फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘क्रांती नायक’ मधून उलगडला राष्‍ट्रसंतांचा जीवनपट

‘क्रांती नायक’ मधून उलगडला राष्‍ट्रसंतांचा जीवनपट

स्‍थानिक कलाकारांनी गाजवला खासदार

सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा चौथा दिवस

नागपूर, २७ नोव्‍हेंबर : मानवतेचे पुजारी, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे, मनामनात राष्‍ट्रभक्‍ती रुजविणारे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट ‘क्रांती नायक’ या महानाट्यातून सोमवारी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची मंचावर उलगडण्‍यात आला.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्‍या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचा आज चौथा दिवस होता. संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य ‘क्रांती नायक’ प्रस्‍तुत करण्‍यात आले.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्‍यनगरीचे संपादक रमेश कुळकर्णी, लोकशाही वार्ताचे संपादक भास्‍कर लोंढे, लोकसत्‍ताचे संपादक देवेंद्र गावंडे, लोकमतचे श्रीमंत माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्‍यक्ष अशोक येवले, सचिव राजेश कुंभलकर, रामदास टेकाडे, रुपराव वाघ, स‍ियाराम चावके, ज्ञानेश्‍वर रक्षक, माजी महापौर कल्‍पना पांडे, मेघे ग्रुपच्‍या आभा मेघे यांची उपस्थिती होती. दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

रंगभूमी, नागपूर निर्मित ‘क्रांती नायक’ या महानाट्याची निर्मिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी वर्ष २००९ मध्ये करण्‍यात आली होती. या महानाट्याचा आजचा ४९ वा प्रयोग होता. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, मानव सेवा, भजनाच्या माध्यमातून चिमूर क्रांती, गांधीजींसोबत स्वातंत्र्य लढ्यात आणि विनोबाजी भावे सोबत भूदान चळवळीत सहभाग, गावोगावी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना, महामहिम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचेकडून ‘राष्ट्रसंत’ उपाधी, ग्रामगीता लेखन, शाहीर संमेलनातून कला सन्मान, असे महाराजांच्या जीवनातील देवभक्ती आणि देशभक्तीपूर्ण अनेक प्रसंग या भव्य रंगमंचावर प्रस्‍तुत करण्‍यात आले.

सोबतीला पारंपारिक गोंधळ, खंजिरी भजन, पाळणा, ठसकेबाज लावणी, बहारदार आदिवासी आणि दिंडी नृत्याची मेजवानी रसिकांना मिळाली.
एकुण ७० कलावंतांचा समावेश असलेल्‍या या महानाट्याचे लेखक पुरुषोत्‍तम म‍िराशी होते तर निर्मिती व दिग्‍दर्शन विलास कुबडे यांचे होते. संगीत दिग्‍दर्शन वामन काचोळे, नृत्‍य दिग्‍दर्शन विरेंद्र लाटणकर, नेपथ्‍य हेमंत कुबडे व सतीश काळबांडे, प्रकाश योजना क‍िशोर बत्‍तासे, रंगभूषा लालजी श्रीवास, वेशभूषा श्‍यामला कुबडे तर रंगमंच व्‍यवस्‍था सतीश बडगे व अक्षय भगत यांची होती. निर्मिती सहाय्य वामन काचोळे यांचे होते.

तुकडोजी महाराजांच्‍या प्रमुख भुम‍िकेत रमेश लखमापुरे होते तर संजय रहाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. जयदेव वानखेडे, ची. वल्‍लभ, भास्‍कर मेश्राम, मिलिंद रामटेके, मोहन व नितीन पात्रीकर, योगेश राऊत, बिस्‍मार्क भिवगडे, अभिषेक बेल्‍लरवार, रविंद्र भुसारी यांच्‍यासह अपर्णा लखमापुरे, मालती वराडे, दिप्‍ती भाके, रेश्‍मा इंदूरकर, वर्षा मानकर, पूजा वडतकर, हर्षाली काईलकर अशा अनेक कलाकारांच्‍या यात भूम‍िका होत्‍या.

विशाल शेळके यांचा हिंदी गीतांचा नजराणा-

सायंकाळच्‍या सत्राची सुरुवात स्‍थानिक उदयोन्‍मुख गायक, संगीतकार विशाल शेळके यांच्‍या बॉलिवूड गीतांच्‍या कार्यक्रमाने झाली. त्‍यांनी यावेळी हिंदी गीतांचा नजराणा सादर केला. ‘नमो नमो जी शंकरा’ या गीताने भगवान श्री शंकराला वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला. ‘देवा देवा ओ नम:’ या गाण्‍यानंतर ‘शाम सवेंरे तेरी यादे आती है’, ‘मै रंग शरबतों का’, ‘ओ जालीमा’, ‘बन्‍नो रे बन्‍नो मेरी’, ‘कबिरा मान जा’ अशा लोकप्रिय हिंदी गीतांची मेडले सादर केला. पल पल दिल के पास, तुझसे नाराज नहीं जिंदगी, ए शाम मस्‍तानी, छुकर मेरे मन को, प्‍यार दिवाना होता है आदी जुनी लेाकप्रिय गीते सादर केली. तु ही किस्मत मेरी हे त्‍याचे ओरिजनल गीत सादर केले. प्रा. अनिल सोले यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा व व इतर वाद्य कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले. वर्षा रेहपाडे यांनी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांची रांगोळीने रेखाटलेली प्रतिमा आकर्षणाचे केंद्र होती. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
आज महोत्‍सवात …
सकाळी ६.३० वाजता : श्रीसुक्त पठण
सायं. ६ वाजता : आयुष मानकर यांचा हिदी व मराठी गीतांचा कार्यक्रम
सायं. ६.३० वाजता : ‘अॅन इव्हिनिंग विथ सुलतान ऑफ म्‍युझिक’ अदनान सामी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
…………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या