‘अगरबत्ती’ने केले नागपूरकर रसिकांना स्तब्ध
समागम रंग मंडळ जबलपूरचे सादरीकरण
नागपूर,ता.२२ फेब्रुवरी २०२४: उत्तर प्रदेशच्या बेहमई या लहानशा गावात १४ फेब्रुवरी १९८१ साली सर्वण जातीच्या २९ ठाकूर समाजातील पुरुषांना एका रांगेत उभे करुन चंबलची डाकू फूलन देवी हिने गोळ्या झाडून यमसदनी पाठवले.देश या हत्याकांडाने हादरुन गेला होता.या सामुहिक हत्याकांडानंतर राजकीय,सामाजिक,प्रशासकीय इत्यादी सर्वच स्तरावर चर्चा झडली ती यमसदनी गेलेल्या ठाकूरांची आणि डाकू फूलनदेवीची मात्र,मृत पावलेल्या ठाकूरांमध्ये वयोवृद्ध ठाकूर लाल सिंग यांच्यासोबतच विशीतले तरुण देखील होते ज्यांची १९ वर्षीय पत्नी ही देखील विधवा झाली होती.या हत्याकांडनंतर या सर्व विधवांच्या मनाची मनोवस्था अतिशय उत्कृष्टरित्या आशिष पाठक या लेखकाने ‘अगरबत्ती’या नाटकात टिपली आहे व तितक्याच ताकदीचे दिग्दर्शन व मुख्य पात्र ‘ठकुराईन’चा अभिनय स्वाती दुबे यांनी केला आहे.
जबलपुरच्या समागम रंग मंडळातर्फे धरमपेठ,ट्रॅफिक पार्क जवळील वनामतीमध्ये आज सायंकाळी या दीड तासांच्या नाटकाचे सादरीकरण झाले.ठाकूरांच्या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशच्या सरकारने विधवा झालेल्या या स्त्रियांना अर्थाजणासाठी ‘अगरबत्ती’चा कारखाना टाकून दिला.या सर्व स्त्रिया यात व्यस्त झाल्या असल्या तरी जिने त्यांचे आयुष्य उधवस्त केले त्या फूलन देवी विषयी त्यांच्या मनातली सूड भावना ही दिवसागणिक धगधगत होती.एकमेकींना धीर देत,एकमेकींचे सुख दु:खं वाटून घेत या सर्व विधवा स्त्रिया एकाकी आयुष्य घालवत होत्या.सरकारने अगरबत्तीचा हा कारखाना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी टाकून दिला असल्याने त्यांच्या मनातील राेष इतका विकोपाला गेला की त्यातील एक विधवा कल्ली ठकुराईन हिने पांढरे वस्त्र नेसून अगरबत्ती बनविण्या ऐवजी खाकी वर्दी अंगावर चढवून,हातात बंदूक घेऊन चंबलची वाट धरली.
फूलन देवीला बॉम्बने उडवून देण्यासाठी अनेक जोखिम पत्करुन अखेर बॉम्ब बनविण्यात कल्ली ठकुराईनला यश मिळवले.तो बॉम्ब मोठ्या ठकुराईनला आणून दिला मात्र,अवघ्या १९ वर्षीय सर्वात लहान विधवेला फूलन देवीने ठाकूर समाजातील पुरुषांना का ठार मारले?याचे उत्तर हवे होते.तिचे प्रश्न इतर स्त्रियांना घायाळ करीत होते.नीच जात म्हणजे काय?त्यांची पाठ हिरवी असते असे का सांगतात?कोवळ्या वयात नीच समजल्या जाणा-या जातीतील मुलावर तिचं प्रेम जडत असतं मात्र ठाकूरच्या मुलीसोबत प्रेम करण्याची शिक्षा तिच्या प्रियकराला मिळते.त्याची हत्या होते मात्र,श्रेष्ठ-कनिष्ठ जात भावना आणि जात पंचायतीचे प्राबळ्य असणा-या प्रदेशात अश्या मृत्यूचे काहीही मोल नसते.
यातील एक विधवा हिला तिचा ठाकूर हा तिच्याप्रति किती एकनिष्ठ होता याचे एकच समाधान तिच्या जवळ होते मात्र,वयाने खूप लहान असणा-या दूसरी विधवा ठकूराईन तिचा हा भ्रम,तिच्यासोबत तिच्या नव-याने गुदरलेल्या प्रसंगातून तोडते आणि मृत नव-याची तिच्या मनातील एकनिष्ठता एका क्षणात तारतार होते,ती कोलमडून पडते.
हसण्या बागडण्याच्या वयात उधवस्त झालेल्या व पांढरे वस्त्र धारण करुन जिवन जगण्यास बाध्य झालेल्या या सर्व विधवा फूलन देवीचा सूड घेणे या एकमेव ध्येयाने आयुष्य कंठत असतात मात्र,एकमेकींच्या सहवासात त्यांच्यावर गुदलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा होत राहतो.बेहमई हे गावच फूलन देवीने सूडासाठी का निवडले?फक्त पुरुषांनाच का मारलं?ती डाकू होती तरी लहान मुले,स्त्रियांना का गोळ्या घातल्या नाही?अशी अनेक प्रश्ने सर्वात लहान विधवा ठकुराईन वारंवार इतर विधवा स्त्रियांना विचारत असते.
कान्हावर जिवापाड प्रेम करणा-या आणि दिवसरात्र त्याच्याच भक्तीत रममाण राहणा-या एका विधवेलाही लहानगी विधवा हाच प्रश्न विचारते.महाभारतात अजुर्नाने युद्धभूमीवर आपल्या समोर आपलेच सगेसोयरे बघून हातातील धनुष्य बाण खाली टाकून दिला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली.ते समोर तुझे सगेसोयरे असले तरी ते पापी आहेत,त्यामुळे तुला युद्ध करावंच लागेल,हा कर्म सिद्धांत सांगितला.तोच न्याय ही लहानगी विधवा इतर विधवांना लावण्यास बाध्य करते,समोरची आपली शत्रू फूलन देवी ही आपली कोणीही नव्हती तरी जे आपले होते,ठाकूर होते त्यांनी तर काही पाप केले नव्हते ना?हे ठाकूर पापी नव्हते तर फूलन देवीने त्यांना का ठार मारले?बेहमई गावात नीच जाती समजल्या जाणा-या फूलनवर कोणी अत्याचार केले?तिची संपूर्ण गावात कोणी नग्न धिंड काढली?तिच्या शरीरासोबतच तिच्या अस्मितेवर,आत्मसन्मानावर कोणकोणते ठाकूर हसलेत?तिच्यावर थूंकलेत!
सर्वात ज्येष्ठ ठकुराईन जी बॉम्ब घेऊन फूलन देवी कारागृहातून सुटून आल्यावर तिच्यासह आत्मघात करण्यास निघते,तिचा विरोध इतर विधवा करतात आणि ती कोलमडून पडते.माझा तर ठाकूर हा वयाने खूप वृद्ध होता तरी फूलनने त्याला का संपवले?असा प्रश्न ती करते.त्यावर,जात पंचायतीमध्ये प्रत्येक निर्णय हा कोण घेत होता?फूलनला त्याने स्पर्श नाही केला पण त्याचे डोळे उपहासाने तिचा नग्न देह बघत नव्हते का?ही गोष्ट प्रत्यक्ष बलात्कारापेक्षा कमी जीवघेणी आहे का?असे प्रश्न तिला विचारल्या जातात.ती कोसळून खाली पडते आणि मोठ्याने हूंदका घेते.
इतर विधवा तिला सावरतात,विचारतात,आता तरी मोकळी हो ठकुराईन म्हणून विनवणी करतात,अखेर ती सांगते,वय वर्ष फक्त दहा असताना एका लग्न समारंभात एक ठाकूर तिला धान्याचे कोठार असलेल्या खोलीत डांबतो,दार लाऊन घेतो,तोंड दाबतो आणि…!
त्या पुरुषाविषयी तुला काय वाटतं?असा प्रश्न केला असता, माझ्या हातात बंदूक असती तर मी त्याला गोळी घालून ठार केले असते,असे अनाहूत उत्तर ज्येष्ठ ठकुराईनच्या तोंडातून निघतं आणि….मग….फूलनने तरी वेगळं काय केलं?या प्रश्नावर हे नाटक कलाटणी घेऊन संपतं.सुडाची भावना मोक्षाच्या भावनेत परिवर्तित होते.
ख-या आयुष्यात मात्र खासदार झालेल्या फूलनदेवीला एक तरुण ठाकूरच बंदुकीच्या गोळीने संपवतो हा भाग वेगळा. विधवा स्त्रियांना फूलनच्या सुडाची भावना कळते कारण त्याही स्त्रिया असतात,त्या तरुणाला मात्र कळली ती फक्त…जात!
हे नाटक जाती,लिंग,श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना,वर्गसंघर्ष,राजकारण या सर्वच बाबींना खोलवर स्पर्श करुन जातं.प्रेक्षकांवरच लेखक सोडून देतो ते विचारांच्या स्तरावर नेमके कुठे उभे राहतात.
या नाटकात संगीत आणि नृत्य जान टाकतात.सवाष्णी असताना एकमेकांच्या नव-याच्या प्रेम करण्याचा अंदाजावरुन सतत मसखरीच्या तो-यात वावरणा-या या सर्व ठकुराईन या प्रेमाला कायमचे पारखे होतात आणि देहाच्या गरजा मरत नसल्या तरी मनाची गरज ही पांढ-या वस्त्रांखाली मारुन टाकण्याची कला शिकतात.तरी देखील होळी आल्यावर प्रेमाच्या त्या अलवार भावना उचंबळून येतात तेव्हा एकमेकींवर फूलांच्या पाखळ्यांची उधळण करुन जगण्यात आनंद भरण्याचा असहाय प्रयत्न करतात.
या नाटकातील संवाद हे बुंदेलखंडी सारख्या हिंदी भाषेत असल्याने प्रेक्षकांना समजण्यास जरी थोडं कठीण गेलं असलं, तरी अभिनयाची ताकद इतकी उंचीची होती की शब्दांची गरजही संपली होती.या नाटकाचे संपूर्ण देशात सादरीकरण झाले असून नागपूरात हा या नाटकाचा ५१ वा प्रयोग होता.
नाटकानंतर ‘सत्ताधीश’ने या नाटकाची दिग्दर्शक तसेच सर्वात मोठी ठकुराईनची भूमिका साकारणा-या स्वाती दुबे यांना या नाटकाद्वारे त्यांना नेमके प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा आहे?असा प्रश्न केला असता, हे नाटक हिंसेपासून मोक्षकडे जाणारे असल्याचे त्या सांगतात.नाटकाची सुरवात होते मारल्या गेलेल्या ठाकूरांच्या हत्याकांडापासून,त्यांच्या विधवांच्या मनात उद् वणा-या सूडाच्या भावनेपासून पण सूडभावना ही शेवटी मोक्षामध्ये परिवर्तित होते.या हत्याकांडानंतर फक्त विधवा उरतात.सूड भावने जळणा-या फक्त विधवा उरतात ज्या की स्त्री म्हणून फूलन देवीसोबत स्वत:ला असाेशिएट करु पाहतात.याचे कारण कुठेही आम्ही उभे राहू मात्र शेवटी आम्ही आपली सगळी ओळख विसरुन फक्त स्त्री म्हणूनच उरतो.जगात कुठेही जा,स्त्रीपणा हाच मागे उरतो.स्त्रीयांच्याच वाटेला संघर्ष येतो,समाज किवा देश कुठलाही असू देत.
नागपूरच्या प्रेक्षकांविषयी प्रश्न केला असता,नागपूरचे प्रेक्षक हे खूप सुजाण असल्याची दाद दिग्दर्शिकेने दिली.खूप चांगले प्रेक्षक होते,संवेदनशील मनाची आणि समजूतदार प्रेक्षक होते असे कौतूक तिने केले.हे नाटक फार गंभीर आहे.हे नाटक टाळ्या खाणारे नाटक नाही.ये नाटक शोर की डिमांड नही करता,असे त्या सांगतात.नाटक सायलंस की डिमांड करता है और नागपूर के प्रेक्षकोने अंत तक वो खामोशी बरकरार रखी.ये तयार प्रेक्षक है इस तरह की गंभीर नाटक के लिये.ये नाटक बच्चो के लिये नही है,ये नाटक उन गंभीर लोगो के लिये है जो विचार करना जानते है.अश्या प्रकारची घटना किवा विषयांना घेऊन जे विचार करतात त्यांच्यासाठी हे नाटक आहे आणि नागपूरच्या प्रेक्षकांमध्ये आम्हाला ते मिळाले,असे स्वाती सांगतात.
तुम्हाला याच विषयावर नाटक का करावसं वाटलं?असा प्रश्न केला असता,मी बुंलेदखंडातून येत असून या नाटकात जे काही दाखविण्यात आले ते फार जवळून मी पाहीले,अनुभवले आहे.त्यामुळे मला वाटतं इतर कोणाची तरी गोष्ट सांगण्या ऐवजी मला आपल्या जवळपासची आणि स्वत:ची गोष्ट सांगितली पाहीजे.मला वाटतं जगात एकच गोष्ट आहे ती सर्वव्यापक आहे ती म्हणजे ‘संवेदना’.त्याची कोणतीच तोड नाही मग ती भारतात असो किवा विदेशात.
‘अगरबत्ती’या नाटकात हर्षिता गुप्ता,सृष्टि बोबडे,शिवांजली गजभिये,साक्षी गुप्ता,ज्योत्सना कटारिया,अन्वेषा पाठक,सुनीता नामदेव,साक्षी दुबे,शिवम भवंरिया,अर्पित,सावन,बॉबी सप्रे,वंदित सेठी,उत्सव हंडे यांच्यासह स्वाती दुबे यांनी भूमिका साकारल्या.नेपथ्य,ध्वनि,प्रकाश योजना स्वाती दुबे यांची होती.
उद्या गुरुवारी ’हूंकारो’’
उद्या गुरुवार दिनांक २३ फेब्रुवरी रोजी रोहित टाकलकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘हूंकारो’या नाटकाचे सादरीकरण होणार असून हे नाटक एक प्रकारे हरयाणवी,हिंदी,मारवाडी,भोजपुरी आणि अवधी भाषेतील विविध कहाण्या असणार आहे जे प्रेक्षकांना नॅरेटरसोबत हळूहळू बांधून ठेवणार आहे.
जयपूर येथील रंगमंदिराचे हे सादरीकरण असून नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने याही नाटकाला प्रतिसाद देण्याचे आवाहन क्लाप संस्थेने केले आहे.
अधिक माहितीसाठी ८८०००४४४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.