नागपूर,ता.२३ जून २०२४: गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या विषयी बदनामीकारक वृत्त डिजिटल माध्यमांवर विशेषत:यूट्यूबवर व्हायरल होत आहे, मी याकडे दूर्लक्ष केल्यानंतर नुकतेच आणखी जास्त बदनामी करण्याची धमकी देत एक कोटीची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज ताजाबाद कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ताजाबादच ट्रस्टचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योजक प्यारे खान यांनी दिली.मला फोन करणा-याचे नाव इमरान मेहबूब खान ट्रू कॉलरवर उमटले.हा मोहम्मद वसीमचा स्वीय सहायक आहे. वसीम हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कार्यकर्ता आहे. पटोले यांनीच मो. वसीम याला पक्षात आणले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्यारे खान यांना फाेन करुन खंडणी मागणारा यूट्यूबर्स मोहम्मद शाकीर रझा हा असून त्याच्याद्वारे
गेल्या अनेक दिवसांपासून ताजाबाद ट्रस्ट विषयी बदनामीकारक व्हिडीयोज यूट्यूबवर व्हायरल केले जात आहे.त्यांनी अगदी चप्पल स्टॅण्ड पासून तर पार्किंगस्थळापर्यंतचे व्हिडीयोज चुकीची माहिती देत व्हायरल केले.ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करण्यात आले मात्र,ट्रस्टचा संपूर्ण कारभार पारदर्शक असल्याने अश्या कोणत्याही वृत्ताला मी महत्व दिले नाही,असे प्यारे खान सांगतात.माझ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मला फोन करुन तडजोडीची भाषा वापरण्यात आली.आम्ही फक्त दोन व्हिडीयोज व्हायरल केले आहे असे आमच्याकडे पाच व्हिडीयोज संपूर्ण पुराव्यानिशी व कागदपत्रांसह आणखी आहेत,ते आम्ही व्हायरल करु इच्छित नाही,एक कोटीपेक्षा जास्त खंडणी दिल्यास ट्रस्टची बदनामी थांबवू,असे फोन करणा-या शाकीर रझा यांनी मला मागणी केल्याचे प्यारे खान सांगतात.
यावर पराकाष्ठा म्हणजे प्यारे खानने फार मोठा हज घोटाळा केला असल्याचा आरोप खंडणीबाजांनी केला.हज सोबत माझा कोणताही संबंध नसताना मी घोटाळा कसा करणार?असा सवाल त्यांनी केला.त्याकडेही मी दूर्लक्ष केलं.ताजाबादमधील माझ्या कामाविषयी नागपूरात सर्वच धर्मियांना माहिती असल्याचे ते म्हणाले.खंडणी मागणा-याने सुरवातीला मला अनेक मॅसेज पाठवले.नंतर मला कॉल केला.त्याचा मिसकॉल बघून मी त्याला कॉल केला.त्याला नेमके माझ्याकडून काय हवे आहे?अशी विचारणा केली.यावर तुम्ही एक खूप चांगले व्यक्ती आहात अशी त्याने माझी स्तुती केली.पण,आम्ही पंधरा लोक असून यात अनेक मोठी माणसे देखील जुळलेली असल्याचे त्याने सांगितले. यात नामांकित वकील आणि न्यायाधीशांचे देखील नाव त्याने घेतले.तुम्ही कितीही पोलिसात तक्रारी केल्या तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही कारण आमच्याकडे सगळे पुरावे असल्याचा दम खंडणीबाजाने प्यारे खान यांना दिला.माझ्याशी नेमके तुम्हाला काय काम आहे?अशी विचारणा केली असता,तो म्हणाला की १२० दिवसांनंतर निवडणूका आहेत.तुमच्या बदनामीचे आम्ही सहा व्हिडीयोज बनवले आहे.दोन व्हायरल झाले आहे, जर आम्हाला एक कोटी रुपये दिले तर आणखी चार व्हीडीयोज व्हायरल होणार नाही,असे त्या खंडणीबहाद्दरने प्यारे खान यांना सांगितले.
यावर मी त्याला सांगितले की मी कोणतेही चुकीचे काम करतच नाही तर तुम्ही माझी बदनामी का करता?मी चुकीचे काही केले असेल तर पोलिसात जा,कोर्टात जा,पुरावे सादर करा.मी काहीही चुकीचे केले हे सिद्ध झाल्यास मी एका क्षणात राजीनामा देईल,अन्यथा माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चला.जोपर्यंत त्याने बदनामीकारण व्हिडीयोज व्हायरल केले मी गप्प होतो.मात्र,त्याने एक कोटीची खंडणी मागताच मी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांना जाऊन भेटलो.त्यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिका-यांना माझी तक्रार घेण्याची सूचना केली.पोलिस आयुक्तांच्या कक्षात जेव्हा गुन्हे शाखेचे अधिकारी माझ्याशी बोलत होते त्याच वेळी त्या खंडणीबहाद्दरचा कॉल मला आला व पोलिसांच्या सूचनेनुसार मी तो रेकॉर्ड केला.त्या रेकॉर्डमध्ये शाकीर रझा याने मोहम्मद वसीम आणि पंधरा लोक असल्याचे सांगितले.अनेक मोठी नावे त्याने घेतली जी रेकॉर्डमध्ये आहे,मी त्यांची नावे घेऊ इच्छित नाही,असे प्यारे खान म्हणाले.
पत्रकारिता ही समाजाचा आरसा असतो.त्याचा गैरवापर करुन बदनामीची भीती दाखवून खंडणी मागितली जाणे हे योग्य नसल्याची खंत प्यारे खान यांनी व्यक्त केली.
माझ्याविषयी भ्रष्टाचारी म्हणून बदनामीकारक व्हिडीयोज व्हायरल करण्यात आले मात्र,यात सत्यता नाही.मी वर्षाला ४० कोटींचा जीएसटी भरतो.मी वार्षिक १७ कोटींचा प्राप्ती कर भरला असून इतर करांच्या रुपात १८ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे.याचा संपूर्ण तपशील शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.२० कोटींच्या जवळपास मी टीसीएस आणि टीडीएस भरले आहे त्यामुळे ताजाबाज परिसरातील पार्किंग किवा चप्पल स्टॅण्डवरुन मी ५० हजार रुपये कमावले,असे वृत्त हास्यासपद असल्याचे प्यारे खान म्हणाले.
मोहम्मद वसीम हा तोच आहे का ज्याने नुकतेच पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन एका लोकप्रिय दैनिकाविरुद्ध हिंदू-मुस्लिम मतमोजणीच्या संदर्भात आगपाखड केली होती तसेच तुमच्यावर काही गंभीर आरोप केले होते?असा प्रश्न केला असता प्यारे खान यांनी हो,असे उत्तर दिले.कोणी तुमचे बदनामीकारक व्हिडीयोज व्हायरल केले?असा प्रश्न केला असता,साजिद हसन असे उत्तर प्यारे खान यांनी दिले.
ताजाबादमधील दानपेटीतून रक्कम चोरीचे आरोप व्हिडीयोजमध्ये लावण्यात आले आहे,याविषयी छेडले असता,मागील चाळीस वर्षांपासून ज्या दोन-चार लोकांची ट्रस्टवर अबाधित सत्ता होती त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टच्या खात्यात सतत तोटा दिसत होता.मी ट्रस्टचा अध्यक्ष झाल्यावर तीन वर्षातच ट्रस्टला नफ्यात आणले.२६ कोटींचा नफा ट्रस्टला झाला असून आज ही ट्रस्टकडे १४ ते १५ कोटी जमा आहेत.लवकरच ५ कोटी ट्रस्टकडे आणखी जमा होणार आहे.भ्रष्टाचार केला असता तर ट्रस्ट नफ्यात कशी राहीली असती?असा सवाल त्यांनी केला.ताजाबाद परिसरातील इलेक्ट्रोनिक बोर्डवर सगळा तपशील दाखवला जातो त्यामुळे काही विघ्नसंतोषी लोकांना तो हिशेब माहिती पडतो ज्याचा फायदा ते उचलण्याचा प्रयत्न करतात,असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर जो कार्यक्रम ती ताजाबाद परिसरात घेतला त्याचे ७५ लाख रुपये मी वैयक्तिकरित्या दिले.ट्रस्टचा एक पैसा ही त्यावर खर्च करण्यात आला नाही.एक कप चहाचा देखील पैसा ट्रस्टकडून खर्च झाला नाही,असा दावा त्यांनी केला.तुम्ही भाजपच्या पक्षाशी जुळलेले आहात त्यामुळे विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या नेत्यांची शह आहे का अश्या स्वरुपाच्या बदनामी मागे असं तुम्हाला वाटतं का?असा सवाल केला असता,मी कोणत्याही पक्षाशी जुळलेला नाही.कोणत्याही राजकीय पक्षाचा मी सदस्य देखील नसल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.पण,मला गडकरी आणि फडणवीस यांचे विचार आवडतात त्यामुळे माझा संबध भाजपशी जोडला जातो.माझ्या बदनामीच्या मागे नेमके कोण आहेत?हे तपासण्याचे काम पोलिसांचे आहे.
मात्र,शब्बीर विद्रोही सारख्या मोठ्या नावांचा उपयोग व्हिडीयोज बनवण्यासाठी माझ्या विरोधात केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.जाफर नगरचे काँग्रेसचे ओवेस कादरी यांनी देखील बदनामीकारक वृत्त पसरवले.ताजाबाद परिसरात रुग्णालय सुरु असताना व पाच हजार रुग्णांचा उपचार नि:शुल्क सुरु असताना,दररोज सकाळी २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात,हे वास्तव असताना काँग्रेसचे कादरी दावा करतात की ताजाबादचे रुग्णालय सुरुच नाही,पत्रकारांनीच त्या रुग्णालयाचे व्हिडीयो काढावे व त्यांना पाठवावे,असे आवाहन प्यारे खान यांनी केले.
आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्याविषयी चुकीचे व बदनामीकारक व्हिडीयोज व्हायरल केले त्यांच्या विरोधात मी २०-२० कोटींचा मानहानिचा दावा ठोकणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
ट्रस्टची मुदत संपली असताना कार्यकाळ वाढून मिळाला नसताना अध्यक्ष व विश्वसतांनी आपले पद सोडले नाही,असा आरोप केला जात आहे,याविषयी विचारले असताना आम्हाला धर्मादाय आयुक्तांकडून आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळाला असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.२०२६ पर्यंत मी ट्रस्टच्या अध्यक्षपदी राहू शकणार आहे,असे ते म्हणाले.याबाबतची कागदपत्रे कोणीही माझ्याकडे येऊन तपासून बघू शकता,असा दावा त्यांनी केला.मुदत संपल्यानंतरही मी ताजाबाद ट्रस्टवर अवैध कब्जा करुन बसलो आहे किवा ट्रस्ट माझ्या हातातून निसटत आहे,अशी यूट्यूबर्स खंडणीबाज करीत असलेली वलग्ना ही धाद्यांत खोटी असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने मो.वसीम याला ट्रस्टचा अध्यक्ष बनवण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा आहे,यात कितपत सत्यता आहे?असा प्रश्न केला असता,हे हजरत बाबा ताजुद्दीन आहेत,ते ज्याला बोलावतील तेच या ठिकाणी,या पदावर येऊ शकतात,कोणी कितीही मोठा नेता,मुख्यमंत्री किवा पंतप्रधानांनी जरी ठरवले तरी जोपर्यंत बाबा ताजुद्दीन यांची मर्जी होत नाही तोपर्यंत या पदावर कोणाचीही वर्णी लागू शकत नाही.बाबा ताजुद्दीन ठरवतात,कोणी या पदावर बसावे आणि कोणी पायउतार व्हावे,असे उत्तर त्यांनी दिले.
याप्रसंगी त्यांनी खंडणी मागणा-या तोतया पत्रकारासोबतच्या रेकॉर्डींग्स देखील पत्रकारांना माईक लावून ऐकवल्या.पत्रकार परिषदेला ताजाबाद ट्रस्टचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते.