रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी दिली माहिती
जिल्ह्यातील नागरिकांना कला, क्रीडा, साहित्य, विविध स्पर्धांची मेजवानी
नागपूर/रामटेक दि.१८ : राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलावंत आणि स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, चर्चासत्र,महानाट्य,लेजर शो, साहसी खेळ, बचतगटांचे स्टॉल्स,फुड कोर्ट अशी मेजवानी असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी महाकवि कालिदास भूमी रामटेकनगरीत तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार ,१९ जानेवारी रोजी या महोत्सवाची येथील नेहरू मैदानावरील मुख्य कार्यक्रमस्थळी सुरूवात होणार असल्याची माहिती रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यभर आयोजित होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात रामटेक येथून होत आहे. नेहरू मैदानासह,राखी तलाव,गडमंदिर, कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठ आदी ठिकाणांवर
१९ ते २३ जानेवारी दरम्यान या महोत्सवातील विविध कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे सवरंगपते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
विशेषत्वाने स्टेजसह बैठक व्यवस्था, पार्किंग, प्रसाधनगृहांची व्यवस्था आणि आरोग्य विभागाच्या टिमही येथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नेहरू मैदानापासून आदर्श शाळेच्या मागील मैदान, ठाकूर नगरातील मैदान, मानापुर रस्त्यावरील कोल्हे ले आऊट, पूर्वी लॉन समोरील तलावाजवळची जागा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
या महोत्सवात सहभागी होण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळाहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
महासंस्कृती महोत्सवात नेहरू मैदानावर क्रमशः २० जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, २१ जानेवारीला गायक हंसराज रघुवंशी तर २३ जानेवारीला कैलाश खैर यांचे सादरीकरण होणार आहे. २२ जानेवारीला सिंधुरागिरी महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.
या सोबतच स्थानिक कलाकारांचेही सादरीकरण होणार आहे. रामटेक येथील रामधाम नटराज कलावंत गृपचे ४५ कलावंत रामायण नृत्य नाटिका सादर करणार आहेत. देवलापार येथील आदिवासी कलाकारांचा गृप वैविध्यपूर्ण आदिवासी नृत्य सादरीकरण करेल. ढोल ताशा पथकाचे सादरीकरणही होणार आहे.
कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठ येथे कवि कालिदासांवरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मुख्य कार्यक्रमस्थळी १००x ८० फुट आकाराचा स्टेज उभारण्यात आला आहे. मैदानावर भल्या मोठ्या आकाराच्या एलईडी वॉल उभारण्यात आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिराची ५२ फुट उंच प्रतिकृती आणि यज्ञकुंड उभारले आहे.महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे व जिल्ह्यातील नागरिकांच्या स्वागतासाठी शहरात ठिक-ठिकाणी कमानी व देखावे उभारण्यात आले आहेत.
महासंस्कृती महोत्सवाचाच भाग असणारा फूड कोर्ट आणि बचत गटांचे स्टॉल्स येथील राखी तलाव परिसरात उभारले आहेत. त्या महोत्सवा अंतर्गत २२ जानेवारी रोजी वनविभागाच्यावतीने प्रभू श्रीराम आणि रामटेक गड मंदिर परिसर, निसर्गरम्य रामटेक आणि रामटेक परिसरातील ऐतिहासिक स्थळ विषयावर खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या महोत्सवासाठी गड किल्ल्यावर खास रोषनाई करण्यात आली आहे.
कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा ,फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे.
नागपूर जिल्हा प्रशासनाने यापूर्वी १३,१४,१५ जानेवारी रोजी महानाट्य जाणता राजा नागपूर शहरात आयोजित करून महानाट्य महोत्सवाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला होता त्यानंतर आता रामटेक येथून हा राज्यस्तरीय संस्कृती महोत्सव सुरू होत आहे. त्यानंतर राज्याच्या इतर भागात हा महोत्सव सुरू होईल.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवातील विविध विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
……………………………