फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसचेत – परंपरा जोडीने केले नागपूरकरांना चार्ज

सचेत – परंपरा जोडीने केले नागपूरकरांना चार्ज

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दहावा दिवस

नागपूर, ३ डिसेंबर २०२३: अल्‍पावधीतच तरुणाईच्‍या हृदयात स्‍थान पटकावणारी व अनेक पुरस्‍कार आपल्‍या नावावर करणारी बॉलिवुडची सर्वाध‍िक डायनॅम‍िक संगीतकार जोडी सचेत आणि परंपराने आपल्‍या धमाकेदार गाण्‍यांनी नागपूरकरांना चार्ज केले. ईश्‍वर देशमुख शारीर‍िक महाविद्यालयाचे भले मोठे पटांगण सचेत-परंपराला ऐकण्‍यासाठी तुडूंब भरले होते. खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या आज दहावा दिवस होता.

आजच्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, नवभारतचे सीएमडी न‍िम‍िष माहेश्‍वरी, ईश्‍वर देशमुख शारीर‍िक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा नायडू, डीसीपी विजयकांत सागर यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला.
‘सिने से तेरे सर को लगा के’ या गीताने सचेत-परंपराने धमाल करायला सुरुवात केली. ‘कसं काय नागपूर तुम्‍ही कसे आहात’ असा मराठीत नागपूकरांशी संवाद साधत या जोडीने सुरुवातीला रसिकांची मने जिंकली. इतके लोक आम्‍हाला ऐकायला येतील असे माह‍ीती नव्‍हते. आजची लाईव्‍ह कॉन्‍सर्ट आमच्‍या आयुष्‍यातील सर्वाधिक उत्‍कृष्‍ट ठरेल असे म्‍हणत दोघांनी ‘हो गये हम और तुम एक’, ‘मेरे सोनिया सोनिया’, ‘फकिरा’ अशा प्रचंड लोकप्रिय गाणी सादर करून धमाल केली.

मैय्या मैनु, मलंग सजना, शिव तांडव, राम सिया राम यांसारखी या जोडीच्या वेगवेगळ्या धाटणीच्‍या गाण्‍यांवर रसिकांनी धूम नृत्‍य केले.,आजच्‍या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

जयतु जयतु भारतम्’ची दमदार प्रस्‍तुती-

बाल कला अकादमी व स्‍त्री श‍िक्षण प्रसारक मंडळ प्रस्‍तुत ‘जयतु जयतु भारतम’ हा संपूर्ण भारतातील विविध राज्‍यातील लोकनृत्‍यांचे दर्शन घडवणारा कार्यक्रम शाळकरी मुलांनी उत्‍कृष्‍टर‍ित्‍या सादर केला. या कार्यक्रमाची संकल्‍पना सीमा फडणवीस यांची होती तर संवाद लेखन रोशन नंदवंशी व विक्रांत साल्‍पेकर यांचे होते. नृत्‍यदिग्‍दर्शक कुणाल आनंदम व सहनृत्‍यदिग्‍दर्शक कोमल चौधरी – पाल हे होते.

बाल कला अकादमीच्‍या अध्‍यक्ष मधुरा गडकरी व स्‍त्री श‍िक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष रवींद्र फडणवीस यांच्‍या मार्गदर्शनात हा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. उर्वरी डावरे, प्रीती नौकरकर यांचे सहकार्य लाभले. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सर्व कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला.
३५० बालकलाकारांनी देशातील वैविध्‍यपूर्ण व रंगारंग संस्‍कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडवले.

बाल कला अकादमीच्‍या विद्यार्थ्‍यांनी देश रंगीला – रंगीला या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. नारायणा विद्यालयाने जम्मु व काश्मिरचे नृत्‍य, इसेन्‍स इंटरनॅशनल स्‍कूलने हिमाचल प्रदेशातील नेती, सोमलवार रामदासपेठ पंजाबचा भांगडा, अव्हेल स्कूलने हरियाणवी नृत्य, डीपीएस लावाने उत्‍तरप्रदेशातील कथक व तम‍िळनाडूतील भरतनाट्यम, हिंदू मुलींची शाळाने राजस्‍थानातील कालबेलिया व महाराष्‍ट्राची दिंडीवारी, नगर परिषद विद्यालय कळमेश्वरने गुजराती गरबा, ललिता पब्लिक स्कूलने मध्‍य प्रदेशचे बधाई नृत्य, महिला महाविद्यालयाचे गोवन नृत्य, एसओएसचे छत्‍तीसगडी कर्मा नृत्‍य, द अचिव्हर्स स्कूलने पश्‍चिम बंगालचे बाउल नृत्य, अस्पायर इंटरनॅशनल स्कूलने बिहारचे झिझिया नृत्‍य, एसओएस वानाडोंगरीने आसामचे बिहू नृत्य, माउंट लिटेरा झी स्कूल बेसाने ओडिशाचे संबलपुरी लोकनृत्य सादर केले. शेवटी सर्वांनी म‍िळून ‘जयतु- जयतु भारतम’ हे थिम सॉंग सादर केले.

महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.

आज महोत्‍सवात …
सकाळी ६.३० वाजता – शालेय विद्यार्थ्‍यांचे मनाचे श्‍लोक पठण
सायंकाळी ६.३० वाजता – शाम देशपांडे यांचा देशभक्‍ती गीतांचा कार्यक्रम
सायं. ६.३० वाजता : नृत्यस्वरूप गीतरामायण

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या