मोदींची ‘अग्निवीर’योजना देशविरोधी
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.विनीत पुनीया यांचा घणाघाती आरोप
‘जय जवान’ यात्रा काढून काँग्रेस लढणार त्या दीड लाख युवकांचा लढा
नागपूर,ता.८ फेब्रुवरी २०२४: दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यात ‘अग्निवीर‘योजना आणली मात्र,त्या पूर्वीच संपूर्ण देशातून दीड लाख तरुणांची निवड सैन्याच्या तिन्ही दलात झाली होती,अग्निवीर योजना लागू होण्या पूर्वीच अतिशय परखड परिक्षेतून व अग्निदिव्यातून पार पडलेल्या या दीड लाख तरुणांची सैन्यासाठी निवड झाली होती .त्यांची निवडच ही योजना लागू झाल्यानंतर मोदी सरकारने रद्द केली,यात हजारो तरुण हे महाराष्ट्रातील देखील होते,इतकंच नव्हे तर त्यांना पुन्हा अग्निवीरसाठी देखील संधी देण्यात आली नाही,एकीकडे मोदी हे देशभक्तीच्या मोठ मोठ्या गोष्टी करतात मात्र,ते देशविरोधी असल्याची घणाघाती टिका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.विनीत पुनिया आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे,जिल्हाध्यक्ष,ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र मूळक,महासचिव अतुल कोटेचा,कमलेश समर्थ,प्रशांत धवड,संजय महाकाळकर.प्रा.दिनेश बानाबाकोडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.पुनिया यांनी सांगितले की,या दीड लाख तरुणाईच्या समर्थनार्थ काँग्रेस संपूर्ण देशातील २० शहरातून ‘जय जवान’यात्रा काढणार आहे.त्या दीड लाख तरुणांवर झालेल्या अन्याय विरोधात न्याय मागण्यासाठी अनेक शहरात आम्ही पत्रकार परिषदा घेत आहोत.या तरुणांची निवड सैन्याच्या तिन्ही दलासाठी लष्कर,नौदल व हवाई दलासाठी झाली होती.सैन्यात भरती होण्याची प्रक्रिया ही आधीच खूप कठीण व खडतर असते मात्र,मोदी सरकारने एका झटक्यात या तरुणांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.त्यांना सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची होती मात्र,त्यांना मोदी सरकारने न्याय संधीच नाकारली.त्यामुळेच काँग्रेस संपूर्ण देशात या तरुणांच्या समर्थनार्थ ‘जय जवान’यात्रा काढणार असून या सर्व तरुणांना सैन्यात घेण्याची मागणी काँग्रेस करणार असल्याचे डॉ.पुनिया यांनी सांगितले.
काँग्रेसच्या दोन प्रमुख मागण्या असून,पहीली मागणी ही या दीड लाख तरुणांना सैन्यात भरती करुन घेण्याची असून, दूसरी मागणी सैन्य भरतीची प्रक्रिया पुन्हा पूर्वीसारखीच करण्यात यावी,ही आहे.यात आताच्या अग्निवीरांना देखील समाविष्ट करण्यात यावे.त्यांना देखील सैन्य दलासारखीच संपूर्ण सुविधा मिळावी.या मागणीला घेऊन आम्ही १ फेब्रुवरी ते १८ फेब्रुवरी दरम्यान ३० लाख कुटूंबियांपर्यंत पाेहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.आमची मागणी मान्य न झाल्यास ५ ते १० मार्च दरम्यान काँग्रेसतर्फे‘सत्याग्रह’ धरना दिला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई ‘न्याय यात्रा’काढली आहे.या यात्रेला प्रत्येक ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळत आहे.काँग्रेस न्याय योद्धांकरवी प्रत्येक जिल्हामध्ये ५० किलोमीटरची पदयात्रा काढणार आहे.देशातील कोणताही नागरिक ९९९९८१२०२४ या क्रमांकावर संपर्क साधून यात्रेसाबत जुळू शकतो किवा Jay jawan.in या लिंकवर नोंदणी करु शकता.
याप्रसंगी बोलताना डॉ.पुनिया यांनी माजी सैन्यप्रमुख मनोज नरवडे यांच्या पुस्तकातील संदर्भ देत,नरवडे यांनी मोदी सरकारची ‘अग्निवीर’ ही योजना सैन्यासाठी वज्राघात असल्याचे नमूद केले आहे.विशेष म्हणजे मोदी यांची अग्निवीर योजना ही सैन्य दलांशी कोणतीही चर्चा न करता अचानक लादण्यात आली असल्याचे नमूद केले.या योजनेत आधी ७५ टक्के अग्निवीरांचा समावेश सैन्यात होणार होता मात्र दोनच वर्षात मोदी सरकारने ही टक्केवारी ७५ वरुन २५ टक्के केली.सुरवातीला ही योजना फक्त सैन्यासाठी होती मात्र,आता ती लष्कर ,नौदल व हवाई दलासाठी देखील लागू केली.
आपल्या समोर रशियाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे डॉ.पुनिया म्हणाले.रशियामध्ये अग्निवीरासारख्या योजना राबवून खासगी सैन्य ठेवल्या जातात,युक्रेन विरोधातील युद्धात रशियाच्या खासगी सैन्याचा प्रभाव व मर्यादा स्पष्टपणे दिसून पडल्या.मोदी सरकारने सैन्याच्या सल्ल्लयाशिवाय जबरदस्ती अग्निवीर योजना राबवली,असा आरोप याप्रसंगी डॉ.पुनिया यांनी केली.सैन्यातील शिस्तीमुळे ते मोदींच्या या योजनेचा विरोध करु शकले नाही.आम्ही सैन्याच्या या शिस्तीचा सन्मान करतो,ते आपली व्यथा उघडपणे माध्यमांमध्ये मांडू शकत नाही.मात्र,माजी सेनाप्रमुख यांनी आपल्या पुस्तकात ही व्यथा मांडली असून, मोदींची अग्निवीर योजना ही सैन्यावर ‘वज्राघाता’सारखी असल्याचे नमूद केले आहे.
नागपूरात मानकापूर येथे सध्या अग्निवीरसाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून तरुणांमध्ये कुठेही निराशा दिसून येत नाही तर उलट उत्साह का दिसून पडतो?असा प्रश्न केला असता, देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अग्निवीर योजने सहभागी होणे ही तरुणांची देखील मजबुरी बनली असल्याचे डॉ.पुनित म्हणाले.जे चूक आहे ते चूक आहे.२०२२-२३ मध्ये अग्निवीरसाठी भरती होण्यासाठी अर्जाची संख्या ही ३४ लाख एवढी होती मात्र,२०२३-२४ मध्ये ती संख्या १० लाखांवर आली.२४ लाख तरुणांनी अग्निवीर योजनेत सहभागी होण्यास अनिच्छा दाखवली तर दुसरीकडे,उत्तरप्रदेशात पोलिस खात्यात हवालदार पदाच्या भरतीसाठी ५० लाख तरुणांनी अर्ज केले,हे कशाचे द्योजक आहे?असे विचारुन, देशातील तरुणांना अल्पकाळातील बेभरवश्याच्या सैन्यातील नोकरी ऐवजी कायम स्वरुपाची राज्य सरकारच्या नोकरीमध्ये विशेष रुची असल्याचे त्यांनी सांगितले आणि हे कोणत्याही देशाच्या सुरक्षा प्रक्रियेसाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या अतिशय चुकीच्या नीतीमुळे देशाची सुरक्षाच धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहूल गांधी यांनी त्यांची न्याय यात्रा काढताना इंडिया आघाडीतील मित्र पक्षांची सरकार असलेल्या प.बंगाल,बिहार यासारख्या राज्यातील प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेतले नाही,काँग्रेसने कर्नाटक,तेलांगणा जिंकले याचा अतिआत्मविश्वास काँग्रेसला आला आहे का की त्यांना मित्र पक्षांची गरज वाटत नाही?असा प्रश्न केला असता,मित्र पक्षांशी वार्तालाप चालत राहत असल्याचे त्यांनी सांगितले.इतकंच की आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला जास्त संधी मिळायला हवी असे वाटणे स्वाभाविक आहे मात्र,याचा हा अर्थ नाही की आम्ही आघाडीच्या विरोधात आहोत,असे उत्तर त्यांनी दिले.
सर्वात शेवटी, मोदी यांनी आपला अहंकार बाजूला सारुन दीड लाख तरुणांसह त्यांच्या कुटूंबियांना दिलासा दिला पाहीजे,अशी मागणी त्यांनी केली.
………………….