जबाबदारीने काम करा:पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांचा सल्ला
७ सप्टेंबेर २०२४: आज दुपारी ३.०० वाजता, पोलीस भरतीच्या प्रथम टप्प्यातील २०२२-२३ च्या जाहिरातीनुसार, २७ नवनियुक्त पोलीस शिपायांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शासन आदेशानुसार २०२२-२३ जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये नागपूर शहर पोलीस दलासाठी एकूण ३४७ पदे उपलब्ध होती, त्यापैकी प्रथम टप्प्यात २७ उमेदवारांना पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. .
या समारंभात नागपूर शहराच्या सह पोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे आणि पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते. २०२२-२३ पोलीस शिपाई भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या ६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार मूलभूत प्रशिक्षणाकरिता नियुक्त करण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी या नवप्रविष्ट पोलीस शिपायांचे अभिनंदन करून, त्यांना पोलीस सेवेत सामावून घेतले. आयुक्तांनी नवनियुक्त उमेदवारांना संबोधित करताना म्हटले की, “आपल्या सर्वांच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली आहे आणि आता आपल्या खांद्यावर नागपूर शहराच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. शिस्त हे पोलीस खात्याचे प्रमुख गुण आहेत, त्यामुळे तुम्ही यापुढे शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम कराल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस आयुक्त म्हणाले की, “नागपूर शहर पोलीस दलात तुम्हाला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल, आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. शासनाकडून तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध होतील, परंतु प्रशासनाला तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.”
आयुक्तांनी नवनियुक्त उमेदवारांना सुचवले की, “तुमच्या वर्तणुकीबाबत कुठलीही तक्रार नको, पोलीस दलातील काम निपक्षपाती असावे. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक कृती विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.”
पोलीस आयुक्तांनी २७ उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी हे देखील सांगितले की, “भविष्यात टप्प्याटप्प्याने इतर नवनियुक्त उमेदवारांना देखील नियुक्तीपत्र देण्यात येईल.
………………………………