समाज माध्यमांवर उमटली तीव्र टिका
पुतणे,कार्यकर्त्यांची मनपात भर्ती:काम न करताच लाटतात पगार!
करोनाच्या काळात नागपूरकर जनता जीवन-मृत्यूशी झूंजत असताना भाजप नगरसेवकांचा असा ही प्रताप!
विरोधकांमध्ये श्मशान शांतता:ज्वाला धोटे यांचा प्रहार
नागपूर,ता.१६ सप्टेंबर २०२३: दोन वर्षां पूर्वी कोविड-१९ चा कहर संपूर्ण जगात बरपला,तसाच तो उपराजधानी नागपूरात ही प्रेतांचे खच रचून गेला.नागपूरकर जनतेच्या प्रत्येकाच्याच कुटूंबात कोणी ना कोणी आप्त,स्वकीय हा पीपीई किटमध्ये पूर्णत: झाकून श्मशान घाटांच्या बाहेर अत्यंविधीसाठी तातकळत प्रतिक्षेत असल्याचे,अंगावर शहारे आणनारे दृष्य उमटले होते.अशा वेळी मनपातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे दोन कर्तबकार नगरसेवक हे मनपाच्या परिवहन विभागात आपले पुतणे तसेच कार्यकर्त्यांना नोकरी लाऊन देण्यासाठी कार्यरत होते!
महत्वाचे म्हणजे दोन वर्षांपासून महिनाकाठी संपूर्ण पगार घेऊन देखील एक ही दिवस त्या कार्यकर्त्यांनी नोकरीवर रुजू होऊन काम केले नाही,फक्त मस्टरवर स्वाक्षरी करुन निघून जात होते,भाजपचे माजी परिवहन समितीचे सभापती व विद्यमान शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या दिमतीला ते कर्तव्यरत होते,असा आरोप कुण्या विरोधी पक्षाच्या नगरसेकवाने नव्हे, तर भाजपचेच माजी परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून काल केला आणि एकच खळबळ उडाली.
या व्हिडीयोमध्ये त्यांनी उघडपणे कबूल केले की त्यांनी परिवहन विभागात त्यांच्या दोन पुतण्यांना नोकरीवर लावले.मात्र,आता कोणाच्या तरी इशा-यावरुन त्यांच्या पुतण्यांना परिवहन समितीचे प्रशासकीय अधिकारी पागे हे त्रास देत आहेत.दूसरीकडे परिवहन समितीचे सभापती असताना बंटी कुकडे यांनी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना तीन वर्षांपूर्वी शुभम माेहने व निखील कावळे यांना तिकीट तपासणीस म्हणून नोकरीवर लावले परंतू हे दोन्ही कार्यकर्ते एक ही दिवस कामावर गेले नसून फक्त सही करुन निघून जातात व बंटी कुकडे यांच्याकडे घरगडी असल्यासारखे काम करीत आहे!
अर्थातच हा आरोप अतिशय गंभीर आहे.नागपूर महानगरपालिका ही नागपूरकर जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी संवैधानिकरित्या व कायदेशीररित्या बांधिल आहे.या मोबल्यात ही स्थानिक स्वराज्य संस्था नागपूरकरांकडून वेगवेगळे कर वसूल करते.मालमत्ता कर,पाणी कर,रस्त्याचा कर,बांधकामांचा कर,विक्री कर इत्यादी प्रकारच्या करांच्या बोजाखाली नागपूरकर भरडले जात असताना जनतेच्या कराच्या पैशांतून सत्ताधारी भाजपचे नेते मात्र, हे आपापल्या नातेवाईकांना व कार्यकर्त्यांचे पोषण करण्यासाठी जनतेच्या कष्टाचा पैसा स्वत:ची मिळकत समजून कशाप्रकारे उधळत आहे,याचे बोरकर यांचा व्हिडीयो उत्तम उदाहरण असल्याची जहाल टिका समाज माध्यमांमध्ये उमटली आहे.
बोरकर यांचा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांमध्ये या दोन्ही नेत्यांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नुकतेच बाल्या बोरकर यांनी त्यांच्या पूर्व नागपूरातील प्रभाग क्र.२३ मध्ये गडर लाईन्सचा व्यास वाढवणे तसेच सिमेंटच्या रस्त्यांसाठीची फाईल तयार करुन मनपा आयुक्तांकडे सोपवली मात्र,माशी कुठे शिंकली माहिती नाही,ती फाईल दडवून ठेवण्यात आल्यामुळे बाल्या बाेरकर यांनी याच महिन्याच्या सुरवातीला पत्रकार परिषद घेऊन, त्यांच्या प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ५० कोटींच्या कामांची फाईल रोखून ठेवल्याचा आरोप केला.या विरोधात १५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही दिला.लगेच ४ सप्टेंबर रोजी बोरकर यांची समजूत घालून भाजपचे मनपातील सर्वच नेते व माजी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातली ‘विकास कामे‘रखडली म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या पंधरा वर्षांपासून मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. आपापल्या प्रभागातल्या गडर लाईन्सपासून तर रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी पंधरा वर्षांचा अवधी हा पुरेसा असतो मात्र गेल्या दीड वर्षांपासून मनपात प्रशासक व्यवस्था लागू झाल्यानंतर व निवडणूका तोंडावर आल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांच्या समस्यांची जाणीव झाली,वारंवार चोक होणारी ड्रेनेज लाईन्स आठवली,त्यासाठी मनपा आयुक्तांवर दबाव आणून निधी मंजूर करण्यासाठी ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला,हे सर्व ‘जनते’साठी असल्याचा समज मात्र कोणाचाही झाला नाही,इतकी भ्रष्ट प्रतिमा जनतेमध्ये भाजपच्या सत्ताधारी नेत्यांची व नगरसेवकांची समाज माध्यमांवरही दिसून पडते.
एवढंच नव्हे तर परिवहन समितीकडून उपराजधानीतील परिहवन व्यवस्था सांभाळणा-या तिन्ही बस ऑपरेटर्सच्या निविदांना घेऊनही बाल्या बोरकर यांनी, गंभीर आरोप करीत मनपा आयुक्तांकडे माहीती मागितल्याचे पत्र ही समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले.या तिन्ही बस ऑपरेर्ट्सला कंत्राट मिळाल्याच्या पाच वर्षानंतर प्रत्येकी ५० मिडी व १५ मिनी बसेस स्वखर्चाने खरेदी करायच्या होत्या मात्र,आज नागपूरच्या रस्त्यांवर अक्षरश:भंगार बसेस धावत असून अनेक मिडी बसेसला आग लागण्याच्या घटना अद्याप नागपूरकर प्रवासी विसरला नाही.जनतेच्या जीवावर उदार होऊन मनपातील काही भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी यांच्या मुजोर कारभाराचे हे एक ज्वलंत उदाहरण सांगता येईल.
आयबीटीएम ऑपरेटरच्या निविदेला घेऊनही बाल्या बोरकर यांनी प्रश्न उपस्थित केले.प्रशासकीय अधिकारी पागे यांना निवृत्तीनंतर देखील नियमात बदल करुन पुर्ननियुक्त करण्यात आले हे विशेष!महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार वयाच्या ६५ वर्षांपर्यंत कंत्राटी पद्धतीवर नोकरीवर ठेवता येतं मात्र पागे यांचे वय ६९ वर्ष आहे,कोणाच्या मेहरबानीसाठी पागे यांच्यासाठी नियमात बदल करण्यात आला…..?
राठी कन्सन्टनतर्फे मेहूल रानडे यांनी चलो ॲपच्या कंपनीच्या व्यक्तीसोबत बसून टेंडर बनविले!पहिली निविदा ३१ दिवसांची काढण्यात आली होती.यामध्ये दोन कंत्राटदार आले असल्यामुळे ऑनलाईन सेंकड टेन्डर काढण्यात का आले नाही?फक्त ७ दिवसांचे कोरियन्डम काढून फक्त सोपस्कार का पार पाडण्यात आले?
आयबीटीएम कपंनीला एका महिन्याचे १ कोटी ८० लाख,१२ महिन्यांचे २१ कोटी ६० लाख व ५ वर्षाचे १०८ कोटी रुपये मनपा देते. १ बस ऑपरेटर(वाहक पुरवठा) एका महिन्याचे ३ कोटी रुपये दिली जातात.यानुसार ३ ऑपरेर्ट्सला महिन्याचे ९ कोटी तर १२ महिन्यांचे १०८ कोटी म्हणजे १० वर्षांचे १ हजार कोटी रुपये दिली जाणार आहे.कन्डक्टर कंपनीला एका महिन्याचे १ कोटी १० लाख रुपये,एका वर्षाचे १३ कोटी २० लाख आणि ५ वर्षांचे ६६ कोटी रुपये दिली जात आहे.नागपूर शहरात जेव्हा पहिल्यांदा बस सेवा सुरु झाली तेव्हा ३० टक्के दर कमी होता मात्र आता नवीन निविदांमध्ये हाच दर ३० टक्क्यांनी कसा वाढला?चलो ॲप व आय ट्रँगल या दोन्ही कंपन्या एकच आहेत का?निविदा काढताना निविदाकारांना ५० कोटी रुपयांचा टर्नओव्हर मागण्यात आला याचा अर्थ दुस-या कोणत्याही कंपनीने या निविदेमध्ये भाग घेतला नाही पाहिजे असा अर्थ धरायचा का?
आरटीओने ऑडीट केल्यानुसार जेएनआरयूएमच्या एकूण १२७ बसेस पैकी १०० बसेस या भंगार झालेल्या अाहेत! या बसेस स्क्रॅपमध्ये टाकण्यात याव्या अश्या सूचना आरटीओने मनपाला दिल्या आहे मात्र मागील दीड वर्षांपासून त्याच भंगार बसेस रस्त्यांवर धावत आहे.या बसेसला अपघात होऊन जिवित हानी झाल्यास जबाबदार कोण असणार?
मागील ७ वर्षांच्या आयबीटीएम कंपनीच्या टेंडरमध्ये सुपरव्हायजर,चेकर,संगणक ऑपरेटर यांच्या पगाराची कॉपी टेंडरमध्ये नमूद होती.पण ती ६ महिन्यांनंतर गायब झाली!टेंडरमध्ये सुपरव्हायजर,चेकर,संगणक ऑपरेटरला २५ हजारपेक्षा जास्त पगार देण्यात आला होता पण आता त्यांना १० हजार,९ हजार किवा १२ हजार एवढाच पगार दिला जातो.आयबीटीएम कंपनीचे १० ते १५ लोकं दिल्लीला बसून काम करतात.त्यांचे पगार लाखांच्या घरात आहेत,त्यांना हा पगार कोणत्या निकषाच्या अाधारावर दिला जात आहे?
ही सगळी प्रश्ने इतर कोणी नाही तर स्वत:परिवहन समिती सभापती राहीलेले बाल्या बोरकर यांनी स्वत:च्या लेटरहेडवर आयुक्तांना लिहलेल्या निवेदनात उपस्थित केली आहे….!
सत्ताधारी भाजपच्या परिवहन समितीचे दोन्ही माजी सभापती हे नागपूरकर जनतेच्या सेवेसाठी कश्याप्रकारचे राजकारण करीत होती याचा जाहीर उलगडाच बाल्या बोरकर यांच्या पत्राद्वारे व व्हिडीयोद्वारे झाला आहे.जनतेपेक्षा ऑपरेटर्सला फायदा पोहोचविणारी धोरणे राबविण्यात आल्याचे स्पष्ट दृष्टिक्षेपात दिसून पडतंय तरी देखील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात,भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना,’राज्यातली सत्ता तर गेली मात्र मनपातील सत्ता गमावू नका’असे मार्गदर्शन केले होते.अर्थात त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सरकार होती.अश्याच कारभारासाठी भाजपला मनपाची सत्ता गमवायची नाही आहे का?असा प्रश्न जनताच समाज माध्यमांवर आता भाजपला विचारत आहे.
महत्वाचे म्हणजे शहरातील विरोधी पक्षाचे दोन्ही आमदार व २९ काँग्रेसचे नगरसेवक हे ‘मौनी बाबा’च्या भूमिकेत वावरत असून बहूजन समावादी पक्षाचे १० नगरसेवकांचा देखील बाल्या बोरकर यांच्या या व्हायरल व्हिडीयोनंतरही आवाज बुलंद झाला नाही.राष्ट्रवादीचे एकमेव माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे हे पक्षीय राजकारणातच गुंतलेले आढळतात.इतर एका राजकीय पक्षाचे आंदोलन जगजाहीर आहे. नुकतेच या पक्षाने नासुप्र समोरही आंदोलनाची ज्योत पेटवली.सभापतींच्या भेटीनंतर या पक्षाचे पाचही पदाधिकारी,लाखांची वारी करुन जनते ऐवजी लक्ष्मीचरणी लीन झाल्याची चर्चा आहे.
परिवहन समितीकडून कशाप्रकारे टेंडर घोटाळे सुरु आहे,हे जगजाहीर करण्यासाठी परवा मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्याचे बाल्या बोरकर यांनी जाहीर केले होते मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,आमदार प्रवीण दटके यांनी समजूत घातल्याने ऐनवेळी ती रद्द केली.मात्र,कुकडे यांच्या कार्यकर्त्यांने त्याचे नाव घेतल्याने मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करीत, बाल्या बोरकर यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली व रात्री हा व्हिडीयो व्हायरल केला.
आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासोबत भेटीनंतर पक्ष कार्य वाढवण्यासाठी या दोन्ही माजी परिवहन समिती सभापतींमध्ये संघटनात्मक चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले….!
अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी मात्र या व्हिडीयोवर सडकून टिका केली व समाजमाध्यमात विरोधी पक्षांच्या भूमिकेवरच नव्हे तर अस्तित्वावरच कठोर ताशेरे ओढले.
वरिल गंभीर आरोप दखलपात्र नाही का ?राहुल सेना, उद्धव सेना ,शरद सेना, माया सेना आणि काही खूद की सेना (अपक्ष) या मंडळींकडून अजून पर्यंत कोणतीच निषेधार्थ प्रतिक्रीया आली नाही याचा स्पष्ट अर्थ होतो “हमाम मे सब नंगे ” ! खंबीर आणि निष्कलंक विरोधक नाही म्हणूनच सत्ताधाऱ्यांची एवढी “मजाल” होते.
आरोप तर अतिशय गंभीर आहेतच आणि पुराव्यासह आहेत असं छातीठोक म्हणणारे महाशय स्वताच आपले बिंग फोडून बसले कि “माझे दोन पुतणे महानगर पालिकेतील परिवहन विभागात आहे !!” नागपूरात सुशिक्षित बेरोजगारांची अक्षरशहा फौज निर्माण झाली असता नोकरी अभावी सर्वसाधारण कुटुंबातील युवक युवतींची भटकंती होत असतांना नगरसेवकांच्या आप्त तथा परिजनांना महानगर पालिकेत “वशिल्याने” हमखास नोकरी लागते ! काय दुर्दैव म्हणावं …आरोप करणारा देखिल आरोपी असू शकतो यात तीळ मात्र देखिल शंका नाही.
विरोधीपक्ष मौन आहे! आतापर्यंत तर वातावरण तापायला हवे होते आणि जोपर्यंत निःपक्ष चौकशी होऊन अहवाल सादर होत नाही तोपर्यंत बंटी कुकडेंना भा ज पा शहर अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी अशी निदर्शने चौका चौकात विरोधीपक्ष करू शकला असता किंबहुना एक आयती संधीच उपलब्ध झाली होती परंतु “तेरी भी चूप मेरी भी चूप” चा लपंडाव खेळ सूरू आहे .
ही स्थिती संपूर्ण महानगर पालिकेत दिसून येते.
अजुनही माजी नगरसेवकांच्या घरी महापालीकेचा एक गडी काम करीत आहे….नगरसेवक असतांना महापालीकेचा कर्मचारी संपुर्ण वेळ वापरतातच मात्र आता माजी झाल्यावर सुध्दा हा प्रकार सर्रास सुरु आहे. महानगर पालिकेच्या आयुक्त लक्ष देत नाही !?!
प्रत्येक नगरसेवकांच्या दिमतीला एक कर्मचारी म्हणजे मनपाचे जवळपास दोनशे कर्मचारी नगरसेवकांच्या सेवेला…प्रत्येकी ३०,००० पगार पकडला तर ३००००x२००–६०,०००००…साठ लाख…..गुणीले पाच वर्ष म्हणजे ३० कोटी रुपये…..अबब !! जनतेचे पैसे स्वतःसाठी वापरतात…..प्रचंड भ्रष्टाचार…यावर त्वरीत स्थगीती द्यावी मनपा आयुक्त यांनी.
जवळपास अशीच परिस्थिती फुटाळयात दिसून येते. फुटाळा तलावाच्या काठावर शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करून राहत असलेला काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक कमलेश चौधरी देखिल स्वताच्या गाई म्हशींचं शेण महानगर पालिकेतील सफाई कामगारांकडून ऊचलून घेत असतो.
कसले हे लोकप्रतिनिधी आणि कसली ही मुर्दाड जनता जी यांच्या सारख्या कलंकितांना निवडून देते. जनतेचे दुर्भाग्यच..
नागपूर महानगर पालिकेतील हा काही पहिलाच भ्रष्टाचार नव्हे या पेक्षाही भयंकर भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रसार माध्यमातून जनतेसमोर आले आहेत. पेन पेन्सिल,, कुलर, PPE KIT , कोरोना काळातील अनेक भ्रष्टाचार आणि “सार्वजनिक संडास” घोटाळा देखिल नागपूर करांनी अनुभवला आहे !!
असे आरोप म्हणजे , “म्हातारी मेल्याचं दूखं नाही परंतू काळ सोकावतो” असा आहे . जनतेचा विश्वासघात करणे हे नपरवडणारे आहे हे विसरून चालणार नाही. जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाही तर किमान अविश्वास तरी पत्करू नये.
भारतीय जनता पक्षाला तर हा घरचाच आहेर मिळाला आहे . किती लाजिरवाणी बाब आहे.कोणत्या थोबाडाने तुम्ही जनतेसमोर मतं मागायला जाणार ? निदान कुकडेची पदावरून हकालपट्टी करून उरली सुरली इज्जत तर वाचवा .
काँग्रेस पक्षाचे मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते अजून प्रतिक्रीया देत नाही ! आश्चर्य वाटते. उद्धव सेना शरद सेना आणि माया सेना चे मनपातील माजी गट नेते चूप्प! जनतेसमोर आता एक मोठा प्रशनंच आहे कि मतदान करायचे तरी कोणाला… ????
महानगर पालिकेच्या आयुक्तांना भेटून संबंधित दोषींविरुद्ध सक्त कारवाई तथा चौकशी समिती त्वरीत नेमावी यासाठी आग्रह धरणार आहे. जरी माला ठाउक आहे की सर्व प्रकरण अतिशय कुशलतेने दाबल्या जाणार परंतु संविधानीक देशाची एक सुशिक्षित आणि जागरूक नागरिक या नात्याने मी माझे कर्तव्य पार पाडणार कारण शेवटी पैसा जनतेचा (Tax) आहे कोणाच्या बापाचा नाही ! आणि नागपूर महानगर पालिका ही नागपूरकरांच्या कल्याणासाठी आणि सुव्यवस्थेसाठी आहे. नागपूर मनपा कोणा राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही …
“मराठा आरक्षण” विषयसंदर्भात संविधान चौकात निदर्शन करत बसता, सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते हजेरी लावतात परंतु नागपूर महानगर पालिकेतील या गंभीर प्रश्नासंदर्भात सर्वांच्या तोंडावर पट्टी !!
व्हा रे आज कल के नेता !
अश्या खरमरीत शब्दात ज्वाला धोटे यांनी या दोन्ही माजी मनपा सत्ताधा-यांचा व शहरातील विराेधी पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतला.
………………..