नागपूर,ता.२२ नोव्हेंबर २०२३: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २० हजार चौ.फूट आकाराचा भव्य मंच तयार झाला असून मैदान हजारो लाईट्सच्या प्रकाशात उजळले आहे.
ध्वनी व्यवस्था, आसन व्यवस्था पूर्ण झाली असून पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, २० टॉयलेटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेकडे देखील विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सात प्रवेशद्वारांवर चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात येणार आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी ९ एलएडी स्क्रीनदेखील लावण्यात आले आहेत.
बारा दिवसाच्या या महोत्सवाच्या नि:शुल्क पासेस 91588 80522 वर क्रमांकावर मिस कॉल दिल्यास रसिकांना घरबसल्या ‘ऑनलाईन’ पासेस प्राप्त करता येतील. या पासेस अहस्तांतरणीय राहतील याची नोंद घ्यावी. याशिवाय, कार्यक्रम स्थळीदेखील तसेच, श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, ऑरेंज सिटी चौक, नागपूर येथे प्रत्येक दिवसाच्या सायंकाळाच्या सत्रातील कार्यक्रमाच्या पासेस, त्याच दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्राप्त करता येतील. याशिवाय, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे डिजिटल चॅनेल सुरू करण्यात आले असून व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असलेल्या https://whatsapp.com/channel/0029VaEObkx2UPBAtNMrL21g या चॅनेलला फॉलो केल्यास महोत्सवाचे सर्व अपडेट्स मोबाईलवर प्राप्त करता येतील.
श्री गजानन महाराजांना तीन हजार किलोचा खिचडीचा नैवद्य- –
खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणात गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात सकाळी ६.३० वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होणार असून, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर महाराजांच्या महाप्रसादासाठी तीन हजार किलो खिचडीचा महाप्रसाद तयार करणार आहेत.
सुमारे ४५ हजार गजानन भक्तांना या महाप्रसादाचा लाभ मिळणार असल्याचे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ असे श्री गजानन महाराज नेहमी म्हणायचे. त्यांच्या पोथीमध्ये खिचडीचा उल्लेख आढळतो. गजानन महाराजांच्या पारायणाला सकाळी ६.३० वाजता प्रारंभ होणार होईल. त्याचवेळी वेळी विष्णू मनोहर खिचडी तयार करायला सुरुवात करतील. त्यात, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबिर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्याचा वापर करून ही तीन हजार किलो खिचडी तयार करणार आहेत. त्यासाठी ७ फूट व्यासाची, ४ फूट कढई वापरली जाणार आहे.
ही तयार झालेली खिचडी प्रसाद म्हणून पारायणात सहभागी झालेले भक्तगण, तसेच, जनतेला वितरीत केली जाणार आहेत. सुमारे ४५ हजार गजानन भक्तांना या महाप्रसादाचा लाभ होईल.
……..
‘खासदार’च्या भव्य मंचावर उदयोन्मुख कलाकारांनाही मिळणार संधी –
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ६ वाजता मुख्य कार्यक्रमापूर्वी अर्धा तास नागपुरातील उदयोन्मुख कलाकारांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, हजारो प्रेक्षकांसमोर या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सवात यंदा सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित कलाकार आपली प्रस्तुती देणार असून या मुख्य कार्यक्रमाच्या आधी स्थानिक उदयोन्मुख कलाकारांच्या कलांचा नागपूरकरांना आनंद घेता येणार आहे.
रविवारी, २६ तारखेला सायंकाळी ६ वाजता विशाल शेळके यांचा बॉलिवुड गीतांचा कार्यक्रम होणार असून २७ तारखेला किशोर हम्पीहोळी यांची चमू ‘गंगा-यमुना’ हा नृत्याविष्कार सादर करतील. २८ तारखेला आयुष्य मानकर यांचा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम, २९ तारखेला श्रीकांत पिसे व चमूचे ‘फ्यूजन’, ३० तारखेला राधिक क्रियेशन्स प्रस्तुत नशामुक्तीवर आधारित पथनाटय ‘मोहजाल’, १ डिसेंबर रोजी आनंदी ग्रुप प्रस्तुत ‘राम रतन धन पायो’, २ डिसेंबर रोजी परिणीता मातुरकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल. ३ तारखेला बालकला अकादमी ‘जयतु जयतु भारतम्’ नृत्यनाटिका प्रस्तुत करेल तर ४ तारखेला श्याम देशपांडे यांची चमू देशभक्तीपर गीते सादर करतील. उदयन्मुख कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता नागपूरकर रसिकांनी मुख्य कार्यक्रमापूर्वी उपस्थित राहून कलावंतांचा कलेला प्रोत्साहन द्यावे, असे खासदार सांस्कृतिक समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
(केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, ओरेंज सिटी चौक, नागपूर येथून देखील पासेस सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत प्राप्त करता येतील)