फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशआणि म्हणे मतदार याद्या अचूक......!

आणि म्हणे मतदार याद्या अचूक……!


८,१९६  बोगस मतदार गडकरी यांच्या मतदासंघातले!

तहसीलदार भोसले मॅडम सांगतात मतदारयादीत नावे टाकण्याचे काम आमचे,काढण्याचे नाही!

प्रशासनाकडे दोन लाख मतदारांची नावे टाकण्याची सरकारने दिली जवाबदारी!

संविधानाच्या ‘एक मत एक मूल्याची’ नागपूर,रामटेक,हिंगण्यात सर्रास थट्टा

एकाच मतदाराचे नाव चार-चार मतदारसंघात ; नावे सारखी असू शकतात पण एपिक क्रमांक सारखा कसा?

वानाडोंगरी संघर्ष समिती तसेच भारत जोडो अभियान समितीची ‘सप्रमाण’ पत्रकार परिषदेत माहिती

जिल्हाधिकारी यांचा मतदार याद्यांसाठी केलेला सत्कार बोगस मतदार याद्यांसाठी का?समितीचा सवाल

स्थानिक मतदारांना तहसीलदार सांगतात लोकसंख्येच्या प्रमाणात यादी पूर्ण झाली,तुमची नावे नाही टाकणार!

नागपूर,ता.१२ मार्च २०२४ : निष्पक्ष निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदानासंबंधी जनजागृती करण्याचा अजेंडा वानाडोंगरी संघर्ष समिती तसेच भारत जोडो अभियान समितीने राबविण्याचा निर्धार केला.या पार्श्वभूमीवर मतदारसंघ निहाय मतदार याद्या डाऊनलोड करण्यात आल्या.या मतदार याद्यांचे अवलोकन केले असता धक्कादायक माहिती समोर आली.खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे प्रत्येक मतदारसंघानिहाय आढळून आली.वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये मतदार यादीत तर कमालच झाली.या यादीत गावातील मतदारांची नावे नसून गावाबाहेरील हजारो मतदारांची नावे यादीत समाविष्ट असल्याची माहिती पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत वानाडोंगरी संघर्ष समितीचे नंदू पोटे ,दिपक नासरे यांनी सांगितले.याप्रसंगी प्रज्जवला थत्तेविजय कोरके उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना दिपक नासरे यांनी सांगितले,की वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये २०१८ पासूनच मतदार यादीमध्ये फार मोठा घोळ आहे.हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर मेघे यांचा असून,मतदार यादीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातीलच ८,१९६ मतदारांची नावे आहेत! स्थानिकांना डावलून बाहेरच्यांची नावे मतदार यादीत घूसवण्यात आली .याबाबत तहसीलदारांना वारंवार निवेदन दिले ,मात्र,तहसीलमधल्या निवडणूक अधिका-यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार यादी पूर्ण झाल्याचे कारण सांगून निवडणूकीत गावातील मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत इथल्या स्थानिकांनी वानाडोंगरी मतदार यादीत नाव असलेल्यांचा शोध घेतला असता लक्षात आले की मतदार यादीतील ८,१९६ मतदार हे नागपूरातील गडकरी यांच्या मतदारसंघातील असून,त्यांची नावे दोन-दोन,चार-चार ठिकाणी मतदारसंघात आहेत!

याप्रसंगी बोलताना प्रज्वला थत्ते यांनी सांगितले,की भारत जोडो यात्रा ही काँग्रेसने काढली होती.या यात्रेदरम्यान अनेक सामाजिक संस्था तसेच अनेक संघटना एकमेकांशी जुळल्या.यात शेतकरी संघटना असो,अंधश्रद्धा निर्मुलन असो,यात्रेत चालताना एकमेकांशी ओळख झाली.यात्रा तर पूर्ण झाली मात्र जनतेच्या प्रश्‍नांचे काय?यावर योगेंद्र यादव यांनी दिल्लीत अनेक संघटना व सामाजिक संस्थांसोबत बैठक घेतली.सर्व संघटना एकत्रित आल्या तर देशातील फास्टीटवादावर अंकूश येईल,या हेतूने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत नसून केवळ भारताच्या संविधानाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे थत्ते यांनी सांगितले.

सरकार जे काही निर्णय घेतात त्यासाठी लोकशाही देशात सरकार हे जनतेला उत्तरदायी आहेत.यातूनच आम्ही ‘चावडी’वाचनाचा उपक्रम गावागावात सुरु केला.यात गावातल्या चौकात मतदारांची नावे वाचून दाखविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.त्या नावांमध्ये गावातील मतदारांची नावे नसून इतर गावातील मतदारांची नावे ऐकून स्थानिक मतदार ही चकीत झालेत!

हिंगणा मतदार संघातच जवळपास ५० हजार नावे ही अशी आहेत जी नागपूरातील अनेक मतदारसंघात आहेत.उदाहरणत:हिंगणा,दक्ष्ण-पश्‍चिम,दक्ष्ण-पूर्वच्या यादीत ८ हजार नावे अशी निघाली जी एकसारखी आहेत.ही आमची यादी नसून सरकारची यादी आहे.दक्ष्ण -पश्‍चिम हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे,या मतदार संघातील मतदार यादीत सुनील नानाजी पटले नावाचा मतदार ज्याचे वय ३४ दाखवण्यात आले असून याचा सीरीयल क्रमांक ५७१ आहे,हाच मतदार हिंगणा मतदार संघाच्या मतदार यादीत ३५ वर्षीय दाखवला असून याचा सीरियल क्रमांक ४२७ व बूथ क्रमांक २४१ दाखविण्यात येत आहे.हे फक्त एक उदाहरण आहे.अशी हजारो बोगस नावे असून,एकच मतदार अनेक मतदार संघात मतदान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.मागील चार महिन्यांपासून मतदार याद्यांवर भारत जोडो अभियान तसेच वानाडोंगरी संघर्ष समितीचे काम सुरु आहेत.मतदार याद्या डाऊनलोड करण्यास आम्ही सुरवात केली.नागपूरात ३७० मतदारसंघ असून ४०० बूथ आहेत.प्रत्येक बूथवर अंदाजे ३५ पाने असून २० हजार पानांचे अवलाेकन आम्ही केले.

एकाच नावाचे,आडनावाची हजारो मतदार असू शकतात मात्र त्यांचा एपिक क्रमांक हा देखील सारखाच असल्याचे नासरे यांनी सांगितले.एकच मतदार सगळ्याच ठिकाणी मतदान करु शकत नाही याचा अर्थ दूसराच कोणी त्याच्या नावाचे मतदान करीत असेल,असा दावा त्यांनी केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला लागू केले त्यात ‘एक व्यक्ती एक मत’हे मूल्य बहाल केले मात्र,निवडणूक जिंकण्यासाठी बोगस मतदारांचा आधार घेतला जात असून, ही लोकशाहीची हत्याच असल्याचा तीव्र संताप वानाडोंगरी संघर्ष समितीच्या सदस्यांनी केला.एकच मतदार हा रामटेकच्या निवडणूकीसाठी देखील मत टाकत आहे,धामणगावच्या यादीत देखील त्याचे नाव आहे,तेच नाव नागपूरातील विविध मतदार संघातील मतदार यादीत देखील आहे.

नुकतेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचा मतदार याद्याच्या संदर्भात सत्कार करण्यात आला.जास्तीत जास्त बोगस नावे टाकून,स्थानिकांचा मतदानाचा हक्क नाकारुन मतदार याद्या तयार करण्यात आल्या,त्यासाठी जिल्हाधिकारी यांचा सरकारने सत्कार केला का?असा खोचक सवाल समिती सदस्यांनी याप्रसंगी केला.

आम्ही कोणीही राजकारणी नाही किवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.सरकारच्या याच धांधलीतून आमचा एक गट गेल्या पंधरा दिवसांपासून वानाडोंगरी तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसला आहे.तहसील कार्यालयातील भोसले नावाच्या अधिकारी सांगतात,आम्हाला दोन लाख मतदारांची नावे टाकण्याचा आदेश सरकारकडून मिळाला आहे,त्यामुळे आम्ही मतदार यादीतील कोणतीही नावे काढणार नाही!

निवडणूकीत सायंकाळी शेवटच्या एका तासात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होत असून त्यावेळी अश्‍या बोगस मतदारांकडून शासन आणि प्रशासनाच्या मिलीभगतमधून मतदान केले जात असल्याची आम्हाला शंका आहे.त्यामुळे रामटेक तसेच नागपूर शहरातील विधानसभा तसेच तहसील मधील निवडणूक अधिका-यांच्या केंद्रिय निवडणूक आयुक्तांनी तात्काळ बदल्या कराव्या.मतदार यादीतून बोगस मतदारांची नावे तात्काळ काढून टाकावी.राज्य तसेस केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी अश्‍या दूहेरी एपिक क्रमांक असणा-या मतदारांची नावे तपासून मतदार यादी प्रगत(अपडेट्स)करावी.अशी मागणी भारत जोडो अभियान तसेच वानाडोंगरी संघर्ष समितीच्या सदस्यांनी याप्रसंगी केली.
………………….

 

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या