दोन तासात शहराचा झाला तलाव:६० वर्षांचा विक्रम माेडला: ११६.५ मिलिमिटर बरसला पाऊस
अंबाझरी ओव्हर फ्लो झांकी:अंबाझरीचा बंधाराच फूटणे आहे बाकी!
वर्मा ले आऊट,गांधी नगर भागात सर्वाधिक नुकसान:पंचशील चौकापर्यंत त्राही त्राही:५४ तास नागरिक अंधारात!
सर्वसामान्यांच्या चारचाक्या,फ्रिज तरंगले:शासकीय मदत १० हजार घोषित!
जी-२० च्या तीन दिवसात ३० पाहूण्यांसाठी २०० कोटींचा खर्च:महाप्रलयात उधवस्त दूकानदारांना मिळणार ५० हजार रुपये!
बेसमेंट इमारतींमध्ये सर्वाधिक नुकसान: संबंधित स्थानिक संस्थांची बांधकामांच्या परवानग्या देण्यापुरतीच कर्तव्याची इतिश्री भोवली
लष्कराला पाचारण:पोलिसांवर आली नाल्यांच्या बाजूला कर्तव्य बजावण्याची पाळी!
नागपूरकर नागरिक देखील निसर्गाच्या कोपाला तितकाच जबाबदार:आम्ही प्रश्न विचारणे सोडून दिले!
अंबाझरी व नाग नदीच्या कायमस्वरुपी उपाययोजनेची गडकरींची सूचना
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२३ सप्टेंबर २०२३: मागील ६० वर्षांचा विक्रम माेडीत काढून शुक्रवारी व शनिवारी ११६.५ मिलीलीटरचा पाऊस उपराजधानीत बसरला आणि पावसाळ्या पूर्वी प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन केलेल्या तयारीची पुन्हा एकदा ‘पोलखोल’ करुन गेला.काल मध्यरात्री २ ते ५ वाजे दरम्यान मूसळधार पाऊस कोसळला,सर्वात महत्वाचे म्हणजे अंबाझरीवर जणू ढगफूटीसदृष्य पाऊस बरसला.अवघ्या दोनच तासात ९० मिलीलीटर पाऊस बरसला. मात्र अंबाझरी ‘धरणाच्या‘पाण्याचा निचरा करणा-या पुरातन नाल्यांचे नैसर्गिक तोंडच, महामेट्रोने बांधकाम करताना ९० अंशाच्या दिशेने फिरवले असल्याने निसर्गाने देखील आपली किमया दाखवली व आजूबाजूच्या संपूर्ण परिसरासह अगदी रामदासपेठ ते पंचशील चौक,मेहाडिया चौकापर्यंत,झांशी राणी,व्हेरायटी चौकांसह सर्वदूर त्राही त्राही माजली.
पाण्याचा वेग इतका भयंकर होता की शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपाजवळील नाल्याची भिंत पूराच्या पाण्यात वाहून गेली.क्रेझी कॅसलच्या भिंत नागपूरच्या नकाशातूनच गायब झाली.सीताबर्डी येथील धीरन कन्या शाळेजवळील पूलाची भिंती देखील अदृष्य झाली.अंबाझरीपासून नाग नदीमधून वाहणा-या पाण्याच्या वेगाने, अनेक पूलांवरील भिंती नामशेष करीत, शहरात ‘घूसखोरी’केली,आपला मार्गक्रमण बदलला व आजूबाजूचा संपूर्ण परिसर,इमारती,रस्ते यांना पाण्याखाली तुंबवून,भविष्यात येणा-या ‘महाप्रलयाचा’इशारा देऊन भल्या पहाटे हा प्रवाह निघून गेला.
दोन जिवित हानि आणि १४ मवेशींचा मृत्यू एवढाच नुकसानीचा हा आकड्यांचा खेळ नसून कोट्यावधींच्या संपत्तीवर या महाप्रलयाने टाच आणली आहे.अंबाझरीच्या पायथ्याशी असणा-या वर्मा ले आऊट सारख्या भागात फ्रिज पासून तर स्वयंपाक घरातील भांडीकुंडी तरंगत होती.हजारो चार चाकी गाड्या या पाण्यात बुडाल्या.धंतोलीतील सिल्वहर पॅलसेमध्ये तर पहील्या मजल्यापर्यंत पाणी चढले.भाजपचे प्रादेशिक कार्यालय असणारे अमर पॅलेसमधील डीपी व पार्किंग पाण्यात तुंबल्याने वीज व पाण्यासाठी ४० तासांची आणिबाणि लागली. अनेक भागांची वीज काल रात्री ३ वाजता लृप्त झाली ती अद्यापही विज वितरण विभाग पूर्ववत करु शकला नाही.अनेक भागात इमारतींच्या डीपीमध्ये पाणी शिरल्याने वीज खंडीत झाली.वीज वितरण विभागाने युद्धस्तरावर कर्तव्य बजावून अनेक भागातील वीज पुरवठा पूर्वरत केला मात्र अद्याप १४ भागातील वीज पूरवठा, डीपीमधील पाणी न वाळल्याने सुरु करता आला नाही. या भागातील हजारो इमारती या अद्याप अंधारात असून हजारो कुटूंबिय,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक हे पाणी व वीजेशिवाय असल्याचे दिसून पडत आहेत.वीजच नसल्याने इमारतीच्या टाक्यांमध्ये पाणीही चढवता आले नाही.इंटरनेट.लिफ्ट,घरातील अत्याव्यशक यांत्रिक उपकरणे बंद होती.नागरिकांच्या त्रासाला तर अंतच नव्हता.
सात वर्षांपूर्वी मेट्रोने अंबाझरीच्या बंधा-याजवळ आपले पिलर्स उभारले त्याच वेळी मेट्रोच्या बांधकामावर धरण सुरक्षा संघटनेने तीव्र आक्षेप घेतला होता.मेट्रोच्या या बांधकामामुळे या धरणाची सुरक्षाच धोक्यात येईल,असा दावा करण्यात आला होता.त्यावेळी नागपूर महानगरपालिका व महामेट्रोने धरणाच्या संवर्धनाची हमी घेतली होती.यासाठी एक कोटी रुपये त्यावेळी महामेट्रोने मनपाला हस्तांतरित केले असल्याचे सांगितले जाते.अंबाझरी तलावाच्या ओव्हर फ्लो पॉईंटपासून नाग नदीचा उगम असल्याचा दावा १९९९ च्या सुमारास मनपाने केला आहे.मात्र,तज्ज्ञांच्या दाव्यानुसर १८७० च्या पूर्वी नाग नदी तिथून प्रवाहित होत होती.आताच्या लावा गावातून नदीचा खरा उगम झाला असून, तेथून ही नदी अमरावती मार्गाने नागपूरात येऊन प्रवाहित झालेली होती.
नदीचा हाच प्रवाह मातीच्या धरणाने १८७० साली अंबाझरी येथे अडवण्यात आला.त्यामुळे तिथे विशालकाय तलाव निर्माण झाल्याचा दावा पर्यावरणीय तज्ज्ञ करतात.अंबाझरी धरणाच्या याच मातीच्या भिंतीला सात वर्षांपूर्वी मेट्राेचे पिलर्स उभारताना गंभीर तडे गेले असून अद्याप मनपा,मेट्रो किवा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागरिकांसाठी भविष्यात काळरात्र ठरु शकणा-या अंबाझरी बंधा-याच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले अद्याप उचलण्यात आली नसून, कालच्या महाप्रलयाने जणू प्रशासन,राजकीय नेते व नागपूरकर नागरिक यांना एक प्रकारे धोक्याचा ‘इशाराच’दिला असल्याचे म्हणता येईल.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी अंबाझरी व नागनदीच्या ‘कायमस्वरूपी’ उपाययोजनेची सूचना आज प्रशासनाला केली आहे.मात्र,मार्च २०१८ मध्ये जलसंपदा विभागाचे निवृत्त सहायक मुख्य अभियंता व सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे यांनी धरणाला भेट देत त्याचवेळी अंबाझरी तलावाच्या भींतीला लागूनच मेट्रो रेल्वेचा मार्ग बांंधण्यात येत असल्याबाबत आक्षेप नोंदवला होता.
धरण सुरक्षा संस्थेच्या नियमानुसार,धरणाच्या २०० मीटरच्या आत कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नव्हते.परंतू महामेट्रोने धरणाच्या मातीच्या बंधा-याला लागूनच मोठमोठे पिलर्स उभारले.यासाठी ड्रीलिंग मशीनरीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.परिणामी धरणाच्या भिंतीला भविष्यासाठी जो धोका निर्माण झाला तो टाळावयाचा असल्यास धरणाच्या भिंती अधिक मजबूत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.त्यामुळेच गडकरी यांनी आज प्रशासनाला अंबाझरी व नाग नदीच्या संदर्भात ‘कायमस्वरुपी’ उपाययोजनेची सूचना दिली असली तरी नाग नदीचा प्रवाह अडवून अंबाझरी येथे मातीचे जे धरण बांधण्यात आले त्या धरणाला तलावाच्या श्रेणीतून काढून प्रशासनाने, तातडीने ‘लघु धरणाच्या’श्रेणतील समाविष्ट करण्याची मागणी शहरातील पर्यावरणवादी करीत आहे.
यामुळे जलसंपदा विभागाने निर्धारित केलेल्या धरण सुरक्षा नियमांचे पालन होईल.या धरणाची तांत्रिकदृष्टया वर्षातून २ वेळा तपासणी,दुरुस्ती व देखभाल करता येईल.महापालिकेने या धरणाची कधीही देखभाल केली नाही.महत्वाचे म्हणजे महामेट्रोच्या बांधकामामुळे या धरणाच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.एवढंच नव्हे तर मनपाने २०१७ साली मनपाच्या निवडणूकीपूर्वी अतिशय जलद गतीने ओव्हर फ्लो पॉईंटरवरच विवेकानंद स्मारकाची उभारणी करुन या धरणाला अधिक धोकादायक बनवले असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.धरणाचा ओव्हर फ्लो पॉईंट हा नेहमीच मोकळा असायला हवा.मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास धरणाच्या भिंतीवर त्याचा दाब येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती.कालच्या मुसळधार पावसाने कोट्यावधींचा खर्च करुन बांधण्यात आलेली विवेकानंद स्मारकाची भिंत ही वाहून गेल्याची चर्चा आहे.हेरिटेज समितीचा अहवाल हा देखील संशयाच्या भोव-यात सापडलेला आहे….!
महामेट्रोने धरणाशेजारी बांधकाम करताना धरणाच्या मूळ स्त्रोतांचे तोंड ९० अंशांने वळवले.याला वर्मा ले आऊट मधील स्थानिक रहीवाशांनी २०१७ मध्येच विरोध केला होता मात्र मेट्रोच्या अधिका-यांनी याची दखलच घेतली नाही,असे वर्मा ले आऊट मधील पांडे नामक गृहस्थाने आज सांगितले.त्यांची संपूर्ण इमारत पाण्याखाली गेली तर गच्चीवर देखील गळ्यापर्यंत पाणी आले होते.अंबाझरीचे पाणी वाहून नेणारे जुने स्त्रोत मेट्राेने आपल्याच मर्जीने ज्याप्रकारे वळते गेले त्यामुळेच पाण्याचा हा प्रलय झाला असल्याचा आराेप आता केला जात आहे.
याशिवाय पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज केली. नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान तसेच
मृत्यूमुखी पडलेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखाची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.यावर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली.जी-२० साठी केवळ तीन दिवसात फक्त ३० पाहूण्यांसाठी २०० कोटींचा खर्च मनपाने केला मात्र प्रशासकीय नोकरशाहीच्या धोरणात्मक लकव्यातून उद् भवलेल्या असमानी व सुलमानी संकटासाठी, दूकानदारांना फक्त ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांसाठी फक्त १० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा ही जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा संताप उमटला.
अनेक भागात बेसमेंटमध्ये हॉटेल्स सुरु होते.दूकाने होती,चार चाकी उभ्या होत्या यात कोट्यावधींचे नुकसान झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याच शहराला सढळ मदतीचा हात देण्या ऐवजी हात आखडता घेतल्याची तक्रार समाज माध्यमावर उमटली.
आज मनपातील मुख्य इमारतीतील सातव्या मजल्यावरील स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील मोठ्या स्क्रीन्सवर अर्ध्या तुंबलेल्या जलमय शहराचा आढावा घेण्यासाठी, गडकरी,फडणवीस यांच्याशिवाय विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,माजी महापौर व फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी,आमदार प्रवीण दटके,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी,पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थिती दर्शवली.
(छायाचित्र : पंचशील चौक पत्रकार भवनासमोरील संपूर्ण रांगेतील मेहाडीया चौकापर्यंतच्या बेसमेंटमध्ये असे पाणी शिरले होते)
या आढाव्यात ढगफूटी सदृष्य पाऊस यावर खापर फोडण्याखेरिज तातडीचे मदत कार्य यावर चर्चा झाली.नुकतेच छत्तीसगढमधील जलप्रलयाचे समीक्षण करताना पर्यावरणवाद्यांनी तेथील डोंगरांना पोखरुन क्षमतेपेक्षा जास्त विकास कार्य लादण्याचा अट्टहास नडला,असे नमूद केले.तोच कित्ता उपराजधानीत देखील गिरवला जात असल्याचा आरोप ते करतात.प्रत्येक शहराची सहन करण्याची एक मर्यादा असते.नागपूर शहराचा विकास हा देखील अमर्याद व नियोजनशून्य होत असल्याने अश्या संकटांची नागपूरकरांनी सवय करावी,असे आवाहन ते करतात.शहरभर पसरलेले ३ फूट उंचीचे सिमेंट रस्त्यांचे जाळे,शंभर वर्षे जुनी ड्रेनेज लाईन्स न बदलताच मॉल्स,उड्डाण पूलांची करण्यात आलेली निर्मिती,पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा या साठी पावसाळ्या पूर्वीच नैसर्गिक स्त्रोतांचा मोकळा न करण्यात आलेला श्वास,तलावांचे न झालेले खोलीकरण,शहरातील झाडून पुसून सर्वच तलावांच्या सौंदर्यीकरणाचा अट्टहास,अंबाझरी,फूटाळ्यासारख्या तलावांच्या कॅचमेंट क्षेत्रात निर्माण करण्यात आलेले सिमेंटीकरण,भिंती,मेट्रोचे फ्लाय ओवर्स अश्या विकासातून ढगफूटी व महाप्रलय नाही येणार तर काय येईल?भरत नगर भागातील ज्येष्ठ नागरिकांना एनडीआरएफचे जवान बोटीच्या सहाय्याने सुरक्षीत स्थळी हलवित असल्याचे दृष्य कशाचे द्योतक आहे?एका मोठ्या नेत्याचे स्वप्न साकारल्याचे?असा खोचक प्रश्न ते उपस्थित करतात.
आज सोशल मिडीयावर सर्वाधिक व्हायरल झाला तो नाग नदीमध्ये बोट चालविण्याचे विधान करणारा व्हीडीयो.यावरील मिम्स हे मनोरंजना पलीकडे विचारप्रवृत्त करणारे होते…!फक्त नाग नदीत नव्हे तर अर्ध्या शहरात बोट चालल्याचा आनंद घेण्याचे नागरिकांना आवाहन करणारे मिम्स हे आजच्या महाप्रलयामुळे उधवस्त झालेल्या नागपूरकर नागरिकांचे मर्म उलगडणारे होते.मात्र,आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना कोणत्याही कामांसाठी प्रश्न विचारत नाही हा लोकांचा दोष नाही का? त्यांच्या धोरणांचा व अंमलबजावणीचा न केलेला विरोध अर्ध्या शहरामध्ये त्राही त्राही माजवून गेला,भविष्यात या ही पेक्षा गंभीर परिणामांसाठी सज्ज होण्याचा इशारा ही पर्यावरणवादी देतात.स्मार्ट सिटीच्या मोठ्या स्क्रिीनवर महाप्रलयाचे दृष्य बघणे हा उपाय होऊ शकत नाही,असा त्यांचा आक्षेप आहे.
भरतवनमधील १२५० झाडे कापून तेलंगखेडी मार्गे फूटाळापर्यंतचा रस्ता बांधण्याचा अट्टहास महत् प्रयासाने थांबवला असला तरी आता माफसूच्या मागून हा रस्ता बांधणे सुरुच आहे.गडकरी यांच्या विभागाने भरतवनमध्ये फक्त ५५० झाडे कापली जाणार असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता,मनपा व पर्यावरणवादी संस्थांनी मोजली असता ती १२५० झाडे होती,ती देखील ७० ते ८० वर्ष जुनी!शहर डूबतंय त्याचे नियोजन करण्याची गरजच वाटली नाही,उड्डाण पुले,सिमेंट रस्ते,हेरिटेज तलावांची नासधूस आच शाश्वत विकासाचा मॉडेल असेल तर…..निसर्गाला दोष देण्याचा नागपूरकरांना अधिकार आहे का?असा सवाल पर्यावरणप्रेमी करतात.
१९८९ साली नदी,तलाव परिसरात १०० मीटर जागेपर्यंत कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करण्याची परवानगी नव्हती.२०१४ मध्ये फडणवीस-उद्धव ठाकरेची युतीची सत्ता सत्तेवर आली आणि त्या सरकारने अधिसूचना काढून या नियमात बदल केले!आता नदी किवा तलावाला लागूनच मोठ्याप्रमाणात अधिकृत-अनाधिकृत बांधकाम होत आहे….!पाण्याचा नैसर्गिक बहाव तिथे तुंबला.हे धोरण तत्कालीन सरकाने राज्यातील २२ नद्यांसाठी जाहीर केले त्यातील एक….नाग नदी होती!आज त्याच नाग नदीचे अतिशय रौद्र रुप नागपूरकरांनी अनुभवले.नागपूर रेल्वे स्टेशनपासून मेयो मेडीकलपर्यं सर्वदूर आज फक्त पाण्याचेच साम्राज्य होते.
(छायाचित्र : नागपूर रेल्वे स्टेशन!)
अलंकार टॉकिज समोरील सेंट्रल मॉलच्या मागील भागात याच नाग नदीमध्ये भरण टाकून लोखंडी रॅम उभारण्यात आले आहे…..!कुठे जाणार नदीचा बहाव? आज तेच घडले.शेकडो लहान लहान पुलाचे कठडे तोडून नाग नदीचे पाणी अनेक इमारतींमध्ये घूसले तर शंकर नगर पूलाजवळ ते धीरन कन्या जवळील पूलाच्या बाजूला अश्या अनेक ठिकाणी तुटलेल्या पुलांजवळ पोलिस हे कर्तव्य बजावत असतानाचे दृष्य नागपूरकरांनी अनुभवले.आता याच नाग नगदीच्या सौंदर्यीकरणावर जापानच्या झिका कंपनीकडून १७०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन खर्च केले जाणार आहे…..!
(छायाचित्र : पंचशील चौक ते झांसी राणी चौक दरम्यान असा रस्ताच उखडला)
फडणवीस यांनी देखील संपूर्ण प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याची सूचना केली मात्र याच प्रशासनाने गेल्या दीड वर्षांपासून श्रीरामभवनच्या बाजूचा रस्ता किव रवि नगर चौकातील रस्ता पूर्ण करण्याची तसदीही घेतली नसल्याकडे जागरुक नागरिक लक्ष वेधीत आहेत.पंचशील चौक ते झांशी राणी चौकाच्या दरम्यान तर संपूर्ण रस्ताच उखडून गेला आहे.आता फडणवीस यांचे प्रशासन सर्वात वर्दळीचा असणारा हा रसता कधी सुधारणार?पुढच्या महाप्रलयानंतर….?नवीन बांधत रहा..जुने तशेच राहू द्या..हेच धोरण फडणवीस यांच्या प्रशासनाच्या अंगवळणी पडल्याची टिका केला जात आहे.
शहरातील महाप्रलयाविषयी-
नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून.
जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली
शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्हयातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.
मुसळधार पावसामध्ये नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन वयोवृद्ध महिला मृत्यूमुखी पडल्या आहे.
१. मिराबाई पिल्ले, ७० वर्षे वृद्ध महिला महेश नगर येथे मृत्युमुखी पडल्या.
२. तर तेलंगखडी परिसरातील सुरेंद्रगड नगरमध्ये ८० वर्षीय संध्या शामराव ढोरे यांचा मृत्यू झाला.
या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) यांचा मृत्यू झाला.हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागासही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.
नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
हजारीपहाड (सह्याद्री)भागात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली बारा जनावरे मृत झाली आहेत. प्रशासनातर्फे तत्काळ आर्थिक मदतीची घोषणा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केली आहे. तसेच, ही मदत तत्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नजिकच्या हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल भोगल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले
कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले
शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले.शहरातील सक्करदरा गार्डन मध्ये पाणी साचले.
दरम्यान, जिल्हा व मनपा प्रशासनाद्वारे मदतकार्य सुरू
नागपुरात रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शुभम विलास खोब्रागडे (२८) आणि शिवशंकर पिंटू लक्ष्मण प्रसाद पाठक (३८) हे मौदा रोड असोली भागात अडकले होते, यांना मनपाच्या रेस्क्यू बोटने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
शहरात ठीक-ठिकाणी स्थानिक प्रशासनासह सामाजिक संस्थांद्वारे नागरिकांना भोजनाचे पॅकेट्स, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक वस्तू,औषध आदी वितरीत करण्यात आले.
नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील पावनगाव येथील कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे ११ नागरिक अडकले होते त्यांना आपदा मित्र यांनी बोटी द्वारे सुखरूप बाहेर काढले.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वार रुममधून परिस्थितीचा आढावा घतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागासही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.
दरम्यान, मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’(सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
अंबाझरी तलावाच्या मजबुतीसाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत, काही नवीन पुलांचे बांधकाम करण्याची सूचना महानगरपालिकेला करण्यात आली आहे. संपूर्ण बंधाऱ्याचे मजबुतीकरण करताना पाटबंधारे विभाग या कामांमध्ये एजन्सीचे काम करेल, राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,मनपा आयुक्त डॉ. अभीजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
नागपूर महानगरपालिका आपात्कालीन मदत क्रमांक-
आपात्कालीन नियंत्रण कक्ष (मुख्यालय) 0712-2551866/7030972200
लक्ष्मीनगर झोन क्र.1 0712-2245833
धरमपेठ झोन क्र.2
0712-2565589/2567056
हनुमान नगर झोन क्र.3
0712-2755589
धंतोली झोन क्र.4
0712-2958401
नेहरू नगर झोन क्र.5
0712-2270090/2702126
गांधीबाग झोन क्र.6
0712-2735599
सतरंजीपुरा झोन क्र.7
7030577650
लकडगंज झोन क्र.8
0712-2737599/2739020
आशीनगर झोन क्र.9
0712-2653476
मंगळवारी झोन क्र.10
0712-2595599/2590605 / 2536903