लक्ष्मण हाकेंना निमंत्रण नाही:आमच्या मागण्या लोकप्रतिनिधींकडून होतात पूर्ण!
ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी
नागपूर,ता.१ ऑगस्ट २०२४: लोकसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या विराेधात नागपूरातून निवडणूक लढविली होती.विकास ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी देखील महाकाळकर सभागृहात पार पडलेल्या सभेत विकास ठाकरेंना आपला पाठींबा जाहीर केला होता,मात्र निवडणूकीच्या निकालात कुठेही तो पाठींबा उमटला नाही.यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खासगीत चांगलीच चर्चा रंगली.काँग्रेसच्याच एका विद्यमान आमदाराने,गिरिश पांडव तसेच बबनराव तायवाडे यांनी विकास ठाकरेंच्या विरोधात गडकरी यांना पडद्या मागून साहाय्य केले असून, गिरीश पांडव हे तर गडकरींच्या रेडीसन ब्ल्यूू पाठीमागील निवासस्थानी भेटीला गेले असल्याची देखील कुजबुज ऐकू आली होती.
याची परिणीती विकास ठाकरेंचा एक लाख ३७ हजार ६०३ मतांनी पराभवात झाली व काँग्रेसच्या उमेदवाराला भारतीय जनपा पक्षाने पराभूत केले नसून काँग्रेसच्याच काही नेत्यांनी व उघड पाठींबा जाहीर करणा-यांनी ‘ठरवून’पराभव केला असल्याची खंत मतमोजणीच्या दिवशी कळमना येथे काँग्रेसच्या काही कट्टर कार्यकर्त्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे बाेलून दाखवली होती.
आज प्रेस क्लब येथे ओबीसी महासंघाच्या ९ व्या राष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता ‘सत्ताधीश’ने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील हा प्रश्न विचारला यावर, मी महाकाळकर सभागृहात काँग्रेस विचारधारेचा असल्यामुळे माझा पाठींबा विकास ठाकरेंना जाहीर केला होता,महासंघाचा नाही,असे उत्तर बबनराव तायवाडे यांनी दिले!मी फार पूर्वीपासून काँग्रेसी आहे,त्यामुळे मी मंचावरुन काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला,असे ते म्हणाले.ओबीसी महासंघातील सभासदांवर कोणतेही बंधन नसून त्यांना हवे त्या पक्षाच्या उमेदवाराला ते मतदान करु शकतात.आमच्या ओबीसी महासंघामध्ये सहभागी होत असताना आम्ही आमचे ‘राजकीय जोडे’बाहेर काढून येत असतो,त्यामुळे महासंघाच्या सभासदांवर कोणाला मतदान करावे?असे बंधन नसते,असा खुलासा त्यांनी केला.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ना.गो.गाणार यांच्या विरुद्ध सुधाकर अडबाले यांना तायवाडे यांनी ओबीसी महासंघाचा उघड पाठींबा जाहीर केला होता.इतकंच नव्हे तर ना.गो.गाणार यांचा पराभव होऊन अडबाले हे विधान परिषदेत पोहोचले.जवाहर वसतीगृहात पार पडलेल्या सभेत तेव्हा देखील बबनराव तायवाडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपले संपूर्ण पाठबल अडबाले यांना जिंकून आणण्यासाठी उभे करणार असल्याचे जाहीर केले होते व त्या निवडणूकीत बबनराव तायवाडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडून विजय खेचून आणला होता.परिणामी,एका राजकीय मंचावर म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ते महासंघाचे अध्यक्ष म्हणून भूमिका जाहीर करतात तर दूस-या राजकीय मंचावर म्हणजे लोकसभेच्या निवडणूकीत ते महासंघाचे अध्यक्ष असतानाही, फक्त ‘काँग्रेसी‘असल्याने वैयक्तीक पाठींबा जाहीर कसे करु शकतात?असा सवाल आता विचारला जात आहे.
महत्वाचे म्हणजे नुकतेच विनोबा आश्रमात अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आलेल्या प्रतिनिधीने,ओबीसी महासंघाचा पाठींबा श्याम मानव यांच्या भूमिकेला जाहीर केला!त्यामुळे तायवाडे यांची कोणती भूमिका खरी व कोणती लपलेली,यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
मेंढपाल कुटूंबात जन्म घेतलेले प्रा.लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भूमिका घेऊन जालन्याच्याच वडीगोद्री या ठिकाणी जून महिन्यात उपोषण सुरु केले होते.ओबीसी आरक्षण संदर्भात लेखी आश्वासन देण्याची मागणी हाके यांनी केली.त्यांचे आई-वडील ऊस तोडणीचे काम करीत होते.हाके हे २००४ पासून सक्रीयपणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहे.धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष (रासप)माध्यमातून हाके यांनी आपल्या राजकीय व सामाजिक प्रवासाची सुरवात केली.२०१४ च्या निवडणूकीत हाके यांनी आक्रमकपणे धनगर आरक्षणाविषयी गावोगावी प्रचार केला होता.फडणवीस यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी जानकर यांची साथ सोडली व शिवसेनेच्या फूटी नंतर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.काही काळ मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटल्यानंतर हाके यांनी ‘ओबीसी समाज पक्षाच्या’ माध्यमातून ती निवडणूक लढवली मात्र त्यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली.अपक्ष असलेल्या हाकेंना अवघी ५,१३४ मत मिळाली होती.अश्या या हाकेंना आपल्या महाअधिवशेनात निमंत्रण का नाही?असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता,आमच्या महाअधिवेशनात लोकप्रतिनिधीच येत असतात कारण तेच ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवू शकतात,असे उत्तर तायवाडे यांनी दिले.
परिणामी,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘पदसिद्ध’पदाधिकारी हे राष्ट्रीय तर सोडा राज्यातीलच दूस-सा ओबीसी आरक्षणासाठी लढा देणा-या नेत्याला एवढ्या मोठ्या मंचावर आमंत्रित करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवशेन रविवारी-
ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा.गोल्डन जुबली कन्वेनशन सेंटर(गुरुनानक भवन)गुरुनानक देव विद्यापीठ,अमृतसर(पंजाब)येथे आयोजित करण्यात आले असून,उद् घाटन एनसीबीसीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते हाेणार अाहे तसेच प्रमुख पाहूणे म्हणून आयुष मंत्रालय व आरेाग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रताप जावध उपस्थित राहतील.याशिवाय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंजाबचे उपसभापती जय कृष्ण सिंह,राज्यातील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे,जलसंपदा मंत्री,गोवा सुभाष शिरोडकर,नाना पटोले,चंद्रशेखर बावणकुळे,क्रिकेटपटू हरभजन सिंह,खा.प्रतिभा धानोरकर,डॉ.नामदेव किरसान,खा.अमर काळे,खा.डॉ.प्रशांत पडोळे,खा.श्यामकुमार बर्वे,खा.डॉ.शोभा बछाव,खा.संजय देशमुख,खा.बाळू मामा म्हात्रे,खा.एटेला राजेंद्र(तेलंगणा),खा.रविचंद्र वाद्दीराजू(तेलंगणा)खा.सुरेशकुमारर शेटकर(तेलंगणा)आमदार संतोष कटारिया(पंचाब)आ.तरनप्रीत सिंह(पंजाब)माजी खासदार राजकुमार सैनी(हरियाणा)माजी मंत्री महादेव जानकर,आ.परिणय फुके,आ.अभिजित वंजारी,आ.सुधाकर अडबले,अशोक वाघ आदी यांनी उपस्थिती राहणार आहे.
…………………………………