नागपूर,ता.२४ सप्टेंबर २०२३: शुक्रवारी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नव्हे तर त्या पावसाच्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजनच प्रशासानाने केले नसल्याने, राज्याच्या उपराजधानीत जो हाहाकार उडाला त्या उधवस्ततेचे निरीक्षण आता राजकीय पातळीवर केले जात आहे.बैठका घेतल्या जात आहे.निर्देश दिले जात आहेत मात्र,सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा पाऊस परतीच्या मार्गावर लागला आहे, अश्या अवेळी शहरातील सर्वोच्च राजकीय पातळीवर संपूर्ण शहरालाच पार उधवस्त करुन जाणा-या पावसाच्या पाण्यावर बैठका घेणे,दिनानिर्देश देणे,प्रशासनाला कामाला लावणे,उधवस्ततेचे निरीक्षण करने कितपत संयुक्तीक आहे?असा प्रश्न आता समाज माध्यमांवर लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे.
अंबाझरी ते पारडी,नाग नदी वाहत असलेल्या शहरातील एक ही भाग असा नाही जिथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या पावसाने कहर बरपवला नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ९.३० वाजता अंबाझरी जवळील डागा ले आऊट भागाचा दौरा ही केला,यावेळी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमधून उपमुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची एकच मागणी होती,आमचे विस्कटलेले संसार पुन्हा जोडून द्या.काहीही उरले नाही.भांडी कुंडी,गाद्या,फ्रिज,दुचाकी,धान्य,कपडे,शाळेचे साहित्य,पुस्तके,भेगा पडलेलया घराच्या भिंती,चिखलाने माखलेले अंगण,परिसरात साचलेले नाग नाल्याचे पाणी,एक नाही हजारो-हजारो नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पाहणी दौ-या दरम्यान धाव घेतली.घाव गहीरे असल्याने संताप ही व्यक्त झाला.
ज्यांचं जळतं त्यांनाच ती वेदना कळते,कोणताही दोष नसताना उपराजधानीत लाखो नागरिक,स्लमवस्तीमधील किवा मध्यमवर्गीय,दूकानदार,व्यापारी वर्ग,धान्याचे व्यापारी पासून संगणक विक्रेते पर्यंत,दुचाकीचे शोरुम पासून हॉटेल व्यवसायिकांपर्यंत प्रत्येक जण उधवस्त झाला आहे.पंचशील चौकातील केअर रुग्णालयातील ७० रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयात काल भर्ती करावे लागले होते.कोणी काेणाचे सांत्वन करावे?कोणी कोणाची आर्थिक मदत करावी?काहीच कळत नाही.अनेक वस्त्यांमध्ये नागपूरकर नागरिक अक्षरश:सैरभैर झालेला आज आढळला.
नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असले तरी, त्यांची पाठ फिरताच प्रशासन ज्या गतीने काम करेल,त्या ‘गतीची’ भीती नागरिकांच्या मनात दाटलेली आढळतेय.
२८ जुलै २०२३ रोजी म्हणजे याच वर्षी अगदी दोनच महिन्यांपूर्वी,मध्यरात्री विजांच्या प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या धुवाधार पावसाने उपराजधानीला अशीच धडकी भरवली होती.रात्रभर कोळसणा-या पावसाने प्रशासनाला जणू ‘सूचक’ इशारा तेव्हाच दिला होता. नाग नाल्याशेजारील झोपडपट्टयांसह तब्बल २०० च्या वर वसत्यांमध्ये त्या वेळी पाणी शिरले होते.जाटतरोडीमध्ये नाल्यावरुन घसरुन एकाचा मृत्यू झाला होता तर बेसा येथील नाल्यात वाहून गेल्याने एकाचे तर पार्थिव ही प्रशासनाला सापडले नव्हते.त्या बुधवारी देखील जागोजागी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.र्कीर अंधारात हजारो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन अख्खी रात्र काढली होती.त्याही पावसाने शहरातील नाग नदी सह इतर नाले व तलाव तुडूंब भरुन वाहिले होते.ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.त्याही वेळी हजारो नागपूरकरांचे अख्खे जीवनच विस्कळीत झाले होते.
त्याही वेळी कळमन्यात पाण्यात अडकलेल्या एका कुटूंबाला बाहेर काढण्यासाठी पाण्यात नाव चालली होती.अंबाझरी तलाव ही असाच ओव्हर फ्लो झाला होता.शहरात तेव्हा २९ वर्षांनंतर प्रथमच १२ तासांमध्ये सर्वाधिक १६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती…!
मनीष नगर,नरेंद्र नगर व लोखंडी पुलांखाली कंबरेपर्यंत पाणी साचले होते.शेकडो विद्युत डीपींमध्ये पाणी शिरले होते.बेसा कादंबिनी विहार कॉलनीत गुडघा भर पाणी साचले,याच ठिकाणी विद्युत डिपी असून त्यात पाणी शिरणार होते!रात्र भर कॉलनीतील नागरिकांची याच भीतीतून झोप उडाली होती.मेडीकलमध्ये वॉड ४५ समोर तसेच कॅज्युल्टी समोरचा परिसर तर मेयोच्या जवाहर वसतिगृहाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते!१ कोटी ९२ लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या आपातकालीन विभागासमोर दर वर्षी पावसाचे पाणी तुंबते आणि स्ट्रेचर ठेवण्याच्या खोलीत गुडघाभर पाणी साचतं.मेडीकलच्या भिंतीमधूनही पावसाचं पाणी रिचत असतं.महत्वाचे म्हणजे याच भिंतींमधून विजेच्या तारा टाकण्यात आल्या आहेत…!
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कुजलेला कचरा शेजारच्या वस्तीत शिरला होता.डम्पिंग यार्डमधील पाणी, शेजारच्या वस्तीपर्यंत पोहोचले व रात्रभर तीव्र दुर्गंधीचा त्रास वस्तीतील नागरिकांना सहन करावा लागला होता,यातच मनपा प्रशासनाच्या कार्यतत्पर नोकरशाहीच्या कारभाराची पोल ही उघडल्या गेली होती.विशेष म्हणजे डम्पिंग यार्डच्या संरक्षक भिंतीलगतच्या न्यू सूरजनगर,सूरजनगर,अंतुजीनगर इत्यादी वस्त्यांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन्सच नाहीत…!
त्या ही पावसात शहरातील २०० ठिकाणी पाणी तुंबले होते.यातील सर्वाधिक वसत्या या उपमुख्यमंत्रीचे निवासस्थान असणा-या धरमपेठ भागातील होत्या!महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी ११ जणांना त्याही वेळी विविध ठिकाणावरुन पाण्यातून सुखरुप बाहेर काढले होते.वर्धा रोडवरील रहाटे कॉलनीतही पाणी साचले होते.या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ही निवासस्थान आहे.त्या ही वेळी पावसाचा सर्वाधिक फटका हा झोपडपट्टी व खोलगट भागांना बसला होता.त्या ही वेळी नाग व पिवळ्या नदीसह छोटे मोठे नाले दुथडी भरुन वाहिले होते.शहरातील रेशिम बाग,कस्तुरचंद पार्कसह अनेक मैदाने पाण्याखाली तुंबली होती.
बेसा,बेलतरोडी,हुडकेश्वर,पिपळा,रामेश्वरी,बालकृष्ण नगर,टोली,रामटेकेनगर,कळमना,स्वामी मंदिर परिसर,शताब्दी नगरसह शहरातील अनेक वस्त्यां या तलावामध्ये परिवर्तित झाल्या होत्या.तरी देखील २८ जुलैच्या संकटातून कोणताही बोध मनपा प्रशासनाने घेतला नाही,हे यातून सिद्ध होतं.तेव्हा ही शहरातील खासदार,आमदार किवा लोकप्रतिनिधींना, प्रशासनाला भविष्यातील संकटांपासून नागपूरकरांना वाचविण्यासाठी युद्धस्तरावर कामाला लावण्याची गरज वाटली नाही..!तेव्हा देखील हातावर पोट असणारे हजारो नागरिक अशाच प्रकारे कायमचे उधवस्त झाले होते…ही संख्या या वेळी लाखांमध्ये गेली.. इतकंच….!
याच वर्षी ११ मे रोजी मनपाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात शहरातील एकूण २२७ पैकी ११५ नाल्यांची पावसाळ्या पूर्वीची स्वच्छता झाली असल्याचे सांगण्यात अाले होते!एप्रिल महिन्यापासूनच दरवर्षी शहरातील नदी व नाल्यांच्या स्वच्छतेचे अभियान कोट्यावधी रुपये खर्च करुन मनपा प्रशासन राबवित असते.या वर्षी देखील मनुष्य बळ व मशीन अशा दोन्ही माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता!
नाले स्वच्छता अभियानातंर्गत नाल्यांची पूर्णपणे स्वच्छता करुन पावसाळी पाणी वाहण्याकरिता सूरळीत प्रवाह करण्यात आला आहे.याद्वारे वाहणा-या पाण्याची क्षमता वाढेल आणि वस्त्यांमध्ये पावसळ्यात येणा-या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल,
आणि वस्त्यांमध्ये पावसाळ्यात येणा-या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल,अशी माहिती मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली होती…!शहरातील विविध भागातून वाहणा-या नाल्यांची संख्या एकूण २२७ आहेत.यापैकी मनुष्य बळाद्वारे १५२ आणि मशीनद्वारे ७५ नाल्यांची स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.यातील लक्ष्मीनगर येथील १८,धरमपेठ येथील ३५,धंतोली येथील १४,हनुमान नगर येथील १४ नाले स्वच्छ झाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र,शुक्रवारच्या ढगफूटीतून याच भागातील नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याने सर्वाधिक नुकसान झाल्याचं दिसून पडतंय….!
मनपाचे नवनियुक्त आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी मनपा अधिका-यांच्या याच जनतेच्या जीवाशी व मालमत्तेशी संबंधित असणा-या, कामचलाऊ वृत्तीवर नाराजी व्यक्त करीत,पावसानंतर शहरात ठिकठिकाणी साचणारे पाणी व त्यामुळे निर्माण होणा-या समस्यांवर मनपातील विविध विभागाच्या अधिका-यांनी नेमकी काय कामे केली आहेत व किती शिल्लक आहेत याची माहिती ‘हमीपत्रावर’ सादर करण्याचे आदेश दिले होते…!पावसाळ्यात इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.अशा इमारतींना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले होते.शहरातील पावसळी वाहिन्यांच्या स्थितीवरुन आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.या वाहिन्यांची योग्य स्वच्छता न झाल्यानेच ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या आहेत.पावसाचे पाणी कुठेही तुंबणार नाही याची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना २० जुलै रोजीच दिल्या असताना देखील, मनपा प्रशासन व तेथील अधिकारी नागपूरकर नागरिकांच्या जिवितेविषयी व मालमत्तेच्या संरक्षणाविषयी, आपातकालीन संकटांविषयी किती तत्पर होतं?याचे उत्तर शुक्रवारच्या महापूरानेच नागपूरकर नागरिकांना दिले आहे.लोकप्रतिनिधींनी देखील सर्व विभागीय बैठकीत अवघ्या दोन तासात ९० मिलीमीटर कोसळलेल्या पावसावर ‘दोषारोपण’ करुन कर्तव्याची इतिश्री मानून घेतली.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी काल शहरातील ड्रेनेज लाईन्सची युद्धपातळीवर दुरुस्तीची घोषणा केली.जे कार्य सर्वात आधी हाती घेण्याची गरज होती ते कार्य शंभर वर्ष जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईन्सवरच, विविध ठिकाणी मॉल्स,मेट्रो व कमर्शियल इमारतींचे इमले चढल्यावर आता हाती घेतले जाणार आहे….!
पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मनपा आयुक्तांनी मलेरिया व फायलेरिया विभागाला दिली होती तरी देखील उपराजधानीत डेंग्यूने चांगलेच थैमान मांडले होते तरी देखील पावणे दहा लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मनपाने न्यायालयात सादर केली आहे!
आता कालचा महापूर ओसल्यानंतर नाग नाल्याचे पाणी हजारो नागरिकांच्या घरात व परिसरात शिरल्यानंतर साचून आहे.यातून येणा-या काळात मोठ्या प्रमाणात रोगराई डोके वर काढणार असल्याचे शहरातील आरोग्य तज्ज्ञ सांगतात,अश्यावेळी मनपाचा हा मलेरिया व फायलेरिया विभाग किती लाख नागरिकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
पावसाळ्या पूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचा मनपाचा दावा देखील कालच्या महापूरात फोल ठरला,खड्डेच नव्हे तर अनेक निकृष्ट सिमेंट रस्त्यांसह डांबरी रस्तेही वाहून गेल्याची धक्कादायक घटना देखील नागपूरकरांनी काल अनुभवली.ऐन मेडीकल चौकातील पाण्याखाली असणा-या मोठ्या खड्डयामुळे परवा रात्री एक तरुणाला आपला जीव गमवावा लागला,हा तरुण शुक्रवारी मुसळाधार बसरत असताना मेडीकलमध्ये एका नातेवाईकाला बघण्यास जात होता…..!
ज्या मनपात अर्धवट काम करुन देखील ११ कोटींची देयके ती देखील उपमुख्यमंत्र्यांच्याच प्रभागातील झोनल अभियंते कंपनीला अदा करतात, त्या मनपाचा कारभार नागरिकांसाठी नसून कंत्राटदारांसाठीच कसा हाकला जातो,हे या घटनेवरुन सिद्ध होतं.महापालिकेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून लक्ष्मीनगर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी ११.९ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.या कामासाठी २०१६ मध्ये निविदा काढण्यात आल्या तर,२०१७ मध्ये नवीन सांडपाणी वाहिन्या व त्याच्याशी संबंधित इतर कामांचे कार्यादेश देण्यात आले.या कामासाठी पुण्यातील तापी प्रेसस्ट्रेस प्रा.लि.कंपनीला काम देण्यात आले.कंत्राटदाराने संबंधित काम न करताही त्याला या कामासाठी ११ कोटींचे शुल्क अदा करण्यात आले….!
परिणामी,गडकरी यांनी केलेल्या घोषणेनुसार संपूर्ण नागपूर शहराची सांडपाण्याची व्यवस्था सुधारावयाची असल्यास किवा फडणवीस यांच्याच प्रभागात निधी देऊनसुद्धा नव्या सांडपाणी वाहीन्यांचे कामे होत नसल्यास, नागपूरकरांनी महाप्रलयासारखी असमानी व सुलतानी आपत्ती कोसळल्यावर कोणाच्या तोंडाकडे बघावे?याच यक्ष प्रश्नातून आज फडणवीस यांच्या पाहणी दौ-या दरम्यान अनेक नागरिकांचा संताप अनावर झाला असावा,त्यामुळेच उधवस्ततेचे निरीक्षण करतानाच नागपूरातील लोकप्रतिनिधींनी आपल्याच राज्यकारभाराविषयी आत्मपरिक्षण करण्याची देखील गरज असल्याचा सूर समाज माध्यमात उमटत आहे.
…………………..