नागपूर,१८ फेब्रुवरी २०२४: शिवशाही महोत्सवात स्त्री शक्तीचा सन्मान होणे हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणे होय, कारण स्वराज्यात स्त्रियांना आपल्या आईचा दर्जा छत्रपतीं शिवाजी राजे यांनीच दिला. शिवशाही महोत्सव नागपूरात साजरा होतोय याचा मला जास्त आनंद आहे कारण नागपूर शहर माझ्या साठी विशेष महत्त्व ठेवतं.माझा पहिला सिनेमा हा नागपूरात प्रदर्शित झाला आणि हिट ठरला,असे उद् गार सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी काढले.नरेंद्र जिचकार आयोजित ‘शिवशाही’ महोत्सवाचा पाचवा दिवस स्त्री शक्ती संवेदना म्हणून साजरा करण्यात आला,याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर कारागृह अधीक्षक दिपा आगे , प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत या होत्या.
प्रास्ताविक मांडताना नरेंद्र जिचकार यांनी स्त्री शक्ती सन्मानाविषयी माहिती दिली.ते म्हणाले जो पर्यंत आपण स्त्रियांचा सन्मान करणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाला माणूसपण येणार नाही.राष्ट्राला दिशा देण्याचे कार्य स्त्री करीत असते तीच आपल्याला संस्कारीत करते.तोच समाज सभ्य मानला जातो जिथे स्त्रियांचा सन्मान होतो.याप्रसंगी अध्यक्षिय भाषण करताना दिपा आगे म्हणाल्या,की सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी उघडलित म्हणून आज हा सन्मान आम्हा स्त्रियांना मिळत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे ( राजकारण) सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरु णासबाणे ( समाजसेवा साहित्य) डॉ. सपना शर्मा ( मानसोपचार), डॉ.प्राची माहुरकर ( सेंद्रिय शेती) अनुसया काळे छाबराणी ( पर्यावरण) प्रतिमा बोंडे ( खेळ) मैत्रयी जिचकार ( शिक्षण) यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
त्यानंतरच्या सत्रात हभप पुरषोत्तम महाराजांचे कीर्तन झाले.कीर्तनात महाराजांनी स्त्री शक्ती वर प्रकाश टाकला. स्त्रियांनी जिजाऊंचा आदर्श घेऊन आपल्या घरात शिवबा घडवावा असा संदेश दिला.
दुपारी गझलधारा कार्यक्रम सादर झाला.सुरेश भट गझल मंच पुणे यांनी मराठी उर्दू गझलांचा मुशायरा सादर करुन समां बांधला.
सुप्रसिध्द सुरेश वैराळकर यांच्या साथीने आठ गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या.
………………………..