१०० नंबरवर डायल करणा-या फिर्यादीलाच केले आरोपी!
१२०० रुपयांची टॉय गन पोलिसांच्या एफआयआरमध्ये झाली ५ हजार रुपयांची!
एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे लिखित दिले मात्र,‘वरुन’आदेशाच्या नावावर सीताबर्डी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
अवघ्या २१ वर्षीय अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या भावाचे भविष्य टांगणीवर
नागपूर,ता.१ एप्रिल २०२४: पोलिस ठाणे सीताबर्डीवरुन गेल्या शुक्रवारी एका घटनेवरील प्रेस नोट पत्रकारांच्या ग्रूपवर पाठविण्यात आली त्यात सार्वजनिक ठिकाणी धुमधाम करुन अग्नीशस्त्र बाळगणा-या आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती होती.दुस-या दिवशी या प्रेस नोटच्या आधारावर वृत्तपत्रात बातमी देखील प्रसिद्ध झाली मात्र,या घटनेत वापरण्यात आलेली बंदूक ही ‘टॉय गन‘ होती व दोन प्रेमवीरांच्या कुटूंबातील आपापसातील वादात कारमधील डॅशबोर्डवर, जंगली जनावरांना भीती दाखवण्यासाठी ठेवण्यात आलेली ती अवघ्या १२०० रुपयांची बंदूक हातात घेऊन, घटनेच्या वेळी वरच्या दिशेने फायर केले असता,गैरसमजूतीतून १०० क्रमांकावर ,या घटनेतील प्रियकराच्या मित्राने डायल केले असता,पोलिस खरे टाऊन धरमपेठ येथील वेलनेस फॉरेव्हर मेडीकल येथे पोहाचले असता आपापसातील हे भांडण ‘प्रेम’या पातळीवरील असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेतील अवघी वीस वर्षीय एक आरोपी,हिचे प्रेम एका मुस्लिम युवकावर जडले.दोघांनीही लग्नाच्या आनाभाका रंगवल्या.दीड-दोन वर्ष ते नात्यात राहीले मात्र,यानंतर युवकाने माझ्या धर्मात तुझा स्वीकार नाही होऊ शकणार,असे सांगून लग्नास नकार दिला.मुलीचे अति उच्चभ्रू असलेल्या पालकांनी तिचे हे प्रेमसंबंध स्वीकारले होते व जात-धर्माच्या पलीकडे आपली मुलगी ही जर आनंदात राहत असेल तर तिचे लग्न लाऊन देण्यास ही तयार होते.परंतु मुलाने लग्नास नकार दिला.यामुळे मुलीला त्या नात्यातून काढण्यासाठी तिच्या पालकांनी पत्रकारितेचा कोर्स शिकण्यासाठी तिला लंदनला पाठवले.
या होळीत मात्र तिने पालकांना फोनवरुन कळवले की तिला होळीत घरी यायचे आहे त्यामुळे तिच्या पालकांनी तिला घरी येण्याची परवानगी दिली.नागपूरात आल्यानंतर या प्रेमी युगलांनी परत एकमेकांची भेट घेऊन,मुंबईत जाऊन निकाह करण्याचे अभिवचन एकमेकांना दिले व दुस-या दिवशी घरुन पलायन करण्याचे ठरवले.या संपूर्ण संभाषणाच्या वेळी या प्रेयसीची मैत्रीण ही सोबत होती.प्रेयसी ही दुस-या दिवशी मुंबईला पळून गेल्यास पोलिस चौकशीत तिच्यावर बाळंट येईल या भितीने या मैत्रीणी प्रेयसीच्या भावाला कॉल करुन तिच्या पलायनाच्या प्लॅन विषयी कळवले.
रात्री दीड वाजता घटनास्थळी प्रेयसीची आई ,भाऊ,भावाचे मित्र आदी पोहोचले.आईने मुलीला जाब विचारला.घरची आठवणे येते हे कारण सांगून नागपूरला आली आणि पुन्हा प्रियकराला भेटलीस वरुन त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लॅन केलास,यावर मुस्लिम प्रियकराने साफ पलटी खात,मी लग्न करु शकणार नसल्याचे मुलीच्या कुटूंबियांना सांगितले!काही क्षणा पूर्वी जो प्रियकर आयुष्यभर साथ देण्याची गोष्ट करीत होता त्याने पुन्हा पलटी खालली व ज्या विश्वासावर ती लंदन येथून परत आली त्याच विश्वासाचा घात झाल्याने,ती आक्रमक झाली.
तिने प्रियकराचा संपूर्ण चेहरा नोचून काढला,आईने तिला आवरले.प्रियकराचा भाऊ,वडील,मित्र यांनीही मध्यस्थी केली.मात्र,वाद वाढत गेल्याने कारमधील डॅश बोर्डवरील टॉय गन घेऊन फायर करण्यात आला.प्रियकराच्या मित्राला ती खरी बंदूक वाटल्याने तो घाबरला आणि त्याने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली.पॉश लोकेशन असणा-या घटनास्थळी फायरिंगची घटना घडली असल्याचे नियंत्रण कक्षाने त्वरित सीताबर्डी पोलिसांना कळवले.हीच माहिती पोलिस आयुक्तांपर्यंतही त्वरित पोहोचली.आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन तपास करण्याची सूचना केली.पोलिसांनाही घटनास्थळावरील ती टॉय बंदूक बघितल्यावर हसावे की रडावे,काही सूचले नसावे.त्या बंदूकीतून जनावरांना घाबरवण्यासाठी फक्त मोठा आवाज होतो,कोणालाही इजा होत नाही कारण त्यात छर्रे वगैरे काहीही नसतात.
हे प्रकरण प्रेम भंग आणि भांडणाचा असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी सर्वांना सीताबर्डी पोलिसठाण्यात आणले.येथेही त्या दोन्ही प्रेमवीरांमध्ये लग्नाला घेऊन वाद झाला.लग्नच करायचे नव्हते तर का माझ्या मनाचा,देहाचा आणि विश्वासाचा घात केला?याचे उत्तर तिला हवे होते.त्याला विसरण्यासाठी ती हे शहरच नव्हे तर देशच सोडून निघून गेली होती.तरी देखील त्याने पुन्हा तिला लग्नाचे आमिष दाखवून परत नागपूरात बाेलावले.पुन्हा एकदा धोका देत, लग्नाला ठामपणे वारंवार नकार देत असल्याचे बघून ती सैरभैर झाली.वीस वर्ष हे आयुष्याचे गांर्भीर्य तसेही न समजण्याचेच वय असते.या वयात कळतात त्या फक्त भावना,त्या ही फसव्या कश्या असतात हे अनुभवातूनच शिकता येतं.
पोलिस ठाण्यात त्याच्यासोबतच लग्न करण्याची तिची जिद्द बघता प्रियकराने चक्क मोबाईल काढला आणि…तिच्यासारख्याच अतिशय सुंदर तीन इतर मुलींसोबतचे त्यांच्या अंतरंग संबंधांचे छायाचित्र तिला दाखवले!ती कोसळलीच…!मी या सर्वांसोबतच लग्न करु का?हा त्याचा प्रश्न तिला दूसरा मानसिक धक्का देऊन गेला,तुझ्यासारख्या खूप मुलींना मी फिरवतो,संबध जोडतो याचा अर्थ प्रत्येकीशी लग्न करने असा होत नाही,हा जिवनाचा नवाच आणि आधुनिक मूलमंत्र तिला त्या क्षणी कळला आणि क्षणात तो मनातून कायमचा उतरुन गेला.शेवटी जगातील कोणतंही नातं हे प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास यावरच टिकून असतं.या नात्यात तर प्रेमाचाच ‘खेळ’ झाला होता आणि विश्वासाचं कलेवरच थडग्यात ‘दफन’झालं होतं.
मोठ्यांच्या मध्यस्थीने अखेर तिने माघार घेतली व लग्नाचा हट्ट सोडला.प्रियकराच्या वडीलांनी त्यांना कोणाच्याही विरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे लिखित मध्ये लिहून दिले.या निवेदनात,घटनेत हवेत फायर करणारी बंदूक ही टॉय गन असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला.दोन्ही पक्ष सीताबर्डी पोलिस ठाण्यातून बाहेर ही पडले मात्र,नियतीला जणू काही दूसरेच हवे होते.डीसीपींनी त्या सर्वांना पुन्हा ठाण्याच्या आत बोलावले अन्….‘वरुन’ऑर्डर आहेत गुन्हा दाखल करा म्हणून….!असे सांगितले.
(छायाचित्र : प्रियकराच्या वडीलांनी पोलिसांना लेखी दिलेले निवेदन ज्यात ‘टॉय गन ’चा स्पष्ट उल्लेख आहे)
मग…ज्याने नियंत्रण कक्षाला कॉल केला, प्रियकराच्या त्या मित्रालाही आरोपी बनवण्यात आले!वीस वर्षीय प्रेयसी,तिची ५३ वर्षीय आई,तिच्या २१ वर्षीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा भाऊ आणि प्रियकर असे मिळून पाच आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.महत्वाचे म्हणजे २१ वर्षीय या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला .निवडणूकीची आचार संहिता लागली आहे.अश्यावेळी या गुन्हा अंतर्गत सहसा जामीन ही मिळत नाही मात्र,सुदैवाने या विद्यार्थ्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि त्याचे शैक्षणिक वर्ष वाचले.ही बंदूक खेळण्यातली असून त्याचे १२०० रुपयांचे बिल देखील पोलिसांना दाखविण्यात आले मात्र पोलिसांनी ‘वरुन’आलेल्या आदेशानुसार गुन्हा नोंदवित ती ५ हजार रुपयांची असल्याचे एफआयआरमध्ये नोंद केली!
(छायाचित्र : ‘टॉय गन ’चे १२०० रुपयांचे बिल!)
यावर कहर म्हणजे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या ज्येष्ठ पत्रकाराने अवघ्या पाच ओळींच्या एफआयआरमधील ओळींवरुन ‘सूता वरुन स्वर्ग’गाठले आणि त्या प्रेयसीचे दोन प्रियकर यांच्यात वाद झाल्याने गोळीबार झाल्याचे वृत्त दिले ठोकून!
आता या संपूर्ण ट्रेजेडीवर मुकेशच्या गाण्याचे ‘मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये,मुझे मेरे हाल पर छोड दो’बोल आठवत,प्रेयसी पुन्हा पत्रकारितेच्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लंदनला निघून गेली आहे.तिचे वडील हे कोट्याधीश असून ‘मद्य’ व्यवसायाचे सम्राट असल्याचे कळताच एकमेकांविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नसल्याचे हमीपत्र लिहून घेतल्यानंतरही, गुन्हे नोंद करण्यासाठी ‘वरुन’आदेश आल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.
…………………………..