फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसर्वपित्री अमावास्या व पितृपंधरवडा

सर्वपित्री अमावास्या व पितृपंधरवडा

(अतिथी स्तंभ)

डॉ. दत्ता हरकरे 

[नागपूर, ९८२२२२६६१५]

वैदिक सण वा उत्सव अतिशय शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत. त्यांत व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. प्रत्येक भारतीय सणाला एक खोल व उपयुक्त असा गहन अर्थ आहे. आपल्या ऋषीमुनींनी हे सर्व सणवार अतिशय विचारपूर्वक सुरू केले आहेत. यात योगसाधनांच्या उच्च अवस्थेतील अनुभवांचे स्मरण आलेले आहे. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही , कि काल्पनिक विजयाचा उन्माद नाही , कि व्यक्ती द्वेष नाही कि पंथाभिमानाने पेटून केलेल्या युद्धसंचाराचा जल्लोष नाही. येथे आहे निव्वळ शास्त्रीयता.पण ती शास्त्रीयता शर्करावगुंठित गोळ्यांप्रमाणे आहे. त्या शर्करा कुंठित गोळ्यांचे आत, वैदिक विचारांचे औषधी संस्कार आहेत. विसाव्या शतकातील श्रेष्ठ योगीपुरूष योगी मनोहर यांनी त्यांच्या ‘वैदिक सणांचे रहस्य’ या पुस्तकात सर्व वैदिक सणांचे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे ते सर्वांनी अवश्य वाचावे.
भारतीय वैदिक सणांमध्ये पितृपंधरवडा व सर्वपित्री अमावस्येला फार महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला सर्व पितरांचे स्मरण करण्यात येते. ही अमावास्या भाद्रपद महिन्यात येते. या पंधरवड्यात यमलोकातून मृत्यू लोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते अशी समजूत आहे.त्यांना पिंडदान करून आपली कृतज्ञता त्यांचे पर्यंत पोहोचविण्यासाठी हा सर्वपित्री अमावस्येचा दिवस अतिशय अनुकूल असतो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात हा दिवस येतो. याला पितृपक्ष असे म्हणतात.

आपल्या कुटुंबातील अनेक पिढ्यांतील स्वर्गस्थ झालेल्या सर्व व्यक्तींना आपण पितरे म्हणतो. या पितरांपैकी बऱ्याच जणांना सद्गती सुद्धा मिळाली असते आणि पुनर्जन्म सुद्धा मिळाला असतो. परंतु ज्यांना पुनर्जन्म मिळाला नाही ते पुण्यात्मे स्वर्गस्थ आहेत, अशी आपली भावना असते. म्हणूनच सर्वपित्रीच्या दिवशी आपण या देवता रूपी पितरांना भेटीचे आवाहन करून त्यांना नैवद्य दाखवतो व गायीलाही नैवैद्य दाखवतो.हे एका अर्थाने सर्व पितरांचे एकत्रपणे श्राद्धच असते. मात्र आपल्या कुटुंबातील एखादी महिला जर सौभाग्यवती मृत झाली असेल तर मात्र तिच्या साठी आपण ‘अविधवा नवमी‘ करून तिला नैवेद्य दाखवतो.सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सवाष्णाला आपल्या कडे जेवायला बोलावून त्यांना आपल्या पितरांना आवडणारे सर्व गोडधोड पदार्थ आपण खाऊ घालतो आणि पितरांना तृप्त करतो.

पितृपंधरवडा व सर्वपित्री अमावस्या या सणात मृत्यू नंतर चे दिव्य शास्त्र दडले आहे. आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्ती जरी शरीररूपाने अस्तित्वात नसल्या तरी मनाने त्या आपल्याशी बांधलेल्या असतात. अर्थात ज्यांना पुढील जन्म मिळाला नाही ते सर्व. म्हणूनच त्यांना मनाच्या माध्यमातूनच सुखी करण्याचा हा आपला एक प्रयत्न असतो. मृत्यू नंतरच्या दिव्य अवस्थेचा अभ्यास करूनच आपल्या ऋषीमुनींनी या सणाची निर्मिती केली आहे. व्यक्त आणि अव्यक्ताचे हे मिलन आहे. इतका शास्त्र शुद्ध विचार फक्त आपल्या वैदिक परंपरेतच झालेला दिसतो.

सर्वपित्री अमावास्येला पितरांना पुजून त्यांना तर्पण द्यायचे असते.अमावस्येलाच का ? याचे शास्त्र शुद्ध कारण योगी मनोहरजी असे सांगतात, कि पितर आणि यमाचा वर्ण काळा असतो असे दर्शन शास्त्रात मानले आहे. काळा वर्ण कां तर पितर आणि यम ‘अप्रकाशात’ राहतात म्हणून. सर्व धर्मांचा अभाव किंवा प्रकाशाचा अभाव म्हणजेच काळा वर्ण. काळा असा स्वतंत्र वर्ण नसतो. काळेपणा भावात्मक आहे. मृत्यू नंतर याच अप्रकाशाच्या प्रांतात वाटचाल करावी लागते.जीवन म्हणजे प्रकाश तर मरण म्हणजे अप्रकाशाकडे वाटचाल करणे होय.म्हणुनच कित्येकांना मरताना ते काळेपणा यमाच्या स्वरूपात साकारलेले दिसत असेल. पितर हे काळ्या तत्वांतील म्हणून त्यांचेकरिता अमावस्येच्या काळ्या दिवशी काळे तीळ वाहत असतात आणि तर्पण सुद्धा ‘अपसव्य’ म्हणजे उलट्या गतीने करतात. प्रदक्षिण गती म्हणजे सव्य गती जिने आपण देवांना प्रदक्षिणा करतो तर अपसव्य गती म्हणजे अप्रदक्षिण अर्थात उलटी गती , जी पितरांसाठी असते. आजच्या दिवशी सर्व पितरांना शरदाच्या शराने खोदून, शोधून काढून तर्पण करावयाचे असते. कारण आपल्यालाही उद्या त्याच मार्गाने जायचे आहे. मग आपला पुढील मार्ग आपण आजच सुकर करायचा नाही काय?

    ही आहे भारतीय वैदिक सणांची महती आणि त्यातील गहन योगरहस्य.  म्हणूनच आजच्या पिढीवरही या सणांचे संस्कार होणे गरजेचे आहे. बहुतेक नवीन पीढी त्यांच्या आधुनिकतेपुढे हे सर्व मानत नाही. परंतु हे दिव्य योग रहस्य त्यांना कळल्यावर ते त्यांच्या आधुनिकतेसोबतच हा वैदिक सणांचा वारसाही जपतील यात संशय नाही. कारण नवीन पिढी आधुनिक असली तरी बुद्धिमान आहे. भारतीय सणांचे हे  दिव्य रहस्य जाणुन प्रत्येक भारतीयाने हा वैदिक सणांचा अनमोल ठेवा जतन करून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आज अगत्याचे आहे.
…………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या