यात पोलीस आयुक्तांनी अतिशय कठोर शब्दात विविध विभागाचे शासकीय अधिकारी(मनपाचा एक ही अधिकारी या अतिशय महत्वपूर्ण बैठकीला हजर नव्हता हे विशेष!)बांधकाम व्यवसायिक तसेच कंत्राटदारांना समज देत, बांधकामांच्या कंत्राटामध्येच नागरिकांच्या जिवितेच्या सुरक्षेचे नियम समाविष्ट असतात,त्याचे कुठेही पालन होत असताना आढळत नसल्याचे दिसून पडत असल्याचे सांगितले.दोन पैसे कमवायचे आहे तर ढंगाने कमवा,अनेक कंत्राटदारांची ‘राजकीय’ओळख आहे मात्र,या पुढे नियमांचे पालन झाले नाही तर ती राजकीय ओळख तुम्हाला कामी पडणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.न्यायालयात मला वारंवार तुमच्यामुळे उत्तरे सादर करावी लागत आहे.तुम्ही पण काय नेते झालात का?असे बोल मला ऐकूण घ्यावी लागत आहे.शहरात याच वर्षी २२८ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर गेल्या वर्षी १३८ नागरिक रस्ते अपघातात मृत्यू पावले.यात १९ नागरिकांचा मृत्यू उड्डणपूलांवर झाला.कंत्राटदारांनी शहरात कोणतेही बांधकाम करताना समन्वयाने व प्रामाणिकपणे कामे करावी अन्यथा मी संपूर्ण जुने व नव्या अपघताची प्रकरणे बाहेर काढील,असा इशाराच त्यांनी उपस्थित बांधकाम कंत्राटदारांना दिला.
ऐन पावसाळ्यात संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे.किमान पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हायला हवी होती.कंत्राटामधील दिलेली वेळ पाळा,व्यवसायिकता पाळत असताना नियमांचे उल्लंघन केल्यास या पुढे बांधकाम करणा-या सुपरवायझरला नव्हे तर कंपनीच्या मूळ मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल होईल,कंपनीचा मालक निष्पाप लोकांच्या जीवावर पैशे मोजण्यासाठी बसलेले नाहीत.मी येथे न्यायालयाला सतत उत्तर द्यायला बसलेलो नाही.शहरात कुठेही रस्ते बांधकाम किवा उड्डाणपूलांच्या बांधकामात अपघात होणार नाही,याची काळजी घ्या,नियमाप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी कंपनीचे नाव,मोबाईल क्रमांक,काम कधीपासून सुरु होणार?केव्हा संपेल?याची माहिती फलके लागली पाहिजे.नागरिकांना कळले पाहिजे अमूक रस्त्याचे बांधकाम कोणती कंपनी,कोणते कंत्राटदार करीत आहेत.कामाच्या ठिकाणी योग्य बेरिकेट्स,सूचनाफलक,पुरेशी विद्युत व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक असावेत.अश्या सूचना त्यांनी केल्या.
बांधकाम व्यवसायिकांनी शहरात या पुढे कोणतेही काम सुरु करण्या आधी पोलिसांना संबंधीत कामाबाबत पूर्व सुचना देऊन कामासंबंधी सर्व तपशील देणे अनिवार्य आहे, जेणेकरुन पोलिसांना वाहतुकीसंबंधी योग्य नियोजन करता येईल.काम सुरु असताना व्यवसायिकांनी योग्य ते मार्शल नेमुण वाहतूक सुरळीत करावी तसेच रात्री ६ ते १२ दरम्यान नाईट रिफ्लेक्टर लावावे जेणेकरुन अपघात होणार नाही. तसेच वॉलेंटीयर ट्राफीक गार्ड हे दिवसा आणि रात्री मिळून २४ तास नेमावे.बॅरिगेट्स लावुन,साईनेज हे मराठी तसेच हिंदीमध्ये लावावे जेणेकरुन वाहतुक विस्कळीत होऊ नये.तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे.ज्या ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम सुरु आहे त्या ठिकाणी नागरिक आपले वाहन पार्क करतात ते गार्ड मार्फत काढून रस्ता मोकळा करावा तसेच व्यवसायिकांनी दिवस व रात्रीच्या कामकाजाची योग्य विभागणी करा असे सांगून नागपूर शहरातील आम जनतेचा वाहतुकीसंबधी होणारा त्रास कमी व्हावा यासाठी सूचना देत, जे कंत्राटदार वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.
अनेकांनी तर रस्ते बनवताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे ’डिझाईन’मिळाले,त्याचीच अंमलबजावणी केली असल्याचे चमत्कारिक उत्तर दिले.सुधीर गुप्ता या बिल्डरचा तसेच मानकापूर भागातील मंजु दीक्षीत या महीलेचा देखील मुद्दा चर्चिला गेला.अशोक नगर ते जगनाडे उड्डाणपूल रस्त्याच्या खोदकामात ओसीडब्ल्यूवर खापर फोडण्यात आले.पाईप टाकण्यासाठी रस्ता खोदला मात्र,पेव्हर ब्लॉकिंग न करताच निघून गेलेत.याचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे.ओसीडब्ल्यूकडून उपस्थित कर्मचा-याला यावर उत्तर विचारले असता ’काम चालू आहे’असे उत्तर त्याने दिले.ओसीडब्ल्यूच्या कामामुळे माती,रेती,चुरी वाहून संपूर्ण रस्त्यावर आली आहे.याबाबत विचारले असता,‘कुठे राहीले असेल तर बघतो’ असे उत्तर त्याने दिले.
पोलीस अधिका-यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले,नागपूर शहरात कोणत्याच विभागाचा कोणत्याच विभागाशी ताळमेळ नाही,एक विभाग एक रस्ता खोदून तसाच वरवर बुजवून जातो,यानंतर दूसरा विभाग पुन्हा तोच रस्ता खोदून ठेवतो.ओसीडब्ल्यू,नेटवर्क केबल,अमृत योजना,सिमेंटीकरण इत्यादी अश्या अनेक कारणांमुळे शहरभरचे रस्ते सारखे-सारखे खोदले जात आहेत.एवढंच नव्हे तर एखादा विभाग अचानक रस्ते बंद करतो आणि काम सुरु करतो.कोणतीही पूर्व सूचना वाहतूक विभागाला देण्याची तसदी देखील नागपूरातील कंत्राटदार घेत नाहीत.याचे महत्वाचे कारण सर्वाधिक कामगार व सुपरवायजर हे इतर राज्यातील आहेत ,ज्यांना शहराविषयीचे कोणतेही ज्ञान नाही.त्यामुळे कंत्राटे मिळाल्यानंतर अचानक कोणताही रस्ता खोदण्यासाठी घेतात व नागरिकांना तसेच संबंधित विभागानंा पूर्व सूचना न देता रस्ते बंद करतात,यावर निदान सुपरवायजर हे स्थानिकाना नेमा, अशी सूचना आयुक्तांनी केली.यानंतर पूर्व सूचना न देता शहरातील कोणताही रस्ता,कोणत्याही कामासाठी बंद केल्यास पुढील कारवाईसाठी सज्ज राहा,असा दम पोलीस आयुक्तांनी दिला.करारानुसार काम करा,विविध विभागांसोबत समन्वयाने काम करा,एकच रस्ता विविध विभागाने वारंवार खोदू नये,एकाच वेळेस त्या रस्त्यावरील कामे संपवावे,गरज भासल्यास पोलीस ही मदतीला राहतील,असे आयुक्त म्हणाले.
मानेवाडा रस्त्याची उंची अतिशय वाढल्याने २० जुलैच्या पावसात अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले,अखेर बुलडोजर बोलावून सिमेंटचा रस्ता फोडला तर दूस-या वस्तीत ते पाणी शिरले,यामुळे दुस-या वस्तीतील देखील ५००-६०० नागरिक याविरोधात जमा झाले.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे निर्माण झाला होता,असे एका पोलिस अधिका-यांनी आयुक्तांना सांगितले.यावर जे.पी.कन्सट्रक्शनच्या कर्मचा-याने ‘पीडब्ल्यूडी’ने सांगितल्याप्रमाणेच रस्ता त्या उंचीचा बांधला,असे सांगून मोकळे झाले!आता पाटबंधारे विभाग नवी डिझाईन देणार आहे,आता त्याप्रमाणे काम करु,रसत्या लगतच्या वस्त्यांमधील ड्रेनेज लाईन्सचे काम आमच्याकडे नाही,मात्र या पुढे ड्रेनेज नाल्यांचे काम झाल्याशिवाय पुढे काम करणार नाही,अशी ग्वाहीच या कंत्राटदाराकडून आयुक्तांना मिळाली!पुन्हा एकदा पीडब्ल्यूडीचे सुप्रसिद्ध कार्यकारी अभियंता ‘कुचेवार‘ यांचा नावाचा ‘उल्लेख’बैठकीत झाला.यावर वेगळी बैठक घेणार असल्याचे आयुक्तांनी ठणकावले.२० जुलै रोजी मानेवाडाच्या त्या रस्त्यामुळे भरपूर गोंधळ झाला,असे आयुक्त म्हणाले.
अंबाझरी पुलाचे बांधकाम करणारे एस.डी.मोटवानी यांच्या कंत्राटदाराने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ३० ऑगस्ट ही डेडलाईन प्रतिज्ञापत्रात दिली आहे.पोलीस आयुक्तांनी या संबंधी त्यांना विचारले असता,शक्यच नाही,३० सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे त्याने संागितले!मग कोर्टात ती डेडलाईन का दिली?असे विचारले असता,त्या ठिकाणचे ३३ हजार केवीचे इलेक्ट्रीक पोल्स इतरत्र हलवायला एमएसईबीने एक महिना लावला,तसेही आमच्या कामाची, करारानुसार डेडलाईन ही ११ मार्च २०२५ पर्यंत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.यावर,हिंगणा टी-पॉईंट ते माटे चौक दरम्यान या कंपनीने अचानक काम सुरु केले.दोन्हीकडील रस्ते बंद केले त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.महत्वाचे म्हणजे वाहतूक विभागने याची अधिक चौकशी केली असता,कंत्राटदाराकडे एनओसी देखील नव्हती,अचानक काम सुरु केल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले.यावर कंत्राटदाराने,पीडब्ल्यूडीला पत्र दिले होते!वाहतूक विभागात ही फोन केला होता,पण ते अवलेबर नव्हते!असे उत्तर दिले.आता नवीन अर्ज केला आहे!
यावर पोलीस आयुक्तांनी,तुमच्या या अश्या कामांमुळे पोलीसांवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे ठणकावले.या पुढे वाहतूक शाखेला न कळवताच रस्ता बंद केला तर गुन्हा दाखल करु.एसीपींना भेटा,डीसीपींना भेटा,रितसर परवानगी घ्या.विना परवाना काम करु नका,असे आदेश त्यांनी दिले.
यानंतर लकडगंज उड्डाणपूलावरचा रॅम्प उतरविण्याचा कामावर चर्चा झाली.या उड्डाणपूलाचे एका बाजूचे काम बाकी आहे.हल्दीरामच्या बंगल्याजवळील सर्विस लेन अद्याप खुली केली नाही.पाच महिने झाले.दोन तीन आठवड्यात होईल असे सांगतात,एकच रस्ता दोन्ही बाजूच्या वाहतूकीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याचे पोलीस अधिका-यांनी आयुक्तांना सांगितले.हे काम बीडीसीएल कंपनी करीत आहे.यावर उत्तर देताना संबंधित कंपनीच्या कर्मचा-याने भूमीगत पाण्याचे पाईप,यूटिलिटी शिफ्टसाठी काम थांबले असल्याचे सांगून अजून २५ दिवस लागतील,असे उत्तर दिले.या कंपनीने वाहतूक वळवण्याची कामगिरी एनएचएआयवर ढकलली!केबल लेनचे काम सुरु असून रॅम्प उतरविण्याचे काम पावसाळ्यामुळे बंद असल्याचे सांगितले.यानंतर आयुक्तांनी एनएचएआयच्या उपस्थित अधिका-याला याचे उत्तर मागितले,त्यांनी उठण्याची देखील तसदी न घेता,बसूनच उत्तर दिले,जे ‘सत्ताधीश’ला ऐकू आले नाही.(याला म्हणतात नेत्याचा पॉवर,अशी कुजबुज मागच्या काही बाकांवर हळूच ऐकू आली).
या ठिकाणी भरपूर माती रस्त्यावर आली असून शेकडो दूचाक्या त्यावरुन घसरुन पडल्या असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले.एनएचएआयचे शेकडो टन भंगार सामान त्या ठिकाणी पडून असून कळमना,वाठोडा,नंदनवन,पारडी इत्यादी भागातील झोपडपट्ट्यांधील मुले तो भंगार चोरुन नेत असतात.पूलावरुन लोखंडी सामान खाली फेकत असताना चौकीदाराचा त्यामुळे मृत्यू झाला.त्याचे शव पूलाखाली सापडले.अधिक तपास केला असता,लोखंडी भंगार चोरी करीत असताना वरुन फेकल्यामुळे खाली असलेल्या चौकीदाराचा मृत्यू झाल्याचा पोलीस आधिका-यांनी सांगितले.हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा असल्याचे ते म्हणाले.यावर तो चौकीदार नसून भिक्षेकरी असल्याचे कंपनीच्या कंत्राटदाराने सांगितले.
यावर पुन्हा त्या पोलिस अधिका-यांनी दोन एक परिसरात कंपनीचा लोखंडी माल पसरला असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे.विद्युताची कोणतही व्यवस्था कंपनीने केली नाही त्यामुळे सतत गंभीर गुन्हा होण्याची दाट शक्यता असते.विद्युत व्यवस्थेसह सुरक्षा गार्ड वाढवण्याची सूचना या वेळी करण्यात आली.निवृत्त पीएसआयच्या एजंसीला हे काम मिळाले असल्याचे सांगण्यात आले.जेडीसीएलचे‘मोटवानी’हे नाव पुन्हा उच्चारण्यात आले.घनदाट अंधार व गुन्हा घडण्याची शक्यता यामुळे पूलावर पेट्रोलिंग वाढवली असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
नरेंद्र नगर ते लंदन स्ट्रीट रसत्याबाबत विचारले असता,मनोज ढोबले कंत्राटदाराने ते ओसीडब्ल्यूने खोदले असल्याचे सांगितले.यावर पोलिस अधिका-यांनी आयुक्तांना त्या ठिकाणी रॅम तोडून ठेवले असल्याचे व अद्यापही बेरिकेट्स लाऊन ठेवले असल्याची माहिती दिली.गजानना मंदिर अंबाझरी ते त्रिमूर्ती नगरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधताना तो नाल्याजवळ अर्धाच बांधला.यावर,त्या ठिकाणचा इलेक्ट्रीक खांब शिफ्ट न झाल्यामुळे तितकी जागा सोडून पुढे रस्ता बांधला असल्याचे कंत्राटदाराने सांगितले!त्या पॅचवर दूचाकी गाड्या फसतात,जोखिम वाढली आहे असे सांगितले असताना,कंत्राटदारांनी एका बाजूची वाहतूक बंद करुन दूस-या -बाजूचा रस्ता बांधत असताना,वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावर लोड येणार नाही,याची खबरदारी घेण्याची सूचना केली.
नरेंद्र नगर ते म्हाळगी नगर मार्गावर पूर्ण दिवस ट्रक व जड वाहनांचे आवागमन सुरु असते.कंत्राटदार मिक्सर व बांधकाम साहित्याचे ट्रक्स नियमानुसार दूपारी १२ ते ४ दरम्यान सकाळी व सायंकाळी रहदारीच्या वेळेस देखील घेऊन जात असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले.चिखली पूलावर अनेक दिवस एकतर्फी वाहतूक सुरु होती.ओटोमेटीव्ह चौक ते यशोधरा नगर ओसीडब्ल्यूचे काम सुरु असून त्या ठिकाणी देखील बेरिकेट्स नाहीत,मार्शल नाहीत,अशोका चौक ते दिघोरी नाका दरम्यान सात-आठ मोठमोठे खड्डे आहेत,भांडेवाडी ते आव्हारी चौक या रस्त्यावर चूरी पसरली आहे जी अपघातांना निमंत्रण देत आहे.जयभीम नगर जिथे चार दिवसांपूर्वी महिलेचे अपघाती निधन झाले.त्या ठिकाणी देखील बेरिकेट्स नव्हते.रेणूका माता मंदिर दरम्यान दोन्हीं बाजूच्या चौकापर्यंत सिमेंट रस्ते बांधणे सुरु झाले पण या दोन्ही चौकांपर्यंत ना विजेचे खांब आहेत ना चौकीदार.या ठिकाणी ३ मोठ्या व ५ लहान शाळा आहेत.आठ शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन त्या रस्त्यावरुन प्रवास करीत आहेत.टीटीअारएस कंपनीला ते काम मिळाले असून विद्यार्थी आठ खड्डे असणा-या एकतर्फी डांबरी रसत्यावरुन जीव मुठीत घेऊन सायकलवरुन प्रवास करीत असतात.श्रीकृष्ण नगर ते इश्वर नगर डांबर रस्त्याखाली जुनी ड्रेनेज लाईन असल्यामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असल्याचे उत्तर ही आयुक्तांना मिळाले!सध्या पाऊस सुरु आहे,उघाड झाला की येत्या २-३ दिवसात डांबर टाकून ते खड्डे बूजवून देऊ असे कंत्राटदाराने सांगताच,हा गंभीर विषय असून नुकतेच अपघातात मृत्यू पावलेल्याचे शव घेऊन शहरात आंदोलन झाले आहे.त्यांच्यावर आम्ही गुन्हा देखील दाखल केला आहे.क्वालिटी आणि सेफ्टी याबाबत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारु शकत नसल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.या रस्त्यावर एक ही अपघात घडल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करु,असा सज्जड दम आयुक्तांनी दिला.
अनेक कंत्राटदारांनी ७५ यासारख्या वयोगटाचे चौकीदार नेमल्याची बाब समोर आली.ज्यांना स्वत:ला उभे राहता येत नाही,ते कंत्राटदारांचे चौकीदार नागपूरकर नागरिकांची काय सुरक्षा करणार?असा सवाल उपस्थित करण्यात आला.अनेक सिमेंट रस्त्यांचा उतार हा डांबरी रस्त्यांपेक्षा खूप उंचीवर तसाच सोडून देण्यात आला आहे.दिवसा तर ती उंची दिसून पडते आणि वाहनचालक गाडीचा वेग हळू करुन ‘उसळून‘ जुन्या डांबरी रस्त्यावर उतरतो मात्र रात्रीच्या वेळी वेग जास्त असल्याने व अधंार असल्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची उंची दिसून पडत नाही आणि अचानक रस्ता संपतो.मिडीयम गॅप कुठेही दिसून पडत नाही याशिवाय साढे तीन फूटांच्या उंचीमुळे नागरिकांच्या घरात ही पाणी शिरत आहे.जिथे सिमेंटचा रस्ता संपतो तिथे रेडीयमचे पट्टे लावण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली.२००-२०० मीटरवर बिल्कर्स लावण्याची सूचना त्यांनी केली.
‘माणसाच्या जीवाची फार मोठी किंमत असते’,असे आयुक्त म्हणाले.यावर एका पोलिस अधिकारी म्हणाले,की नशीब अश्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या गॅप मध्ये नागरिकांचा मृत्यू झाला नाही.त्या गॅप अनेक ठिकाणी शहरात इतक्या भंयकर आहेत की इतक्या लोकांचा जीव जाईल की कोणी मोजू शकणार नाही.यावर पोलिस आयुक्तांनी कंत्राटदारांना सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे लेवल जुन्या रस्त्यांसोबत एक समान करण्यास कपंनीच्या मालकांना सांगण्याची सूचना कंत्राटदारांना केली.शहरात सर्व दूर रस्ते कुठे माती,रेती,गिट्टी,केबल,पाईप,चुरीने तुंबलेले आहेत.मुंबईत दररोज पाण्याने रस्त धुतले जातात मगच त्यावरुन वाहतूक सुरु केली जाते.आपल्या राज्यात नियम सगळ्यांना सारखे असताना जे मुंबईला साध्य आहे ते नागपूरकरांच्या नशीबी का नाही?असा प्रश्न त्यांनी केला.
याप्रसंगी वाहतूक विभागाच्या अधिका-यांनी स्लाईड च्या माध्यमातून कंत्राटदारांना काही आकडे व व्हिडीयोद्वारे महत्वाच्या सूचना दाखवल्या.लंदन या शहराची लोकसंख्या १ कोटी असून नागपूर शहराची ४० लाख लोकसंख्या आहे मात्र,लंदनमध्ये एका वर्षात १०० अपघात होतात तर नागपूरात अवघी ४० लाख लोकसंख्या असताना वर्षाला ३०८ अपघाती मृत्यू झाले.शिवाय गंभीर जखमी व किरकोळ जखमींची तर काही मोजदादच नाही.सायंकाळी ६ ते ९ दरम्यान सर्वाधिक मृत्यू झाले.कोराडी,उमिया धाम,कापसी या ठिकाणच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे,सूचना फलक,ड्रेन होल क्लिनिंग ,स्पीड ब्रेकर्स इत्यादी उपायांमुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व पोलिस ठाण्यातील पीआय यांनी कंत्राटदारांकडून नियमांचे पालन करुन घेण्ययची सूचना त्यांनी केली.५० ते ७० वेगमर्यादेवर अपघात घडला तरी मृत्यू होत नाही मात्र १०० ते १२० वेगमर्यादेवर सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याची आकडेवारी त्यांनी सादर केली.काँक्रिट मिक्सर सोडून बांधकामांच्या इतर जड वाहनांना दूपारी १२ ते ४ दरम्यान शहरात परवागनी दिली आहे,इतर वेळी नाही.कामाच्या ठिकाणी योग्य सूचनांसह योग्य सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी उपस्थित कंत्राटदारांना दिले.
मात्र, अनेक कंत्राटदारांच्या निष्काळजी धोरण व पैसे कमविण्याच्या हव्यासातून गेल्या काही वर्षात शहरात निर्माण झालेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवर,उड्डाणपूलांवर जे अपघाती मृत्यू झाले,त्या मृत्यूंसाठी संबंधित कंत्राटदारांवर सदोष मृत्यूचे गुन्हे पोलीस आयुक्त दाखल करतील का?असा मार्मिक सवाल ते करतात.याच वर्षी १८ फेब्रुवरीला वेस्ट हायकोर्ट रोडवर सांयकाळी ६ वाजता एक अपघात झाला.कंत्राटदाराने एकतर्फी वाहतूक सुरु ठेवली असल्याने चार चाकी कारने शिवबहादूर ठाकूर यांना धडक दिली,यात त्यांचा मृत्यू झाला.कंत्राटदार अभिषेक विजय वर्गीय विरुद्ध मृतकाच्या मुलाने विश्वजीत याने अनेक तक्रारी मनपा आयुक्तांकडे केल्या.कंत्राटदाराने त्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नव्हते.एकतर्फी वाहतूकीने घरुन सकाळी घराबाहेर पडलेल्या शिवबहादूर यांचा घात केला.एकतर्फी वाहतूक सुरु असताना देखील रेलिंगचे कठडे,सूचना फलक,सुरक्षा रक्षक,स्पीड ब्रेकर्स नसल्यामुळेच माझ्या वडीलांचा अपघात झाला असल्याचे विश्वजीत सांगतात.आजपर्यत त्या कार चालकावर कारवाई झाली नसून पोलिसांनी ’अज्ञात’वाहनधारक नमूद करुन केस बंद केली.
काँग्रेसचे पश्चिम व उत्तर नागपूरचे आमदार विकास ठाकरे व डॉ. नितीन राऊत यांनी मनपा आयुक्तांला कंत्राटदारावर योग्य कारवाईसाठी मार्च महिन्यात पत्र दिले, तरी देखील अभिषेक विजयवर्गीयवर मनपा आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे विश्वजीत सांगतात.उलट याच कंत्राटदाराला नागपूरातील रामदासपेठ,धंतोली,सिव्हील लाईन्ससारख्या पॉश वस्तीचे सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे कंत्राट देऊन उपकृत केले असल्याची खंत विश्वजीत व्यक्त करतात.आमचा काय दोष होता?या विकासाने आमच्यासारख्यांचेच बळी घ्यायचे का?त्यांचा हा सवाल घायाळ करतो..
येत्या तीन महीन्यात राज्यात विधान सभेच्या निवडणूका आहेत.नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मनपामध्ये जनसंपर्क मोहीम राबवली.सध्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात,वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या घरात शिरणारे पाणी यामुळे नागपूरकरांच्या मनात शहरातील प्रशासन व नेत्यांविषयी चांगलाच रोष आहे,त्यामुळे गडकरी असो किवा पोलीस आयुक्त यांच्या या आढावा बैठका,जनसंवाद,नागपूरकरांची या महाभयंकर समस्येतून सोडवणूक करण्यासाठी किती प्रभावी ठरतात?याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.
………………………………..