उद्या विनोबा भावे केंद्रात पुरोगामी सामाजिक संघटनांची मोट
लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेत सत्तारुढ पक्षांना मिळणार झटका
भाजप पक्ष प्रेतांच्या ढिगा-यांवर चढून सत्तेवर विराजमान:श्याम मानव यांची जहाल टिका
नागपूर,ता.२३ जुलै २०२४: आम्ही अराजकीय असून कोणत्याही निवडणूकांपासून अलिप्त राहणारे आहोत मात्र,देशाच्या संविधानातील मूल्ये पायदळी तुडविले जात असताना आम्ही मूकप्रेक्षक बनून राहू शकत नाही.त्यामुळे आम्ही व आमच्यासारख्या अनेक पुरोगामी विचारधारेच्या संघटनांनी लोकसभेच्या निवडणूकीत प्रस्थापितांविरोधात लोकप्रबोधन केले.यामुळेच मोदी सरकारची ‘चार सौ पार’ची हवा निघाली. यंदा तर महाराष्ट्राच्या विधी मंडळात ’महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’कायदा पारित झाला असून आमच्यासारख्या संघटनांवर या कायद्याचा वरवंटा चालतो का,याची आम्हाला देखील वाट असल्याचा इशारा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
याप्रसंगी श्याम मानव यांनी अनेक ज्वलंत विषयांना हात घातला.‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’या कायद्यात कुठेही नक्षलवादी विचारांना आळा घालण्यासाठी हा कायदा आहे,असा उल्लेख नाही.परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक विधानसभेत सादर करताना लेखी निवेदनात तो उल्लेख केला.लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जाहीर विधान केले होते की, निवडणूक प्रचारात काही ‘अर्बन नक्षल’ संघटनांचा सहभाग होता.त्यांचा सारा रोख निवडणुकीत विरोधकांचा उघडपणे प्रचार करणा-या नागरी संघटनांकडे होता.त्यामुळे हा नवीन कायदा करण्याचा उद्देश्य राजकीय आहे का?या प्रश्नावर श्याम मानव यांनी उपरोक्त मत मांडले.
महाराष्ट्र हे देशातील इतर राज्यांसारखे नाही,या ठिकणी संतांची,प्रबोधनाची फार मोठी चळवळ रुजली आहे.त्यातल्या त्यात विदर्भात जर या कायद्याच्या अनुषंगाने कारवाई होणे इतके सोपे नाही,राज्यातील जनता हे खपवून घेणार नाही,असे ते म्हणाले.इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणि लावली होती परंतु त्यांनी संविधानाची चारही मूलतत्वे,समता,बंधूता,स्वातंत्र्य आणि न्याय या तत्वांना हात ही लावला नाही फक्त विचार स्वातंत्र्यावर गदा आणली होती.मात्र,आता देशामध्ये केंद्रिय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांना जेरीस आणल्या जात आहे.हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविल्या जात आहे.देशात पुन्हा एकदा मनूवादी सरंचना उभी करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वत: देशाचे संविधान हे यूरोपियन मूल्यांनुसार निर्माण झाल्याची वलग्ना केली आहे.त्यांना देखील भारतीय मूल्यानुसार देशाची राज्यघटना पुन्हा निर्माण होण्याची गरज वाटते.असे संविधान जी समानता प्रदान करणारी नसेल तर ब्राम्हण-शुद्रवाद जोपासणारी असेल,असा घणाघात त्यांनी केला.
आम्हाला मोदींना हरवू शकतो व काँग्रेसला जिंकवू शकतो हा आत्मविश्वास लोकसभेच्या निवडणूकीनंतर आला आहे त्यामुळेच आम्ही येत्या विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी लोकप्रबोधनाची चळवळ सुरु करणार असून आमचे ५० वक्ते हे किमान दोन हजार लोकांसमोर विविध मुद्दे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल देशमुख आणि चार प्रतिज्ञापत्र-
राज्यातील अराजकता व दडपशाहीविषयी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयीचे उदाहरण त्यांनी दिले.अनिल देशमुख यांच्यावर सूड भावनेतून अाणि सत्तेचा गैरवापर करुन ईडीची कारवाई करण्यात आली,असा आरोप श्याम मानव यांनी केला.अनिल देशमुखांसमोर प्रस्थापिंतानी चार प्रतिज्ञापत्र ठेवले व त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.पहील्या प्रतिज्ञापत्रावर शिवसेनेचे अर्ध्यवू उद्धव ठाकरेंच्या विरोधात शंभर कोटींची खंडणी जमा करण्याचे आरोप होते,त्यावेळी केबिनेट मंत्री असणारे आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियान बलात्कार व खूनाचे आरोप लावणारे दूसरे प्रतिज्ञापत्र होते,तिसरे अनिल परब यांच्या विरोधात तर चौथे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गुटखा इत्यादी व्यापारातून भ्रष्टाचाराचे व खंडणीचे आरोप लावणारे होते.अनिल देशमुखांनी १३ महिने कारागृहात राहणे स्वीकारले मात्र ,त्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केली नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याच्या गृहमंत्र्याला पहील्यांदा ईडीच्या बनावट कारवाईतून कारागृहात डांबण्यात आले.आम्हाला पुन्हा राज्यात अशी राजकीय व्यवस्था नको आहे,यासाठीच आम्ही लोकप्रबोधनाची चळवळ सुरु केली असल्याचे श्याम मानव यांनी सांगितले.
…………………………..