फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम‘अल्पवयीन’ मुलांकडून पत्रकार कृष्णा मस्के यांचा घात करण्याचा डाव!

‘अल्पवयीन’ मुलांकडून पत्रकार कृष्णा मस्के यांचा घात करण्याचा डाव!

तीन वर्षात बाल सुधार गृहातून सूटून बाहेर पडण्याचा कलमाचा व्हावा गांर्भीयाने विचार

भाजपच्या ‘शासन आपल्या दारी’उपक्रमाची केली होती पोलखोल

नागपूर,ता.१९ सप्टेंबर २०२३: नुकतेच ’एडिटर गिल्ड ऑफ इंडिया’च्या(ईजीआय)चार सदस्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठाेर कारवाईपासून संरक्षण दिल्याच्या बातमीची शाई वाळत नाही, तर महाराष्ट्राच्या उपराजधानीत एका प्रामाणिक पत्रकारावर अल्पवयीन मुलांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने नागपूरच्या पत्रकार जगतात चांगलीच खळबळ माजली आहे.कृष्णा मस्के हे दूरदर्शनसाठी कंत्राटी पद्धतीने काम करीत असून ते ’एनएमसी न्यूज’नावाचे यूट्यूब पोर्टल ही चालवतात.
वाठोडा येथे १० ते १५ तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचा ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम पार पडला.या उपक्रमाचे उद् घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.या उपक्रमात शासनातर्फे राबविण्यात येणा-या अनेक कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्यांविना लाभ मिळावा, या हेतूने शासनातर्फे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जात आहे.राज्यातील सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागू नये, यासाठी हा उपक्रम राबविला जात असून, एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे व त्यासाठी आवश्‍यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करुन दिली जात आहे.या उपक्रमात शासकीय अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन नागरिकांना विविध योजनांची माहिती देतील त्याच बरोबर आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेतील अशी घोषणा सरकारने केली तसेच, अर्जदारांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येईल,असे उद्दिष्ट सरकारने या उपक्रमाचे सांगितले आहे.या उपक्रमावर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होत आहे,हा भाग अलहदा.

याच उपक्रमात शासकीय कर्मचा-यांच्या सोबत बसून काही खासगी लोकं हे नागरिकांकडून प्रत्येक योजनेसाठी पैसे उकळत असल्याची तक्रार पत्रकार कृष्णा मस्के यांना मिळाली.परिणामी ते आपल्या आईला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वाठोडा येथील केंद्रात गेले.राजू गोतमारे नावाच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम वाठोडा येथे राबविला जात होता.पूर्व नागपूरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तसेच विविध कार्यकर्त्यांचा भरणा प्रत्येक टेबलवर कृष्णा मस्के यांना आढळला.इतकंच नव्हे तर प्रत्येक नागरिकांकडून प्रत्येक योजनेसाठी पैसे घेतले जात होते!

ज्येष्ठ नागरिकाचा कार्ड काढून देण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेण्यात येत होते.महत्वाचे म्हणजे याची कोणतीही रसीद दिली जात नव्हती!याबाबत विचारणा केली असता,अर्ज अपलोड करावा लागतो,काऊंटर सांभाळावे लागते अशी विविध कारणे संबंधित खासगी व्यक्ती यांनी सांगितली.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून ५०० रुपये घेतले जात होते.याशिवाय रहीवाशी असल्याचा दाखला,इन्कमचा दाखला इत्यादी विविध दाखल्यांसाठी नागरिकांकडून १००-१०० रुपये उकळले जात होते.आखिव पत्रिकेसाठी २०० रुपये घेण्यात येत होते.

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याची योजना ‘मोफत’असताना नागरिकांकडून इतके पैसे कसे घेतले जात आहे?अशी विचारणा पत्रकार कृष्णा मस्के यांनी केली.यावर ’आम्ही शासकीय कर्मचारी नसून खासगी लोकं आहोत, आम्हाला आमचा खर्च पहावा लागतो’असे चमत्कारिक उत्तर तेथील खासगी कर्मचा-यानी दिले.कागदे,स्कॅनिंग इत्यादीचे एवढे पैसे लागत असल्याचे उत्तर काऊंटरवर बसलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले.

हा उपक्रम १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत संपन्न होणार असल्याने हजारो नागपूरकर नागरिकांची लृट भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कश्‍याप्रकारे करत आहेत,यावर कृष्णा मस्के यांनी बातमीच्या स्वरुपात आपल्या ‘एनएमसी’ यूट्यूब पोर्टलवर व्हिडीयो व्हायरल केला.‘भाजपच्या दलालांसमोर सेतू गप्प’शासन आपल्यादारी नव्हे तर भ्रष्टाचार आपल्या दारी’अशी बातमी त्यांनी व्हायरल केली.एका तासात लाखांच्या वर हा व्हिडीयो बघितला गेला व मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने भाजपचे पूर्व नागपूरातील पदाधिकारी चिडले.

३० च्या जवळपास भाजपचे कार्यकर्ते,नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून कृष्णा मस्के यांच्या विरोधात तक्रार नोंदवली.यासाठी भाजपच्या एका आमदाराचा फोन वाठोडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना गेला असल्याची चर्चा आहे.वाठोडा पोलिस ठाण्यातील पीआयचा फोन कृष्णा मस्के यांना आला असता मोठ्या पोळ्यानिमित्त ते आपल्या गावी काटोलला असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या बदनामीची तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती.या मागे आमदार कृष्णा खोपडे यांचे नातेवाईक असणारे व पूर्व नागपूरचे संपर्क मंत्री सजंय अवचट तसेच भाजपचे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सुनील सूर्यवंशी यांनी भडकावले असल्याने माझ्या विरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे कृष्णा मस्के यांचे म्हणने आहे.यावर कृष्णा मस्के यांनी आपले वकील मित्र ॲड.राहूल झांबरे यांच्याशी कायदेशीर सल्लामसलत केली.इतकंच नव्हे तर मस्के यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खोटी तक्रार वाठोडा पोलिस ठाण्यात दाखल केल्याचे कळताच समाजातील विविध जाती-जमातीच्या संघटनांनी मस्के यांना आपले पाठबळ जाहीर केले.मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते काँंग्रेसचे तानाजी वनवे यांनी देखील वाठोडा पोलिस ठाण्याला संपर्क केला.बातमी प्रसिद्ध करने हे पत्रकाराचे काम असून मस्के यांनी जनतेच्या हितासाठी बातमी व्हायरल केली.हा त्याचा संवैधानिक अधिकार असल्याचे वनवे यांनी वाठोडा पोलिसांना ठणकावले.

झोन-४ चे डिसीपी विजयकांत सागर यांच्यापर्यंत प्रकरण पोहोचले.त्यांनी बातमीचा तो व्हिडीयो बघितला यात आक्षेपार्ह्य असे काहीच नसल्याचे सांगितले,असे मस्के सांगतात.हा कायदा सुव्यवस्थेचा नसून प्रश्‍न नसून राजकारणाचा विषय असल्याचे मत पोलिसांचेही झाले. त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यातील पीआयसोबत संवाद साधल्याने मस्के अटकेपासून वाचले.

संजय अवचट यांनी वैयक्तीकरित्या भेटून धमकी देत ‘तुला बघून घईल’असे शब्द वापरल्याने मी सावध झालो व ओंकार नगर येथील मित्राच्या घरी विविध संघटनांच्या प्रमुखांसोबत चर्चा करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता बैठक पार पाडल्यानंतर रात्री घरी परतत असताना रात्रीचे ११.४५ वाजले,असे कृष्णा मस्के सांगतात.

ओंकार नगर चौकातच तीन अल्पवयीन मुले एकाच दूचाकीवर दडून बसली होती.मला बघताच त्यांनी मला अडवले व शिवीगाळ सुरु केली.त्यांचा हेतू लक्षात येताच मस्के सावध झाले.आम्ही अल्पवयीन असल्याने आमचे कोणीही काहीच वाकडे करु शकत नाही….कायदा किवा पोलिस सुद्धा नाही!अश्‍या शब्दात मस्के यांना धमकविण्यात आले.भारतीय दंड संहितेच्या १५(ग)या कलमानुसार १६ ते १८ या वयोगटातील मुलाने कोणताही गुन्हा केल्यास व तो दोषी सिद्ध झाल्यास त्याला बालसुधारगृहात जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत बंदी म्हणून ठेवल्या जाऊ शकतं.दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपी हा अल्पवयीन होता.याच आरोपीने निर्भयासोबत सर्वाधिक क्रार्य घडवून आणले होते.तिच्या योनीमार्गात सलाख टाकून तिच्या आंतरिक भागाला सर्वाधिक इजा याच अल्पवयीन मुलाने पोहोचवली होती.पुढे याच कारणामूळे तिची मृत्यूशी झूंज संपली होती!

मस्के यांना इजा पोहोचवण्यासाठी देखील हेतुपुरस्सर गुंड प्रवृत्तीच्या तीन अल्पवयीन मुलांची निवड करण्यात आली होती.त्यामुळेच मस्के यांना एकट्यात गाठून त्यांनी ’आम्ही अल्पवयीन असल्याने आमचे कोणी काहीच बिघडवू शकत नाही’अशी वल्गना केली.दूस-या शब्दात ’हमारा कोई कूछ भी उखाड नही सकता,पोलिस भी नही!’त्यांच्या अश्या शब्दावर कृष्णा हे सावध झाले.ॲड.राहूल झांबरे यांचे घर अवघ्या तीन-चार मिनिटांच्या अंतरावर असल्याने मस्के यांनी त्यांना आलेल्या जीवघेण्या संकटाची माहिती दिली व त्या मुलांसमोर नमते घेऊन, मस्के हे मागे मागे सरकत गेले व वाटाघाटीच्या बोलणीत त्या मुलांना गुंतवूण ठेवले. चौरस्ता असल्याने रात्री देखील नागरिकांची वर्दळ होती व त्या मुलांची देहबोली लक्षात आल्याने ५-७ नागरिक तिथे थांबले.एवढ्यात ॲड.राहूल झामरे आपल्या दूचाकीने तिथे पोहोचताच,‘चलो जल्दी’म्हणत त्या तिघ्या अल्पवयीन मुलांनी दूचाकीवरुन धूम ठोकली.जाताना मस्के यांनी त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला.मात्र,तो सुस्पष्ट आला नाही.

झामरे यांनी म्हाळगी नगर चौकापर्यंत त्यांचा पाठपुरावा केला.यानंतर याच चौकातून ११२ क्रमांकावर मस्के यांनी कॉल केला.एका क्षणात त्यांचा फोन पोलिसांच्या रडारवर लोकेट झाला.मस्के यांना कोणती मदत लागेल अशी विचारणा झाली.घटनेची हद्द ही अजनी क्षेत्रात येत असल्याने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना मस्के यांना देण्यात आली.रात्रीचे १२ वाजून २० मिनिटे झाली असल्याने व घरुन वारंवार काळजीचे फोन येत असल्याने,तक्रार दाखल करण्यास गेल्यास आणखी दीड दोन तास लागतील असे वाटून ,मस्के यांनी दुस-या दिवशी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे पोलिसांना कळवले.

दूस-या दिवशी वंचित बहूजनचे रवि शेंडे,बीआरएसपीचे झामरे,माजी नगरसेवक व काँग्रेस सचिव ॲड.यशवंत मेश्राम,शिवसेनेचे उपप्रमुख गुड्डू रहांगले,दलित नेते तन्हा नागपूरी तसेच ॲड.राहूल झामरे यांच्यासह मस्के यांनी अजनी पोलिस ठाण्यात तीन अज्ञात मुलांविरोधात तक्रार दाखल केली.

(छायाचित्र :मस्के यांनी अजनी पोलिस ठाण्यात नोंदवलेली तक्रार)

पोलिसांनी ओंकार नगर चौकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता...दोन सीसीटीव्ही कॅमरे बंद होते तर एका कॅम-याच्या लेंसवर धूळ बसली असल्याने चित्र ब्लर उमटत होते….!आरोपींची गाडी दिसत होती मात्र मुख्य कॅमरा बंद असल्याने त्यांनी केलेली धक्काबुक्की दिसू शकली नाही.मात्र,प्रत्यक्ष घटना बघणारे अनेक साक्षीदार समोर आले.

(छायाचित्र : कृष्णा मस्के यांनी पळून जात असलेल्या आरोपींचा असा फोटो मोबाईलमध्ये कैद  करण्याचा प्रयत्न केला)

डीसीपी यांनी घटनास्थळी जाऊन गांर्भीयाने चौकशी केली.अजनीच्या पीआय यांना तीन दिवसांनंतरही तीन अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई का केली नाही?अशी विचारणा केली.

वाठोडा पोलिस ठाण्यात जाऊन मस्के यांच्याविरोधात तक्रार देणारे ते ३० भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोण होते?कोणत्या आमदारांचा वाठोडा पोलिसांना फोन गेला?याची देखील उत्तरे नागपूरकर जनतेला पोलिस प्रशासनाकडून आता अपेक्षीत आहे.कारण यानंतरच मस्के यांच्यासारख्या प्रामाणिक पत्रकाराच्या जीवावर ते तीन अज्ञात अल्पवयीन आरोपी चालून आले होते.मस्के यांच्या कूटूंबात ज्येष्ठ नागरिक असणारी आई,पत्नी दोन लहान चिमुकले असून केवळ राजकीय सूडापोटी मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असता, तर त्यांच्या कूटूंबियांची होणा-या वाताहतीचा अंदाज देखील सभ्य माणसाला लावता येत नाही.

कृष्णा मस्के यांना भर चौकात अडवून त्यांच्यावर धावून जाणारे ते तीन अल्पवयीन हे गुंड प्रवृत्तीचे असून, कोणाचाही जीव सहज घेणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती.त्यामुळेच कायद्याने आता ‘अल्पवयीन’गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत पुर्नलोकन करने गरजेचे आहे.ज्या काळी हा कायदा बनला त्याकाळी समाजात इतकी पराकोटीची बजबजपुरी माजली नव्हती.आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे.गेल्या काही वर्षात कायद्याच्या दृष्टिेन ‘अजाण’असलेल्यांनीच अतिशय गंभीर गुन्हे केल्याचे प्रमाण १५० पट वाढल्याचे एक अहवाल सांगतो!तसेच ५० वर्षांपूवी अजाण मुलाला असणारी समज आणि आजच्या अल्पवयीन मुलाची समज, यात जमीन अासमानाचे अंतर आहे.अश्‍यावेळी केवळ अल्पवयीन असल्याच्या कारणाने एखाद्या निर्भयाचा,एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचा किवा एखाद्या पत्रकाराचा जर जीव जात असेल तर घटनेचे गांर्भीय बघता या कायद्याचे पुर्नलोकन होणे,नितांत गरजेचे असल्याचे दिसून पडतं.

मस्के यांना भर चौकात अडवून तीन अल्पवयीन यांनी ‘हम मायनर है,पोलिस भी हमारा कूछ नही उखाड सकती’अश्‍या शब्दात जी धमकी दिली ती अत्यंंत गंभीर असून कायद्याची टर उडवणारी आहे. राजकीय सूड भावनेतून हेतुपुरस्सर अल्पवयीन यांचा वापर या घटनेत केलाा असल्याचे सिद्ध होत आहे.

देशात जानेवरीपासून मणिपूर राज्य धूसमसतोय.एडिटर गिल्ड ऑफ इंडियाचे चार पत्रकार हे मणिपर येथे वार्तांकंनासाठी गेले होते.लष्कराने केलेल्या विनंतीनुसारच गिल्डचे हे सदस्य मणिपूरमध्ये वार्तांकनासाठी गेले होते.परिणामी त्यांच्यावर विविध समुदायांमध्ये वैमनस्य भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला!या विरोधात गिल्डच्या या चारही पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.सर्वोच्च न्यायालयाने या चार ही सदस्यांविरोधात कठोर कारवाई करण्यापासून संरक्षणाची मुदत दोन आठवड्याने वाढवली आहे.

मणिपूरमधील स्थानिक प्रसारमाध्यमे तेथील स्थितीचे वार्तांकन पक्षपातीपणे करीत असल्याचे सांगून लष्कराने गिल्डच्या सदस्यांना वार्तांकनासाठी बोलावले होते.गिल्डच्या चारही सदस्यांनी मणिपूरमध्ये प्रत्यक्ष फिरुन वार्तांकन केले.ते वार्तांकन चुकीचे असेल किवा बरोबर पण…हेच तर उच्चार स्वातंत्र्य आहे ना?असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.

या पत्रकारांच्या विरोधात तक्रार करणा-या तक्रारदात्याच्या वकीलाने ॲड.गुरु कृष्णकुमार यांनी ‘वार्तांकनात एकतर्फी आरोप करुन गिल्डच्या सदस्यांनी फौजदारी गुन्हा केला’असल्याचे सांगितले.हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांर्भीयाने घेत याची चांगलीच चिरफाड केली.न्यायालयासमोर चुकीची माहिती सादर करणे हा फौजदारी गुन्हा ठरु शकतो,असा समज वकील महोदयांना दिला.एवढंच नव्हे तर गिल्डच्या सदस्यांविरुद्ध याचिका दाखल करुन घेणा-या मणिपूर उच्च न्यायालयावरही सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी नोंदवली.

थोडक्यात दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र,प्रसार-प्रसार माध्यमांच्या,सर्वोच्च न्यायालयाच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ‘उच्चार स्वातंत्र्य’आपल्या निर्णयातून अबाधित राखले जात आहे.अश्‍यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारे ‘शासन आपल्या दारी’योजनेतून सर्वसामान्यांची केली जाणारी लृट याची सप्रमाण बातमी प्रसिद्ध करण्याचा हक्क पत्रकाराला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बहाल करतो.अश्‍यावेळी पत्रकारावर जीवघेणे हल्ले,मुस्कटदाबी याचा पुरजोर विरोध सर्वच स्तरावर झालाच पाहिजे,यात वाद नाही.

महत्वाचे म्हणजे शासनानेच बहाल केलेल्या पत्रकार सरंक्षण कायद्याच्या आधारे कृष्णा मस्के हे पोलिस आयुक्तांकडे दाद मागणार आहेत.
…………………….

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या