(रविवार विशेष)
‘ते’ लोभी नाही पिडीत आहेत:समाज आणि सरकार समजून घेणार का?
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळेल का?
आरोपी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग प्रकरणात तपासाची संथ गती!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १ ऑक्टोबर २०२३: ऑगस्ट २०२२ च्या १० तारखेला प्रताप नगर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली.या तक्रारीत भारतीय दंड संहितेचे कलम ४०९,४१९,४२०,४६५,४६८ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये आरोपी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग,राहणार ब्रम्हघाट विश्वेश्वरगंज,वाराणसी,उत्तरप्रदेश याच्याविरुद्ध ही तक्रार सुनील वसंतराव कुहीकर यांनी दाखल केली होती.शहरातील एका प्रतिष्ठित दैनिकामध्ये उच्च पदावर कार्यरत राहीलेले व सध्या एका स्थानिक वाहीनीचे संपादक असणारे कुहीकर यांच्या तक्रारीचे वृत्त सर्वच प्रसार माध्यमात अवघे ५० शब्दात छापून ही आले मात्र,हे प्रकरण कोण्या एखाद्या गुंतवणूकदाराच्या फसवणुकीपुरती मर्यादित नसून या फसवणुकीत अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणुक झाली असून पिडीत गुंतवणूकदारांचा धीर आता सुटत चालला आहे.
माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूकदारांच्या फसवणूकीच्या अनेक घटना प्रसिद्ध होत असतात.यात उच्च विद्याभूषितांचाही भरणा असतो.सर्वसामान्य वाचक किवा वाहीन्यांवरील दर्शक अश्या घटनांकडे एका विशिष्ट चष्म्यातून बघत असतो.कमी पैसे गुंतवूण अधिक पैसा मिळेल अश्या ‘लोभी’ वृत्तीमुळे पैसे बुडाले,एवढाच त्याचा अर्थ ध्वनित होत नाही तर सर्वसामन्य जनतेने आणि मायबाप सरकारने, पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार आहेत तरी कोण?याचा ही विचार करने अपरिह्यार्य आहे.
या ही प्रकरणात अनेक पिडीत हे अगदी सर्वसामान्य कुटूंबातील असून एका पिडीतने पाच लाखांचे कर्ज घेऊन याेजनेत पैसे गुंतवले होते तर एका पिडीतने आपल्या वडीलांच्या आयुष्यभराच्या परिश्रमाचे फिक्स डिपॉझिट मोडीत काढून पाच लाखांची रक्कम भरली होती.या पिडीत व्यक्तीची मुलगी १२ वी चं शिक्षण घेत असून आता तिचे भविष्य व पिडीत व्यक्तीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वडीलांचे म्हातारपण घोर संकटात सापडल्याचे तथ्य खास ‘सत्ताधीश’च्या हाती पडले आहे.
कोण आहेत हे गुंतवणूकदार?कशासाठी केली होती तद्दन अनोळखी असणा-या श्रीमान अनिरुद्ध होशींगकडे या लोकांनी पाच ते पंधरा लाखांची गुंतवणूक?तर अश्या प्रकरणात हा व्यवहार अतिशय जवळच्या,ओळखीच्या आणि विश्वासहार्य व्यक्तिमुळेच घडत असतो,हे विशेष.समाजाने हे सत्य समजून घेणे गरजेचे आहे.येथे प्रश्न लोभाचा नाही तर ज्याच्या सांगण्यावरुन अशी गुंतवणूक केली जाते ती व्यक्ती गुंतवणूकदारासाठी ‘विश्वासहार्य’असते,हे महत्वाचे.
या प्रकरणात आरोपी होशींग याने तो केंद्रिय पर्यटन विभागात प्रथम फायनान्स अधिकारी तसेच जनरल डायरेक्टर म्हणून कार्यरत असून, पर्यटन विभागाच्या ‘अतुल्य भारत’इत्यादीसारख्या विविध उपक्रमांतर्गत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास त्यांच्या नावाची वाहने उपक्रमात घेतली जातील व गुंतवणूकदारांना दर महिन्यांला फार मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून आर्थिक परतावा मिळेल,असे आमिष दाखविण्यात आले होते…!
स्वाभाविक आहे, केंद्राच्या अनेक योजना वेळोवेळी घोषित होत असतात.यासाठी ऑन लाईन पद्धतीने निविदा देखील मागवल्या जातात.ओळखीच्या माध्यमातून केंद्राच्या एखाद्या योजनेचा लाभ. सर्वसामान्य आयुष्यमान असणा-या कोणाचेही, आर्थिक उत्पन्न व परतावा मोठ्या प्रमाणात मिळवून देणारे असतील, तर केंद्राच्या किवा इतर कोणाच्याही योजनेत पैसा गुंतविण्यास कोणीही सहज तयार होईल.या प्रकरणात नेमके हेच घडले…!
श्रीमती मीरा फडणीस वय वर्षे अंदाजे ५२ ,राहणार यवतमाळ,ही महिला, तक्रारदात्याच्या अगदी घनिष्ठ परिचयाच्या होत्या.मागील ३५ वर्षे त्या तक्रारदात्याच्या परिचित असल्यामुळे त्यांनी अनिरुद्ध यांच्या या योजनेची माहिती तक्रारदाराला दिली.एवढंच नव्हे तर तिनेसुद्धा या योजनेत पैसे गुंतवले असल्याचे सांगितले.सर्वसामान्य माणसाला ५ लाख गुंतवल्यास नाही ५० लाख तर किमान १०-१२ लाख तर मिळतील,अशी अपेक्षा असते.याच ‘परंपरागत’मानसिकतेतून तक्रारदात्याने १५ लाख रुपयांची गुंतवणूक केवळ मीरा फडणीस यांच्यावर विश्वास ठेऊन या योजनेत केली. ही घटना फेब्रुवरी २०२२ मधील आहे.
यानंतर मीरा यांनी तक्रारदात्याला अनिरुद्ध होशींग हा नागपूरमध्ये हॉटेल रेडीसन ब्लूमध्ये येत असल्याचे कळवले.फेब्रुवरीच्या पहील्या आठवड्यात तक्रारदाते हे आपले मित्र मोहब्बतसिंग महेंद्रसिंग बावा,वय वर्षे ४७ वर्ष,व्यवसाय जुने वाहन खरेदी-विक्री,राहणार हनुमान नगर,यांना सोबत घेऊन गेले.होशींग याने तक्रारदाराला सांगितले,की केंद्रिय पर्यटन विभागाच्या काही योजना आहेत.त्यामध्ये रेल्वे विभागाचा लिनेन क्लिनिंग आणि टुरिस्ट व्हेईकल या दोन योजना आहेत.ज्यामध्ये इनोवा व्हिस्टा लावण्यासाठी सहा लाख पन्नास हजार रुपये तर टेम्पो ट्रॅव्हलर लावण्यासाठी दहा लाख रुपये तसेच रेल्वे कंत्राटीसाठी आठ लाख त्र्यांशी हजार इतकी रक्कम भरावी लागेल.याचा मोबदला दर महिन्याला इनोवा विस्टाचे रुपये चार लाख पन्नास हजार,टेम्पो ट्रॅव्हलरचे रुपये सहा लाख पन्नास हजार रुपये तर रेल्वेच्या कंत्राटीसाठीचे ३२,००,००० इतका नफा मिळेल.
याच वेळी आरोपीने त्याचे आयसीआय बँकेतील ३ खात्यांचे क्रमांक दिले.यानंतर तक्रारदात्याने आपल्या एका बँकेच्या शाखेतून २ लाख,दुस-या खात्यातून ४ लाख व ५ लाख अशी रक्कम ट्रांसफर केली.एवढंच नव्हे तर आपल्या ओळखीच्या व्यक्तीलाही या योजनेची माहिती दिल्याने त्याने देखील या योजनेत ६ लाख ७५ हजार रुपये गुंतवले.हळूहळू ही रक्कम वाढत गेली.होशींग यांनी गुंतवणूकीच्या कराराबाबत सातत्याने टाळाटाळ सुरु ठेवली.
आरोपीने गुंतवणूकदारांना गुंतवणूकीच्या करारनामा देण्यासाठी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये ही बोलावले.मात्र या ही ठिकाणी कोणताही करारनामा गुंतवणूकदारांना सोपवला नाही.या ठिकाणी गुंतवणूकदारांची संख्या बघता हा आकडा साढे सात कोटी पल्ल्याड असल्याची माहिती समोर आली आहे….!विशेष म्हणजे हॉटेल ताज मध्ये होणा-या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयाचे नाव नमूद होते!त्या कार्यक्रम पत्रिकेत रेल्वे मंत्रालयाचे नाव नमूद होते व अशोक स्तंभाचा लोगो तसेच वरिष्ठ राजकीय नेत्यांची नावे असल्याने गुंतवणूकदारांचा आरोपीवर आणखी विश्वास दृढ झाला…!
नागपूरातील सुभाष मंगतानी यांचे २० लाख रुपये तर यवतमाळ येथील मीरा फडणवीस यांचे ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार प्रताप नगर ठाण्यात नमूद आहे.याशिवाय यवतमाळ येथे देखील आरोपी होशींग तसेच मीरा फडणवीस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना झूलवत ठेवणारा होशींग हा आरोपी तोतया असल्याचे कळताच गुंतवणूकदारांच्या पायाखालील जमीन सरकली.त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.विशेष म्हणजे ज्यांच्या ओळखीतून त्यांनी विश्वास ठेऊन या योजनेत लाखो रुपये गुंतवले त्यांची ही लुबाडणूक झाली असल्याने पैसा परत मागावा तर कोणाला,असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडला.
नागपूरात विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही रक्कम ४८ लाख ८५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व रकमेचा व्यवहार हा ऑन लाईन झाला असल्याने पोलिसांनाही सर्व धागे दोरे गवसले आहेत.पोलिसांनी होशींगच्या मुसक्या आवळत त्याला नागपूरात आणले.सध्या तो नागपूरच्या कारागृहात सरकारी पाहूणचार घेत आहे.या घटनेला एक वर्ष होत आले मात्र चौकशीची संथ गती बघता अनेक गुंतवणूकदारांच्या काळजाला काळजीचे पिळ पडले आहेत.
महत्वाचे म्हणजे आरोपीने आपला गुन्हा न्यायालयासमोर मान्य केला आहे मात्र त्याच्यावर आता जास्तीत जास्त खोटे ओळखपत्र बनवने,फसवणूक करने यासारख्या कलमा लागल्या असल्याने जास्तीत जास्त ७ ते १० वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर पडेल. मात्र,यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय?
पोलिसांनी आरोपीच्या खात्यातून कोणाकोणाला पैसे गेलेत याचा शोध युद्धस्तरावर घेणे गरजेचे आहे.ते पैसे नेमके कोणीकोणी खात्यातून काढले,याचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण कर्म नाही.नियमानुसार ५० हजारच्या वर कॅश निघत नाही मग साढे सात कोटींची रक्कम ही किती वेळेत काढण्यात आली?नागपूर पोलिसांच्या कोठडीतून यवतमाळ पोलिसांनी देखील आरोपीला यवतमाळात नेऊन पाहूणचार केला मात्र यवतमाळच्या पोलिसांच्या हाती देखील अद्याप काहीच लागले नाही.
मूळात तपास कुठपर्यंत करायचा हे सर्वस्वी पोलिसांच्याच हाती असतं.त्यांनी जर पुढे न जाण्याचा निर्णय घेतला तर आता एक वर्ष झाले पोलिसांना रक्कम जप्त करता आली नाही,दहा वर्ष जरी लोटली तरी अश्या प्रकरणात काहीच प्रगती होत नाही.या प्रकरणात तर आरोपीने गुन्हा मान्य केला असून ताे शिक्षा ही भोगण्यास तयार आहे.परंतू,गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय?ते कसे सावरतील?याचा विचार ना समाज करत ना सरकार.
मीरा फडणीस यांच्या विरोधात देखील यवतमाळमध्ये तक्रार दाखल आहे मात्र अद्याप त्यांना अटक देखील करण्यात आली नाही.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याविरुद्ध हा तपास ‘नागपूर’मधून थांबविण्यात आल्याची चर्चा आहे…..!
आरोपी होशींगचे वकीलपत्र नागपूरातील प्रसिद्ध असणारे व माजी भाजप सेलचे प्रमुख असणारे ॲड.नितीन तेलगोटे यांनी घेतले असून,आरोपी हा उत्तरप्रदेशचा आहे.उत्तर प्रदेशात योगी सरकार अस्त्विात आहे.अशावेळी आरोपीला वाचविण्यासाठी पडद्या मागे कोण हालचाल करीत आहे,याची देखील चर्चा पिडीत गुंतवणूकदारांमध्ये झडत असते.
ही यंत्रणा हलवायची असेल तर आता फक्त कोर्टाच्या आदेशानेच ती हलू शकते,याची शाश्वती गुंतवणूकदारांनही पटली आहे.त्यांना न्याय हवा आहे.या प्रकरणाची तपास गती संथ का झाली किंबहूना करण्यात आली?पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का?अशी शंका उपस्थित केली जात आहे.मीरा फडणीस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल असताना त्यांना चौकशीसाठी देखील यवतमाळ पोलिसांनी का बोलावले नाही?त्यांनी आरोपी होशींग कडून महागड्या भेटवस्तू घेतल्या असल्याचे मान्य केले असून त्यांची कुटूंबासह विदेशवारी देखील आरोपीने घडवली असल्याचा आरोप पिडीत गुंतवणूकदारांनी केला आहे.आरोपीच पिडीत असल्याचा दावा केला जात आहे,याच किती तथ्य आहे?मीरा यांनी त्यांचेही ६ लाख ५० हजार रुपये योजनेत गुंतवले असल्याचे तोंडी सांगितले,यात कितपत तथ्य आहे?याचा शोध पोलिस का घेत नाही?असे प्रश्न आता विचारले जात आहे.
नागपूर पोलिसांनी या प्रकरणात आमिर नावाच्या संशयिताला मागच्या महिन्यात चौकशीसाठी लखनऊ येथून बाेलावले होते.त्याने पोलिसांच्या चौकशीला कोणतीही दाद न देता दोन दिवसांनंतर लखनऊल निघून गेला.एखाद्या संशयित आरोपी पोलिसांच्या चौकशीला दाद न देता नागपूरातून जाण्याची हिंमत कशी करु शकतो?नागपूर शहराची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख आहे.अश्या शहरात काही सर्वसामान्य गुंतवणूकदारांची कोट्यावधीने फसवणूक होते,तपास मात्र कासव गतीने केला जात आहे. मीरा फडणीस यांनाही नागपूर पोलिसांनी साधे चौकशीसाठी देखील बोलवले नसल्याकडे पिडीत लक्ष वेधतात….!या देशाचा कायदा आणि यंत्रणा हे पिडीतांना नव्हे तर आरोपींना संरक्षण देण्यास गुंतले आहेत का?असा संताप ही व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणामुळे पिडीतांच्या प्रतिष्ठेलाच समाजामध्ये फार मोठा धक्का बसला आहे.त्यांना लोभी म्हणून दूर्लक्षीत केल्या जातं.‘विश्वास’मानवी मन आणि संवेदनशीलतेला पार तडा गेला असून लोभापायी त्यांनी गुंतवणूक केली नसून, व्यवसायिक लाभाच्या दृष्टिने त्यांचा घात केला…..!फरक आहे….या दोन्ही गोष्टींमध्ये…!समाज आणि मुर्दाड शासन यंत्रणेने हे समजून घेणे गरजेचे आहे.एका गुंतवणूकदाराला तर हे समाधान आहे,नशीब मी माझ्या वडीलांच्या आयुष्यभराची कमाई बुडवली,इतरांचे कोणाचेही,ओळखीच्या किवा नातेवाईकांना या योजनेत गुंतवणीसाठी प्रेरित केले नाही अन्यथा…..माझ्या फोटोवर जगाला हार आढळला असता…..!
आरोपीच्या मागे या देशातला कायदा,सक्षम वकील आणि शासकीय यंत्रणा किंबहूना प्रसंगी राजकीय नेतेही उभे राहताना दिसतात,पिडीतांच्या मागे कोण उभा असतो?आरोपी कायद्याच्या खाचखळल्यातून पाच-सात वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर पुन्हा तो समाजातील अन्य साध्या भोळ्या सर्वसामान्यांना लक्ष करेल त्याचे काय?तपास यंत्रणांनी याचाही विचार करावा,अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
अशा घटनेत दोष फक्त गुंतवणूकदारांचाच असतो का?केंद्रिय सरकारने आधीच त्यांच्या योजनांविषयी जनजागृती करने गरजेचे नाही का?अनेक वेबसाईट्सवर केंद्रिय योजनांचा रतीब वाढलेला दिसतो,त्याच्या निविदा निघतात का?कश्या रितीने निघतात?कोण सहभाग घेऊ शकतो?याविषयी सुस्पष्ट दिशानिर्देशांची माहिती जनसामान्यांना देणे हे केंद्र सरकाचे कर्तव्य नाही का?साधा माणूस,मध्यमवर्गीय माणूस हा कधीही शेअर मार्केट किवा लॉटरी,क्रिप्टो करंसीमध्ये पैसा गुंतवत नसतो.त्यामुळेच केंद्र किवा राज्याची अमूक अमूक योजना आहे,त्यात पैसे गुंतवल्याने आर्थिक लाभ मिळेल,अश्या भूलथापांना ताे सहज बळी पडतो.
अतिशय जवळचा माणूसच विश्वासघात करतो आणि येथेच मानवी मूल्याची नृशंस हत्या होते.तिळतिळ जळत असतो गुंतवणूकदार.आत्म्यावर ओझे घेऊन,कुटूंबियांची बोलणी खाऊन जगत असतो.मनातही येत नाही हा जवळचाच माणूस घात करेल…..!अपेक्षांची राख रांगोळी करेल…!आयुष्यालाच उधवस्त करेल…!
ही भावना,हे दुखं,ही हताशा एखाद्या एफआयरच्या दीड-दोनशे शब्दांच्या पलीकडची असते.सरकारने या बाबत आता तरी कडक पाऊले उचलावी.पिडीतांना किमान काही टक्के तरी रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी.ही रक्कम आरोपीच्या मालमत्तेतून सरकारने वसूल करावी,अशी मागणी पिडीत गुंतवणूकदार करतात.
हॉटेल ताज,रेडीसन ब्लू सारख्या अतिशय महागड्या हॉटेलात पार्ट्या झोडणारा आरोपी होशींगचा मागोवा घेत नागपूरातील काही गुंतवणूकदारांनी चक्क वाराणसीतील त्याचे घर गाठले.कारण त्या हूशार आरोपीने चुकून आपले खरे आधारपत्र गुंतवणूकदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दिले होते.त्याचे घर बघून या पिडीतांना चांगलाच धक्का बसला.पडक्या धर्मशाळेसारखे दोन खोल्यांचे त्याचे घर बघून,कोट्यावधीची मालमत्ता त्याने कुठे दडवून ठेवली आहे,याचा अदमास ते घेऊ शकले नाही.ते पडके घर विकून मायबाप पोलिसांना किती गुंतवणूकदारांचे पैसे परत करता येईल?
सर्वात महत्वाचे म्हणजे आराेपीवर संशय बळावल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी दिल्ली देखील गाठली.पर्यटन मंत्रालयात जाऊन चौकशी केली.अनिरुद्ध होशींग नावाचा कोणताही अधिकारी हा मंत्रालयात कोणत्याही पदावर नसल्याचे जळजळीत वास्तव कळले.येथपर्यंत पोहोचून पदरी निराशा पडण्या ऐवजी एक चौकशीसाठीचा फोन ‘आधी’ केला असता तर…..!असा अनाहूत सल्ला गुंतवणूकदारांना मिळाला.
पिडीत गुंतवणूकदार हे तपास यंत्रणेच्या संथ गतीमुळे आता लवकरच न्यायालयात दाद मागणार आहे.आरोपीविरुद्धचा तपास हा कुठपर्यंत आला,याची माहिती मागणार आहे.तपास बरोबर होत नसल्याची याचिका दाखल करणार आहे.कुठे ना कुठे आरोपीने पैसे दडवले असतील.सर्व काही ऑन लाईन व्यवहार असतानाही नागपूरची पोलिस इतकी संथ का?पोलिसांचे हात बांधण्यात आले आहे का?कोर्टाच्या आदेशाने ही यंत्रणा हलली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत, या प्रकरणात आरोपीच शिक्षा भोगायलाही तयार आहे कारण त्याला विश्वास आहे त्याच्याविरुद्ध फक्त बनावट ओळखपत्र बनवणे किवा तत्सम गुन्हा सिद्ध होईल…!
पिडीत गुंतवणूकदार समाजाकडून सहानुभूती व यंत्रणेकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत……!
……………………………………