नागपूर,ता.२९ जुलै २०२४: न्यायालयाने जामीन देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना वैद्यकीय आधारावर नव्हे तर ज्या प्रकरणात अनिल देशमुखांना सक्त वसुली संचालनाच्या(ईडी) अधिका-यांनी अटक केली त्या प्रकरणात न्यायलयाला विश्वासहर्ता वाटली नसल्याने अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे प्रतिउत्तर जिल्हा परिषद सदस्य व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांना दिले.
वैद्यकीय कारणावरुन जामिनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करा व त्यांना परत कारागृहात पाठवा,अशी मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केली होती.फुके यांच्या या मागणीवर सलील देशमुखांनी वरील खुलासा करीत सांगितले की,न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन देताना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे नमूद केले आहे.याशिवाय अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप करण्यात आले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.इतकंच नव्हे तर सर्व कागदपत्रे व बयाण ऐकल्यावर भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरु शकणार नसल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.दोन वर्षांपूर्वीच न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपात ‘क्लिन चिट’ दिली असल्याचे सलील देशमुख म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी खोट्या आरोपांमध्ये व खोट्या पुराव्यांच्या आधारावर अनिल देशमुख यांना१३ महिने तुरुंगात राहावे लागले.असे असताना पुन्हा एकदा भाजपची नेते मंडळी अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करुन त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत,हा भाजपला आलेला सत्तेचा माज असल्याची जहाल टिका याप्रसंगी सलील देशमुख यांनी केली.ज्या नेत्याने खोटे आरोप करण्यासाठी नकार दिला,भाजपने पाठवलेल्या चारही प्रतिज्ञापत्रांवर सह्या करण्यास नकार दिला,ज्यामुळे त्यांच्यावर ईडीची धाड टाकण्यात आली.१३ महिन्यांचा तुरुंगवास घडला पण ते कटकारस्थानाला बळी पडले नाहीत,त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा म्हणजे सत्तेचा माजच आहे,असे ते म्हणाले.
आमच्या कुटूंबियांवर,जवळच्या मित्रांवर ईडीने शंभरच्या वर धाडी टाकल्या.माझ्या ६ वर्षाच्या मुलीची देखील ईडी अधिका-याने चौकशी केली.आमच्या संपूर्ण कुटूंबाचीच ईडी,सीबीआय व प्राप्तीकर विभागाने छळवणूक केली तरी देखील अनिल देशमुख हे खोट्यांसमोर झुकले नाहीत. आता फडणवीस,अविनाश ठाकरे,चंद्रशेखर बाावणकुळे ,सुधीर मुनगंटीवार हे सातत्याने अनिल देशमुखांवर बेछूट आरोप करीत आहेत.याचे उत्तर काटोलची आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनताच देईल,असा इशारा सलील देशमुख यांनी दिला.
मि
रजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदत यांच्यावर अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले होते.फडणवीस यांनी समित कदम यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,अजित पवार तसेच अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करणारे चार प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची ‘ऑफर‘समित कदम यांच्या मार्फत दिली असल्याचा आरोप या पूर्वीच अनिल देशमुखांनी केला आहे.मात्र,समित कदम यांनी खंडण करीत मला अनिल देशुखांनीच भेटायला बोलावले होते व देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगून त्यांच्या अडचणीत काही मदत होऊ शकले का,अशी विनंती केली होती,असा दावा समित कदम यांनी केला आहे.नेमकं कोण खरे बोलत आहे?असा प्रश्न केला असता,मी वैयक्तीकरित्या कधी समित कदम यांना भेटलो नाही पण,अनिल देशमुख जे बोलले ते शंभर टक्के खरं असल्याचे सलील देशमुख म्हणाले.
चांदीवाल आयोगाच्या अहवालाविषयी विचारले असता,दोन वर्षांपूर्वीच तो अहवाल युती सरकारला सादर करण्यात आल आहे मात्र,आपली नाचक्की होईल या भीतीतून तो अद्याप विधीमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला नसल्याची टिका त्यांनी केली.हेच त्यांचे ‘रामराज्य’आहे,असा टाेला ही त्यांनी हाणला.त्यांच्या रामराज्यात अवघ्या ६ वर्षाच्या मुलीची देखील ईडीचे अधिकारी चौकशी करतात.आरएएस,स्टाफ सिलेक्शनचे अधिकारीच सांगत होते,कश्याप्रकारे कटकारस्थानातून आमच्यावर वारंवार धाडी टाकण्याच्या सूचना मिळत आहेत.चौकशी करणा-या अधिका-यांची नावे देखील ‘योग्य वेळी’जाहीर करेल,असा इशारा सलील देशमुखांनी दिला.
भाजप देखील पेनड्राईव्ह दाखवून ‘योग्य वेळी’सत्य बाहेर आणू,असा दावा करीत असते.महाराष्ट्राच्या जनतेसमोर ही ’योग्य वेळी’म्हणजे नेमके केव्हा?असा प्रश्न पडला आहे.आमदार,खासदार म्हणून संविधानाची शपथ घेताना,जनतेप्रति कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेतली जाते मग त्याच जनतेपासून लपवाछपवी का करतात?असा प्रश्न केला असता,प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते,योग्य वेळीच ती पुढे आणल्या जात असते,आम्हाला देखील त्या योग्य वेळीची वाट आहे,असे सलील देशमुख म्हणाले.फडणवीसांनी त्यांच्या आरोपांबाबतचे पुरावे द्यावे,आम्ही पण ते देऊ,‘बात निकलेगी तो दूर तलक जायेगी’अश्या शायरीचा आधार सलील देशमुखांनी याप्रसंगी घेतला.
सत्ता पक्ष तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही खोटा नेरेटीव्ह सेट करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत.यावर बोलताना,देशातील जनतेला कटकारस्थानाचे राजकारण चांगल्याने माहिती झाले आहे.देशातील जनता ही खूप जागरुग आहे,हे लोकसभेच्या निकालाने सिद्ध केले.महाराष्ट्रात तर एकनाथ शिंदेच्या पक्षाने भाजपची लाज वाचवली.शिंदेंनी सात जागा निवडूण आणल्यामुळे त्यांची इभ्रत तरी वाचली,असा टोला त्यांनी हाणला.साताराची जागा देखील आमचीच होती मात्र,निवडणूक आयोगाने तेथे ‘पिपाणी’हे निवडणूक चिन्ह दिल्याने मतदारांना ते राष्ट्रवादी शरद पवारांचे निवडणूक चिन्ह ’तुतारी’वाटल्याने अपक्ष लढणा-या उमेदवाराच्या पिपाणीला लाखांच्या वर मते मिळाली.हीच बाब अनेक मतदारसंघात घडली,नाही तर महाराष्ट्रात आणखी वेगळा निकाल लागला असता,असा दावा सलील देशमुख यांनी केला.