फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममाझ्या वडीलांच्या अपघाती मृत्यूला ‘विकास’ जवाबदार:ठाकूर कुटूंबियांचा आरोप

माझ्या वडीलांच्या अपघाती मृत्यूला ‘विकास’ जवाबदार:ठाकूर कुटूंबियांचा आरोप


नागपूर शहरात ‘विकास’आहे फक्त जिवन नाही

‘विम्स‘रुग्णालयाचे घेतले मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रुपये!

मृत्यूला एक महिना लोटला मात्र अद्याप शवविच्छेदन अहवाल ही देण्यात नाही आला!

पोलिस आयुक्तांना दोन वेळा भेटलो,त्यांनी निर्देश ही दिले मात्र…..!

नागपूर,ता.१८ मार्च २०२४ : एखाद्या व्यक्ती घरुन हेलमेट घालून,दूचाकीची सगळी कागदपत्रे सोबत ठेऊन घराबाहेर पडतो,स्वत: ३५ वर्ष शासकीय नोकरीत वाहन चालक असणारे व निवृत्त झालेला व्यक्ती फक्त नागपूर शहरातील एका सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे व कंत्राटदाराने सुरक्षेची कोणतीही काळली न घेतल्याने अपघात होऊन, एखाद्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू होत असेल तर याला काय म्हणावं?असा सवाल करीत नागपूर शहरात सगळं काही आहे,सिमेंट-काँक्रिटेचे रस्ते आहेत,महामेट्रो आहे,उड्डाण पूल आहेत फक्त जिवन नाही,अशी खंत मृतक शिवबहादूर ठाकुर यांच्या कुटूंबियांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

१८ फेब्रुवरी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शिवबहादूर ठाकूर हे त्यांच्या दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून सत्र न्यायालय,जिल्हाधिकारी कार्यालया समोरुन जात असताना दूर्घटनाग्रस्त झाले.त्यांच्या दुचाकीला एका चारचाकीने जोरदार धडक दिली त्याच वेळी वेगात असणा-या दुचाकी चालकाने देखील त्यांना धडक दिल्याने ते रस्त्यावरच कोसळले.आज पूर्ण एक महिना झाला तरी देखील त्या अज्ञात चारचाकी व दूचाकीवाल्याचा शोध सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस लाऊ शकले नाहीत!आम्हाला अजून देखील कळले नाही आमच्या वडीलांचा मृत्यू हा कशामुळे झाला,कसा झाला आणि कोण दोषी आहे,अजून ही आम्हाला पोलिसांनी या दूर्घटनेची काय चौकशी केली,कुठपर्यंत केली,याची देखील माहिती नसल्याचे मृतक शिवबहादूर ठाकूर यांचे पूत्र विश्‍वजित सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराज बाग रोड पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे.अतिशय रहदारीच्या या रस्त्यावर त्यामुळे दररोज वाहतूक जाम होतं.महत्वाचे म्हणजे या रस्त्याचे बांधकाम जी एसीईपीएल कंपनी करतेय त्याचे कंत्राटदार अभिषेक विजयवर्गीय हे असून, त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कोणतेही बॅरिकेट्स इत्यादी लावले नव्हते,असा आरोप त्यांनी केला.त्यांनी कोणतेही सुरक्षेचे उपाय योजले नव्हते.त्यांच्या हलगर्जीपणाच्या वृत्तीमुळे माझ्या वडीलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप विश्‍वजीत यांनी केला.कंत्राटदाराने वाहनचालकांच्या सुरक्षेचे नियम पाळले असते तर एवढा भीषण अपघात घडलाच नसता आणि आमचे वडील आज हयातीत असते,असे ते म्हणाले.

आम्हाला दुख यासाठी आहे की आम्ही अश्‍या समाज व शहराचा हिस्सा आहोत ज्यांना हे नाही माहीत त्यांची जवाबदारी काय आहे!रस्ते वाहतूकीच्या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली त्यात पुन्हा वाहनचालकांनी हेलमेट घालावे,वाहतूकीचे नियम पाळावे इत्यादीचीच पुनरावृत्ती झाली.जे नियम दहा वर्षांपासून पहीलेपासून अस्तित्वात आहेत तेच नागरिकांना पुन्हा पुन्हा का सांगता?असा प्रश्‍न करीत, वाहतूकीचे नियम सर्वांनी पाळलेच पाहीजे यात शंका नाही मात्र,जे वाहनचालक नागपूरच्या ज्या रस्त्यांवर आज चालत आहेत ते रस्ते कसे आहेत?यावर देखील चर्चेचे गु-हाळ शासकीयस्तरावर का चर्चिले गेले नाही? उड्डण पूल बनतात आहेत त्याचे गर्डर कोसळून कोणी मृत्युमुखी पडला तर दोष संबंधित विभागाचा किवा कंत्राटदारांचा नसतो,दोष त्या पुलाखालून जाणा-या वाहनचालकाचा असतो!

या शहरात स्टारबसने वाहनचालकांना चिरडले तरी दोष त्यांचा नसतो, जो रस्त्यावरुन जात आहे त्याचा दोष असतो. माझे वडील हे आपल्या रस्त्याने व्यवस्थितच जात होते,दोष त्यांचा आहे का ते त्यांची दूचाकी अश्‍या अर्धवट बांधकामाच्या रस्त्यावरुन चालवत होते?पोलिस तसेच इतर विभागांना हेच सिद्ध करायचं आहे का दोष माझ्या वडीलांचा होता,अज्ञात चारचाकी चालक किवा त्या अज्ञात दूचाकी चालकाचा नव्हता.

मग एक महिना उलटला तरी पोलिसांना ते अज्ञात का सापडत नाही?आम्हाला सीसीटीव्ही फूटेज देखील मिळाले नाही,पोलिसांनी जरी ते बघितले असते तर आतापर्यंत दोषी सापडले नसते का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
पोलिस आयुक्तांनी नागपूरात रुजू होताच ‘क्राईम फ्री’सिटीची ?घोषणा केली,ती घोषणा अद्याप तरी फक्त कागदावरच दिसून पडतेय कारण एक महिना उलटला तरी आतापर्यंत आम्हाला,आमच्या वडीलांचा मृत्यू नेमका कसा झाला?याची काहीच माहिती नाही.या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे,वडीलांच्या शवविच्छेदनाचा अहवाल,माहिती,पुरावे,काहीही आम्हाला देण्याची ,पुरविण्याची तसदी पोलिस विभागाने केली नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आता आम्ही कोर्टात पीआयएल टाकायची का की आम्हाला आमच्या वडीलांचा मृत्यू नेमका कसा झाला?हे माहिती करुन द्या!पोलिसांच्या लेखी ही देखील एक ‘हिट ॲण्ड रन’केस आहे,यावर कोणतेही नियंत्रण नाही,कोणताही उपाय नाही,आम्हीच मानसिकरित्या एका महिन्यात थकून गेलो आहोत,आम्हाला १० वर्षांनी न्याय मिळणार का?स्वत: बीएसएनएलमध्ये वाहन चालक पदावरुन निवृत्त झालेला व्यक्ती वाहन व्यवस्थित चालवित असताना तो जिवंत आणि सुखरुप घरापर्यंत परत का नाही पोहोचू शकला नाही?कोण देणार याचे उत्तर?

सीताबर्डी पोलिसांनी आम्हाला पंचनाम्याची रिपोर्टसुद्धा दाखवली नाही.बंदोबस्तात आहेत,हेच कारण ते सांगत असतात.याचा अर्थ त्या अज्ञात दोषींचा शोध पोलिसांना लागला असूनही आम्हाला माहिती द्यायची नाही का?अशी शंका त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

ज्या क्षणी तो अपघात झाला,आजूबाजूचे लोक धावले,त्यांना ओटोरिक्क्षात टाकून सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले मात्र,तिथे न्यूरोसर्जन नसल्याने एलआयसी चौकातील विम्स रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.ते जागेवरच ठार झाले होते तरी देखील विम्स रुग्णालयाने त्यांचा मृतदेह परत करण्यासाठी व मृत्यूपत्र देण्यासाठी तीन हजार रुपये आमच्याकडून घेतले!

आम्ही त्या वेळी कोणत्या मनोवस्थेत होतो!तो क्षण पैसा कमविण्याचा होता का?आम्ही अशा समाजाचा,अश्‍या शहराचा एक भाग आहोत याचे तीव्र दु:खं त्या क्षणी झाले,अशा शब्दात विश्‍वजित यांनी आपली खंत बोलून दाखवली.सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये नागपूर शहराला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी करण्यासाठी ३ हजार ३०३ कोटी रुपये मिळाले.शहराच्या विकास योजने अंतर्गत ३ हजार ७०० सीसीटीव्ही कॅमरे लावण्यासाठी ५२४ कोटी खर्च करण्यात आले.त्याच्या देखरेखीसाठी एल ॲण्ड टी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे मात्र,कोट्यावधीच्या या स्मार्ट यंत्रणेतून आम्हाला आमच्या वडीलांचा जीव नेमका कसा गेला,याचा एक फूटेज देखील मिळू शकले नाही.

याचाच अर्थ पोलिसांना सामान्य माणूस रस्ता दूर्घटनेत मरतो याविषयी कोणतीही संवेदना नाही,हेच जर गडकरी किवा फडणवीस यांच्या कुटूंबियांपैकी कोणासोबत घडले असते अवघ्या एका तासात आरोपी हे गजाआड असते.त्यामुळेच आता पोलिस विभागाने तसेच पोलिस आयुक्तांनी नागपूरच्या जनतेला स्पष्टपणे सांगावे की,त्यांच्याकडे सामान्य नागरिकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यास पोलिस त्याची चौकशी नाही करु शकत.पोलिस आयुक्तांनीही सांगावे त्यांच्याकडे अनेक जवाबदा-या आहेत जसे पोलिस क्रीडामध्ये सहभागी होणे,विविध कार्यक्रमात भाषण देणे,पुस्तक लिहणे,शहरात येणा-या अति विशिष्ट व्यक्तींच्या स्वागतासाठी रांगेत उभे राहणे,बंदोबस्त बघणे इत्यादी,अशी खोचक टिका याप्रसंगी विश्‍वजित यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष माजी न्या.अभय सप्रे यांना देखील आमचे निवेदन आहे की त्यांनी ही जनतेलाच फक्त जनजागृतिचे धडे देऊ नये,अपघात घडला असेल तर दोषींवर कारवाई करा,फक्त अज्ञाताचे कारण सांगून दोषींना वाचविण्याचे काम आता तरी थांबवले गेले पाहिजे.यातून भ्रष्टाचार वाढतो व पिडीतांना न्याय मिळतच नाही.

आणि पोलिस आयुक्त हसले……
नागपूर शहरात मागील दोन महिन्यात २१२ पेक्षा जास्त रस्ते अपघात झाले ज्यात ७३ लोकांचा मृत्यू झाला.यातील फक्त काही दोषींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली बाकीचे सगळे पोलिस विभागासाठी अद्याप ही ‘अज्ञात’आहेत.माझ्या वडीलांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे व सीताबर्डी पोलिस ठाण्यातून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे बघून नुकतेच रुजू झालेले पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल यांना आम्ही भेटलो.त्यांना सांगितले तुम्ही रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक कुटूंबाचा घरी जाऊन बघा,त्यांची काय दैना झाली आहे तर आयुक्त हसलेत……!त्यांना रस्ते अपघातात जीव गेलेल्या मृतकांच्या कुटूंबियांशी भेटण्यात, त्यांची दैना बघण्यात कोणताही रस नव्हता.याचं मला फार दुखं झालं असे विश्‍वजित यांनी याप्रसंगी सांगितले.

माझा भाऊ मनोज सिंह ठाकूर हा गोरेवाडा येथून येत असताना त्याला एका कारमध्ये गायींची तस्करी होत असल्याचे आढळले.त्याने विचारपूस करताच त्याच्या पायावरुन कारचालकाने कार नेली व पळून गेला.त्याने रात्रीच्या ३ वा.पोलिसांच्या कंट्रोल रुमला घटना सांगितली.गोधनीच्या पोलिसांनी फक्त एनसी रिपोर्ट माझ्या भावाला दिली.दुस-या दिवशी मी त्याला मेयाे रुग्णालयात घेऊन गेलो असता त्याच्या पायात फ्रेक्चर निघाला.जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असताना आम्हाला फक्त एनसी देण्यात आली.चार दिवसांनी आरोपी सापडले तेव्हा ३०७ कलम जोडण्यात आली.गायींच्या तस्करीची तक्रार ही हिंदूत्ववादी संघटेनचे आहात का?अशी विचारणा केल्यावर होते!नसल्यास सामान्यांची तक्रार घेणार नाही का?असा प्रश्‍न करीत,आम्ही आज वृत्तपत्रांमधील बातमी होण्यासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा उद्देश्‍य आहे जे आमच्यासोबत घडले ते आता इतरांसोबत घडू नये.आज सगळी अद्यावत संसाधने पोलिस विभागाकडे असतानाही एक महिना झाला तरी दोषींना अटक का झाली नाही?आम्ही आमचं दूखं बाजूला ठेऊन प्रशासनाच्या विविध विभागाचे उंबरठे झिझवतोय.आमच्या वडीलांचा मारेकरी कोण आहे?हे तर सांगा.गो तस्करांची रात्रीच्या ३ वाजताची सीसीटीव्ही फूटेज मिळते तर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्या अपघाताची सीसीटीव्ही फूटेज का पोलिसांना मिळत नाही?

आमच्या जवळ आमच्या वडीलांची, रस्ते अपघाता नंतरचे एकमेव छायाचित्र,आठवण म्हणून उरले असल्याचे सांगत, त्यांनी ते छायाचित्र पत्रकारांना दाखविताच,मृतकाच्या पत्नीला हूंदका आवरला नाही!
……………………………..

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या