नागपूर,ता.२८ डिसेंबर २०२३: नुकतेच संसदेत अधिवेशना दरम्यान मला भारतीय जनता पक्षाचा एक खासदार चोरुन भेटला,ते खासदार आधी काँग्रेसमध्ये होते.मला भेटताच ते म्हणाले,तुमच्याशी बोलायचं आहे,मला वाटलं त्यांना काही कौटूंबिक अडचणी असतील मात्र,त्यांनी सांगितलं भाजपमध्ये आता सहन होत नाही,शरीर भाजपमध्ये असलं तरी मन काँग्रेस पक्षातच आहे,यातून हेच स्पष्ट होतं की त्यांचे मन हे त्यांच्या शरीराला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी घाबरत आहे,खासदार असून ही एवढी भीती कशाची वाटते?असा प्रश्न केला असता,भाजपमध्ये फक्त गुलामी चालते,वरुन आदेश येतात त्याचेच पालन करावे लागते,मग ते आदेश मनाला मान्य असो किवा नाही,अशी व्यथा खासदारांनी माझ्याकडे कथन केली,याचाच अर्थ भारतीय जनता पक्षात फक्त ‘गुलामी’ चालते,’लोकशाही’ नाही,अशी घणाघाती टिका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व शीर्षस्थ नेते राहूल गांधी यांनी केली.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या दिघोरी येथील‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभेला ते संबोधित करत होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की पूर्वी आपल्या देशात राजा-महाराजा आदेश देत होते आणि प्रजा त्याचे पालन करीत होती,आता पुन्हा देशात तीच स्थिती उद् भवली आहे.स्वत: माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी पंतप्रधान मोदींना बैठकीत देशातील शेतक-यांना त्यांनी लागू केलेल्या जीएसटी कर प्रणालीचा किती फायदा होईल,असे विचारले असता त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली.
मोदींना कोणी प्रश्न विचारलेले आवडत नाही.मोदींची विचारधारा ही ‘राजा’लोकांची विचारधार असल्याची टिका याप्रसंगी राहूल गांधींनी केली.आमच्या पक्षात आवाज हा खालून वर जात असतो.लहानतला लहान कार्यकर्ता हा कोणत्याही काँग्रेसी नेत्याला प्रश्न विचारु शकतो.मला देखील सांगत असतात माझी अमूक गोष्ट त्यांना आवडली नाही.मी त्यांना त्या मागचं कारण सांगतो व समजावित असतो मी नेमकं असं का बोललो किवा अशी कृती का केली.मी त्यांचे म्हणने ऐकत असतो,त्यांच्या मताचा आदर करतो,मी त्यांच्या मताशी सहमत नसलो तरी त्यांचे म्हणने ऐकतो आणि हीच खरी लोकशाही आहे.
आम्हाला प्रश्न विचारला जातो,एवढ्या दशकात काँग्रेसने काय केले?स्वातंत्र्या पूर्वी देशात ५००-६०० राजे महाराजे होते.त्यांची मिलीभगत इंग्रजांसोबत होती.राजा महाराजांना २१ तोफांची सलामी मिळत असे.मात्र,हिंदूस्तानच्या जनतेचा कोणी वाली नव्हता.गरीबांची जमीनही राजे महाराजे हिसकत होते.आता मात्र गरीबांच्या अधिकारांचे रक्षण जो संविधान करतोय,तो संविधान देशाला बहाल करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांनी केले.राष्ट्रीय स्वयं संघ आणि भाजपतर देशाला संविधान लागू व्हावा,याच्या विरोधात होते.अनेक दशके तर त्यांनी तिरंगाचा सन्मान ही नाही केला.हजारो वर्ष जे मिळाले नव्हते ते काँग्रेसने या देशाला दिले.अनुसूचित जाती,जमाती,स्त्री,पुरुष,भाषिकते पलीकडे प्रत्येकाला एक व्यक्ती एक मत देण्याचा संवैधानिक अधिकार आम्ही बहाल केला.यासाठी गांधी,नेहरु,आंबेडकर यांना कारागृहात देखील जावे लागले.वर्षानुवर्ष त्यांना संघर्ष करावा लागला.देशाची धुरा ही देशातील जनतेच्या हातात असली पाहिजे,हा विचार काँग्रेसने देशाला दिला.
आम्ही देशाला राजा महाराजा जसे चालवित होते,तसा देश चालवायचा नव्हता.आम्ही लोकशक्तीवर विश्वास ठेवतो.स्वातंत्र्याची लढाई ही फक्त इंग्रजांविरुद्ध नाही तर राजा महाराजांच्या विरुद्ध देखील होती.इंग्रज आणि राजे महाराजे यांची भागीदारी होती.त्या संघाची विचारधारा आम्ही बदलली मात्र,एकदा पुन्हा ते त्याच विचारधारेकडे देशाला घेऊन जात असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला.
देशात सध्या विचारधारेचीच लढाई सुरु आहे.लोकांना वाटतंय ही राजकीय किवा समतेची लढाई आहे मात्र,या लढाईची नीव ही विचारधारा हीच आहे.देशातील खूप सारे राजकीय पक्ष एनडीए तसेच इंडिया आघाडीमध्ये दिसतात मात्र,फक्त दोन विचारधारांमधील ही लढाई असल्याचे ते म्हणाले.
केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वास दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे.
ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. या देशात श्वेत किवा हरीत क्रांती ही महिलांनी व तरुणांनी केली आहे,काँग्रेसने फक्त त्यात आपला सहयोग दिला.आता देशात तरुणांच्या हाताला काम नसून त्यांच्या हातात फक्त मोबाईल आहे ज्यावर ते आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवातना दिसून पडतात.देशातील दोन तीन अरबपतींच्या हातात संपूर्ण रोजगाराची साधने देऊन टाकण्यात आली आहे.
अग्निवीर योजना लागू होण्या पूर्वी देशातील एक लाख पन्नास हजार तरुणांची निवड सैन्यात झाली होती.शारीरिक चाचण्या देखील ते उत्तीर्ण झाले होते मात्र,मोदी यांनी देशात अग्निवीर योजना आणली आणि या तरुणांचे जीवन उधवस्त झाले.त्यांना सैन्यात तर घेतलेच नाही मात्र अग्निवीर योजनेतही त्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली नाही.त्यांच्या गावात त्यांची टर उडविली जाते,‘खोटे सैनिक’असे त्यांना टोमणे मारले जातात.लाखो तरुणांचे आयुष्य उधवस्त करुनही स्वत:ला ते देशभक्त म्हणून घेतात,अशी टिका राहूल गांधींनी केली.
मी स्वत: संसदेत प्रश्न विचारला,देशाला ९० आयएएस सनदी अधिकारी चालवित आहेत त्यात किती ओबीसी आहेत?देशात ५० टक्के ओबीसी,१५ टक्के अनुसूचित जाती व १२ टक्के अनुसूचित जमातीचा वर्ग आहे मात्र ९० पैकी फक्त ३ अधिकारी हे ओबीसी प्रवर्गातील होते.५० टक्के ओबीसींची लोकसंख्या असतानाही त्यांना बाजूला सारले जात आहे.छोट्या छोट्या संस्थेत बसवले जात आहे. महाराष्ट्रात देखील सर्वोच्च कंपन्यांमध्ये डेटा काढल्यास वास्तव तुम्हाला दिसून पडेल.
आम्ही जात जनगणनेचा मुद्दा मांडताच मोदी आपलं भाषणच बदलून टाकतात.आता ते देशात फक्त गरीबी हीच जात असल्याचे सांगत आहे.मनरेगासारखी योजना त्यांनी बंद पाडली.आम्हाला देशात दोन देश नाही हवे.एक देश अरबपतींचा एक वंचितांचा.म्हणूच आम्ही चार हजार किलोमीटरची पदयात्रा काढली.’नफरत के बाजार मे मुहब्बत की दूकान’ आम्ही उघडली.महाराष्ट्रात ही यात्रा येताच मला जाणवले या राज्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते हे विशेष आहेत.‘भारत जोडो यात्रेविषयी’त्यांना काहीच सांगावं लागलं नाही कारण त्यांना त्याचे महत्वं माहिती होते.म्हणूनच मी आज त्यांच्यासाठी नागपूरात आलो आहे.ते गब्बर शेर आहेत जे कोणालाही घाबरत नाही.
आपल्याला देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे असे सांगून, हीच काँग्रेसची विचारधारा आहे असे ते म्हणाले. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष, खासदार राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री CWC सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा, दिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्या संध्या सव्वालाखे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ नेते, पदाधिकारी व लाखो लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.