संविधान महानाट्याचे ‘शिवशाही’ महोत्सवात दमदार सादरीकरण
नागपूर,ता.१७ फेब्रुवरी २०२४: अनेक वर्षांपासून बहुजन विचार मंचाच्या माध्यमातून आम्ही संविधान जागर करीत आहोत.प्रत्येक घरात संविधान हे असायलाच हवा कारण तोच आपला राष्ट्रग्रंथ आहे.संविधान जागरच्या माध्यमातून संविधानाप्रती जनजागृती आम्ही करतोय.आज सरकारातील काही मंत्र्यांची विधाने ऐकली तर देशाचे संविधान धोक्यात तर नाही ना अशी शंका येते.त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची हीच वेळ आहे असे आवाहन, बहूजन विचार मंचचे संस्थापक व ‘शिवशाही’महोत्सवाचे आयोजक नरेंद्र जिचकार संविधान जागर दिनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी केले.
शिवशाही महोत्सवाचा चौथा दिवस संविधान जागर म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी माजी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.
प्रसिद्ध अधिवक्ता फिरदौस मिर्जा यांनी ‘भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ संविधान’ या विषयावर व्याख्यान करताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्याला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले असे सांगत,भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले.अनेक वर्तमानातील उदाहरण देऊन भारतीय संविधान कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिध्द केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याला स्पर्श करीत संविधान लिहण्याची प्रक्रिया, झालेला वादविवाद, आलेल्या समस्या,त्या समस्यांवर मात करीत समतावादी संविधान देशाला अपर्ण करण्याचा धगधगता इतिहास ‘संविधान’ या महानाट्याच्या रूपाने शिवमंचावर सादर करण्यात आले.संविधान या महानाट्याचे दिग्दर्शक नितीन बन्सोड असून लेखन अमन कबीर यांनी केले.रवी पाटील यांनी बाबासाहेबाची भुमिका केली.प्रकाशयोजना बाबा पदम तर पाश्र्वसंगीत आणि ध्वनी मुद्रण चारूदत्त जिचकार यांचे होते.
हिंदू कोड बिल, पुणे करार,३७० कलम, रमाबाईचा मृत्यू, फाळणीची दंगल या सारख्या अनेक प्रसंगाने नाटकाला वेगळ्या उंचीवर नेले.२ तास १५ मिनिटांच्या या नाटकात १२० कलावंतांनी अभिनय केला.
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात ‘म्हातारा पाऊस’ ही एकांकिका सादर करण्यात आली.यात सचिन गिरी, मंजुश्री डोंगरे, रूचिता पंडिया, अनंत घुलक्षे यांनी भुमिका साकारल्या.
……………………………..