सततची मारहाण,जीवे मारण्याचा केला प्रयत्न:हिंगणा पोलिस ठाण्याकडून कारवाई थंड बसत्यात
तीन महिन्याचा बाळाचा झाला गर्भपात:पिडीतेची न्यायाची मागणी
पोलिस आयुक्तांनी कारवाईचे दिले आश्वासन मात्र,आरोपी अद्यापही मोकाट!
भाजपचा वरदहस्त:पिडीतेच्या कुटूंबियांची शंका
नागपूर,ता.३ मे २०२४: भारतातील कोणतेही माय-बाप हे आपली मुली चांगल्यात चांगल्या घरी पडावी,सुखी राहावी याच अपेक्षेने आपल्या काळजाचा तुकडा अगदी परक्या असणा-या कुटूंबात देतात,नागपूरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका छाया भोसकर यांची राजकीय पार्श्वभूमी व संपन्न रुसुख बघून भंडारा जिल्ह्यातील तहसील तुमसर सिलेगाव येथील वैशाली फकिरा शेंद्रे यांचा विवाह तिच्या कुटूंबियांनी मोठ्या थाटात २८ मार्च २०२२ रोजी लाऊन दिला मात्र,नागपूर पोलिस मुख्यालयात अंमलदार पदावर असणा-या वैशालीला लग्नाच्या दोनच महिन्यात दूकानासाठी मालवाहू गाडी घेण्याकरिता सहा लाख रुपयांचे कर्ज घेण्याची मागणी सासरच्यांनी केली.पिडीतेने सांगितले की दोनच महिने लग्नाला झाले असून लग्नाचा सर्व खर्च तिनेच केला आहे तसेच तिची नवीनच बॅच असल्या कारणाने तिला कर्ज मिळू शकत नाही,पुढे नक्की कर्ज घेईल.मात्र,हुंड्याचे लोभी भोसकर कुटूंबियांकडून तिला बेदन मारहाण केली जाऊ लागल्याचा आरोप पिडीतेने आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केला.
पिडीतेने भोसकर कुटूंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले.१४ एप्रिल रोजी सकाळी १० वा.घरचा स्वयंपाक करुन डबा घेऊन पिडीता कर्तव्यावर निघून गेली.रात्री ८ वा.परत आली असता तिची कंबर व पोटात दुखत असल्याने बेडरुममध्ये जाऊन झोपली.यावर रात्री ९ वा.पती अमोल याने तिला स्वयंपाक करण्यास सांगितले मात्र तीन महिन्याची गर्भवती असल्याने पिडीतेला इतके शारीरिक श्रम झेपवले नसल्याने स्वयंपाक करण्यास असमर्थता व्यक्त केली.
यावर पती अमोल याने तिच्या कानावर दोन-तीन थापडा मारल्या,केस धरुन ओढतच देवाच्या खोलीत आणले,खाली पाडून डाव्या कानावर,पाठीवर थापडा व बुक्के मारले,तिचा गळा दाबला !त्या वेळी पतीची मोठी आई शंकुतला भोसकर याने अमोलला,ती दोन जीवाची आहे,तिला कशाला मारतो,असे सांगितले असता,मला काही फरक पडत नाही,ती आज मेली तरी चालते,असे सांगत मोठ्या आईला बाहेर काढले व पिडीतेला ओढतच किचनमध्ये आणून ,तुझा विषयच आज संपवतो,असे सांगून गॅस सुरु करुन काही तरी शोधत असताना,सासू छाया भोसकर व नणद श्वेता भोसकर यांनी,ही फार माजली आहे,हीचा विषयच संपव,असे म्हणत पतीच्या कृत्याला दुजोरा दिला.सासरे यांनी देखील सासू व नणदेच्या म्हणण्याला सहमती दर्शवली.
पती काही तरी शोधत असतानाच त्याच्या हातातून पिडीतेचा हात सुटताच तिने बेडरुमकडे धाव घेतली,नणदेने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिच्यापासून सुटका करीत पिडीतेने बेडरुम मध्ये जाऊन दार लाऊन घेतले व ११२ क्रमांकवर पोलिसांना सूचना दिली.थोड्या वेळाने पोलिस घरी `आल्यावर पिडीता बेडरुमच्या बाहेर निघाली.त्याच वेळी दुसरी विवाहित नणद प्रिया सचिन लोणकर या देखील घरी आल्या व मला पोलिसांसमोरच शिवीगाळ करु लागल्या.पतीने पोलिसांसमोरच पिडीतेवर पुन्हा हात उचलला,असे आरोप याप्रसंगी पिडीतेने केले.
पिडीतेच्या पगाराच्या पैश्यांसाठी तसेच सहा लाख रुपयांसाठी सासू,नणद,विवाहित नणद,पती तसेच सासरे ज्ञानेश्वर यांच्या विरोधात पिडीतेने हिंगणा पोलिस ठाण्यात कलम ४९८(अ)५०४,५०६(२)३२३,३४ आर/डबल्यू ३,अन्वये गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी तसेच एपीआय तेलरांदे यांनी तपासास सुरवात केली.घरुन माझे सामान आणण्यासाठी दोन महिला पोलिस सोबत देण्याची विनंती केली असता, अनीता चव्हाण व वैशाली झाडे यांना सोबत पाठवण्यात आले मात्र,त्या सासरी पोहोचल्याच नाही,उशिरा पोहोचल्या.तोपर्यंत पुन्हा एकदा पिडीतेसोबत सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करुन नातेवाईकांसह तिला घरा बाहेर काढले.पुन्हा ११२ वर कॉल करुन पिडीतेने पोलिसांना बोलावले.दोन्ही महिला पोलिस एखाद्या गुन्हेगारासारखे मला दरडावून पूर्णच सामान घेण्यास सांगत होते.
वारंवार दाट फटकार करीत होत्या.चुटकी वाजवून,लवकर निघ या घरातून म्हणाल्या.त्यातील एक महिला पोलिस नणदेची लहानपणाची मैत्रीण होती व शासकीय कर्तव्य विसरुन गुन्हेगारांना सपोर्ट करीत होती,असा गंभीर आरोप यावेळी पिडीतेने केला!
१४ एप्रिलच्या मारहाणीमुळे गर्भातल्या बाळाला इजा पोहोचली असल्याचा सोनोग्राफी अहवाल आल्याने प्रीती हॉस्पीटलमध्ये २५ एप्रिल रोजी गर्भपात करण्यात आला.आज २० दिवसांचा कालावधी लोटून देखील एका महिला पोलिसांवरच केलेल्या अन्याया विरोधात, पोलिस विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पिडीतेने सांगितले.
पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल यांना देखील भेटून अन्यायाची माहिती दिली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे पिडीतेने सांगितले.
भाजपच्या नगरसेविका असल्याने भाजपच्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आहे का?असा सवाल केला असता,आम्हाला तसा संशय आहे,असे पिडीतेच्या भावाने सांगितले.
थोडक्यात,नोकरीपेशा मुलीच्या पगारावर नजर ठेऊन तिच्याशी विवाह करायचा,यानंतर हुंडयाची मागणी करायची,न दिल्यास गर्भवती असतानासुद्धा रानटीपणाने आपला वांझोटा पुरुषार्थ गाजवून तिच्या असहाय देहाचे,मनाचे ,विश्वासाचे लचके तोडायचे,तिला गर्भातल्या बाळासह लाथेने तुडवायचे,याच विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात हुंडा विरोधी कायद्याचे संरक्षण पिडीत महिलांना मिळाले आहेत मात्र,कायदा कितीही चांगला असला तरी ती राबविणारी यंत्रणा हीच जर भ्रष्ट आणि कमकुवत असली तर काय होतं?याचेच एक ज्वलंत उदाहरण पोलिस अंमलदार वैशाली हीची व्यथा व अवस्था सांगते.महत्वाचे म्हणजे एका महिला पोलिस अंमलदारावरच झालेल्या अन्यायावर राजकीय दबावातून पोलिस विभाग पांघरुन घालण्याचे काम करीत असेल, तर नागपूर शहरातील सर्वसामान्य महिलांनी न्याय कुठे मागावा?हा लाख मोलाचा प्रश्न निर्माण होतो.
त्याहीपेक्षा महत्वाचे फक्त काही लाख रुपयांच्या लोभातून इतक्या पराकोटीच्या क्रोर्याला साथ देणा-या या देखील महिलाच असतात आणि या ही घटनेत ते दिसून पडलं.लग्न करुन
कोणाचा तरी काळजाचा तुकडा घरी आणला,तर तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा,हेच भारतीय संस्कार सांगतात.भाजप ही तर संस्काराची खाणच समजली जाते कारण हिंदूत्व आणि पारंपारिक संस्कार हे एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत.परिणामी,मुलगा आणि सुनेचे वैचारिक मतभेद पराकोटीला गेले असेल, तर कोणतीही मारहाण न करता तिला सुखरुप तिच्या घरी पाठवून देने हीच नीतीमत्ता,नैतिकता नागपूरातील जनतेला, सार्वजनिक जिवनात असणा-या भाजपच्या नगरसेविका यांच्याकडून होती,मात्र,असे घडले नाही.पुन्हा जनतेमध्ये मत मागायला जाताना जनतेची सेवा,प्रभागाचा विकास,नागरिकांच्या समस्यांचे निराकरण इत्यादी-इत्यादी बाबींवर मत मागितले जाईल तेव्हा, स्वत:च्या घरातील लक्ष्मीचेच पार्थिव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी १४ अप्रेल रोजी त्या काढायला निघाल्या होत्या,याचा देखील हिशेब त्यांच्या प्रभागातील मतदारांनी घ्यावा,अशीच जणू पिडीतेची मागणी आहे.
पोलिसात तक्रार नोंदवल्याने पिडीतेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सांगून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी पिडीतेने केली आहे.
………………………………………………………………
(तळटिप: ‘सत्ताधीश‘लकवरच नव्या स्वरुपात वाचकांसमोर येणार असून,वेबसाईटच्या नव्या स्वरुपावरील कामामुळे पुढील आठवड्यात सात दिवसांसाठी वाचकांसाठी उपलब्ध होणार नाही,कृपया वाचकांनी दखल घ्यावी)