फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहानिर्मितीचा अजब कारभार:जमीनी घेऊनही चौदा वर्षांपासून प्रशिक्षणार्थीच!

महानिर्मितीचा अजब कारभार:जमीनी घेऊनही चौदा वर्षांपासून प्रशिक्षणार्थीच!


चौकीदाराचे पद द्या मात्र ‘कायमस्वरुपी’ करा:तांत्रिक विभागातील प्रकल्पग्रस्तांची मागणी

किशोर भाटे व राजकुमार सोने बसले आमरण उपोषणाला

नागपूर,ता.३० जुलै २०२४: महानिर्मिती कंपनी व महाराष्ट्र शासनाने १९७१,१९७२ आणि १९८५ साली जमीनी संपादित केल्या व संपादित शेतीच्या मोबदल्यात कुठल्याही अटी शर्ती न ठेवता कायमस्वरुपी नोकरी देण्याची तरतूद केली.मात्र,२००९ नंतर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरी न देताच फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर ठेवण्यात आले व तुटपुंज्या मानधनावर आठ तास कामे करवून घेत असून, आम्हाला कोणतीही वैद्यकीय सुविधा तसेच भविष्य निर्वाह निधीची सुविधा प्रदान करण्यात आली नाही.त्यामुळे काल सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून कोराडी मंदिर टी-पॉईंट जवळ महानिर्मिती व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आमचे आमरण उपोषण सुरु असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत,महाराष्ट्र राज्य विज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समिती औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र,कोराडीचे उपाध्यक्ष नरेंद्र भांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

२००९ साली औरंगाबाद उच्च न्यायालयाने शासकीय पदभरती ही परिक्षाशिवाय करु नये असा आदेश दिला होता त्यामुळे २००९ नंतर महानिर्मितीत देखील प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी देण्यात आली.गेल्या १४ वर्षांपासून अद्यापही आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणूनच काम करीत असून फक्त १४ हजार पगारात आठ तास काम करीत आहोत.मात्र,आमच्यानंतर जे दहावी,बारावी उत्तीर्ण नोकरीवर रुजू झाले त्यांना तीन वर्ष विद्युत सहाकय म्हणून ठेवलं व त्यानंतर कायमस्वरुपी करण्यात आल्याचे भांगे यांनी सांगितले.आम्ही गेल्या १२ ते १४ वर्षांपासून आठ तास काम करुन देखील १४ हजार मानधनावर प्रशिक्षणार्थीच राहीलो.
परिक्षेची अट जरी न्यायालयाने टाकली असली तरी एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर प्रकल्पग्रस्तांची महानिर्मितीने अंतर्गत परिक्षा घेऊन आम्हाला प्रमाणपत्र देखील बहाल केले आहे.आम्ही महानिर्मितीत तांत्रिक कामे करीत असलो तरी त्या प्रमाणपत्रांच्या आधारावर आम्हाला गट ‘अ’,‘ब’ नाही दिले तरी चालेल,सुरक्षारक्षकांची नोकरी द्या पण ‘कायमस्वरुपी’नोकरी द्या,अशी मागणी कृती समितीतील सदस्यांनी याप्रसंगी केली.
संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरु असून आम्ही कोराडी येथे हे आंदोलन करीत असल्याचे ते म्हणाले.जेव्हा आमची जमीन घेतली त्यावेळी कोणत्याही अटी व शर्ती नव्हत्या.महाराष्ट्रात १८०० ते २२०० आंदोलक असून कोराडी येथील आंदोलनात १४० आंदोलक सहभागी झाले आहेत.किशोर भाटे व राजकुमार सोने हे आमरण उपोषणाला बसले असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पूर्वी देखील याच मागणीसाठी आम्ही आंदोलन केले त्यावेळी मंत्रालयात उर्जा खात्याचे सचिव यांनी आमच्यासोबत बैठक घेतली.प्रधान सचिवांनी आमची दिशाभूल केली.१५ दिवसात यावर तोडगा काढू असे आश्‍वासन दिले होते आता सात महिने झाले तरी यावर तोडगा काढला नाही.परिणामी,आम्ही पुन्हा आमच्या न्याय मागणीसाठी आमरण उपोषण करीत असून उर्जा विभागाने तातडीने बैठक घ्यावी व आम्हाला योग्य न्याय द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला कृति समितीचे हेमंत मुसळे,संदेश नवयोगे,संजय ठाकरे,कमलेश सावरकर आदी उपस्थित होते.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या