नाट्यक्षेत्राचा संपूर्ण इतिहास सांगणारा ‘१ ते ९९’नाट्याची प्रस्तुतीच टाळली
कारणीभूत नागपूरकर नाट्यकर्मीच!नाट्यकर्मींचा उघड उघड आरोप
गजानन महाराज महानाट्यावरुन देखील रंगला वाद !
नागपूरच्या नाट्यक्षेत्रातील घाणेरड्या राजकारणाचा आला वीट:नाट्यकर्मींचा संताप
माझ्या बोलण्याचा विपर्यास:नरेश गडेकर
गजानन महाराजांवरील प्रयोगासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.९ जानेवरी २०२४ : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलानाचे शंभरावे पर्व नुकतेच संस्कृतीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणा-या पुण्याचेच उपशहर असणा-या पिंपरी-चिंचवड येथे दिनांक ६ व ७ जानेवरी रोजी पार पडले मात्र,अस्सल नागपूरकरांचे असणारे व नागपूरात कोविड पूर्वी पार पडलेल्या ९९ व्या नाट्य संमेलानात, राज्यभराच्या संपूर्ण नाट्यकर्मींच्या कौतूकास पात्र ठरलेले ‘१ ते ९९’ हे नाट्य संमेलनाच्या संपूर्ण ९९ संमेलनाध्यक्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारे नाट्यच, शंभराव्या नाट्य संमेलनातून बाद करण्यात आले,परिणामी नागपूरच्या नाट्यकर्मींमध्ये पराकोटीची नाराजी असून यासाठी नागपूरातील नाट्य परिषदेचे पदाधिकारीच कारणीभूत असल्याचा उघड-उघड आरोप करण्यात येत आहे.
नाट्यसंमेलनाच्या इतिहासात कधीही न घडलेला असा माहितीपूर्ण कार्यक्रम २०१९ मध्ये सुरेश भट सभागृहात तुडूंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर झाला होता.नाट्य संमेलनाच्या इतिहासातील आतापर्यंतच्या ९९ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचा माहितीपट तब्बल २०० कलावंतांनी सादर केला होता.यात अवघ्या ३ वर्षाच्या बालकापासून तर ८० वर्षीय ज्येष्ठ कलावंत सहभागी झाले होते.अवघ्या दोन तासात अतिशय माहितीपूर्णरित्या या ९९ संमेलनाध्यक्षांच्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा या कार्यक्रमात सादर करण्यात आला होता.त्यावेळी सभागृहात उपस्थित काही माजी संमेलनाध्यक्षांनी देखील नागपूरकर कलाकारांच्या या बहारदार सादरीकरणाला भरभरुन दाद दिली होती.संपूर्ण ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या चर्चेस्थानी अस्सल नागपूरकरांची ही कलाकृती चर्चेचा व कौतूकाचा विषय ठरली होती.
२८ ऑगस्ट १९०५ रोजी मुंबईत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पहिले नाट्य संमेलन रंगले होते.१९०५ ते २०१९ पर्यंतच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांची माहिती रसिकांना करुन देण्याची संकल्पना ज्येष्ठ रंगकर्मी देवेंद्र बेलणकर यांनी नाट्य संमेलनाच्या निमित्त पार पडलेल्या बैठकीत सर्वप्रथम मांडली.त्यांची ही भन्नाट संकल्पना पदाधिका-यांनी देखील उचलून धरली व अडीच तासांच्या कार्यक्रमात रसिकांसमोर अगदी कल्पकतेने मांडण्यात आली.मागे स्क्रीनवर प्रत्येक अध्यक्षाचे नाव,संमेलन किती साली आणि कुठे झालं,त्या संमेलनाची तरीख अगदी बिनचूक दाखविण्यात आली होती.त्याचबरोबर तीन रंगकर्मींच्या माध्यमातून एक-एक अध्यक्षांची ओळख रसिक प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यातून,प्रहसनातून,त्यांच्या नाटकातील उता-यातून आणि त्यांच्याविषयीच्या माहितीतून देण्यात आली होती.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर नाट्य संमेलनात कसे बदल होत गेले याचे अप्रतिम विवेचन या संमेलनाच्या वारीचं विशेष आकर्षण ठरलं होतं.या कार्यक्रमासाठी नरेश गडेकर,आसावरी तिडके,रुपाली मोरे या नागपूरच्या रंगकर्मींनी विशेष मेहनत घेतली होती.वि.वा.शिरवाडकर,पु.ल.देशपांडे,आचार्य अत्रे,ग.दि.माडगुळकर,नाना पाटेकर,भक्ती बर्वे,पुरुषोत्तम दारव्हेकर,न.चि.केळकर,दादासाहेब खापर्डे,बालगंधर्व आदी अशा दिग्गज ९९ संमेलनाध्यक्षांचा जीवनपट आणि कार्यकाळ नागपूरकर रंगकर्मींनी अवघ्या अडीच तासात उलगडला.आचार्य अत्रे यांच्या अजरामजर ‘मोरुची मावशी’ नाटकातील एका प्रहसलाना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.मावशीच्या भूमिकेतील राजेश चिटणीस या रंगकर्मीला टांग टिंग टिंगावर नाचताना पाहून रसिक प्रेक्षकांनी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडककडाट डोक्यावर घेतले होते.
(छायाचित्र : ९९ व्या अ.भा.मराठी नाट्य संमेलनात २०१९ मध्ये नागपूरात सुरेश भट सभागृहात ‘१ ते ९९’चा प्रयोग सादर झाल्यानंतर रंगमंचावर या नाटकातील सर्व कलावंतांनी अशी उपस्थिती दर्शवली होती)
हा कार्यक्रम म्हणजे सर्व माजी दिग्गज नाट्यसंमेलनाध्यक्षांच्या कार्याला एक प्रकारे मानाचा मुजरा होता.मात्र,नागपूरच्या एवढ्या अस्सल प्रस्तुतीला नाट्यसंमेलनाच्या शंभराव्या नाट्य संमेलनात सादरीकरणाची संधी मिळू नये ही समस्त नागपूरकरांसाठी खेदजनक बाब असून, यासाठी नागपूरातील नाट्य परिषदेचे पदाधिकारी नरेश गडेकर यांच्याकडे बोट दाखविले जात आहे.
देवेंद्र बेलणकर यांच्या मताप्रमाणे दोन महिन्यांपूर्वीच ‘१ ते ९९’च्या सादरीकरणाविषयी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यांनी या कार्यक्रमाचे १० ते १२ प्रयोग विविध विभागीय संमेलनात करणार असल्याचेही सांगितले हाेते.मात्र,नरेश गडेकर यांनी ‘मी हा प्रयोग कुठेही होऊ देणार नाही’,अशी विरोधी भूमिका घेतल्याने,शंभराव्या नाट्यसंमेलनात अस्सल नागपूरकरांचा हा प्रयोग होऊ शकला नसल्याचा धक्कादायक आरोप बेलणकर यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.
या संदर्भात नागपूरातील काही नाट्यकर्मींनी नागपूरातील सांस्कृतिक क्षेत्रावर मोठी पकड असणारे गिरीश गांधी यांची देखील भेट घेतली.त्यांनी नाट्य परिषदेतील पदाधिका-यांची बैठक घेतली असता त्या बैठकीत देखील नरेश गडेकरांनी ‘मी हा प्रयोग कधीच होऊ देणार नाही’अशी धक्कादायक भूमिका मांडली असल्याचा दावा केला जात आहेे.
याशिवाय शेगावीचे संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्यावरील नाटकाविषयी देखील नरेश गडेकर यांनी आडमुठी भूमिका घेत,या नाटकावर सर्वस्वी त्यांचाच हक्क असल्याचे सांगून हे नाटक,महानाट्याच्या स्वरुपात खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादर होऊ नये यासाठी देखील ‘नाटक कसे सादर करता,तुमची ॲक्टिविटी बंद करतो,तुम्हाला रंगमंचावर उभे राहू देणार नाही’अश्या धमक्या दिल्याचा आरोप समाज माध्यमात उमटला असून यावर नाट्यक्षेत्रातील कलावंतांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्याचे दिसून पडतंय.
गजानन महाराजांवरील नाटक नरेश गडेकर यांनी १३-१४ वर्षांपूर्वी सादर केले होते.यानंतर या नाटकाचा वाद न्यायालयात पोहोचला.गडेकर यांच्यावर हे नाटक सादर करण्यास बंदी आली.मात्र,गजानन महाराजांवरील महानाट्याचे देखील सादरीकरण होऊ नये यासाठी नागपूरातील नाट्यकर्मींना गडेकर यांच्याकडून दमदाटी करण्या आल्याचा आरोप केला जात आहे. या मागे कारण देत मूळ संकल्पना माझी होती,असा तर्क नरेश गडेकर देत असल्याचा आरोप नाट्यकर्मींनी केला.
‘१ ते ९९’या कार्यक्रमाची मूळ संकल्पना माझी होती मात्र,नरेश गडेकर यांनी या संकल्पनेवर देखील वारसा हक्क गाजवला.माजी संमेलनाध्यक्ष प्रसाद कांबळी तसेच किमान ५० नाट्यकर्मींसमोर या कार्यक्रमाची संकल्पना मी प्रथम मांडली व सर्वांनी ती उचलून धरली होती,असा दावा बेलवणकर करतात.या कार्यक्रमाची निर्मिती नागपूर शाखेने केली होती,
नाट्य परिषदेचे पदाधिकारी म्हणून नरेश गडेकर यांनी सहा महिन्यांपूर्वी एका नाटकाची घोषणा केली होती,यानंतर ती घोषणा कोणत्या अंतराळात हरवली याचा शोध घ्यावा लागेल.नागपूरच्या रंगभूमीसाठी नागपूरातून निवडून जाणा-या नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांनी काहीही भरीव केले नसल्याचा आरोप केला जात आहे.नागपूरकर रंगकर्मींचे पाय ओढणे,त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही,असेच धोरण गेल्या दहा वर्षांपासून नाट्य परिषदेच्यास्तरावर सुरु असल्याची टिका करण्यात येत आहे..
पुण्यातील शंभराव्या नाट्य संमेलनात नागपूरचं ‘तेरवं’हे नाटक पुन्हा सादर झालं.नागपूरातील ९९ व्या नाट्य संमेलनातही या नाटकाचे सादरीकरण झाले होते मग ‘१ ते ९९’ची पुनरावृत्तीला विरोध का करण्यात आला?असा सवाल आता विचारला जात आहे.हा ‘१ ते ९९’च्या २०० कलावंतावर झालेला अन्याय आहे.हे संमेलनाध्यक्षांवरील नाटक होतं.पुण्यातील शंभराव्या नाट्य संमेलनात हे नाटक ‘माईल स्टोन’ठरलं असतं,नागपूरच्या नावलौकिकात भर पडली असती मात्र,र्निबुद्ध नाट्यकर्मींनी द्वेषाचं राजकारण करुन एका भव्यदिव्य कलाकृतीचा गळा घोटळा,असा आरोप करीत,हे नाटक बघून काही माजी संमेलनाध्यक्षांनी नागपूरकर कलावंतांसाठी अभिनंदनाचा ठराव घेतला होता मात्र,काही नागपूरकर नाट्यकर्मींनी उकरुन काढलेल्या निरर्थक वादामुळे हा प्रस्ताव देखील रखडला,असे बोल लावले जात आहे.
कलाकृतीत वाद नसतो,कलावंताच्या परिश्रमाची पायमल्ली करण्यात मात्र,धन्यता मान्यात आली.निश्चितच पुण्यात शंभराव्या नाट्य संमेलनात नागपूरकर पराग घोंगे यांचा दोन पात्री नाट्यप्रयोग ‘परमेश्वर डॉट.कॉम’ आणि हरीश इथापे यांचा ‘तेरवं‘या नाटकाला सादरीकरणाची संधी मिळाली,याचा आनंदच आहे परंतु ‘१ ते ९९’चा प्रयोग होऊ शकला नाही,याची खंत कायम असणार.
आरोपात तथ्य नाही : नरेश गडेकर( नाट्य परिषदेचे सदस्य,नागपूर)
शंभरावे नाट्य संमेलन मध्यवर्तीचं होतं,संपूर्ण महाराष्ट्रातून यानिमित्त प्रस्ताव मागविण्यात आले होते.मध्यवर्तीत ‘१ ते ९९’च्या सादरीकरणाचे प्रस्तावपर पत्र दिले होते का?मी हे नाटक होऊ दिलं नाही,हा आरोप खोटा आहे.असा प्रस्ताव दिला असल्यास पुढील बैठकीत याचा निश्चितच पाठपुरावा करण्यात येईल.नागपूरातील नाट्यकर्मींमधील आपापसातातील भांडणामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या नाटकाचे सादरीकरण टाळले,या आरोपात तथ्य नाही.
माझ्यावर गिरीश गांधींसोबतच्या बैठकीत आरोप केला गेला की’ पद गेलं तरी चालेल पण मी हे नाटक होऊ देणार नाही’माझ्या या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला.‘१ ते ९९’हे नाटक ९९ व्या नाट्य संमेलनात सादर झाले आहे त्यामुळे शंभराव्या नाट्य संमेलनात नवे काही सादर झाले पाहिजे,असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता.या नाटकासाठी सर्वांनीच परिश्रम घेतले होते.हे नाटक किवा संकल्पना माझी आहे,अशी दावेदारी मी कधीही केली नाही.हे नाटक नागपूर शाखेने केले होते.परिणामी,नागपूरकर नाट्यकर्मीं चर्चा करुन हा विषय सांगू शकले असते.
मागच्या कार्यकारणीत विषय झाला होता की शंभराव्या नाट्यसंमेलनात वेगळं काही करायचं आहे.पुणे शाखेनेच सर्व कार्यक्रम ठरवले होते आणि नाट्य संमेलन देखील पुण्यातच होते.हा वादाचा विषय होऊच शकत नाही.नागपूरकर नाट्यकर्मींना जरा जरी अडचण असेल तर मी लिखितमध्ये लिहून देतो.
याशिवाय गजानन महाराज नाटकाविषयी देखील माझ्यावरील आरोप हे सर्वस्वी खोटे आहेत.माझा या वादाशी कोणताही संबंध नाही.महाराज हे सगळ्यांचे आहेत.नागपूरात तर गजानन महाराजांवर दोन नाटक सादर झाले.हिंदीमध्ये पवन तिवारी यांनी बुटीबोरीत देखील गजानन महारांवरील नाटक सादर केले.गजानन महाराजांवरील महानाट्यावरुन कोणी धमकी दिली?हे मला माहिती नाही.सोशल मिडीयावर जी पोस्ट व्हायरल करण्यात आली,त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही.त्या पोस्टमध्ये माझे नाव देखील नाही.संजय पेंडसे यांनी सादर केलेल्या गजानन महाराजांच्या नाटकात तर माझा आवाज मी दिला आहे.जे चुकीचे आरोप करीत आहेत,त्यांनी आता कुठेतरी थांबलं पाहिजे,कोणाशी तरी बोललं पाहिजे.
पुणे,रत्नागिरी,अहमदनगर,सोलापूर,बिड,उस्मानाबाद,लातूर तसेच नागपूरात शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन भरणार असून संधी असेल,प्रपोजल असेल तर तक्रारकर्त्यांनी यावं,बसावं आणि ‘१ ते ९९’च्या प्रयोगाविषयी चर्चा करावी.’पद गेलं तरी चालेल पण हे नाटक मी होऊ देणार नाही,’असे शब्द कार्यकारिणीच्या बैठकीत वापरले जात नाही.शंभरावे संमेलन असल्यामुळे झालेला प्रयोग पुन्हा करण्या ऐवजी काहीतरी वेगळं करावं,असा माझा हेतू होता.त्यातच अडकून राहायचं आहे का?
संमेलन हे कुण्याही एकाचं नसतं,सगळ्यांना घेऊन चालायचं असतं.नागपूर शाखेने संस्थेची विनाकारण बदनामी करु नये.विचार केला पाहिजे,मार्ग काढला पाहिजे.काहीही अडचण असल्यास मी लिखितमध्ये लिहून देण्यास तयार आहे,ज्याला पाहिजे त्याला नावासह लिहून देतो.
वैयक्तिक हव्यासापोटी कलेला कोणी दडपण्याचा प्रयत्न केला?रुपाली मोरे(ज्येष्ठ नाट्यकर्मी)
माझा हा प्रश्न सर्वांना आहे,विषय नागपूर नाट्य परिषदेचा होता,समस्त नागपूरकरांचा होता, ‘१ ते ९९’चा प्रयोग उद् घाटनालाच का नाही पुण्यात पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात झाला? या प्रयोगाचा विषय फक्त नाट्य संमेलनाचा होता,दूसरे काहीच नाही.बाकीच्या नाटकाना ‘विषय’ असतो ते कुठेही सादर होऊ शकतात मात्र ‘१ ते ९९’दूसरीकडे सादर होऊ शकतो का? शंभराव्या नाट्य संमेलनाची आम्ही वाट बघत बसलो.नागपूरातील नाट्य परिषदेतील पदाधिका-यांनी आम्हाला शब्द दिला होता कि नागपूरातील आठ ते दहा प्रयोग पुण्यातील शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलनात होतील,झाले मात्र दोनच!याशिवाय महाराष्ट्रभर नागपूरातील प्रयोग लागतील,याला आता अर्थ तरी उरला आहे का? पुण्यात नाट्य संमेलनाच्या उद् घाटनालाच ‘१ ते ९९’चा प्रयोग व्हायला हवा होता.यासाठी नागपूरच्या नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांनी का यासाठी पुढाकार घेतला नाही?हा माझा नव्हे तर समस्त नागपूरकरांचा त्यांना प्रश्न आहे.
‘१ ते ९९’नाट्य प्रयोगातील दीडशे ऑन स्टेज काम करणा-यांच्या कलेला वैयिक्तक हव्यासापोटी दडपण्याचा कोणी प्रयत्न केला?आता पुण्याचं जाऊ द्या,अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.अजय पाटील यांनी दोन दिवसात भेटतो तुला,असे सांगत आहेत.‘१ ते ९९’चे चार पाच प्रयोग पुर्ण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करु,असे आता ते सांगत आहेत.तुम्हाला तर आठवण आली नाही,आता हा मुद्दा नागपूरातील नाट्य जगतात तापत असल्याने ही बोळवण सुरु झाली आहे का?