरातील दहन घाटावर पाणी तुडूंब भरल्याने लाकडे ओली झाली.परिणामी सकाळी कोणाचेही अत्यंसंस्कार झाले नाही कारण सर्व दहनघाटांवर तीन ते चार फूटांपर्यंत पाणी साचले होते!दूपारनंतर पाणी ओसरल्यानंतर मानेवाडा घाटातवर पहीले अत्यसंस्कार झाले!
(वाचा उद्याच्या बातमीत अंबाझरी’विवेकानंद स्मारकाची चित्तरकथा’)
………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या