फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपत्रकाराची ‘नेकी कर दरिया मे डाल...’

पत्रकाराची ‘नेकी कर दरिया मे डाल…’

रजिस्ट्री झालेल्या प्लाॅटवर ग्रामपंचायतने बांधली सार्वजनिक टाकी
बिल्डरने समोरचा प्लॉट देण्याचे दिले आश्‍वासन:ताबा पत्र दिले मात्र रजिस्ट्रीला ९ वर्षांपासून टाळाटाळ
पत्रकाराच्या प्लॉटवर शेजा-यांचा डोळा: भांडणे गेली पोलिस ठाण्यात
पत्रकाराची माणूसकी:बिल्डरच्या मुलीवर अट्रासिटी टाळली
स्वत:च्याच घरात एक ही कपाट बांधण्याची चोरी:घराचे झाले गोडाऊन
नागपूर,ता.१० जुलै २०२४: नागपूरातील एका  महिला पत्रकाराने भारती हाऊसिंग एजन्सीकडून(रजि.न.एन.जी.पी/६३८२/ईई/९९-२०००) २०१४ मध्ये न्यू स्वराज नगर,बेसा पिपळा रोड येथे ७८७ चौ.फूटांचा प्लॉट साढे पाच लाख रुपयांमध्ये घेतला.या हाऊसिंग सोसायटीचे मूळ मालक हे पुरुषोत्तम खराबे व दिपक मुंगले हे आहेत.या महिला पत्रकाराच्या पतीने प्लॉटसंबंधित संपूर्ण व्यवहार पुरुषोत्तम खराबे यांच्यासोबत केला.फक्त रजिस्ट्रीच्या वेळी दिपक मुंगले हे हजर होते.या दोघा भागीदारांनी त्याच वेळी या पत्रकाराकडून अडीच-अडीच लाख रुपये घेतले.हा प्लॉटचा व्यवहार झाला त्यावेळी या भागात संपूर्ण जंगल होतं.कोबरा सांपांची दहशत होती तसेच अनेक लोक कोबराच्या दंशाने मरण पावले होते.मात्र,कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबियांना शहरात कुठे का असो ना,स्वत:चे हक्काचे राहाते घर असावे,ही भावना असणे स्वाभाविक आहे.
श्रेया स्नेहदिप भोंगाडे या महिला पत्रकाराने देखील स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न असेच मनात बाळगले होते.यासाठी पती स्नेहदिप(सनी)भोंगाडे यांच्यासोबत पै-पै जोडून हा प्लॉट तिने खरेदी केला.मात्र,त्यांच्या दूर्देवाचे फेरे येथूनच सुरु झाले.बेसा ग्राम पंचायतीने नेमके भोंगाडे दाम्पत्याने खरेदी केलेल्या प्लॉटवरच सार्वजनिक टाकीचे बांधकाम सुरु केले!भोंगाडे दाम्पत्याने यावर आक्षेप घेत, ले-आऊट मालक तसेच जलप्रदाय विभागाच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्याचे ठरविले.परंतु,सरपंच तसेच ले-आऊट मालकाने या भागात पाण्याच्या भीषण समस्येकडे भोंगाडे यांचे लक्ष वेधले.५०० फूट खोदून देखील बाेरवेलला पाणी लागत नव्हते.परिणामी,संपूर्ण बेसा परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी या टाकीचे निर्माणकार्य होणे अत्यंत गरजेचे असल्याची विनंती भोंगाडे दाम्पत्याला त्यांनी केली.
इतकंच नव्हे तर भारती हाऊसिंग एजन्सीचे मालक यांनी भोंगाडे यांना आश्‍वस्त केले की रजिस्ट्री झालेल्या प्लॉट क्र.६५ वर पाण्याची टाकी निर्माण होत असल्याने, त्या समोरच त्यांचा आणखी एक प्लॉट असून त्या प्लॉट क्र..६६ ची रजिस्ट्री त्यांच्या नावे करुन देतो.एवढंच नव्हे तर रजिस्ट्री झालेला प्लॉट क्र.६५ हा ७८७ चौ.फू.आहे तर प्लॉट क्र.६६ हा ९६० चौ.फूट असून ही वाढीव जागा देखील अतिरिक्त पैसे दिल्यास भोंगाडे यांच्या नावाने करुन देण्यात येईल.
पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्‍न असल्याने व भोंगाडे कुटूंबियांना देखील याच ठिकाणी वास्तव्य करावयाचे असल्याने त्यांनी बिल्डरच्या या प्रस्तावाचा स्वीकार केला.बिल्डरने भोंगाडे दाम्पत्याकडून वाढीव जागेचे अडीच लाख रुपये अतिरिक्त घेऊन या संपूर्ण ९६० चौ.फूटांच्या प्लॉटचे ताबापत्र तसेच एनओसी बनवून दिली.२६ ऑक्टोबर २०१५ रोजी हे ताबापत्र बनवून देण्यात आले.त्यात ४ लाख ५० हजार रुपयात प्लॉट क्र.६६ श्रेया भोंगाडे यांना विक्री केल्याचे नमूद आहे.
यानंतर भोंगाडे दाम्पत्यांनी कुवतीप्रमाणे या प्लॉटवर लहानसे घर उभारले.मात्र,त्यांनी संपूर्ण ९६० चौ.फूटांवर संरक्षण भिंत बांधली नाही तर काही जागा भविष्याचा विचार करुन दोन बाजूंनी मोकळी सोडली व १२ बाय ४० फूटात बांधकाम केले.भोंगाडे यांच्या शेजारचा प्लॉट एकनाथ रानडे यांनी २५ वर्षांपासून घेऊन ठेवला होता,रानडे हे त्यांच्या राहत्या घरापासून त्यांचा प्लॉट ४-५ किलोमीटरवर असतानाही वर्षानुवर्ष प्लॉवर येऊन बघत नसे.मात्र,माझे घर बांधल्यानंतर रानडे यांनी आरोप केला.माझ्या घराचे मोजमाप मागून बरोबर आहे पण,पुढील भागात मी दोन फूट जागा त्यांची घेतली,असा आरोप त्यांनी केला.वास्तवतेत रानडे यांनीच आता त्यांच्या शेजारील प्लॉट मधून दोन फूट जागा दुस-याची घेतली आहे! बिल्डर पुरुषोत्तम खराबे यांनी १३ बाय ४० चौ.फू.प्लॉट मला लिहून दिले असताना तसेच या प्लॉटवर बांधकाम होत असताना स्वत: ते हजर होते.रानडे आणि भोंगाडे यांना प्लॉट विकणारा एकच व्यक्ती आहे तरी देखील रानडे यांनी खोटी तक्रार भोंगाडे यांच्याविरोधात दाखल केली.सुनावणीच्या वेळी कोर्टमध्ये एकनाथ रानडे यांनी कबूल केले की मी भोंगाडे यांना कधीच भेटलो नाही,पहील्यांदा कोर्टमध्येच भेटलो,मग मी जीवे मारण्याची धमकी कधी दिली?आज त्याच केसच्या तारखेवर मला जावे लागत आहे.रानडे यांच्या घराचा खसरा क्र.१५७/२ असून भोंगाडे यांच्या घराचा खसरा क्र.१५७/३ आहे.मालमत्तेची मोजमाप हे कधीही कोप-याकडून होते.मात्र,सगळे माझ्या प्लॉटकडून मोजमाप करतात,असे भोंगाडे सांगतात.

(छायाचित्र : हीच ती प्लॉट क्र.६५ वरील पाण्याची टाकी.रस्त्याच्या त्या बाजूला प्लॉट क्र.६६ वर भोंगाडे दाम्पत्यानी बांधलेले घर)

महत्वाचे म्हणजे रानडे यांच्या जवळील ले-आऊट नकाशामध्ये भोंगाडे यांच्या जागेवर प्लॉट नसल्याने, भोंगाडे यांनी ही जागा अतिक्रमण करुन ताब्यात घेतली असल्याचा आरोप रानडे यांनी केला.भोंगाडे यांनी रानडे यांना स्वत:जवळील नकाशा दाखवला तसेच रजिस्टर नकाशा,ग्राम पंचायत,भू-मापन,सिटी सर्व्हेचा शिक्का या सर्व बाबी दाखवून सुटलेल्या सर्व जागेचा अधिकार सोसायटीचा असतो,सोसायटीने तो मला विकला असल्याचे सांगितले.ताबा पत्र ही दाखवले.मात्र,रानडे यांनी आपला दावा कायम ठेवला व भोंगाडे यांच्या प्लॉटला घेऊन दररोजची भांडणे होऊ लागली.हा वाद हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातही पोहोचला.रानडे यांनी सनी भोंगाडे यांच्या विराेधात जीवानिशी मारण्याची धमकी दिल्याची खोटी तक्रार केली.रानडे यांनी ले-आऊट मालका ऐवजी भोंगाडे यांच्या विरोधात प्लॉट संबधीची केस ठोकली.२०१९ पासून सनी भोंगाडे हे आपल्याच हक्काच्या घरात राहण्यासाठी कोर्टाच्या तारखेवर हजर होत असतात!

भारती हाऊसिंग एजन्सीचे मालक पुरुषोत्तम खराबे हे जिवंत असते तर भोंगाडे यांच्यावरील दूर्देवाचे हे फेरे कदाचित टळले असते मात्र पुरुषोत्तम खराबे यांचे २०१५ मध्येच भोंगाडे यांच्यासोबत प्लॉटचा व्यवहार झाल्यानंतर त्याच वर्षी निधन झाले.परिणामी,भोंगाडे हे आपल्या हक्काच्या प्लॉटच्या रजिस्ट्रीसाठी मुंगले यांच्यावर निर्भर झाले.गेल्या ९ वर्षांपासून ९६० चौ.फूटांच्या प्लॉटचे संपूर्ण पैसे देऊन सुद्धा मुंगले हे भोंगाडे यांना प्लॉटची रजिस्ट्री करुन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

(छायाचित्र : प्लॉटचे मूळ मालकांपैकी एक भागीदार असणारे पुरुषोत्तम खराबे यांचं मृत्यू पत्र)

भोंगाडे यांच्या रजिस्ट्री झालेल्या प्लॉट क्र.६५ सह बेसा ग्राम पंचायतीने ४,८०० चाै.फूटांच्या जागेवर १० हजार लिटरची पाण्याची टाकी बांधली नसती तर,आज भोंगाडे दाम्पत्य सुखनैव आपल्या घरात राहत असते.मात्र,असे घडले नाही.त्या प्लॉटच्या मोबदल्यात जो प्लॉट क्र.६६ त्यांना मिळाला,ती वास्तूच त्यांना लाभी पडली नाही कारण,पुरुषोत्तम खराबे यांच्या निधनानंतर त्यांचा मुनीम बोरकर,ज्यांना संपूर्ण व्यवहार माहिती होता त्यांनी देखील खोटेपणा करीत ,दिवंगत खराबे यांच्या पत्नीला भोंगाडे यांना मिळालेली वाढीव जागा ५ लाखात विकण्याचा सल्ला दिला.५ लाखांची रक्कम मिळत असल्याने खराबे यांची पत्नी व मुलगी हे प्लॉटवर आले व  भोंगाडे यांचे सामान बाहेर फेकू लागले.भोंगाडे यांच्या प्लॉटला लागूनच जुमडे यांचे घर आहे.त्यांना त्यांची चार चाकी ठेवण्यासाठी भोंगाडे यांच्या प्लॉटचा हा अर्धा मोकळा भाग पाहिजे असल्याने त्यांनी देखील खराबे यांच्या पत्नी व मुलीचा साथ दिला व भांडण उकरुन काढले.

याच भांडणात खराबे यांच्या मुलीने भोंगाडे यांच्या जातीला घेऊन अवमानकारक भाषा वापरली.माझे वडील कधीही तुमच्या जातीच्या लोकांना प्लॉट विकत नव्हते,असे देखील ती म्हणाली.परिणामी, घरातील सामान फेकणे या गुन्हासाठी कलम ५०६ ची तक्रार भोंगाडे यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात नोंदवली.मात्र,अट्रासिटीचा गुन्हा त्यांनी नोंदवला नाही.खराबे यांच्या मुलीने पोलिस ठाण्यात कबूल केले,तिच्याकडून जातीवाचक शिवीगाळ झाली आहे मात्र,तिचा पती दिव्यांग असल्याने व वडीलांचे निधन झाले असल्याने तसेच त्या मुलीला एक वर्षाचेच बाळ असल्याने ,माणूसकीच्या भावनेतून सनी भोंगाडे यांनी अट्रासिटीचा गुन्हा दाखल केला नाही.शुभांगी देशमुख या पीआय होत्या.त्यांनी देखील भोंगाडे यांना विचारणा केली होती,खराबे यांच्या मुलीच्या कबुलीजबाबानंतर अट्रासिटीचा गुन्हा लागू होतो,मात्र,भोंगाडे यांनी नकार दिला.

 एकीकडे पत्रकार सनी भोंगाडे हे माणूसकी जपत असताना भोंगाडे यांच्याच प्लॉटच्या बाजूला राहणारे जुमडे यांचा वारंवार पोलिस शिपाई किशोर शिरड यांना फोन जात असतो. इतकंच नव्हे तर परिसरातील लोकांनी मिळून वारंवार भू-मापन विभागाला देण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत ,या विभागाच्या दोन महिला कर्मचारी वारंवार भोंगाडे यांच्या प्लॉटचे मोजमाप करण्यात तत्परता दाखवित असल्याची वेदना भोंगाडे व्यक्त करतात. पंचायतीचे लोक धनदांडग्यांच्या तक्रारीवर सकाळी ८ वा.भोंगाडे यांचा प्लॉटचे मोजमाप करायला येतात.फक्त ९६० चौ.फू.ची जागा मोजायला ते दूपारचे २ वाजवतात!
‘सत्ताधीश’ने ऑन द स्पॉट जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली.भोंगाडे यांनी मागील बाजूला रिकामा ठेवलेल्या ५०० चौ.फूटांच्या जागेवर जुमडे यांनी परिसरातील इतरांना हाताशी धरुन मंदिर उभारण्याचा घाट रचला.यासाठी देवांच्या मूर्त्या देखील आणून ठेवण्यात आल्या.मंदिरासाठी पाच लाख रुपये खर्च करण्याची वल्गना केली.याच जुमडे यांचे प्रशस्त घर बांधत असताना त्यांना भोंगाडे यांनी त्यांचा हा मागील बाजूचा रिकामा प्लॉट झोपडे बांधून राहण्यासाठी दिला होता व आपला शेजारधर्म पाळला होता.यानंतर जुमडे यांची नीयत बदलली,परिणामी डीसीपी अक्षय शिंदे यांनी मध्यस्थी करुन जुमडे यांना झोपडे काढायला लावले.यानंतर जुमडे यांनी मूर्त्या आणून ठेवल्या,असे भोंगाडे सांगतात.

(छायाचित्र : स्वतचं प्रशस्त घर,तरी देखील भोंगाडे यांच्या घराच्या मागील बाजूस अर्ध्या रिकाम्या प्लॉटवर नजर,ते ही स्वत:ची चार चाकी ठेवण्यासाठी!माणसाची दानत ही श्‍मशानभूमीतील अवघ्या काही फूटांवरील जागेवर हक्क दाखवण्याची देखील नाही तरी देखील अश्‍या लोभाला काय म्हणावे?)

 आता,भोंगाडे यांच्या या अर्ध्या रिकाम्या प्लॉटवर डोळा ठेऊन,आजूबाजूचे शेजारी दररोज भांडणे उकरुन काढतात.शेजारचे नाखले आडनावाचे गृहस्थ तर ‘ये जगह तेरी नही,तुझे हम यहा घर नही बनाने देंगे’अशी उघड धमकी देतात,असा आरोप भोंगाडे यांनी केला.नगर पचांयतचे कर्मचारी हे मला सांगतात त्यांच्या अधिका-यांनीच सांगितले आहे की माझे घर पाडा, बादल नंदनवार हे नगर पंचायतचे प्रशासक असून त्यांना भेटायला गेलो असता व याबाबत विचारणा केली असता,तुमची बाजू क्लिअर आहे.प्रशासक कारवाई पूर्वी ज्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यांना बोलावत असतो,आधी नोटीस ही दिली जाते आणि मी माझ्या कोणत्याही कर्मचा-यांना तुमचे घर पाडा असे आदेश दिले नसल्याचे नंदनवार यांनी भोंगाडे यांना सांगितले.
थोडक्यात,ले-आऊट एकच,प्लॉटचे मात्र २ तुकडे झाले कारण मधून रस्ता गेला.रस्त्याच्या या बाजूला पाण्याची टाकी बनली तर रस्त्याच्या दूस-या भागाला भोंगाडे यांचे विद्यमान घर आहे.
त्याला घर देखील म्हणता येणार नाही कारण,या संपूर्ण कोर्ट कचेरीमुळे कोर्टाने बांधकामावर स्थगिती दिली आहे.परिणामी,भोंगाडे यांच्या घरात कोणतंही सामान ठेवण्यासाठी एक ही कपाट नाही,ना स्वयंपाक घर आहे.फक्त एकच हॉल असून संपूर्ण सामान त्या हॉलमध्ये पसरले आहे.हॉललाच लागून शौचालय व स्नानघर आहे.स्वयंपाक देखील गोडाऊन सारखे झालेल्या घरात खाली बसून करावा लागतो.अश्‍या या अर्धवट घरात श्रेया व सनी भोंगाडे हे पत्रकार दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून आपलं आयुष्य कंठत आहेत.
महत्वाचे म्हणजे संपूर्ण भागाला पाणी पुरवठा करणारी नगर पंचायतची पाण्याची टाकी ही ज्या प्लॉट क्र.६५ या जागेसह बांधण्यात आली त्या जागेचा कर अद्यापही भोंगाडे यांना भरावा लागत आहे.१०४० रुपयांची पाण्याच्या कराची पावती ग्राम पंचायत बेसा,पिपळा नावाने भोंगाडे यांनी दाखवली.यासोबतच ज्या प्लॉटवर त्यांचे घरच उभारलेच गेले नाही, त्या घरावरील कर आकारणी देखील ते २०१५ पासून नियमित भरत आहेत!
जिल्हा सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राजेश बागडे हेच बिल्डर दिपक मुंगले यांचे संपूर्ण केसेस बघत असून, भोंगाडे यांनी अनेकदा ॲड.बागडे यांना त्यांच्या प्लॉटची रजिस्ट्री करुन देण्यास, मुंगले यांना सांगण्यासाठी ॲड.बागडे यांना अनेकदा विनंती केली मात्र,ॲड.बागडे हे देखील सातत्याने टाळाटाळ करीत असल्याची खंत भोंगाडे व्यक्त करतात.जे ॲड.बागडे पूर्वी सहज उपलब्ध होत होते ते आता बार असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यावर पाच-पाच तास बाहेर बसवून ठेवतात,अशी खंत देखील ते व्यक्त करतात.बिल्डर मुंगले असो किवा ॲड.बागडे,यांची फार मोठी स्वत:ची आलिशान आणि प्रशस्त घरे आहेत,यांना आमच्या उधवस्त घराची आणि आयुष्याची वेदना का कळत नाही?असा आर्त प्रश्‍न ते करतात.
‘सत्ताधीश’ने बिल्डर दिपक मुंगले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कॉल रिसिव्ह झाले नाहीत.
(संपर्क क्रमांक- सनी भोंगाडे- ८२७५७७६५८८)
………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या