खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा अकरावा दिवस
नागपूर, ४ डिसेंबर २०२३: ‘आधुनिक वाल्मिकी’ असा आदरयुक्त उल्लेख ज्यांचा केला जातो ते लेखक व ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेले आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजाने अजरामर झालेले ‘गीत रामायण’ हे प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अनमोल असे वैभव असलेल्या या गीतरामायण नृत्यस्वरूपात सादर करून शरयू नृत्यकला संस्थेच्या कलाकारांनी रसिकांना रामायण काळाची सफर घडवून आणली.
ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज अकरावा दिवस होता.
आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक डॉ. बबनराव तायवाडे, चेंबर ऑफ असोसिएशनचे दीपेन अग्रवाल, उद्योगपती नितीन खारा, व्हीआयएचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, प्रेरणा कॉन्व्हेंटचे संचालक प्रवीण जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे, सहपोलिस आयुक्त संजय पाटील, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, श्रीधरराव गाडगे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला श्याम देशपांडे व चमूने देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खनगई यांनी केले. त्यानंतर शरयु नृत्यकला संस्था निर्मित ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’ ४० कलाकारांनी सादर केले. सोनिया परचुरे यांच्या नृत्यनिर्देशनात व अतुल परचुरे यांच्या निवेदनाने नटलेल्या या प्रस्तुतीत गीतरामायणातील ‘राम जन्मला गं सखे’, ‘सावळा ग रामचंद्र’, ‘मार ही ताटिका रामचंद्रा’, ‘चला राघवा चला’, ‘आज मी शापमुक्त झाले. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ अशा गीतांवर कलाकारांनी नृत्य सादर केले. यात रामजन्मापासून ते रावण वधापर्यंतचे प्रसंग नृत्यस्वरूपात सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
लहानग्यांचे दमदार ढोलताशा वादन
६ ते १२ वयोगटातील लहानग्या मुलांनी आपल्या छोट्या छोट्या हातांनी ढोलताशा सारख्या अवजड वाद्यांचे अतिशय दमदार सादरीकरण करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले.
नवयुग प्राथमिक शाळेचे शिव नवयुग ढोलताशा व ध्वज पथक हे आशिया खंडातील छोट्या मुलांचे पहिलेच ढोलताशा पथक असून यात केजी टू ते सातवीचे विद्यार्थी यांचा सहभाग होता. मुख्याध्यापक अजय काळे व शिक्षक गौरव शिंदे यांच्या तालमीत तयार झालेल्या या विद्यार्थ्यांनी ‘वक्रतुंड महाकाय’ व गुरू वंदना सादर करून वादनाला प्रारंभ केला. शिवताल, वक्रतुंड ताल, नागपुरी ताल, बिनधास्त तालाचे वादन दमदार वादन करून या लहानग्यांनी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांना मानवंदना दिली.
‘दुनिया आपके बच्चो को अधर्म सीखाये उसके पहले आप अपने बच्चों को धर्म सिखाओ’ असा संदेश या वादनातून देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मंत्री नितीन गडकरी व कांचन गडकरी यांनी बालकलाकारांचे भरभरून कौतूक केले. नितीन गडकरी यांनी अतिशय सुंदर प्रदर्शन केल्याबद्दल मुलांचे अभिनंदन केले व शिक्षकांनी मुलांवर चांगले संस्कार केल्याबद्दल सत्कार केला.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना सांस्कृतिक महोत्सवामध्ये संधी देण्यात येते. लहानग्यांनी त्याचा पुरेपुर लाभ घेत या भव्य मंचावर आपले कौशल्य दाखवले असे म्हणत नितीन गडकरी यांनी या पथकाला भविष्यात अधिक चांगले प्रदर्शन करता यावे, यासाठी भरघोस मदत जाहीर केली.
हजारो शालेय विद्यार्थ्यांनी केले ‘मनाच्या श्लोक’चे सामूहिक पठण
खासदार सांस्कृतिक महोत्सवातील ‘जागर भयक्तीचे’ भव्य समापन
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण विद्यालयाचे पटांगण मंगळवारी सकाळी विविधरंगी गणवेश परिधान केलेल्या शाळकरी मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते. ८३ शाळांतील ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘मनाचे श्लोक’ चे पठण करून मन:शांतीचा परिचय दिला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जागर भक्तीचा’ या उपक्रमाचा भव्य असा समापन सोहळा आज मुख्य मंचावर ‘मनाचे श्लोक’ च्या सामूहिक पठणाने पार पडला. समर्थ रामदास स्वामी रचित ‘मनाचे श्लोक’ द्वारे बालमनावर संस्कार व्हावे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेने विद्यार्थ्यांना खासदार सांस्कृतिक महोत्सवात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, पंडित बच्छराज व्यास शाळेच्या उपप्रधानाचार्य रेणुका खळतकर, कुमार शास्त्री, देवेन दस्तुरे, बाळासाहेब कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला.
विविध शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींनी मंचावरून श्लोक पठणाला सुरुवात केली. त्यामागून विद्यार्थ्यांनी एका सुरात या श्लोकांचे पठण केले. ‘मनाचे श्लोक’ मध्ये एकुण २०५ श्लोक असून त्यापैही पहिल्या ५१ श्लोकांचे यावेळी पठन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुती देशपांडे, हरीश केवटे, दीपाली अवचट, संजय डबली, विजय फडणवीस, अनिल शिवणकर यांचे सहकार्य लाभले. सुरुवातीला राम भाकरे यांनी राम नामाचे भजन प्रस्तुत केले तर रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. विदयार्थ्यांसह शिक्षक, पालक, शाळेचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आज महोत्सवात …
सायं. ६.३० वाजता : प्रसिद्ध गायक मिका सिंग यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट व समारोप