अतिक्रमण विभागावर केले गंभीर आरोप
मनपा आयुक्तांचे बोलवचन:माहिती घेतो आणि सांगतो
नागपूर,ता.१२ ऑक्टोबर २०२३: मनपा मुख्यालयात आज एका २८ वर्षीय महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.तिच्या डोळ्यात व तोंडात रॉकेल गेल्याने वेदनेने विव्हळत ती तिथेच कोसळली.तिला त्वरित रुग्णवाहिकेमध्ये मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रसंगी तिची पाच वर्षीय मुलगी देखील तिच्यासोबत होती.उदरनिर्वाहासाठी नंदनवन येथील केडीके कॉलेज समोर ती अंडा भूर्जीचा ठेला चालवते.मात्र मनपाच्या नेहरु झोन अतिक्रमण विभागाद्वारे ‘अर्थपूर्ण’व्यवहारातून तिचा ठेला वारंवार उचलला जातो,तिचे फलक फेकले जातात, आजूबाजूच्या ठेल्यांना अतिक्रमण विभागातील कर्मचारी हात देखील लावित नाही,हे सर्व आरोपी तोसिफकडून पैसे खाऊन तिच्या हिंमतीच्या खच्चीकरणासाठी केले जात असल्याचा गंभीर आरोप तिने माध्मांसोबत बोलताना केला.
पिडीता ही बलात्कार पिडीत असून वयाच्या १७ व्या वर्षी तिने मुस्लिम तरुणासोबत लग्न केले.ती राजपूत समाजातील आहे.मात्र,लग्नाच्या पाचच वर्षात गुलजार कुरेशी हा पिडीता व दोन्ही मुलींना सोडून २०१९ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये निघून गेला.तिच्या पतीसोबत आरोपी तोसीफ अब्दूल हसन खान वय वर्षे अंदाजे ४२ हा पीओपी मटेरियलचा भागीदारीत व्यवसाय करीत होता.
त्याची नजर पिडीतेवर होती.संधी साधून २४ जानेवरी २०२१ मध्ये ऐन करोना काळात लॉकडाऊन असताना त्याने पिडीतेवर बलात्कार केला.या विरोधात पिडीतेने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तिच्यासोबत जबरीने बलात्कार केल्यामुळे संतप्त होऊन बहीणीसोबत तिने आरोपीचे घर गाठले असता तोसीफने तिला भर रस्त्यातच बेदम मारहाण केली होती.याचा व्हिडीयो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता.
यानंतर पिडीता खरबी येथील खोली सोडून श्रीनगर भागात राहण्यास गेली असता दोन तीन महिन्यात आरोपी तोसीफ याने तिचे हे घर देखील शोधून काढले व तक्रार मागे घेण्यासाठी पिडीतेला धमकावले.यानंतर आरोपीने पिडीतेच्या ५ फोटोंसह स्वत:च्या खासगी भागाचे अतिशय अश्लील फोटोज अश्लील कमेंट्ससह ९७६३७६१७१८ या क्रमांच्या मोबाईलवरुन पाठवले
४ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री ३ वाजता तोसीफ पुन्हा पिडीतेच्या घरी पोहोचला व जोरजोरात दार वाजूव लागला.तक्रार मागे न घेतल्यास दोन्ही मुलींसह जिवंत राहू देणार नसल्याची धमकी पिडीतेला दिली.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम ४५२,३५४,५०६(ब) आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल असून तोसीफ हा सध्या जामीनावर बाहेर आला असून पिडीतेवर सातत्याने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप पिडीतेने केला.पोलिस आणि कोर्ट माझे काहीही वाकडे करु शकत नसल्याची वल्गना आरोपी बेधडक करतो!
नंदनवन पोलिस ठाण्यातील पीआय तिला बघताच हसतो.तू दररोजच का येते?तू वेडी असल्याचे कुस्तितासारखे बोल तिला नंदनवन पोलिस ठाण्यात ऐकवले जात असल्याचे पिडीता सांगते!
पिडीता ही सुखवस्तू हिंदू कुटूंबातील मुलगी असून परधर्मात लग्न केल्यामुळे काटोल येथील जन्मदाते यांनी पिडीतेसोबत कायमचे नाते तोडले आहे.या पूर्वी देखील पिडीतेने झोपेच्या गोळ्या खालल्या होत्या मात्र सुदैवाने ती जिवंत राहीली.
मागील महिन्यात १८ सप्टेंबर रोजी भर दुपारी हसनबाग येथे पिडीतेला अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली.या पूर्वी तिच्या मोठ्या मुलीच्या डोक्यावर अज्ञाताने दंडूका हाणला होता.नंदनवन पोलिसांकडे तोसीफ विरुद्ध तक्रार करण्यास गेली असता.पीआय यांनी सांगितले की ,तुझ्या तक्रारीमध्ये पुरावा नसल्याने तोसीफ या आरोपीचे नाव टाकू शकत नाही!
पिडीता ही आपल्या ८ व ५ वर्षांच्या मुलींसोबत जिथे ही घर घेते,आरोपी तिथे जाऊन,हीच्यावर बलात्कार झाला असल्याचे घर मालकाला सांगून तिची बदनामी करीत असल्याने व पोलीस केस सुरु असल्याने वारंवार घर मालक पिडीतेला घर रिकामे करण्यास सांगतात.
कोर्टात केस सुरु असल्याने,न्याय मिळेपर्यंत हे शहर मी सोडणार नसल्याचा निर्धार ती व्यक्त करते.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची मिलीभगत तोसीफ सोबत असल्यानेच माझाच एकटीच्या ठेल्यावर वारंवार कारवाई केली जात असल्याचा अारोप पिडीतेने पुन्हा एकदा केला. नुकतेच मनपात पैसे भरुन पिडीतेने आपले सामान सोडवले होते.परवा पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाच्या नेहरु नगर झाेनच्या कर्मचा-यांनी एकमेव तिच्याच ठेल्यातील ५ हजार रुपयांचे सिलेंडर व ती चार्जिंग करुन ठेवत असलेली ६ हजार रुपयांची बॅटरी जप्त केली.
या विरोधात तिने काल मनपा मुख्यालय गाठले व अतिक्रमण विभागाचे कांबळे या अधिका-यांना सविस्तर आपली आपबिती तिने सांगितली.यावर, इथे तुमचे काम होणार नाही तुम्ही आशीनगर झोनमध्ये जा,असा सल्ला त्यांनी दिला.आशीनगर झोनमध्ये उपायुक्त राऊत यांच्याकडे गेली असता, त्यांनी नेहरुनगर झोनमध्ये त्वरित फोन करुन पिडीतेचे जप्त केलेले संपूर्ण सामान परत करण्यास सांगितले.
यानंतर पिडीता नेहरु नगर झोनमध्ये गेली असता सहारे नावाच्या कर्मचा-याने पिडीतेसोबत अरेरावी करुन सिलेंडर आणि बॅटरी देण्यास नकार दिला व फक्त ५ स्टूल व ५ टेबल परत केले.पिडीतेने संपूर्ण सामान परत मागितले असता,हे पण सामान मिळणार नाही,अर्धे सामान मिळत आहे नशीब समज,अशी अरेरावी पिडीतेसोबत केली व आम्ही एवढंच सामान आणले होते अशी पुश्ती जोडली.
परिणामी,पिडीतेने आज सिव्हील लाईन्स येथील महानगरपालिकेचे मुख्यालय गाठून मनपा प्रशासनाला जागवण्यासाठी पिडीतेने टोकाचे पाऊल उचलले.
आरोपी,पोलीस प्रशासन तसेच मनपा प्रशासनाच्या अन्यायाविरोधात ही २८ वर्षीय महिला टोकाचा लढा देत असून, जगाच्या कटू अनुभवातून अतिशय कटू शब्द तिच्या मुखातून मुर्दाड व्यवस्थेसाठी निघतात,हे विशेष.याशिवाय ती ‘एकाकी’असल्याने सभ्य समाजाची देखील काेणतीही सहानूभूती तिला मिळत नाही.ती अतिशय आक्रमकपणे बोलत असल्याने ओळखीचेही तिच्यापासून फटकून वागतात.
मनपा मुख्यालयात आज घडलेल्या घटनेच्या संदर्भात मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना विचारले असता,अशी घटना घडली असल्याची कबुली देत, पिडीतेला शासकीय रुग्णालयात उचारासाठी पाठवले असल्याचे सांगितले.अतिक्रमण विभागाच्या अन्यायपूर्ण कारवाईच्या संदर्भात विचारले असता,घटनेची माहिती घेत असून यात तथ्य आढळल्यास उचित कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.मनपाच्या अधिका-यांची वागणूक ही असंवेदनशील व अन्यायकारक असतो,असा प्रश्न केला असता,असा मुद्दा नसल्याचे सांगून मनपा आयुक्तांनी अधिकारी व कर्मचा-यांना पाठीशी घातले.
………………..