फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजस्वच्छता ही सेवा की भाजपचा देखावा!

स्वच्छता ही सेवा की भाजपचा देखावा!

स्वच्छतेसाठी राबले हात:भाजप नगरसेवकांचा मात्र फक्त फोटोसाठी साथ

समाज माध्यमावर उमटली तीव्र टिका

नागपूर,ता.२ ऑक्टोबर २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी देशभरात महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात आले मात्र नागपूरात भाजपच्या अनेक नगरसेवकांसाठी हा उपक्रम फक्त छायाचित्र काढण्या पुरतीचा मनोरंजनात्मक ‘इव्हेंट ’ठरला असल्याने समाज माध्यमांवर यावर तीव्र टिका उमटली आहे.

जरीपटका येथे आयोजित उपक्रमात श्रमदानासाठी सकाळी ९ ते १० ही वेळ देशभर नियोजित करण्यात आली असताना, सकाळी आठ वाजताच मनपाचे स्वच्छता कर्मचारी हे आयोजन स्थळी पोहोचले.त्यांनी संपूर्ण परिसर आधीच स्वच्छ करुन ठेवला.९ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरातील बाह्य भाग चकाचक झाला होता.श्रमदानाची वेळ सकाळी ९ वाजता असतानाही या भागाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा हे उशिरा उपक्रमस्थळी पोहोचले.

त्यांनी झाडू देखील हातात घेतला नसल्याची माहिती सूत्राने दिली.कचरा पोत्यात फेकण्यापुरती झाडू मात्र हातात घेतला!महेंद्र धनंजय या भाजपच्या नगरसेवकाने झाडू हातात घेतला आणि छायाचित्रासाठी ‘पोज’दिली.विशेष म्हणजे कचरा संकलनासाठी प्लासटिकच्या कचरा डब्यांचा उपयोग केला जाणार असल्याचे नियोजित असताना प्लास्टिकच्या पांढ-या रंगाच्या पोत्यांचा वापर करण्यात आला.

(छायाचित्र : मनपाच्या कर्मच-यांनी आधीच हा परिसर असा स्वच्छ केला)

जरीपटका भागातील आतील गल्ली बोळ्यांमध्ये ढिगभर कचरा तसाच साचून होता मात्र, मार्केट भागात तितकाच परिसर स्वच्छ करण्यात आला,तो देखील मनपाच्या कर्मचा-यांद्वारे.करोनासाठी ज्या हॅण्ड ग्लोब्सची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली,त्याचा देखील या उपक्रमात चांगलाच उपयोग करण्यात आला.जरीपटका भागातील आतील गल्ली बोळ्यात गणपती विसर्जनानिमित्त जो कचरा साचला होता तो तसाच पडून होता.स्वच्छतेचा ध्यास घ्यायचाच होता तर प्रामाणिकपणे भाजपच्या नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावरील कचरा एक तास झाडून ख-या अर्थाने श्रमदान करायला हवे होते मात्र,असे घडले नाही.

स्वच्छतेसारख्या इतक्या महत्वपूर्ण बाबीला छायाचित्र काढून घेण्यापुरती व इव्हेंटसारखे साजरे करण्यातच भाजपच्या काही नगरसेवकांनी धन्यता मानली.त्यात ही एक तास हा नियोजित वेळ असताना पंधरा ते वीस मिनिटच हा इव्हेंट साजरा करण्यात आला,हे विशेष!जरीपटका येथे हे छायाचित्रण ‘आय लव्ह जरीपटका’समोर उरकण्यात आले.सकाळीच स्वच्छ करण्यात आलेला परिसरात स्वच्छतेचे फक्त फोटोसेशन पार पडले.पहाटेच परिसरातील स्वच्छतेसाठी मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांवर प्रथमच अक्षरश: सुपरवाईजर ने नजर राखली!हाच प्रतिसाद जनतेसाठीच्या स्वच्छतेसाठी मात्र कधीही नसतो!

गांधीजींच्या मुद्रेत एक व्यक्ती या उपक्रमात सहभागी झाले होते मात्र,गांधीजींनी आपल्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वछतेला सेवा मानली होती व संपूर्ण आयुष्य या सेवेसाठीच वाहीली.त्या महात्म्याला कधीही या साठी ‘फोटोसेशन’ची गरज भासली नाही.मात्र,त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभर स्वच्छतेचा जो ‘उच्छाद’ मांडला गेला तो निश्‍चितच भूषणावह म्हणता येणार नाही.

हीच गत गांधी सागर तलावाच्या ठिकाणी पार पडलेल्या उपक्रमात देखील घडली.येथे मनपाच्या अधिका-यांनी नागरिकांसोबत नियोजित वेळेत चांगला उपक्रम पार पडला मात्र,अगदी शेवटच्या काही मिनिटांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रमोद चिखले यांनी फक्त फोटोसेशनसाठी उपस्थिती दर्शविल्याचे येथील नागरिकांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.काँग्रेसचे नगरसेवक मनोज साबळे,स्वयंसेवी संस्थेचे राजेश कुंभलकर,मनपा अधिकारी महेश धामेचा यांच्यासह नागरिकांनी हा परिसर किमान एक तासभर का होईना,स्वच्छ करण्यास प्रामाणिकपणे पुढाकार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत किवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर केलेल्या श्रमदानात किमान त्यांच्या समोर थोडाफार कचरा तरी दिसत होता,नागपूरात तर चकाचक परिसरातच झाडू मारण्याचा आणखी एक प्रताप, भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कारकीर्दीच्या इतिहासात जोडला गेला आहे.

नागपूरात डेंग्यूने आणि व्हायरल तापाने घरोघरी संक्रमित रुग्ण दिसत असताना ज्या अस्वच्छतेमुळे हा आजार नागपूरकर नागरिकांना जडतोय,त्याच्या मुळावर घाव घालण्या ऐवजी फोटोसेशन करुन घेण्यात गुंतलेल्या या ’फोटाजीवी’राजकारण्यांवर त्यामुळेच समाज माध्यमांवर तीव्र टिका उमटली आहे.कायम कर्तव्यात कसूर करणा-या मनपाच्या अधिका-यांनी मात्र नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या शिस्तीच्या बडग्याखाली प्रथमच देशपातळीवरचा हा उपक्रम स्थानिक पातळीवर इमाने इतबारे राबविल्याचे दिसून पडले.

………………………………….

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या