आरोपी मालूचा अटक पूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
मालूला घटनास्थळावरुन फरार करणा-या पीएसआयवर काय कारवाई केली?
यंत्रणा धनदांडग्यांना वाचवण्यासाठी की सर्वसामान्यांच्या न्यायासाठी?नागपूरकरांमध्ये तीव्र संताप
नागपूर,ता.२८ मे २०२४ : रामझुला रेल्वे ओव्हर ब्रीजवरील मर्सडिज कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितू मालूचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मंगळवार रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला,परिणामी आरोपी रितू मालूला त्वरित अटक करुन कारागृहात डांबावे अशी मागणी मृतक मोहम्मद हुसैन व मोहम्मद अतिफ यांच्या परिजनांनी केली.या पूर्वी सत्र न्यायालयाने आरोपी रितू मालूला अंतरिम जामीन दिला होता, पोलिसांनी पुर्ननिरीक्षण याचिका दाखल करुन रितू मालूच्या जामीनाला विरोध केल्यानंतर सत्र न्यायालयाने रितू मालूचा अंतरिम जामीन रद्द केला.या आदेशाला नागपूर खंडपीठाकडून स्थगिती मिळविण्याचा उद्देश आरोपींचा होता असा दावा पिडीतांनी केला असून,या प्रकरणावर स्थगिती मिळाल्यास आरोपींना प्रदीर्घ काळ मोकाट राहता आले असते मात्र,नागपूर खंडपीठाने रितू मालूचा अटकपूर्व जामीन फेटाळ्याने आरोपीचे मनसुबे कामयाब होऊ शकले नाही,असा दावा पिडीतांच्या परिजनांनी केला.
महत्वाचे म्हणजे, रामझुला पुलावर ही घटना २४ फेब्रुवरी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मृतकांचे घर हाकेच्या अंतरावर असतानाच मद्यधुंध रितिका मालू व माधुरी सारडा यांच्या मर्सिडिज कारने दुचाकीवर असणारे ३२ वर्षीय मोहम्मद अतिफ आणि ३४ वर्षीय मोहम्मद हुसैन यांना जोरदार धडक दिली.या भीषण दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा करुण अंत झाला.अद्याप ही मृतकाची जन्मदात्री,रितू मालूला अटक झाली का?सतत हा प्रश्न विचारुन मृतकाच्या वडीलांना भांबावून सोडत असल्याची वेदना, स्वत: मृतकाच्या वडीलांनी पत्रकार परिषदेत मांडली होती!
पुण्यात दोन तरुण अभियंतांचा जीव घेणा-या अल्पवयीन नशेबाज आरोपीला अटक होऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले ,त्याच्या उद्योगपती वडीलांना व ७७ वर्षीय आजोबांनाही न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात डांबण्यात आले मात्र,२४ फेब्रुवरीच्या घटनेनंतर आज २८ मे उजाडले तरी नागपूरातील आरोपींना अटकेपासून सूट मिळण्यास नागपूरात जणू, संपूर्ण शासकीय यंत्रणाच कामाला लागली आहे,असा गंभीर आरोप मृतकांचे परिजन करतात.महत्वाचे म्हणजे ही दुर्घटना घडल्यानंतर आरोपी महिलांना तहसील पोलिस ठाण्यातील पीएसआयने पतीच्या कारमध्ये फरार होण्यास मदत केली,असा आरोप प्रत्यक्षदर्शींनीच केला आहे.
(छायाचित्र : हेच ते ‘कर्तव्यदक्ष पीएसआय,दुर्घटनास्थळ आणि आरोपी महिला)
सुरवातीला तसहील पोलिसांनी भारतीय दंड संहिता(आयपीसी)ची ३०४(अ)ही जामीनपात्र कलम लावली होती मात्र,नंतर ते हत्येचे प्रमाण नसलेल्या दोषी हत्याकांडासाठी, अजामीनपात्र कलम ३०४ आयपीसीमध्ये बदलले.३०४ कलम दाखल करण्यासाठी तहसील पोलिसांना ४८ तासांचा वेळ जाऊ द्यावा लागला!परिणामी,आता या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास धनदांडग्या दोन्ही महिला आरोपींना उर्वरित आयुष्य हे कारागृहात काढवी लागणार असून,नागपूरकरांना न्यायदेवतेकडून याच न्यायाची अपेक्षा आहे.
आयुष्यभर तरुण मुलांच्या मृत्यूची वेदना ही कारागृहातील कष्टप्रद जीवनापेक्षा फार-फार जीवघेणी असते हे दूर्घटनेला सर्वस्वी कारणीभूत असणा-या रितू मालूला कळले नसावे ज्यावेळी तिच्या रक्तात मद्य होते!,रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी(आरएफएसएल)च्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात रितीका मालूच्या शरीरात दुर्घटनेच्या वेळी मद्य असल्याचे उघड झाले आहे.असे असताना आज एका राष्ट्रीय वृत्त वाहीनीवर नागपूरातील या घटनेविषयी डिबेटमध्ये सहभागी असलेले आरोपी रितीका मालू यांचे वकील प्रकाश जायस्वाल यांनी मालू यांनी मद्य प्राशन केले नव्हते असा बचाव केला.यावर त्या वृत्त वाहीनीच्या संपादकांनी ,नागपूरातील दुर्घटना ही खोटी आहे,त्यात दोन तरुणांचे मृत्यू हे देखील खोटे आहे,मृतकांच्या पालकांची आयुष्यभराची वेदना ही पण खोटी आहे फक्त तुम्ही बोलता ते ‘सत्य’आहे,अशी उपरोधिक टिका केली!
महत्वाचे म्हणजे रितू मालू सारख्या आरोपी महिलेला अटक करने पोलिसांसाठी सहज शक्य असतानाही आरोपी महिलेला अटक होत नाही,यावर संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरातच कायदा आणि पळवाटेचा खेळ खेळला जात आहे! एखादा आरोपी हा पोलिसांच्या ‘पहोच के बाहर’कसा काय असू शकतो?असा प्रश्न सुरवातीपासून पिडीतांची लढाई चिवटपणे लढणारे झिशान सिद्धीकी करतात.आशिया खंडात महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचा क्रमांक पहील्या पाचमध्ये येतो तरी देखील एखाद्या आरोपी महिलेपर्यंत नागपूर पोलिस पहोचू शकत नाही?यावर शेंबडे पोर देखील विश्वास ठेवणार नाही,अशी टिका सिद्धीकी करतात.
पोलिसांची भूमिका या ही घटनेत अतिशय महत्वाची होती.दोन तरुणांचे प्रेत घटनास्थळावर पडले असताना आरोपी महिलांना ज्या शिफातीने तहसील पोलिस ठाण्याच्या पीएसआय यांनी पळवून लावले त्या गुन्हासाठी पीएसआयची तात्काळ बडतर्फी होणे गरजेचे असल्याचे सिद्धीकी सांगतात.आम्ही वारंवार पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांना निवेदन दिले.२४ फेब्रुवरी व मार्चच्या पहील्या आठवड्यात दोन वेळा निवेदन देऊन देखील दोषी पीएसआयवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा संताप ते व्यक्त करतात.दोन तरुणांच्या हत्येसाठी जितक्या दोषी रितिका मालू आणि तिची सहप्रवासी माधुरी सारडा आहे तितकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त दोषी ते पीएसआय आहेत ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला.आरोपींविरोधात जामीनपत्र कलम लावले,ही केस कमजोर करण्याचा प्रयत्न केला.घटनास्थळावरुन आराेपींना पळून जाण्यास मदत केली.हे पोलिसांचे काम आहे का?असा प्रश्न ते करतात.
नागपूरकरांचा तीव्र संताप पाहता पोलिसांनी नंतर आपली भूमिका बदलली.मालूला ताब्यात घेण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयासमोर याचिका दाखल केली.उद्या बुधवार दिनांक २९ मे रोजी यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला जाणार आहे.याशिवाय गुरुवार रोजी पोलिस सत्र न्यायालयात रितिकाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेणार आहे.यावेळी पोलिसांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आरोपी महिलेच्या पोलिस कोठडीची मागणी करावी,अशी पिडीत परिजनांची मागणी आहे.पैशांच्या बळावर धनदांडग्यांची गुन्हापासून सुटका व्हावी यासाठी जणू पुणे काय नागपूर काय,संपूर्ण यंत्रणाच कामाला लागत असते,असा आरोप केला जात आहे.
पुण्यातील दुघर्टनेत दोन तरुण अभियंताचा जीव घेणारा अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात तीन लाख रुपये घेऊन फेरफार करणारे ससून रुग्णालयातील वादग्रस्त डॉ.अजय तावरे व सहयोगी डॉ.श्रीहरी हलनोर,कर्मचारी अतुल घटककांबळे यांना पुणे गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली.आरोपीचे रक्ताचे नमुने घटककांबळे यांनी अक्षरश: कच-यात फेकल्याचे वास्तव समोर आले.
त्या दुर्घटनेचे शिंतोडे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे,टिंगरे यांच्या सिफारशीवरुन आरोपी डॉ.अजय तावरेंची नियुक्ती ससूनमध्ये करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,पुढे अजित पवारांचे फोन,पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या भूमिकेवरही पडलेत.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पुणे दूर्घटना कांड गाजत असून पोलिस विभाग,वैद्यकीय क्षेत्र,राजकारणी,नेते असे अनेक घटक संशयाच्या फे-यात अडकत आहेत.नाना पटोले यांनी तर एक पाऊल पुढे जाऊन अल्पवयीनच्या कारमध्ये एक आमदार पुत्र होता,असा आरोपच केला.श्रीमंतांच्या मुलांसाठी एक कायदा व गरीबांच्या मुलांसाठी एक कायदा,अशी परिस्थिती महाराष्ट्रात सुरु असल्याची टिका केली मात्र,जे पटोले नागपूरात अगदी मध्य भागात रहाटे कॉलनीत राहतात,त्यांनी दहा मिनिटांच्या अंतरावरील रामझुल्यावर २४ फेब्रुवरी रोजी झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूबाबत काय दखल घेतली?असा सवाल आता केला जात आहे.
नागपूर असो किवा पुणे,अपघातात मृत्यूमुखी सर्वसामान्यांची मुलेच पडली.पब आणि पार्ट्यांमधून मद्य तसेच एमडीचे सेवन करणा-यांनी त्यांना धडक देऊन जगातूनच उठवले.मायबाप सरकारनेच रात्री ११ ऐवजी पब व बारची वेळ वाढवून मध्यरात्रीपर्यंत केली.महसूलीच्या लोभापायी सरकारच्या या धोरणाचे सामाजिकस्तरावर काय परिणाम घडेल,याचा विचार करण्याची संवेदनशीलता हल्लीच्या सरकारांमध्ये नाही.
डोक्यात नशेची झिंग घेऊन चारचाक्यांवर हल्ली महाराष्ट्रातील शहरा-शहरात मृत्यू धावताना दिसतोय.नागपूरकर पार भेदरलेले आहेत.एकदा घराबाहेर पडणारा आप्त सुखरुप कुटूंबात परतेल का?या भीतीतच दररोजचं आयुष्य कंठतोय.रामझुला दूर्घटनेतील मृतकाची आई ही तर अजूनही सावरलेली नाही.रितू मालूला अटक झाली का? तिला घटनास्थळावरुन पळवून लावणा-या तहसील पोलिस ठाण्यातील त्या पीएसआयला शिक्षा झाली का?असे आर्त प्रश्न तिचंच काळीज घायाळ करतात.व्यवस्थेला तिच्या उधवस्तेशी काही एक घेणे-देणे नाही.त्यांना हवा तो फक्त पैसा.मृतकांच्या टाळूवरील लोणी ओरबाडून खाणे इतकंच त्यांना कळतं.पुणे आणि नागपूरच्या घटनेने तर हे नग्न सत्य संपूर्ण जगा समोर आणले आहे.
किळस येते नेत्यांची,राजकारण्यांची,शासकीय यंत्रणांची.‘मृत्यू‘सारख्या घटनाही त्यांच्यात संवेदना निर्माण करीत नाही,याला काय म्हणावे?दोषींना शिक्षा करने व पिडीतांना न्याय देणे हे कोणाचे काम आहे?भ्रष्ट यंत्रणांच्या याच भूमिकेमुळे रामझुलाच्या पिडीतांचा न्यायावरील विश्वास ढळत चालला आहे.उद्या सत्र न्यायालयाच्या निकालाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
या जगात सर्वात कठीण असतं ते जीवाला जन्माला घालणं.नऊ महिने आपल्या गर्भात आई ही आपल्या बाळाला घडवत असते.जीवघेण्या प्रसव वेदनेतून सृजनाची निर्मिती करते.अहोरात्र कष्टातून आपल्या बाळाचं संगोपन करते.संस्कार घडवते.हेच बाळ तरुण झाल्यावर जगातील प्रत्येक पालकांना जो आनंद होतो ते शब्दात व्यक्त करता येत नाही.आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून पाल्यांवर त्यांच्या जगण्याची भिस्त असते.मात्र,नशेच्या धुंधीत एखादी रितू मालू किवा एखाद्या अगरवालची चार चाकी कधी त्या सृजनाला दफनभूमीत दफन करतील,मोक्षधामात राखेत परिवर्तित करतील याचा कोणताही नेम राहीला नाही.
त्यामुळेच, हल्ली सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला आहे.मृत्यूचे हे सापळे मायबाप सरकारनेच आता थांबवावे.बार आणि पब्सला मध्यरात्रीपर्यंत देण्यात आलेली परवानगी रद्द करावी.शहरात सहज उपलब्ध होणा-या अम्ली पदार्थाचे कठाेर नियमन करावे,एवढी माफक अपेक्षा व्यक्त करीत ,या दोन्ही दुर्घटनेतील दोषींना इतकी कठोर शिक्षा व्हावी जेणेकरुन ‘पुढच्यास ठेच मागचा सावध’ हा संदेश खासकरुन ‘उच्चभ्रू ’समाजापर्यंत पोहोचेल.१८ जून रोजी रितू मालू प्रकरणी, रिव्हिजन याचिकेवर नागपूर खंडपीठाच्या सुनावणीकडे त्यामुळेच आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
………………………………