कोरोडी येथे २७० मोठ्या मूर्तींचे विसर्जन
नागपूर, ता. २९ : संपूर्ण नागपूर शहरामध्ये भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण १४४१६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. याशिवाय ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलेली असून येथे आतापर्यंत २७० मोठ्या मूर्ती विसर्जीत करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, एकूण विसर्जीत १४४१६९ मूर्तींमध्ये १३७११० मूर्ती मातीच्या तर पीओपीच्या फक्त ७०५९ मूर्तींचा समावेश आहे.
कोराडी तलावासह शहरातील सर्व विसर्जन स्थळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वत: लक्ष दिले. गुरूवारी (ता.२८) रात्री मनपा आयुक्त डॉ. चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोराडी तलाव परिसरातील कृत्रिम विसर्जन तलावाला भेट देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. याशिवाय अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल तसेच श्री. सुनील लहाने यांनी देखील शहरातील विविध भागात जाऊन येथील विसर्जन स्थळांना भेट दिली व पाहणी केली. याशिवाय उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे व सुरेश बगळे यांनी देखील शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. सर्व झोनच्या सहायक आयुक्तांकडून देखील झोनमधील विसर्जन स्थळांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचे नियोजन सांभाळण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील दहा झोनमधील २११ ठिकाणी ४१३ कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली. याशिवाय दहा झोनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दहा फिरते विसर्जन तलावांची देखील व्यवस्था करण्यात आली. यासर्व विसर्जन स्थळांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित आपल्या सोयीनुसार कृत्रिम विसर्जन तलावांमध्येच लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला.
सर्व विसर्जन स्थळांवर नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कलशांमध्ये नागरिकांना निर्माल्य जमा करण्याचे आवाहन मनपा आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांमार्फत करण्यात येत आहे. नागरिकही या आवाहनाला प्रतिसाद देत निर्माल्य कलशामध्ये श्रीगणेशाचे निर्माल्य संकलीत करून सहकार्य करीत आहे. याशिवाय मनपाद्वारे विशेष १४ निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आलेली असून या रथाद्वारे गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांकडून श्रद्धापूर्वक निर्माल्य संकलीत करण्यात आले. मनपाद्वारे या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.
विसर्जन स्थळावरील स्वच्छतेकडे नागपूर महानगरपालिकेद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. विसर्जन स्थळांवर कुठेही अस्वच्छता राहू नये यासाठी मनपाची स्वच्छता चमू निरंतर कार्यरत आहे. कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर त्या मूर्ती सन्मानपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने बाहेर काढण्याचे काम स्वच्छता चमूद्वारे केले जात आहे. मनपाची स्वच्छता चमू कोराडी येथील विसर्जन स्थळी देखील कार्यरत आहे. कृत्रिम विसर्जन तलाव स्वच्छ राहिल यासाठी स्वच्छता कर्मचारी कार्य करीत आहेत. याशिवाय विसर्जन स्थळी सर्वत्र स्वच्छता राखली जाईल, याची देखील काळजी कर्मचारी घेत आहेत. यासोबतच मिरवणुकीचे मार्गही स्वच्छ करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याचे काम स्वच्छता कर्मचारी गुरूवार रात्रीपासून करीत आहेत.
झोननिहाय मूर्ती विसर्जन-
झोन क्रमांक व नाव मातीच्या मूर्ती पीओपी मूर्ती एकूण मूर्ती विसर्जनाची संख्या
१ – लक्ष्मीनगर १४५६२ ७३६ १५२९८
२ – धरमपेठ २५३३५ २६३९ २७९७४
३ – हनुमान नगर १४८८९ २९० १५१७९
४ – धंतोली १२०८२ २८५ १२३६७
५ – नेहरूनगर १८४३१ ७९४ १९२२५
६ – गांधीबाग ११०९४ ६३ १११५७
७ – सतंजीपुरा १२९९१ ६९१ १३६८२
८ – लकडगंज १२२०७ ३०५ १२५१२
९ – आशीनगर २५४३ २०३ २७४६
१० – मंगळवारी १२७०६ १०५३ १३७५९
कोराडी २७० ० २७०