आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना अनुसुया काळे-छाबरानी यांनी,दरवेळी नागपूकरांनी हा मानसिक,आर्थिक भुर्दंड का सहन करायचा?असा प्रश्न केला.प्रशासनाने २०१८,२०२३ आता पुन्हा जुलै २०२४ च्या पुरापासून काहीच धडा घेतला नाही.उलट आणखी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्यासाठी निविदा काढतच आहेत.याचा अर्थ पुढील अनेक दशकात देखील नागपूरकर नागरिकांनी जिविताची व वित्त हानी सहन करण्यासाठी तयार रहावे,असाच होतो.शहरातील रस्ते,तलाव,सार्वजनिक उपयोगाच्या जागा,पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या मोकळ्या संशोधनाच्या हजारो हेक्टरच्या जागा,मैदाने,लाखो झाडे सगळं काही ‘विकासा’च्या नावावर गिळंकृत केले जात असून याचे गंभीर परिणाम नागपूरकरांच्या जीवनावर पडत आहे.यंदाच्या उन्हाळ्याने ५० अंशापर्यतचे तापमान गाठले होते,हे कशाचे निर्दशक आहे?असा सवाल त्यांनी केला.प्रशासनाच्या या ‘अघोरी’वृत्तीच्या विरोधात आम्ही ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता व्हेरायटी चौक गांधीजींच्या पुतळ्यापासून तर संविधान चौकापर्यंत जनआंदोलन करणार असून याच वेळी सिमेंट काँक्रिटचे रस्ते आता आम्हाला नको,या मोहिमेसाठी स्वाक्षरी अभियान राबविणार आहे.जनतेच्या स्वाक्षरीचे ते निवदेन आम्ही शहरातील दोन्ही धोरणकर्ते नेते यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण पाचव्या वर्गात असताना भूगोलच्या अभ्यासक्रमात मोहंजदारो-हडप्पा या शहरांच्या संस्कृतीचा देखील अभ्यास केला आहे.त्या शहरांची सिवेज लाईन आणि रस्त्यांच्या नियोजनाचा अभ्यास हा पाच हजार वर्षांपूर्वीचा असून देखील आपण त्याची अंमलबजावणी आणि नियोजन करु शकत नसला तर आपल्याला ख-या अर्थाने ‘विकास’समजला का?असा प्रश्न त्यांनी केला.दूसरी अतिशय गंभीर बाब म्हणजे शहरात गेल्या काही वर्षात लाखोच्या संख्येने वृक्षांची कत्तल झाली असून,एकेकाळचा ग्रीन नागपूर आता ड्रोन ने बघितले तर उजाड दिसत आहे!याच वर्षी जानेवरी ते ऑगस्ट दरम्यान माहीतीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या उद्यान विभागाने अडीच हजार वृक्षांची कत्तल करण्याची परवागनी दिली आहे!
मागच्या मनपा आयुक्तांनी(राधाकृष्णन बी)वृक्ष समितीच आपल्याच मनाने बर्खास्त करुन रान मोकळे करुन दिले आहे.कोर्टाने ती समिती पुन्हा बहाल करुन त्यात पर्यावरणतज्ज्ञाचा देखील समावेश करण्याचे आदेश दिले आहे मात्र,त्यावर अंमलबजावणी केली जात नाही,प्रशासन कोर्टाला देखील जुमानत नाही,एवढी निर्ढावली आहे.दूसरीकडे बिल्डर लॉबी देखील बेशुमार झाडांची कत्तल करीत सुटली आहे मात्र,मनपाचा उद्यान विभाग त्याकडे हेतुपुरस्सर दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आर.जे.प्रिती यांनी सांगितले की,सिमेंट रस्ते चांगले पण ड्रेनेज सिस्टिम खराब,अशी सध्या भ्रामक कल्पना मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे.ड्रेनेज सिस्टिम स्वच्छ झाली की मग नागपूर शहराला काहीच समस्या येणार नाही,असा दावा केला जात आहे मात्र,यामुळे शहरातील भू-जल पातळीची वाढ होणार आहे का?याचे काहीच उत्तर ते देत नाही,असे प्रिती यांनी सांगितले.सिमेंट रस्त्यांच्या नियोजनासोबतच अनेक प्रकल्पांविषयी अनियोजित विकास सुरु आहे.सिमेंट काँक्रिट रस्ते हवेत का?यावर अल्पावधीतच पाच हजार नागरिकांनी ऑन लाईन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांना सिमेंटचे रस्ते शहरात आणखी नको आहेत.अद्याप ही ऑन लाईन प्रतिक्रिया नाेंदवण्याची ही प्रक्रिया सुरु असल्याचे प्रिती यांनी सांगितले.नागपूरकरांना नको आहे तर मग हे सिमेंट रस्ते का आणि कोणासाठी बांधले जात आहेत?असा सवाल त्यांनी केला.
जनमंचचे आशुतोष दाभोळकर म्हणाले,की २०२३ च्या २३ सप्टेंबर रोजी शहराचे ११३० कोटींचे नुकसान झाले तरी देखील त्यातून कोणताही बोध घेण्यात आला नाही.त्या रात्री अंबाझरी भागातील २६ हजार घरांना नुकसान झाले असून ८ ते १० लाख घरे पाण्यात बुडाली होती.तरी ही सुधरणार नसाल तर रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
जनमंचचे प्रा.शरद पाटील म्हणाले की, ग्रीन नागपूरची चळवळ योग्य असल्यामुळेच या चळवळीसोबत मी जुळलो.आम्ही देखील सिमेंट -काँक्रिटच्या निकृष्ट आणि नियोजनशून्य रस्त्याविरुद्ध जनमंचच्या माध्यमातून फार मोठा लढा दिला आहे.त्याच वेळी सिमेंटचे रस्ते हे ५०-६० वर्षे टिकतील असा दावा केला जात होता.५०-६० वर्षे तर सोडा शहरातील अनेक भागात ५०-६० दिवसात सिमेंट रस्त्यांना तडे जाताना दिसत आहे.५-७ वर्षांआधीच जनमंचने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या उंचीवर आक्षेप घेतला होता.मात्र,आमचा लढाच मोडीत काढण्यात आला.त्यावेळी नागपूरकर नागरिकांनाही त्या लढ्याचे गांर्भीय कळले नाही.आता त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे.
जनतेच्या कराच्या पैशांची नुसती लृट सुरु आहे.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे प्रकल्पांसाठी पैसे आणत आहेत मात्र,त्याचा कसा विनियोग होत आहे याकडे त्यांनी शहराचे खासदार म्हणून पाहावे.‘घर मे घूस कर मार रहे हो’अशी जहाल टिका करीत ,नागपूर हा आता पाकिस्तान झाला आहे का?असा सवाल त्यांनी केला.मनमानी कारभार सुरु आहे.दर वर्षी कार,दूचाकींचे नुकसान होत आहे,नागपूरकरांनी पैसे कुठून आणावे?नागपूरच्या खासदारांसाठी सिमेंट रस्ते ही प्राथमिकता आहे की शंभर वर्ष जुनी सिवेज लाईन दुरुस्त करने?त्यात ही जुने डांबरी रस्ते न खोदताच त्यावर दीड-दोन फूट उंचीचे सिमेंट रस्ते बनवता?विरोध विकासाला नाही,विनाशाला आहे,असे खडे बोल प्रा.पाटील यांनी सुनावले.शहरातील तलाव,झाडे गायब करु नका,स्वयंसेवी संस्थांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांच्यातील तज्ज्ञांची विकासासाठी मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद पालीवाल म्हणाले,की डांबरी रस्ते हे फार काळ टिकत नाही,असा चुकीचा भ्रम पसरविण्यात आला.नागपूर-बैतूल डांबरी महामार्ग हा गेल्या दहा वर्षांपासूनही आजही अगदी तसाच आहे कारण प्रामाणिकपणे त्या महामार्गाचे काम झाले होते.सिमेंट रस्त्यांमुळे ५० वर्ष ही बघावे लागत नाही,यामुळे पैशांची बचत होते,हा दूसरा भ्रम असून, सिमेंटचा रस्ता खराब झाला तर पूर्णच उखडून टाकावा लागतो,पुन्हा नव्याने बांधावा लागतो,डांबरी रस्ते त्या तुलनेत पुन्हा-पुन्हा सहज सुधारले जाऊ शकतात.आज दैनिकांमध्ये मनपा प्रशासनाने आठ सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी काढलेली जाहीरात,ही संतापजनक असून त्यात आता ही फक्त रस्त्यांच्या बांधकामाचा उल्लेख आहे.पावसाळी नाले तसेच ड्रेनेज व्यवस्थेसोबत जुळवणी करुन बांधकामाचा कोणताही उल्लेख जाहीरातीत नाही,याचा अर्थ आणखी नव्या,आठ ठिकाणी नव्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरणार!चूक कोणाची भरेल कोण?मनपाने याचे उत्तर नागरिकांना दिले पाहिजे.मनपा डिफर करीत नसून आणखी निविदा काढत आहे,मूर्खता अशीच सुरु असल्याने आम्ही त्यांचा विरोध आता रस्त्यावर उतरुन करणार,असा इशारा त्यांनी दिला.सिमेंट रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांची आकडेवारी काय सांगते? याचा विचार मनपाने करावा,असा सल्ला त्यांनी दिला.
अनूसुया यांनी एकमेव नागपूर शहरात चार-चार विकास संस्था कार्यरत असून मनपा,नासुप्र,एनएमआरडीए,महामेट्रो तसेच, हे ही नसे थोडके तर राष्ट्रीय महामार्ग(एनएचएआय)च्या माध्यमातून नागपूर शहरात विकासाचे इमले चढवले जात असल्याचे सांगितले.निधी कोणाचा,खर्च कोण करतोय?याची काहीच माहिती नागपूरकरांना दिली जात नाही.आम्ही करदाते आहोत,विकासाचा कोणता प्रकल्प आणि का राबवला जात आहे,याची विचारणा करण्याचा आम्हाला संवैधानिक अधिकार आहे मात्र,आमच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळत नाही त्यामुळेच आम्ही ११ तारखेला सकाळी १० वा.जनआंदोलन करणार आहोत,पुरे झाला विकास,आणखी विकास आमच्यावर आणि या शहराच्या पर्यावरणावर लादू नका असे सांगत, सगळे खापर मनपावर फोडून सोयीस्करपणे खरे कर्तेधर्ते हे बाजूला होत आहेत मात्र,राज्य सरकार त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे स्वत:चे हे गृहनगर आहे ते आणि आपले खासदार गडकरी यांच्यावर जास्त जबाबदारी निश्चित होते,असे अनूसुया म्हणाल्या.
आता नागपूरकरांनी आणखी एकदा सिमेंटचे रस्ते खोदलेले पाहण्यासाठी तयार राहावे कारण आता गॅसची पाईप लाईन टाकण्यासाठी ९०० कोटींचे सिमेंट रस्ते पुन्हा आता शहरभर खोदल्या जाणार असल्याचे जयदीप दास यांनी सांगितले.जगात कुठेही नाही असे ८०० मीटरचे भुयारी मार्ग नागपूरात निर्माण करण्यात आले जे पावसाळ्यात पाण्यात बुडून मृत्यूचे तर इतर वेळी अपघातात मृत्यू पावण्याचे ठिकाण बनले आहेत.तरी देखील मानस चौक ते इन्टिट्यूट ऑफ सायन्स पर्यंत आणखी १०० कोटींचा भुयारी मार्ग त्यांना बनवायचाच आहे,त्यासाठी शेकडो झाडे कापण्याची, त्यातही हेरिटेज झाडे कापण्याची परवानगी देखील महामेट्रोला मनपाकडून सहज आणि तितक्याच सुलभरित्या मिळाली आहे.त्यामुळेच आम्ही ‘नो मोर सिमेंट रोड’ही चळवळ उभारली असून,नागपूर शहराच्या गल्लोगल्लीत सिमेंट रस्ते बांधणे बंद करा,ज्या ठिकाणी वाहनांची गर्दीच नाही त्या ठिकाणी देखील शहरभर उड्डाणपुले बांधून मोकळे झाले आहेत.आम्हाला सर्वाधिक गरज ही शंभर वर्ष जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईन सुधारण्याची ची आहे,ती सुधारा.असे जयदीप दास म्हणाले.
आमच्यावर आता ‘सर,हम आपको चून के लाये है हमको चून-चून कर मत मारो’अशी म्हणायची वेळ आली आहे,अशी कोटी अनूसुया काळे-छाबरानी यांनी केली.
…………………………………