फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमभाजप कामगारांच्या दारी,महिला कामगार यमाच्या घरी!

भाजप कामगारांच्या दारी,महिला कामगार यमाच्या घरी!

(छायाचित्र : मृतक मनु तुळशीराम राजपूत)

नागपूरात ‘गोवारी’दूर्घटनेची पुनरावृत्ती:सत्ताधा-यांचा अति उन्माद गरीबांना पुन्हा एकदा नडला

वृद्ध महिलेचा मृत्यू:अनेक जखमी:गरोदर महिलेवर मेडीकलमध्ये उपचार

शवविच्छेदन न करण्यासाठी पुढे आले अदृष्य हात:पोलिस,डॉक्टरांनी बजावले मात्र चोख कर्तव्य

भांडीकुंडीच्या किटसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे जमा करण्याचे केले होते भाजपने आवाहन:जमखी महिलांची ‘सत्ताधीश’ला माहिती

साढे सात वर्षांच्या सत्ताकाळात आताच गरीब,गरजू कामगार महिलांच्या ‘कल्याणाची’ आठवण का? समाज माध्यमावर संताप

निवडणूकीच्या फंड्यात सत्ताधा-यांच्या लोकप्रिय घोषणा,मरतो मात्र गरीबच:जनतेमध्ये रोष

नागपूर,ता.९ मार्च २०२४: भाजपा कामगारांच्या दारी…भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर,महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर बांधकाम कामगार व घरेलु कामगारांची नोंदणी व किट वाटप महाशिबिर,भारतीय जनता पक्ष महानगर व कामगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर शहराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आमदार प्रवीण दटके यांच्या अथक प्रयत्नाने,नागपूर शहरातील बांधकाम कामगार व घरेलू मोलकरीण कामगार यांची नाेंदणी तसेच, बांधकाम कामगारांच्या नोंदणी केल्यानंतर लगेच किट वाटप(पेटी व घरेलू साहित्य) केल्या जाईल.ही नोंदणी जागतिक महिला दिन ८ मार्च ते साेमवार दिनांक ११ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुवारी ४ पर्यंत रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करावी,असे जाहिरातपर पत्रक,नागपूरची अशी एकही वस्ती नसावी जिथपर्यंत पोहोचले नाही मात्र,काल ८ मार्च रोजीच्या गरीब,गरजू महिला कामगारांच्या तूफान गर्दीच्या रेट्यातून समाज माध्यमावर संतापयोजकांनी कोणताही बोध न घेतल्याने,आज सकाळी भट सभागृहाचे फाटक जसे उघडण्यात आले तसा तूफान गर्दीचा रेटा आत जाण्यासाठी ढकलल्या गेला व या चेंगराचेंगरीत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा हकनाक बळी गेला तर अनेक महिला या जखमी झाल्या,परिणामी ‘भाजप कामगारांच्या दारी’जरी आली असली तरी गरीब,गरजू कामगार महिलांची क्रूर थट्टा होऊन, वृद्ध कामगार महिला ती फार आशेने नोंदणीसाठी कार्यक्रमस्थळी आली तिचा मृतदेहच उचलून मेडीकलच्या शवागृहात घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर आली. ही गरजू महिला हकनाक ‘यमाच्या दारी’व्यवस्थेच्या ढिसाळ व्यवस्थापनामूळे ‘पोहोचविण्यात’आली,असेच आता म्हणावे लागेल.

या देशात सगळ्या योजना या गरीब,गरजू आणि कामगारांसाठी जाहीर होतात मात्र सत्ताधा-यांच्या अति उन्मादाला बळी देखील हा गरीब वर्गच का व कसा पडतो,याचे आणखी एक उदाहरण आज भट सभागृहात दिसून पडले. भाजपचा उद्देश्‍य गरीबांना सरकारी योजनेच्या लाभ मिळावा हा होता की त्या आडून येत्या निवडणूकीत पदरात लाभ पाडून घ्यावा,हा होता?पिडीत महिलांसोबत ‘सत्ताधीश’ने संवाद साधला असता ,कालच गर्दीचा कडेलोट झाला होता मात्र,आयोजकांनी या गर्दीला हाताळण्यासाठी कोणतीही योग्य पाऊले उचलली नसल्याचा रोष अनेक महिलांनी प्रकट केला.आम्ही भाजपची पेटी घ्यायला आलो नव्हतो,आमच्या मुलांना सरकार पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती(स्कॉलरशिप)देणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले,त्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करा व फॉर्म भरुन देण्याची माहिती आम्हाला सांगण्यात आली होती.

आमच्यासाठी सर्वात महत्वाचं काही असेल तर ते आमच्या मुलांचे शिक्षण आहे.दहावी,बारावीतल्या मुलांच्या खासगी क्लासची फी वर्षाला एक लाख रुपये मागतात,त्यामुळे या पाच हजार रुपयांची सर्वात जास्त गरज आम्हाला होती,त्यामुळे आम्ही नोंदणीसाठी भट सभागृहात आलो.महत्वाचं म्हणजे मध्यरात्रीपासून महिला यांनी भट सभागृहाच्या फाटकासमोर गर्दी केली होती.ग्रामीण आणि शहर दोन्ही स्तरावर एकाच वेळी नोंदणी ठेवण्यात आल्यामुळे प्रचंड गर्दी झाली.प्रत्येकीला सभागृहाच्या आत जाण्याची घाई होती. वेळ सकाळी १० वा.ची होती मात्र सभागृहाचे सुरक्षा रक्षक यांनी ११ वाजता ते उघडले.त्यांनी कोणालाही रांगेत उभे केले नाही.चार रांगा लावल्या असत्या तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.त्यांनी अचानक फाटक उघडले आणि गर्दीच्या रेट्यामुळे अनेक महिला या चेंगरल्या गेल्या.मनू तुळशीराम राजपूत ही वृद्ध महिला श्‍वास कोंडून दगावली.

शोभा मसराम हिच्या पासळ्यांना मुका मार लागला.पुनम चांडगे वय वर्ष ४३ राहणार रामेश्‍वरी ही गंभीर जखमी झाली.अनेकांच्या हाताला मार लागला,अनेक महिलांचा रक्तदाब वाढला,श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला.यात एक गर्भवती महिला देखील होती.या सर्वांवर मेडीकलमध्ये उपचार सुरु आहेत.

(छायाचित्र : साक्षात मृत्यूशी गाठ….!)

भाजपाचे आमिषाचे राजकारण आणि आयोजकांचे  व्यवस्थापन आज पुन्हा एकदा गरीबांना नडले.किमान ५० महिला जखमी झाल्याचे त्या सांगतात.भट सभागृहाचे फाटक उघडताच हजारोची गर्दी आत येण्यासाठी धडपडू लागल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी देखील लाठीमार केला असल्याचे महिलांनी सांगितले!यामुळे आणखी जास्त चेंगराचेंगरी झाली.अगदी १९९४ साली सीताबर्डी टी-पॉईंटवर पोलिसांच्या गोवारी बांधवांवर लाठीमारामुरे ११४ बळी हकनाक गेले,अगदी तेच दृष्य भट सभागृहासमोर चपलांचा ढीग बघता समोर आले.कोणत्याही आंदोलनात महिला याच समोर असल्याने सहज बळी पडतात.यामुळे फक्त एक कुटूंबच विस्कळीत होत नाही तर,तिच्यावर अवलंबून असणारे आप्त हे कायमचे कोलमडून पडतात.मनु तुळशीराम राजपूत ही आज सकाळी जिवंत,योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी आली होती,तिच्या कुटूंबियांना विश्‍वास हाेता,नोंदणी झाल्यानंतर आपला माणूस परत सुखरुप घरी येईल मात्र,असं घडलं नाही…!

आज अनेक नागपूरकरांनी या गरीब,गरजू कामगार महिलांचा जिवाचा आक्रोश भट सभागृहासमोर अनुभवला.अनेकांनी त्याचे व्हिडीयो काढले,समाजमाध्यमांवर व्हायरल केले.ही दूर्घटना सहज टाळता आली असती मात्र,गरीबांच्या जीवालाही काही मोल असतं,हे नेते,सत्ताधारी आणि प्रशासनाच्या लक्षात येत नाही.त्यांच्या लेखी गरीबांचं जीवन किडे-मुंग्यासारखं असून अश्‍याच मरणासाठी ते असतात,असाच त्यांचा समज असावा.नाही तर सभागृहाच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री हजर असताना,बाहेर मृत्यूचा तांडव आणि जगण्यासाठीची धडपड घडलीच नसती.या दूर्घटनेला एकमेव कारण ही गरीबांप्रतिची ‘मानसिकता’आहे,असेच म्हणावे लागेल.

महाशिवरात्रीनिमित्ताने शेकडो महिलांनी काल उपवास केला होता.पोटात अन्नाचा दाना ही नसताना मध्यरात्रीपासून त्यांनी भट सभागृहासमोर गर्दी केली.त्यातील अनेकांची उत्तर पूजा ही सलाईन लागून झाली…!

(छायाचित्र : असहनीय वेदनेत पूनम चांडगे मेडीकलमध्ये उपचार घेताना…सकाळी घडलेल्या दूर्घटनेनंतर देखील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी नागपूरात भूमिपूजनाचा सपाटा लावला..मेडीकलमध्ये पिडीतांची वेदना जाणून घेण्यासाठी वेळ नव्हता!)

भाजपच्या नेत्यांची आपापल्या कार्यकर्त्यांना देण्यात येणारी ‘ठेकेदारी’,या वृत्तीने पुन्हा एकदा गरीबांचा घात केला.काही नगरसेवकांची मजल तर इथपर्यंत गेली आहे की ’प्रभागासाठी काहीही केले नाही तरी लोकं भाजपलाच वोट देते’अशी उघड वल्गना करताना ते आढळून पडतात.वरपासून खालपर्यंत झिरपणा-या या उन्मादाचे बोलके उदाहरण म्हणजे,इतकी मोठी दूर्घटना घडून देखील नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील भूमीपूजन,लोकापर्ण इत्यादीचा एक ही कार्यक्रम रद्द केला नाही….!जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करणा-यांच्या लेखी गरीब,गरजू महिलांची गरीबांच्या जीवाची, हीच किंमत होती….!

उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बिनाकी तलावाचे पुनर्जीवन व विकासकामांचे भूमिपूजन करताना मात्र गडकरी यांच्या तोंडी आजचे भाषण होते ‘नागपूरचा चौफेर विकास करताना गोरगरीब जनता केंद्रस्थानी आहे. गरीबांना चोवीस तास पाणी मिळावे, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांच्या घरातील युवा पिढीला रोजगार मिळावा या उद्देश्याने नागपूर शहरात सातत्याने विकासकामे सुरू आहेत!’या शहरातील गरीब जिवंत राहील तेव्हाच पाणी,आरोग्य,रोजगार याचा लाभ ते घेऊ शकतील ना?असा सवाल आता त्यांना विचारला जात आहे.

एका जखमी महिलेला कॉल केला असता ती तीव्र वेदनेने तळमळत होती,तिने बोलण्यासाठी कॉल तिच्या सोबतच्या नातेवाईकाला दिला.तिची कॉलर ट्यून ऐकू आली ‘देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे…होणारा होतंला जाणारा जातंला मागे तू फिरु नको..उगाच सांडून ख-याची.. संगत खोट्याटी धरु नको…येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको…तुझ्या हाती डाव सारा इसार गजाल कालची रे…देवाक काळजी रे…..!

’चित्रपट ‘रेडू’मधील गीतकार गुरु ठाकूरचे शब्द जणू ही माऊली आज प्रत्यक्ष जगली…!

भट सभागृहासमोर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्ष मनीषा पापडकर यांच्या देखील काही कार्यकर्त्या होत्या मात्र त्या थोडक्यात बचावल्या.त्यांच्याही अनेक कार्यकर्त्या या पहाटे ५ वा.पासून भट सभागृहासमोर उभ्या होत्या.सकाळी १०.३०,११ वा.च्या सुमारास फाटक उघडले तोपर्यंत अफाट गर्दी फाटकासमोर जमा झाली होती.फाटक उघडताच महिला एकमेकींच्या अंगावर पडल्या व चेंगराचेंगरीत आर्शिवाद नगर येथील ६५ वर्षीय मनू तुळशीराम राजपूत नावाच्या महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला.अनेक महिला या गंभीर जखमी झाल्या.संबंधित भाजपा पदाधिकारी यांनी समयसूचकता दाखवून योग्य नियोजन करायला हवे होते.आज आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दसरा मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे नियोजन करतात,त्यांच्या जेवणावळीची व्यवस्था स्वत:आधी खासदार श्रीकांत शिंदे येऊन बघतात यानंतर मुख्यमंत्री स्वत:जातीने हजर होऊन लक्ष देतात.मेळाव्यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू हार्टअटैकने झाला तेव्हा चार्टड प्लेनने त्याचा मृतदेह गावी पाठवला.पाच लाखांची मदत तात्काळ दिली.त्याच्या अंत्यविधीसाठी दोन जवळचे पदाधिकारी शिंदे यांनी पाठवले.ही असते बांधिलकी नेता आणि कार्यकर्त्यांमधली.आजच्या चेंगराचेंगरीत ज्या महिलेचा हकनाक बळी गेला तिच्या कुटूंबियाला तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत द्यावी,जखमी महिलांचा औषधोपचार मोफत करावा,अशी मागणी त्यांनी केली.

मेडीकलमध्ये मृत पावलेल्या महीलेचे शवविच्छेदन होऊ नये यासाठी काही अदृष्य शक्तींनी प्रयत्न केले ,तिच्या मृत्यूमुळे परिस्थिती गंभीर झाली होती,लवकरात लवकर तिचा अंत्यसंस्कार करण्याचा हेतू होता मात्र पोलिस व डॉक्टर्स यांनी नियमाप्रमाणे मनु यांच्या पार्थिवाचे शवविच्छेन केले,असे त्यांनी सांगितले.

थोडक्यात,आई ही कोणत्याही वयाची असू देत ती कुटूंबाची आधारवड असते.भाजपच्या ठेकेदारीवृत्तीने आणि प्रत्येक योजनाचे श्रेय लाटण्याच्या धडपडीतून,आज हाच आधारवड श्‍मशान घाटावर पोहोचण्याची वेळ आली.अनेक महिला या रुग्णालयात पोहोचल्या.आता तरी भाजपचे आमदार,खासदार,पदाधिकारी,नेते आणि कार्यकर्ते आपल्या संवेदनाशुन्य व्यवहाराचे आत्मचिंतन करणार की नाही?असा सवाल केला जात आहे.
…………………………

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या